Total Pageviews

Sunday 3 June 2018

नवे माहिती-तंत्रज्ञानही सुरक्षिततेसाठी प्रभावीपणे वापरले जाऊ शकते- डॉ. दीपक शिकारपूर



ब्रिटिश राजवटीत काठीला सोने बांधून काशीला जायची सोय होती...! असे म्हणतात. कारण, त्या काळी कायद्याचा वचक तसा असावा. परंतु, सध्या विविध कारणांमुळे कायद्याचे राज्य कमी होत चालले आहे. सध्या सर्वत्र वैयक्‍तिक असुरक्षिततेचे वातावरण आढळत आहे. अनेक प्रकारचे गुन्हे (चोरी, बलात्कार, शोषण, मारहाण इत्यादी) लहान बालकांपासून ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत घडत आहेत. अर्थात, पारंपरिक उपायांसोबतच नवे माहिती-तंत्रज्ञानही सुरक्षिततेसाठी प्रभावीपणे वापरले जाऊ शकते. त्याची काही उदाहरणे आपण पाहू.
सुरक्षिततेचा विषय निघाला की साधारणतः प्रथम आठवतात सीसीटीव्ही ऊर्फ क्लोज्ड सर्किट टेलिव्हिजन कॅमेरा. हॉटेलपासून बँकांपर्यंत आणि परीक्षा केंद्रांपासून तुमच्याआमच्या घरापर्यंत बहुधा सर्वाधिक प्रमाणात आढळणारे हे उपकरण असावे. 
आता या तंत्रामध्ये आणखी सुधारणा होत आहे. घरात लावलेले कॅमेरे घरातील व्यक्तींना चेहर्‍याने ओळखून त्यानुसार स्वतःची कार्यपद्धती ठरवणार किंवा बदलणार आहेत. सजग पोलिस आणि नागरिकदेखील कॅमेर्‍यात बंद झालेल्या व्यक्तींच्या संशयास्पद हालचाली पाहून त्यांना पकडण्यासाठी अधिक माहिती अन्य मार्गाने मिळवू शकतात. बीजिंग, लंडनसारख्या शहरांत जवळजवळ सर्व काने-कोपरे सीसीटीव्हीने व्यापले आहेत. त्याची संख्या हि अजस्त्र म्हणजे 3 लाखांहून अधिक आहे.
आज जवळजवळ प्रत्येकाच्याच हाती दिसणार्‍या मोबाइल फोनचाही वापर अतिशय प्रभावीरीत्या करता येतो. यासाठी आपल्याकडे स्मार्टफोन असण्याचीही तसे पाहिले तर गरज नाही. अगदी साधा वाटणारा फोनदेखील इमर्जन्सी तसेच फेक कॉल करू शकतो. फोनची बॅटरी पूर्णपणे डिस्चार्ज झाली असली तरीही ठराविक नंबरला इमर्जन्सी कॉल त्यावरून होऊ शकतात. फेक कॉल म्हणजे एकट्याच असणार्‍या वापरकर्त्याला कोणी धमकावत असेल, त्रास देत असेल तर तो किंवा ती एकटी नसून कोणाच्यातरी संपर्कात आहे, असे भासवणारा बनावट कॉल. हा कॉल खरा नसतो तर फक्त रिंग वाजते व समोरच्या व्यक्तीला वाटते वापरकर्त्याला कॉल आला आहे.
काही बिकट स्थितीत सापडलेली अशी व्यक्‍ती सद्यस्थितीचा फोटो काढून पाठवू शकते. सेलफोनमध्ये समाविष्ट असलेल्या जीपीएस, लोकेशन सेन्सर अशा सुविधांचा वापर करून निदान फोनधारकाचे स्थान तरी निश्चित करणे इतरांना सोपे जाते. जीपीएस समाविष्ट असलेले स्मार्ट वॉचदेखील मिळते. गाडीच्या रिमोट लॉकिंगसारखेच दिसणारे हे एक सुरक्षा-उपकरण आहे. त्यावरील योग्य ती बटने दाबली असता ते पूर्वनिर्धारित मोबाइल क्रमांकांना संदेश पाठवू शकते, स्वतःचे स्थान जाहीर करू शकते तसेच मोठा आवाजही काढू शकते.
 सुरक्षितता जपण्यासाठी साह्य करणारी अक्षरशः शेकडो मोबाइल अ‍ॅप्स उपलब्ध आहेत असे अ‍ॅप हॅँडसेटमध्ये स्थापित केले गेले की फक्‍त एका बटनावर ते वापरकर्त्याची गरज आणि पसंतीनुसार विविध कामे करू शकते. काही हॅँडसेट्स जोरात हलवले तरी संबंधित अ‍ॅप चालू होऊ शकते. यापेक्षाही भन्नाट म्हणजे पीडित व्यक्‍ती स्वतःच जोरात किंचाळली वा ओरडली तरी त्याद्वारे देखील ट्रिगर होणारे अ‍ॅप मिळते. प्रकृती अचानक बिघडणे, अपघात, भूकंप, चक्रीवादळ अशांसारख्या संकटांतही ही अ‍ॅप्स वापरून मदत मिळवणे शक्य असते. अशी अ‍ॅप्स महिलांप्रमाणेच लहान मुले, एकटेच राहणारे ज्येष्ठ नागरिक, विरळ लोकवस्तीच्या भागांत राहणार्‍या व्यक्‍ती आदींना उपयुक्त असतात. 
सर्कल ऑफ सिक्सहे अ‍ॅप अँड्रॉइड तसेच आय ओएसवर चालू शकते. हेदेखील फ्री आहे. यामध्ये आपण सहा जवळचे मित्र वा नातलग निवडून, त्यांचे नंबर फीड करून ठेवू शकता. आणीबाणीच्या प्रसंगी वापरकर्त्याने कोणाशी संपर्क साधायचा, हे ठरवून त्यानुसार स्क्रीनवरील प्रतिमा टॅप करायची असते. याशिवाय मदतकर्त्याने संकटस्थळी यायचे आहे (कार), कॉल करायचा आहे (फोन) की मेसेज पाठवायचा आहे (टेक्स्ट) हे निवडण्याचा पर्यायही वापरकर्त्याला आहे. याखेरीज रक्षा, निर्भया अशी आणखीही अनेक अ‍ॅप्स आहेत. काहींमध्ये अ‍ॅप चालू स्थितीत असावे लागते तर काही अ‍ॅप्स निव्वळ व्हॉल्यूम की 3 सेकंद दाबून धरल्याने किंवा पॉवर बटन दोनदा लागोपाठ दाबल्यानेही पूर्वनिश्चित नंबरला धोक्याचा संदेश पाठवू शकतात


No comments:

Post a Comment