Total Pageviews

Friday 15 June 2018

डिजिटल इंडिया विकासाची गुरुकिल्ली-पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन,तभा वृत्तसेवा-इनोव्हेशनची ताकदमोदी सरकार रोखणार रुग्णांची लूट►वैद्यकीय उपकरणांत सूट देणार,नवी दिल्ली-


, १५ जून
दलाली रोखण्याचे तसेच गोरगरीब लोकांना त्यांचा न्याय हक्क मिळवून देण्याचे डिजिटल इंडिया हे जनआंदोलन असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवारी केले. डिजिटल इंडिया ही काळाची गरज, तसेच विकासाची गुरुकिल्ली आहे, असे मोदी यांनी स्पष्ट केले.
डिजिटल इंडियाच्या लाभार्थ्याशी डिजिटल माध्यमातून संवाद साधताना मोदी म्हणाले की, शासकीय योजनांचा लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच यातून दलाल आणि मध्यस्थांची हकालपट्टी करण्यासाठी डिजिटल इंडिया अभियान सुरू करण्यात आले. या योजनेमुळे हितसंबंध दुखावलेल्या दलाल आणि मध्यस्थानी डिजिटल इंडिया अभियानाबद्दल अपप्रचार सुरू केला. आपल्या देशात हे अभियान यशस्वी होऊ शकणार नाही, अशी त्यांची भूमिका होती. मात्र, ग्रामीण भागातील महिलांनी, शाळेत शिकणार्‍या मुलींनी हे अभियान यशस्वी करून दाखवत, अभियानावर टीका करणार्‍यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
ग्रामीण भागातील गरीब जनता तसेच शेतकरी या अभियानात सहभागी होत आहे, याकडे लक्ष वेधत मोदी म्हणाले की, या अभियानाला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे हितसंबंध धोक्यात आलेल्या लोकांनी नवीनच अपप्रचार सुरू केला आहे. देशाला पुढे नेणारे हे अभियान आहे. यामुळे देश बदलत असल्याचे सगळ्यांना दिसत आहे, याकडे लक्ष वेधत मोदी म्हणाले की, ग्रामीण भागातील जनता, देशातील तरुण आणि शेतकरी या अभियानाचा चांगला फायदा घेत आहे. डिजिटल इंडियामुळे ग्रामीण भागाच्या सशक्तीकरणाला तसेच साक्षरतेला चालना मिळाली आहे. प्रधानमंत्री ग्राम डिजिटल साक्षरता अभियानाची सुरुवात या मोहिमेअंतर्गत करण्यात आली होती, या योजनेत २० तासांचे संगणकाचे प्राथमिक शिक्षण देण्याची तरतूद होती. आतापर्यंत देशातील सव्वा कोटी जनतेने या अभियानातंर्गत संगणकाचे प्रशिक्षण घेतले आहे. त्यात अनुसूचित जाती तसेच जमातीच्या लोकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. डिजिटल इंडिया ही काळाची गरज तसेच विकासाची गुरुकिल्ली आहे, असे मोदी यांनी स्पष्ट केले.
संधिसाधू लोकांचा अपप्रचार
डिजिटल व्यवहारात पैसे सुरक्षित नसल्याचा दावा केला जात आहे. या व्यवहारामुळे ज्यांची दुकाने बंद झाली, ज्यांना व्यवहारात मिळणारी दलाली बंद झाली, ज्यांचा काळाबाजार बंद झाला, तेच डिजिटल इंडिया अभियानाला विरोध करीत आहे. मात्र अशा संधिसाधू लोकांच्या अपप्रचारामुळे डिजिटल इंडिया अभियान राबवण्याच्या सरकारच्या निर्धारात कोणताच फरक पडणार नाही. उलट तो आणखी दृढ होणार आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
मोदी सरकार रोखणार रुग्णांची लूटवैद्यकीय उपकरणांत सूट देणार,

वैद्यकीय उपचारांमध्ये वापरण्यात येणार्‍या विविध उपकरणांच्या किमती कमी करून सर्वसामान्यांना मोठा दिलासा देण्याची तयारी मोदी सरकार करीत आहे. या उपकरणांमधील नफा ३० टक्क्यांपर्यंत मर्यादित करण्याचा सरकारचा विचार असल्याचे समजते. यामुळे वितरक, घाऊक व्यापारी, छोटे व्यापारी, तसेच रुग्णालयांकडून होणारी रुग्णांची लूट रोखण्यास मदत होईल.
