Total Pageviews

Monday 4 June 2018

पाकिस्तान कुणाचे ऐकेल असे आजतरी कुणी सांगू शकत नाही-महा एमटीबी

सीमेवरील भारतीय चौक्यांवर पाकिस्तानी सैन्याने हल्ला करून, सीमा सुरक्षा दलाच्या दोन जवानांच्या घेतलेल्या बळींमुळे पुन्हा एकदा हे सिद्ध झाले आहे की, इस्लामाबाद बोलतो वेगळेच अन कृतीत आणतो दुसरेच. पाकिस्तानच्या या कृतीमुळे खोर्‍यात संतापाची लाट उसळणे स्वाभाविक आहे. जम्मू-काश्मीरचे ऊर्जामंत्री सुशील शर्मा यांनी, पाकिस्तानला या दुःसाहसाबद्दल योग्य तो धडा शिकविला जाईल, असा इशाराच दिला आहे. उभय देशांच्या डीजीएमओंनी २००३ साली मान्य केलेल्या शस्त्रसंधीचे भारताकडून पूर्णतः पालन होत असताना पाकिस्तान मात्र वारंवार आगळीक करून त्याचे उल्लंघन करतो आणि त्यामुळे सीमेवरील गावांमध्ये दहशत पसरते. पाकिस्तानच्या या कृतीमुळे सीमेवरील अनेक लोकांना गाव सोडून जावे लागलेले आहे. कुणाला त्यांची भरली शेती सोडावी लागली, तर कुणाला त्यांचे राहते घर सोडावे लागले. पाकिस्तानच्या कृतीमुळे मुलांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. कालच्या हल्ल्यात सहायक उपनिरीक्षक सत्यनारायण यादव आणि कॉन्स्टेबल विजयकुमार पांडे हे दोघे शहीद झाले. पण, भारताने पाकिस्तानच्या या कृतीला जोरदार प्रत्युत्तर देत त्यांच्या ११ चौक्या उद्ध्वस्त केल्या. पाकिस्तानचे काही सैनिकही या कारवाईत दगावले. तथापि, त्यांचा आकडा कळू शकलेला नाही. गेल्या शनिवारीच पाकिस्तानच्या लष्करी मोहिमेच्या महासंचालकांनी भारतीय लष्करी महासंचालकांशी हॉटलाईनवर चर्चा करून संघर्षविरामाचे उल्लंघन होणार नाही, याचे आश्‍वासन दिले होते. पण, त्या आश्‍वासनाची शाई वाळते न वाळते तोच पाकिस्तानने पुन्हा एकदा शब्द मोडला. अखनूर सेक्टरमधील प्रागवला आणि कानचाक तसेच खौर सेक्टरमधील बीएसएफच्या तळांना आणि लोकवस्त्यांना लक्ष्य करण्यात आले.
 
पाकी सैनिकांनी केवळ गोळीबारच केला नाही तर तोफगोळेदेखील डागले. म्हणूनच या प्रकाराला बोलायचे एक आणि वागायचे वेगळेच असे म्हणायला हवे. हा प्रकार घुसखोरीतून उद्भवलेला नसून पाकिस्तानी सैन्याने एकाएकी सीमेपलीकडून केलेल्या अंदाधुंद गोळीबारातून झाल्याचे लष्करी अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे. मुस्लिमांसाठी पवित्र असलेला रमझान महिना सध्या सुरू आहे. या महिन्यात देव आणि समाजाला साक्षी ठेवून कडवा मुसलमान सत्कृत्य करण्याच्या आणाभाका घेत असतो. या सणाचे महत्त्व लक्षात घेऊन भारताने रमझानच्या महिन्यात कुठल्याही प्रकारे प्राणहानी टाळली जाईल, यासाठी प्रयत्नशील राहण्याची ग्वाही दिली. रमझानच्या महिन्यात लष्कराकडून अशा प्रकारच्या वागणुकीची अपेक्षा राज्याच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी व्यक्त केली आणि केंद्र सरकारने त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. पण, याउपरही पाकिस्तानकडून संघर्षविरामाचे उल्लंघन झाल्यामुळे दस्तुरखुद्द मेहबुबा मुफ्तीदेखील उद्विग्न झाल्या आहेत. त्यांनी, भारताने दिलेल्या संधीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघण्याचे विघटनवाद्यांना आणि पाकिस्तानलाही आवाहन केले आहे.
 
