Total Pageviews

Saturday 16 June 2018

समुद्रातील प्रदूषण : एक गंभीर समस्या : तरुण भारत

गेल्या काही वर्षांपासून जागतिक तापमानात जे बदल झाले आहेत, त्याचे विपरीत परिणाम आम्ही अनुभवत आहोत. वातावरणात झालेल्या बदलांमुळे ऋतुचक्रच बदलले आहे. पावसाळ्यात पाऊस कमी पडतो आहे. अवकाळी पावसाचे आणि गारपिटीचे प्रमाण वाढले आहे. वेळेवर पाऊस पडत नसल्याने आणि जो पडतो तो पुरेसा नसल्याने शेती, उद्योग यासाठी पाणी कमी पडतेच आहे, पिण्याच्या पाण्याचीही अभूतपूर्व टंचाई निर्माण झाली आहे. मी हे विदर्भ, महाराष्ट्र वा विशिष्ट राज्याबद्दल लिहीत नाही. जगातील अनेक देशांमध्ये अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात असतानाच उपायांवरही विचार सुरू झाला, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हटली पाहिजे. जगभर सगळीकडेच यांत्रिकीकरण झाले असल्याने आणि रसायनांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने, जंगलांची मोठ्या प्रमाणात कटाई झाली असल्याने वायुप्रदूषणही वाढले आहे आणि आज मी ज्या विषयाला हात घालत आहे, तो तर अतिशय गंभीर विषय आहे.
जगभरातले जे समुद्र आहेत, त्या समुद्रातले पाणीही प्रदूषित होत चालले आहे. आम्ही शहरांमध्ये जी घाण निर्माण करतो, ती समुद्रात जाण्यापासून रोखण्यासाठी काहीच करीत नसल्याने परिस्थिती चिंता करायला लावणारी झाली आहे. जगात अण्वस्त्रांची स्पर्धा सुरू झाली आहे, अनेक प्रकारचे गंभीर आजार लोकांना सतावत आहेत, त्या आजारांवर औषधे उपलब्ध होत नसल्याने या वैज्ञानिक प्रगत युगातही माणसं मृत्यूच्या विळख्यात सापडत आहेत. एकूणच सगळी परिस्थिती विचारात घेतली, तर मनुष्यजीवन अनिश्‍चित झाले आहे. केव्हा काय होईल, काही सांगता येत नाही. गेल्याच आठवड्यात हवाई बेटांवर ज्वालामुखींचा उद्रेक झाला. त्यामुळे तिथले जनजीवन विसकळीत झाले. गेल्या मंगळवारी रात्री पाकिस्तान, अफगाणिस्तान, भारताची राजधानी दिल्ली एनसीआरसह उत्तर भारतही भूकंपाने हादरला. निसर्गाचा समतोल बिघडविण्याचे पाप आम्ही करीत असल्याने त्याची फळे आम्हाला इथेच विनाशकारी संकटांच्या रूपात मिळत आहेत.
मध्यंतरी, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी इंग्लंडला जाऊन आले. राष्ट्रकुल गटातील देशांची एक महत्त्वपूर्ण बैठक तिथे आयोजित करण्यात आली होती. अण्वस्त्र स्पर्धा, दहशतवाद, परस्परसहकार्य अशा अनेक गंभीर विषयांवर त्या बैठकीत चर्चा झाली. तिथे समुद्रांमधील प्रदूषणावर चर्चा होऊन एखादी संयुक्त मोहीम राबविण्यासंदर्भात निर्णय होईल, असे अपेक्षित होते. परंतु, दुर्दैवाने सामुद्रिक प्रदूषणाचा विषय तिथे चर्चेला आलाच नाही. याचाच अर्थ असा की, समुद्राला ग्रासलेल्या प्रदूषण संकटाचे गांभीर्य अजूनही अनेक देशांच्या लक्षातच आलेले नाही. आर्थिक विकास, मानव सुरक्षा, दहशतवाद या सगळ्या मुद्यांवर चर्चा होणे अपेक्षित होतेच, पण प्रदूषणाच्या मुद्यावरही चर्चा व्हायला