वैद्यकीय सेवा सर्वसामान्यांच्या आवाक्यात येण्यासाठी या संदर्भातील सूचना नीती आयोगाकडून देण्यात आल्या आहेत. वैद्यकीय उपकरणांमधील नफा आटोक्यात आणण्यासंदर्भात नीती आयोगाच्या सूचनेनंतर, आता पहिल्या टप्प्यात या उपकरणातील नफा ३० टक्क्यांंपर्यंत आणण्याचा प्रस्ताव आहे.
पंतप्रधान कार्यालयासोबत नुकत्याच झालेल्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. या मुद्यावर नीती आयोगाने वैद्यकीय उपकरणे उत्पादक आणि सार्वजनिक आरोग्य गटासोबत यासंबंधित इतरही घटकांशी चर्चा सुरू केली आहे. नीती आयोगाने हा नफा नियंत्रित करण्यासाठी अशा वैद्यकीय उपकरणांची यादी करण्याची सूचना परवडणारी औषधे आणि आरोग्य उत्पादनांच्या स्थायी समितीला दिल्या आहेत. यामुळे या उपकरणातील नफा कमी होऊन त्यांचे उत्पादन वाढण्यास मदत होईल.
सद्यस्थितीत भारताकडून ७५ टक्केवैद्यकीय उपकरणांची आयात केली जाते. यामधील ८० टक्केउपकरणे मोठ्या आजारांच्या उपचारांसाठी वापरली जातात, शिवाय त्यांची किंमतही खूप जास्त आहे. अशा उपकरणांच्या किमतीवर सध्यातरी सरकारचे कोणतेही नियंत्रण नाही. कार्डिअ‍ॅक स्टेंट, ड्रग इलुटिंग स्टेंट, कॉन्डम्स, इंट्रा यूटेरिन डिव्हायसेज यांच्या किमती पूर्णत: सरकारच्या नियंत्रणात आहेत. सरकारने ह्या उपकरणांचा अत्यावश्यक औषधांच्या राष्ट्रीय यादीत समावेश केला आहे. या बैठकीत सादर केलेल्या अ‍ॅक्शन प्लॅननुसार, औषधे, उपचार आणि आवश्यक उपकरणाचे दर ड्रग प्राईस कंट्रोल ऑर्डर्सच्या अंतर्गत आणायला हवे. यामुळे सर्व वैद्यकीय उपकरणांच्या किमती आणि इतर आरोग्य उत्पादनांच्या किमती नियंत्रणात राहू शकतील, असा सल्ला देण्यात आला आहे.
इनोव्हेशनची ताकद!-धनश्री बेडेकर |
त्या दिवशी आमच्या वर्गात सर्वात जास्त कंटाळा आला होता तो मला! आमचे वयोवृद्ध सर इनोव्हेशनया विषयावर अत्यंत कंटाळवाण्यापद्धतीने विचार करायला शिकवत होते. मुळात इनोव्हेशन हा विषयच खूप अभिनव आहे. ज्या शब्दाला जात्याच रुटीनचा कंटाळा आहे, ती गोष्ट कंटाळवाणी शिकवून कशी चालेल? पण अनेकदा असं जाणवतं, काही कल्पना शिकवणं खरच खूपच अवघड जातं.
इनोव्हेशनम्हणजे नेमकं काय? असं पटकन विचारलं तर कुठे झटकन् सांगता येतं? हे म्हणजे लता मंगेशकरांच्या आवाजाचं नेमकं वर्णन एका शब्दात कर असं सांगितल्यासारखं आहे! इनोव्हेशनही खूप व्यापक संकल्पना आहे.
काहीतरी नवं करणं म्हणजे इनोव्हेशन का? अनेकदा बाजारात आलेली अनेक इनोव्हेटिव्ह म्हणवणारी प्रॉडक्टस् बंद पडलेली दिसतात. म्हणजे एखाद्या प्रॉडक्टचा उत्तम विचार करून प्रॉडक्ट बनवलेलं असतं, पण त्या विचाराला वास्तवतेची किनार नसते. मी माझ्यापुरती इनोव्हेशनची संकल्पना ठरवलीय! इनोव्हेशन म्हणजे वेगळा विचार करणं, त्यानुसार व्यावहारिक कृती करणं आणि त्यातून काहीतरी फायदा मिळवणं. मला कल्पनाही एखाद्या विमानासारखी असावी असं वाटतं. त्यामध्ये उडण्यासाठी पंख आहेत, ज्यामुळे ते विमान उंच आकाशात भरारी घेतं आणि विमानाला खाली चाकं आहेत. जी चाकं ही भरारी मारून झाल्यावर जमिनीवर टेकू देतात. त्यामुळे प्रचंड वेगात उडून आलेलं विमान जमिनीवर स्थिरावताना त्याला त्रास होत नाही. घर्षण होऊन अपघात होत नाही.