वारंवार भारत अशी संधी उपलब्ध करून देणे अशक्य असल्याची वस्तुस्थितीदेखील त्यांनी विदित केली आहे. पण, पाकिस्तान कुणाचे ऐकेल असे आजतरी कुणी सांगू शकत नाही. पूर्वी तो अमेरिकादी सरकारचे अथवा प्रशासनाचे ऐेकत तरी होता, पण आज ती वेळही निघून गेली आहे. अमेरिकेने पाकिस्तानने आश्रय दिलेल्या हाफिज सईद आदी दहशतवादाला प्रोत्साहन देणार्‍या नेत्यांच्या संघटनांच्या हालचालींवर नियंत्रण आणल्याने आणि त्यांच्या बँक खात्यांवर निर्बंध आणल्याने पाकिस्तानची नाराजी या देशाने ओढवली आहे. त्यामुळे पाकिस्तान अमेरिकेचे ऐकेल अशी आजची स्थिती नाही. पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून प्रत्युत्तर दिले जातेच, पण भारत सैनिकी चौक्यांना लक्ष्य करीत असताना पाकिस्तान मात्र भारतातील रहिवासी जागांवर हल्ले करून जनतेला भयभीत करीत असतो. त्यामुळे भारतीयांची प्राणहानी वाढते. कालचा हल्ला काळे बुरखे घातलेल्या इसमांनी केल्याचे सांगितले जात असले, तरी लष्करी अधिकार्‍यांनी तशी शक्यता साफ शब्दांत फेटाळून लावली आहे. शत्रू हा सीमेपलीकडीलच आहे. कारण गृहमंत्री राजनाथसिंह यांनी ज्यावेळपासून लष्कराला ठोशास ठोसा मारण्याचे आदेश दिले आहेत तेव्हापासून लष्करानेही त्या संधीचा योग्य फायदा घेऊन पाकिस्तानचे कंबरडे मोडण्यास मागेपुढे पाहिलेले नाही. ‘सर्जिकल स्ट्राईक’ हा पाकिस्तानविरोधात वापरलेला गनिमीकावाच होता.
 
पण, पाकिस्तान अजूनही बधलेला नाही. ‘सर्जिकल स्ट्राईक’मुळे आपले काही नुकसान झाले असेही पाकिस्तानला वाटत नाही. सीमेवरील कालच्या गोळीबाराची चौकशी झाल्यानंतरच भविष्यात त्याविरुद्ध कुठली पाऊले उचलायची, हे ठरविले जाणार आहे. पण, तोवर पाकिस्तान काही शांत बसणारा नाही. पाकिस्तानला ना रमझानचे काही पडले आहे, ना त्याला ईद आणि मोहर्रमशी देणेघेणे आहे. त्याला काश्मीरच्या आझादीचे तुणतुणे आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडायचे आहे आणि त्यातून भारतविरोधी आवाज बुलंद करायचा आहे. पण, पाकिस्तानची ही खेळी यशस्वी होण्याची नजीकच्या भविष्यात तरी शक्यता नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे मनसुबे जागतिक पातळीवर पोहोचविले आहेत. पाकिस्तान चीनच्या माध्यमातून भारताविरुद्ध ज्या कारवाया करीत आहे, त्यादेखील सांगून झाल्या आहेत. मोदी यांच्याच प्रयत्नांमुळे पाकिस्तान जगात वेगळा पडला आहे. पाकिस्तानातील सत्तासंघर्षदेखील दहशतवादाला कारणीभूत ठरत आहे. या देशातील नेतृत्व जोवर भारताला विरोध करीत नाही, त्याच्याशी संघर्षाची भूमिका घेत नाही, तोवर तेथील नेतृत्वाला मान्यता मिळत नाही, लोकप्रियता मिळत नाही, हा इतिहास आहे. त्यामुळे या देशात पंतप्रधान कुणीही असला, तरी त्याला याच धोरणाची री ओढावी लागते. सत्ताधारी असो की विरोधी, हे सारे भारताचा मुद्दा आला की त्याविरुद्ध एकत्र होताना दिसतात. पण, हळूहळू या देशातील सुधारणावादी आणि विदेशात शिक्षण घेणार्‍या पाकिस्तान्यांना वस्तुस्थितीचा बोध व्हायला लागलाय्.
 
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या वेळी विदेश दौर्‍यावर जातात, त्या वेळी त्यांचे जसे उत्स्फूर्त स्वागत तेथील भारतीय समुदायाकडून आणि त्या त्या देशांच्या सरकारी यंत्रणांकडून होते, तसे पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे कधीच होत नाही, ही बाब आता उकलू लागली आहे. भारताचा दबदबा वाढल्याने पाकिस्तान एकाकी पडत आहे. ही बाब आता त्यांच्या मुत्सद्यांनाही कळू लागली आहे. पण, देशातील राजकीय नेतृत्व, आयएसआय आणि लष्करी नेतृत्व यांच्यात सुप्रीमसीवरून सुरू असलेल्या सुप्त संघर्षाचे पडसाद देशातील घडामोडींवर आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरही उमटताना दिसत आहेत. म्हणूनच तेथील नेतृत्वाने केलेल्या शांततेच्या आवाहनाला प्रतिसाद मिळताना दिसत नाही. दहशतवादी आपल्याच देशातील मशिदीत बॉम्बस्फोट करताना दिसतात, त्यांच्या मुसक्या आवळण्याचे प्रयत्न झाले तर त्यांच्यातीलच काही लष्करी तळावर आणि त्यांच्या शाळांवर हल्ले करताना मागेपुढे बघत नाहीत! या सुप्त सत्तासंघर्षातून पाकिस्तानात राजकीय हत्यादेखील झाल्या आहेत. पाकिस्तानी कुरापतखोर आपला देश तर अस्थिर करतातच, शिवाय भारतालाही वेठीस धरतात. पण, यावेळी भारताने निश्‍चय केलेला आहे, पाकिस्तानने स्वतःत बदल करावा किंवा त्याने बेचिराख होण्यास तयार राहावे, अशी धमकीच पाकी नेतृत्वास देण्यात आली आहे

No comments:

Post a Comment