हवी होती. ती झाली नाही. जगासमोर अनेक समस्या आहेत, अनक आव्हाने आहेत. त्यांची यादी केली तर ती फार मोठी होईल. या यादीत एकेका समस्येची भरच पडत चालली आहे. एकही समस्या मुळापासून कायमस्वरूपी सोडवण्यात आम्हाला अद्याप यश आलेले नाही. विज्ञानात प्रगती झाली, नवनवीन शोध लागले, अत्याधुनिक अशी इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरात आली. जी कुचकामी ठरली ती भंगारात फेकण्यात आलीत. त्यामुळे जगभरातील प्रगत देशांमध्ये मोठ्या प्रमाणात ई-कचरा तयार झाला. हा ई-कचरा कुठे फेकायचा, असा प्रश्‍न पडताच, विकसनशील देशांना आर्थिक मदतीच्या बदल्यात ई-कचराही देण्यात आला. आता विकसनशील देश तरी या कचर्‍याचे करणार काय? अनेकांनी तो समुद्रात फेकून दिला. त्यामुळे समुद्रातील प्रदूषण वाढले. अजूनही वेळ गेलेली नसली तरी जो धोका निर्माण झाला आहे, त्याचे गांभीर्य आम्ही लक्षात घेतले नाही, तर प्रदूषणाचा हा धोका आम्हाला विळखा घातल्याशिवाय राहणार नाही!
एका डच फाऊंडेशनने मार्च महिन्यात एक अहवाल जारी केला. सतत तीन वर्षे अभ्यास केल्यानंतर हा अहवाल जारी करण्यात आला. या अहवालात कचर्‍यासंबंधी आणि कचर्‍यामुळे झालेल्या प्रदूषणासंबंधी गंभीर इशारा देण्यात आला आहे. जगभरातले समुद्र पृथ्वीवरील कचरा स्वत:मध्ये सामावून घेत आहेत. इतर कुठल्या कचर्‍यापेक्षा प्लॅस्टिकचा जो कचरा आहे, तो जास्त घातक आहे. प्लॅस्टिकमुळे समुद्रांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आपण कधी मुंबईला गेट वे ऑफ इंडियाजवळचा समुद्र पाहायला गेलात, तर त्या ठिकाणच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकच्या बाटल्या, पिशव्या तरंगताना दिसतील. आता या बाटल्या आणि पिशव्या कुणी फेकल्या? आपल्याच बंधू-भगिनींनी फेकल्या आहेत! आधीच तर सगळ्या गटारगंगा समुद्राला जाऊन मिळत असल्याने समुद्राचे पाणी प्रदूषित झाले आहे. त्यात आम्ही ई-कचरा आणि प्लॅस्टिक समुद्राच्या पाण्यात फेकत असल्याने धोका आणखी वाढला आहे. पूर्वीच्या काळात उपाय करता येणे शक्य नव्हते. पण, आता नवनवीन शोध लागले असल्याने निगराणी ठेवता येणे शक्य आहे. समुद्रात प्लॅस्टिकचाच काय, कुठलाच कचरा फेकला जाणार नाही, अशी उपाययोजना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने करता येणे शक्य आहे.
ज्याला समुद्राच्या आरोग्याची जराही माहिती आहे, त्याला या प्रदूषणाचे गांभीर्य नक्कीच लक्षात येईल. समुद्रात आपण जो कचरा फेकतो, त्यातील प्लॅस्टिकचा कचरा पाण्यावर तरंगत असतो. तो हवेच्या झोकाने इकडेतिकडे फिरत राहतो. पण, जो कचरा घन असतो, तो तळाशी जाऊन बसतो. यामुळे पाणी तर खराब होतेच, या खराब पाण्यामुळे समुद्री जिवांनाही धोका निर्माण होतो. याकडे आज लक्ष दिले जात असले, तरी ज्या गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे, त्या गांभीर्याने ते दिले जात नसल्याचे लक्षात आले आहे. नुकताच या सदंर्भात डच फाऊंडेशनने जो