व्यवसायामध्ये वेगळा विचार, वेगळी कृती म्हणजे काय? असं  आठवताना मला एक गोष्ट आठवते. खरी घडलेली गोष्ट! पुण्याजवळ चासकमान या गावात एक सधन, सुशिक्षित शेतकरी रहात होता. त्याची शेती व्यवस्थित चालू होती. त्याला शेतमालाच्या दलालांचा त्रास होत होता. त्याच्या शेतामध्ये अनेक प्रकारची भाजी पिकत असे. त्याला या त्रासाचा अतिरेक व्हायला लागल्यावर एक कल्पना सुचली. हंगामामध्ये कोथिंबीरीला खूप उत्तम भाव मिळणं अपेक्षित असूनही दलालांमुळे त्याला मिळायचा नाही. त्याने प्रयोग म्हणून पुणे शहरामधील मंगल कार्यालयांना भेटी दिल्या. लग्नाचे मुहुर्त कुठले, कोणते दिवस आहेत. जेवणाचा मेनूकाय याचा अभ्यास केला. जेवणामध्ये कोथिंबीरहा घटक तर लागणारच! त्याला जाणवलं की, जसे हे दलाल आपल्याला भाव पाडून देतात तसेच या ग्राहकांना महाग विकतात. त्यामुळे अनेकदा त्यांची खरेदी कमी व्हायची. तसंच कोथिंबीर हा घटक जेवणात वगळला तरी फरक पडत नाही. या सगळ्याचा त्याने अभ्यास केला. त्याने मंगल कार्यालयातील लोकांशी दोस्ती केली. दोघांना परवडेल असा भाव ठरवला आणि मुहुर्ताच्या आधी ४० दिवस कोथिंबीर पेरली! त्याच्या या प्रयोगातून त्याला बाजारपेठेचं नवं दार उघडलं. याचबरोबरीने त्याने इतर भाज्यांमधल्या काही भाज्याही या पद्धतीने विकायला सुरुवात केली. मी मगाशी उ?ेख केल्याप्रमाणे ही झाली विमानाची भरारी. आता दुसरी अडचण होती. लग्नाचे सिझन कायम नसतात. त्यामुळे नेहमीच्यादलालांना दुखवून चालणार नव्हतं. त्याने त्यांच्या सोबतचे व्यवहार तसेच चालवत ठेवून एक पाय या नव्या बाजारपेठेत रोवलाही झाली विमानाची चाकं! अत्यंत वाजवी जोखमीमध्ये शोधलेली ही गोष्ट त्याच्या शेतीचं इनोव्हेशनच की!
माझा एक गुजराथी दादा आहे, जो जाता येता अशा अनेक गोष्टी माझ्यात रुजवत असतो. तो दापोलीला असताना, त्यांच्या नवीन कारखान्यासाठी शेतमाल आणायला मुंबईच्या बाजारपेठेत जायचा, तेव्हा तो फक्त त्याला हवा तो माल घेऊन कधीच परत आला नाही. जेव्हा त्याने पहिल्यांदा जाण्याच्या खर्चाचा अंदाज काढून बघितला तेव्हा त्याच्या लक्षात आलं, की गाडीचा आकार आणि आपल्या मालाची आवश्यकता यात अंतर आहे. म्हणजे मोठ्या गाडीतून छोटा माल आणला तर, गाडी भाड्याचे पैसे वाया जाणार! त्याने यावर उपाय म्हणून तिथल्या वाडीत निरोपानिरोपी केली, की मुंबईहून उत्तम दर्जाचे कांदे, बटाटे अत्यंत वाजवी दरात उपलब्ध होणार आहेत. लोकांनी नोंदणी करावी. कोकणात काही पट्‌ट्यामध्ये भाज्या पिकण्याचं प्रमाण खूप अत्यल्प आहे. या परिस्थितीमध्ये लोकांना त्याची ही योजना खूप आवडलीत्यानेही योजना इतकी यशस्वी केली, की गाडीभाडं शून्य झालं! नफा मिळाला. त्यानंतर इतकी मागणी वाढली, की नवीन गाडीचा विचार करायला लागला! त्याला हा विचार सुचणं, त्याने या पद्धतीने त्याच्या व्यवसायाच्या एका खर्चाची किंमत शून्य करून, तेवढाच नफा वाढवणं यालाच इनोव्हेशनम्हणतात.
