Total Pageviews

Sunday 24 June 2018

रोजगार, क्रयशक्ती वाढविणारे ओला, उबेर इंजीन… Source: तरुण भारत -यमाजी मालकर



ओला, उबेर या खासगी कंपन्या आहेत आणि त्यांच्या अस्तित्वाविषयी गेले चार वर्षे आपल्या देशात उलटसुलट चर्चा होत असली, तरी रोजगारसंधी वाढीसाठी आसुसलेल्या आपल्या देशाला आता त्यांच्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. खासगी कंपन्यांशी संबंधित संप झाला आणि मोठ्या समूहाला त्याचा त्रास झाला, त्यांची अडचण झाली, असे क्वचितच पाहायला मिळते. ओला, उबेरच्या चालकांच्या देशव्यापी संपात गेल्या महिन्यात ते पाहायला मिळाले. या कंपन्या किमान शहरी नागरिकांच्या आयुष्याचा एक भाग झाल्या आहेत, याची जाणीव त्यानिमित्ताने झाली. ओलात काम करणार्‍या चालकांची संख्या १० लाखांवर, तर उबेरकडे साडेचार लाख चालक आहेत. रेल्वेत काम करणार्‍यांची संख्या १४ लाख इतकी आहे आणि एकाच उद्योगात एवढी मोठी संख्या असणारा तो पहिल्या क्रमांकाचा संघटित उद्योग आहे. ओला, उबेर यांना संघटित मानायचे का, हा मुद्दा बाजूला ठेवला तर या उद्योगाने रेल्वेवरही मात केली आहे. ओला १०० आणि उबेर ३१ शहरांत असताना ही स्थिती आहे. याचा अर्थ, याच वेगाने ही सेवा विस्तारत गेली तर ओला, उबेर या कंपन्या भारतीय तरुणांना रोजगार देणार्‍या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या कंपन्या ठरतील. हा बदल अवघ्या चार वर्षांत कसा होत गेला, हे पाहणे फार महत्त्वाचे आहे.
गोष्ट दोन वर्षांपूर्वीची आहे. एक मित्र अमेरिका पाहून आला आणि अमेरिकेतील व्यवस्थेविषयी भारावून बोलू लागला. त्याने अनेक गोष्टी सांगितल्या, मात्र त्याला सर्वाधिक आकर्षण वाटले, ते तेथील शेअर टॅक्सीचे. ज्या मार्गाने आपल्याला जायचे आहे, त्या मार्गावर उभे राहून एका अ‍ॅपवर जाऊन आपल्याला कुठे जायचे हे नोंदविले की, शेअर टॅक्सी काही मिनिटांत येऊन आपल्याला घेऊन जाते, याचे त्याला फार अप्रूप वाटले. आपल्या देशात असे कधी होणार, असा त्याचा प्रश्‍न होता. पण, त्यापुढील काही महिन्यातच ओलाने शेअर सेवा सुरू केली आणि मेट्रो, बस, उपनगरी गाड्यांसाठी एकच तिकीट चालेल, अशी एक सोपी पद्धत मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर सुरू झाली. मुंबई-पुण्यासारख्या शहरात आता ओला शेअर सेवा वापरणार्‍यांची संख्या वेगाने वाढत चालली आहे.
भारतीय नागरिक इतक्या वेगाने या सेवा का स्वीकारत आहेत, हे जाणून घेण्यासाठी गेल्या आठवड्यात मी एक प्रयोग केला. पुण्यात ज्या प्रमुख मार्गावर बसने जाता येते, त्यातील काही मार्गांवर ओला शेअरने जाण्याचे ठरविले. पौड रोड (कोथरूड) ते लक्ष्मी रोड हे चार किलोमीटर अंतर जाण्यासाठी ३२ रुपये लागले, रिक्षाने या अंतराला साधारण ६० ते ७० रुपये लागतात. बसने १० रुपये लागतात, पण बसमध्ये धक्के खात जाण्याची तयारी ठेवावी लागते. अर्थात, यावेळी ओला मिळण्यासाठी १० मिनिटे लागली. दुसर्‍या फेरीत अप्पा बळवंत चौक ते पौड रोड या रूटवर ओला शेअर दोन मिनिटांत मिळाली आणि भाडे झाले ३२ रुपये. ३२ रुपयांत एसी कारमध्ये प्रवास. पर्वती ते पौड रोड या अंतरासाठी रात्री ९ वाजता ५० रुपये लागले आणि ओला मिळण्यासाठी १० मिनिटे लागली. फोनमध्ये ओलामनी असल्याने कुठेही रोख पैसे देण्याची गरज पडली नाही. त्याच मार्गावर दुसर्‍या प्रवाशाला घेण्यासाठी गाडी थांबली, तेव्हा एकदाही अधिक वेळ गेला नाही. बुक केल्यावर पहिल्या एक मिनिटात फेरी रद्द केली तर काहीही दंड नाही. चांगली गाडी असेल तर गाडीत मनोरंजनाची आणि वायफायची सोय. वेळ लागणार असेल तर दुसर्‍या गाडीला जोडण्याचे काम, काही संकट आले तर इमर्जन्सी नावाचे बटन, गाडीतून उतरताच किती पैसे झाले, हे स्क्रीनवर. तुमच्या रूटचा नकाशा आणि मिनिटांचा लगेच हिशोब, चालकाचे नाव, गाडीचा नंबर