अभ्यास केला, त्यातील निष्कर्षानुसार, जगातल्या सगळ्यात मोठ्या कचर्‍याच्या भंडाराचे नाव आहे- ग्रेट पॅसिफिक गार्बेज पॅच! याला ‘जीपीजीपी’ या संक्षिप्त नावाने ओळखले जाते. याचा आकार म्हणाल तर फ्रान्स या देशाच्या आकाराच्या तिप्पट आहे. डच फाऊंडेशनच्या अभ्यासातील निष्कर्षानुसार, या जीपीजीपीचा आकार १६ लाख वर्ग किलोमीटरच्या बरोबरीने आहे. यात एकूण ८० हजार मेट्रिक टन कचरा आहे. यावरून या समस्येचे गांभीर्य आपल्या सहज लक्षात यावे.
या अभ्यासात जो निष्कर्ष पुढे आला, त्यानुसार दरवर्षी महासागरांमध्ये ८० लाख टन प्लॅस्टिक कचरा फेकला जातो. ब्रिटनमधील एक संस्थेच्या अहवालातही याची पुष्टी करण्यात आली आहे. आताच प्लॅस्टिक कचर्‍याला आवर घातला नाही, तर २०२५ सालापर्यंत हा कचरा तीनपट वाढेल. जगातल्या तमाम राजकीय नेत्यांनी याकडे जास्त गांभीर्याने लक्ष देत ही समस्या सोडविण्याची आवश्यकता आहे. जर का प्लॅस्टिकचा हा कचरा आम्ही थांबवला नाही, तर जमा होत जाणार्‍या प्लॅस्टिकचे रूपांतर मायक्रोप्लॅस्टिकमध्ये होईल आणि नंतर हेच प्लॅस्टिक समुद्रजीवनाचा एक हिस्सा बनून जाईल. त्यामुळे मनुष्य जे सामुद्रिक खाद्य खातो, त्या माध्यमातून हे प्लॅस्टिक मनुष्याच्याही पोटात जाईल अन् त्यामुळे जे आजार होतील, ते कशा स्वरूपाचे असतील, याची कल्पनाही न केलेली बरी! असा एक अंदाज आहे की, गेल्या कित्येक वर्षांपासून जे प्लॅस्टिक समुद्रात फेकण्यात आले, त्याचे रूपांतर मायक्रोप्लॅस्टिकमध्ये झाले आहे आणि त्याचे अंश मनुष्याच्या शरीरात दाखल झाले आहेत. ही बाब लक्षात घेता, मनुष्याच्या आरोग्यावर त्याचे दीर्घकालीन जे विपरीत परिणाम होणार आहेत, त्याचा अभ्यास आता शास्त्रज्ञांनी, संशोधकांनी करायला हवा.
जगासाठी अण्वस्त्रं जेवढी धोक्याची आहेत ना, तेवढाच हा प्लॅस्टिकचा कचराही धोकादायक आहे. प्लॅस्टिकचा परिणाम हा हळुवारपणे होत असला तरी तो जास्त घातक आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. इस्रायलमध्ये समुद्राचा अभ्यास करणारे एक वैज्ञानिक आहेत, ते पेशाने शिक्षकही आहेत. डॉ. बेल्ला गालील असे त्यांचे नाव आहे. त्यांनी १९९५ साली प्रकाशित झालेल्या ‘मरीन पोल्युशन बुलेटिन अंक ३०’ मध्ये प्लॅस्टिकच्या धोक्याबाबत सगळ्यात पहिल्यांदा जगाला अवगत केले होते. भूमध्य सागरातील प्लॅस्टिक कचर्‍याचा मुद्दा त्यांनी सगळ्यात आधी उपस्थित केला होता. ग्लोबल वार्मिंगमुळे आधीच जागतिक तापमानात बदल झाले असताना, त्याचे समुद्राच्या पाण्यावरही परिणाम झाले आहेत. समुद्राच्या पाण्याचे तापमान वाढवण्यात ग्लोबल वॉर्मिंगचाही मोठा वाटा आहे. या सगळ्या बाबींचा गांभीर्याने विचार करीत, जागतिक नेत्यांनी एका व्यासपीठावर येऊन या संदर्भात खुली चर्चा करावी आणि या समस्येवर तोडगा काढावा. अन्यथा, आपल्या सगळ्यांनाच प्रदूषणाचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, यात शंका नाही!

No comments:

Post a Comment