इनोव्हेशनही अशी भव्य दिव्य कल्पना नाहीच! इनोव्हेशन म्हणजे, तुम्हा आम्हांसारख्या सामान्य माणसांना सुचलेली अशी कल्पना ज्यामध्ये यश मिळण्याची ताकद आहे.
परवा टीव्हीवर मंदार जोगळेकरांची मुलाखत पाहिली. बुकगंगा डॉटकॉमया कंपनीने मराठी साहित्य विश्वात अक्षरशः कमाल घडवली आहे. मी अनेक वर्ष पुस्तक विक्री विश्वात वावरतेय. त्यामुळे इथल्या बाजारपेठेची बरीच ओळख आहे. पुण्या/मुंबईच्या बाहेर असा एक मोठा वाचकवर्ग आहे, ज्याला वाचनाची भूक आहे. पैसे खर्च करण्याची तयारी आहे. पण त्याच्या साठी पुस्तके विकत मिळण्यासाठी दुकानं नाहीत. या माणसाने त्यावर पर्याय म्हणून ही कंपनी काढली. इंटरनेटचा वाढता प्रचार लक्षात घेऊन त्यापार्श्वभूमीवर हे इनोव्हेशन कमालीचं यशस्वी झालंय! यामध्ये लोक इंटरनेटवर व फोनवर हव्या त्या पुस्तकांची नोंदणी करतात. वाचकांच्या एका सर्व्हेमध्ये जाणवलं, की शहरात जिथं पुस्तकं विकत मिळण्याची दुकानं आहेत, तिथेही अनेकदा लोक वाढलेलं शहर, पोचायला लागणारा वेळ, ट्रॅफिक आणि पार्किंगचा प्रश्न लक्षात घेऊन बुकगंगाकडे वळतायत.
मंदार जोगळेकरांनी स्वतःच्या सॉफ्टवेअरमधल्याज्ञानाचा असा इनोव्हेटिव्ह वापर केला. आणि त्याला लागणारी कुरियर यंत्रणा, लोकांशी संवाद साधायला कम्युनिकेशनची टीम तयार केली व ते यशस्वी झाले! याउलट, पण असंच एक मॉडेल फ्लिपकार्टचं! ती मूलतः कुरियर कंपनी होती. आपल्या कुरियरच्या व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन आज विक्रीचं प्रचंड जाळं त्यांनी भारतात तयार केलं. आज फ्लिपकार्टवर कितीतरी हजार प्रॉडक्टस् फोन आणि इंटरनेटवर विक्रीला आणली जातात.ओएलएक्सवर जुनं सामान विकून देणं हे सुद्धा असंच जबर्‍या इनोव्हेशन!
माणसाचा स्वभाव बघता त्याला नाविन्याची मूलतः ओढत असते. अशा नाविन्याचा जो नीट विचार करतो आणि विमानाच्या उदाहरणासारखी काळजी घेतो, तो कमालीचा यशस्वी होतो. आपण इनोव्हेटिव्ह कल्पनेचा विचार करताना तीन गोष्टींची काळजी गोष्ट शोधताना घेतली पाहिजे. एक म्हणजे, व्यवसायासाठी लागणारा वेळखर्चकमीतकमी होईल. त्यासाठी एखादी गोष्ट शोधता येईल का? दुसरं म्हणजे, आपण शोधलेली गोष्ट आपण दीर्घकाळ चालवू शकण्याची यंत्रणा आपण विकसित करू शकू ना! अनेकदा ही क्षमता आपल्यात नसल्याने चांगल्या गोष्टी बाजारपेठेतून गायब होतात. त्यामुळे त्याचा विचार करायला हवा. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या सर्व गोष्टींमध्ये, पुढे येणार्‍या संभाव्य अडचणींचा विचार आपण केला आहे का? अनेकदा त्या गोष्टींचा विचार कमी पडल्याने आपल्याला चमकदार कल्पनांमध्ये अपयश येतं!
वेगळा विचार करायला खूप धाडस लागतं. ती जोखीम आहे! पण कुणीतरी वेगळा विचार केल्याशिवाय आपल्या हाती अनेक उत्तमोत्तम प्रॉडक्टस् पडली नसती. पणहा विचार फक्त हवेत राहून उपयोग नाही. त्यासाठी पाय घट्‌ट रोवून जमिनीवर उभं राहायला हवं. परिस्थितीचा अभ्यास पक्का करायला हवा.
कवी गे्रसांचं अतिशय वेगळ्या संदर्भातलं वाक्य आठवतं, अस्तित्वाला हादरे दिल्याशिवाय काही नवनिर्माण होऊच शकत नाहीमला वाटतं हीच इनोव्हेशनची ताकद!


No comments:

Post a Comment