आणि लागेलेले भाडे, याचा मेल आभारासह काही मिनिटांत तुमच्या मेलबॉक्समध्ये येऊन पडतो. आता बाहेरगावी एकतर्फी भाड्यात जाण्याची सोय या कंपन्यानी केली आहे. अशी बरीच माहिती त्या त्या चालकाशी बोलून मिळाली. चालक अतिशय नम्र. त्यांनी ओलाचे अ‍ॅपचे तंत्रज्ञान उत्तम रीत्या शिकून घेतलेले आणि बहुतांश चालक पुण्याबाहेरून रोजगाराच्या शोधात आलेले. काही तर उच्च शिक्षित तरुण. दिवसाची कमाई किमान १५०० ते २००० रुपये. (गेल्या काही दिवसांत गाड्या वाढल्याने कमी झाल्याची तक्रार) ओला, उबेर सेवा असलेल्या प्रत्येक शहरात हेच चित्र असणार.
उबेर ही विदेशी बहुराष्ट्रीय कंपनी, तर ओला ही भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी. या दोन्ही कंपन्यांची आर्थिक स्थिती सध्या चांगली नाही, कारण भारतीय बाजारपेठ काबीज करण्यासाठी त्यांनी सुरवातीला प्रचंड पैसा ओतला. आता मात्र स्पर्धा बाजूला ठेवून एकत्र येण्याचा विचार त्यांना करावा लागतो आहे. ज्या जपानी सॉफ्ट बँकेचे कर्ज या दोन्हीही कंपन्यांनी घेतले आहे, ती बँक आता या कंपन्यांच्या मागे लागली आहे. त्यामुळेच उबेरने आशियातील सेवा बंद करून म्हणजे त्याची विक्री करून अमेरिका आणि युरोपच्या बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात, ओला, उबेरची सेवा वापरताना या सर्व आर्थिक ताणाचा मागमूस नाही. उबेरमध्ये आठ दिवसांनी आमचे पैसे जमा होतात, मात्र ओलात दररोजच्या दररोज हिशोब होतो, अशी माहिती या चालकांनी दिली. या कंपन्यांवर काही संकट येऊ शकते, अशी कल्पनाही हे चालक आज करू शकत नाही, कारण त्यांनी कर्ज काढून गाड्या घेतल्या आहेत आणि त्या गाड्यांचे हप्ते त्यांना वेळेत भरायचे आहेत. शिवाय (एका गाडीमागे) एवढ्या भांडवलात दोन माणसांना ६० हजार महिन्याला मिळण्याची आज दुसरी कुठलीही संधी साडेचौदा लाख तरुणांना दिसत नाही.
१३० कोटी लोकसंख्या असलेल्या देशात सेवाक्षेत्र काय किमया करू शकते, याचे हे उत्तम उदाहरण आहे. ओला, उबेरमुळे रिक्षाचालकांच्या व्यवसायाचे काय होणार, मोनोपॉली झाली तर या कंपन्या कशा वागतील, चालकांचे शोषण केले जात आहे, असे काही प्रश्‍न आहेतच. पण ते आहेत, म्हणून हा बदल आता थांबणार नाही. प्रवासासारख्या सुविधेची प्रचंड गरज असताना आपण तिचा दर्जा आणि व्याप्ती वाढवू शकलो नाही, विशेषत: देशभरात वर्षानुवर्षे ज्या लाखो रिक्षा, काळीपिवळी, वडाप, सहा आसनी रिक्षा आणि खासगी बस फिरत आहेत, त्यांचे चालक आजही असंघटित आहेत. त्यांना आर्थिक सुरक्षितता नाही. कोणत्याही सेवासुविधा नाहीत. हे मार्केट ओला, उबेर चालविणार्‍या उद्योजकांनी ओळखले आणि त्या क्षेत्रातील या त्रुटी कमी करून चांगली सेवा देण्याचा प्रयत्न केला. या सेवेचे वय आहे अवघे चार वर्षे. पण, त्यात दररोज बदल होत आहेत आणि ते तेवढ्याच वेगाने स्वीकारले जात आहेत.
खासगी उद्योजक नफ्यासाठी भांडवल टाकत असतात, त्यामुळे त्यांना नफा घेण्याचा अधिकार आहेच. पण, त्यातून व्यापक समाजहित साधले जाते ना, हे पाहण्याची जबाबदारी सरकारची असते. त्यामुळे या सेवेत जे काही प्रश्‍न निर्माण होतील, ते देशातील कायद्यांनुसार सोडविले जातील. मुद्दा आहे, रोजगारसंधी सेवाक्षेत्रातून किती चांगल्या पद्धतीने वाढू शकते, हे ओळखण्याचा. ज्या ओला, उबेरसारख्या सेवांनी आपल्या साडेचौदा लाख तरुणांना रोजगार दिला आहे, अशा सेवांकडे गंभीरपणे पाहिले गेले पाहिजे. रेल्वेने प्रवास करण्यासाठी चार महिने आधी आरक्षण करावे लागते, बस उभी राहिली की भरून वाहते, रिक्षा आणि काळीपिवळीमध्ये अजूनही लोक दाटीवाटीने प्रवास करतात, ही सेवाक्षेत्रातून रोजगार आणि क्रयशक्ती मिळविण्याची मोठी संधी आहे. ओला, उबेरसारख्या धाडसांकडे सकारात्मकदृष्ट्या पाहिले की अशाच संधी देशाला पुढे घेऊन जातील

No comments:

Post a Comment