Total Pageviews

Sunday 18 February 2018

शिवरायांचे आठवावे रूप। शिवरायांचा आठवावा प्रताप। शिवरायांचा आठवावा साक्षेप। भूमंडळी॥

शिवरायांचा आठवावा प्रताप।।- प्रहार 

समर्थ रामदासांनी छत्रपती शिवरायांचे केलेले वर्णन अत्यंत यथार्थ असेच आहे. छत्रपतींचा पराक्रम, काम करण्याची पद्धती आपण समजून घेतली, तर आपल्याला यश कधीच हुलकावणी देणार नाही, इतका आदर्श राजा या जगापुढे आहे. म्हणूनच अनेकवेळा महाराजांचा उल्लेख भाषणात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायअसा करतात, तेव्हा आश्चर्य वाटते. कारण, महाराज फक्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत नाहीत, तर ते संपूर्ण देशाला, जगाला आदर्शवत आणि आराध्य असे आहेत. त्यांना आपण संपूर्ण जगाचे मार्गदर्शक म्हणू शकतो. शिवरायांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली होती. हिंदवी राज्याची त्यांनी स्थापना केली होती आणि संपूर्ण जगाला ते मार्गदर्शक बनले होते. त्याचे दाखले आपल्याला इतिहास देतो. त्यामुळे केवळ इतिहासात त्यांना कोंडून ठेवता कामा नये. ते नित्य आमच्यासमवेत मार्गदर्शक आहेत, फक्त त्यांचा अभ्यास करण्याची सवय लावून घेतली पाहिजे, मग यश आमच्यापासून दूर नाहीच. आजकाल छत्रपती शिवरायांना मॅनेजमेंट गुरू म्हणून जगात गौरवले जाते. पाश्चिमात्य देश त्यांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करत आहेत, ही गोष्ट आम्हास अभिमानाची आहे. कारण, ते जगाचे आराध्य दैवत आहेत. उत्कृष्ट योद्धा, आदर्श शासनकर्ता, प्रजाहितदक्ष कल्याणकारी राजा म्हणून जागतिक इतिहासात त्यांना अत्युच्च स्थान आहे. शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले.
आज आम्ही पुरोगामी महाराष्ट्राचा वारसा सांगतो त्याला शिवरायांच्या आदर्शाची पार्श्वभूमी आहे. महाराष्ट्राचे हे राजे किती पुरोगामी होते, अनिष्ठ प्रथा बंद करणारे होते, ते त्यांच्या कार्यावरून दिसून येते. आपल्याकडे इतिहासात सतीची प्रथा १९०५ साली राजा राममोहन रॉय यांच्या पुढाकाराने ब्रिटिशांनी बंद केली असे सांगितले जाते. पण, त्यापूर्वीच दोनशे र्वष अगोदर हा मुद्दा महाराजांनी मांडला होता. शहाजी राजांच्या निधनानंतर आईसाहेब जिजाऊ सती जाण्यास निघाल्या होत्या. त्यांना सती जाण्यापासून रोखण्याचे काम महाराजांनी केले, ही त्या काळातील फार मोठी सुधारणा होती. या त्यांच्या कार्याचा अभ्यास करून महाराज कसे दूरदृष्टीचे होते हे लक्षात घेतले पाहिजे. त्यांच्या लढाया, शत्रूचा केलेला वध, छाटलेली बोटे, आग्य्राहून सुटका या पलीकडे इतिहास अभ्यासून त्यांची कार्यपद्धती, कौशल्य, व्यवस्थापन याचा अभ्यास करायची वेळ आहे. म्हणून प्रत्येक तरुणाने लक्षात ठेवले पाहिजे की, शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप, भूमंडळी. आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढय़ शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले. आज दहशतवादाचा फार मोठा मुद्दा केवळ आपल्या देशालाच नाही, तर संपूर्ण जगाला भेडसावत असताना छत्रपतींच्या नीती-नियमांनीच आपल्याला त्यावर विजय मिळवता येईल, याचा विचार सरकारने करण्याची वेळ आलेली आहे. आपल्या वडिलांकडून मिळालेल्या २,००० सैनिकांच्या छोटय़ा तुकडीपासून एक लाख सैनिकांचे लष्कर शिवाजी महाराजांनी उभे केले होते. हे संघटन कौशल्य कोणत्याही संघटनेने, पक्षाने किंवा टीमवर्कने ज्यांना काम करायचे आहे त्यांनी लक्षात घेतले तर त्यांना यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच अनेक किल्लेही महाराजांनी उभारले. हे संरक्षणासाठी फार महत्त्वाचे आहे. सीमेचे रक्षण करण्याची जबाबदारी घेऊन केलेले ते काम होते. राज्यकारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले होते.
त्याचप्रमाणे अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे व्हिएतनामच्या युद्धात शिवकालीन गनिमी काव्याचा आदर्श आणि अभ्यास करून छोटय़ाशा व्हिएतनामने अमेरिकेसारख्या बलाढय़ सैन्याला जेरीस आणले होते, हा अलीकडचा इतिहास आहे. व्हिएतनामसारखे अनेक देश महाराजांच्या कार्यपद्धतीचे अनुकरण करून यशस्वी होतात, हे आम्ही लक्षात घेतले पाहिजे. आम्हाला कोणत्याही संरक्षणासाठी, दहशतवाद रोखण्यासाठी अमेरिकेसारख्या महासत्तेच्या परवानगीची, मार्गदर्शनाची गरज वाटते. पण, जर महाराजांचा आदर्श डोळय़ापुढे ठेवला तर दहशतवाद आम्ही केव्हाच संपवू शकतो हे लक्षात येईल. महाराजांनी काही कोणत्या देशाविरोधात, धर्माविरोधात युद्ध केले नव्हते तर ते जुलूमशाही, अत्याचार आणि दहशतवादाविरोधात केले होते हे लक्षात घेतले पाहिजे. युद्धाभ्यास आणि रणनीती तसेच राजकारभार यासबंधी प्राथमिक मार्गदर्शन महाराजांना शहाजीराजांकडून मिळाले होते. परकीय सत्तेविरुद्ध लढा करण्याकरिता आवश्यक असलेल्या शिस्तीचे शिक्षण आई जिजाबाईंकडून मिळाले होते. जिजाऊंनी बालशिवाजीच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांना युद्धकला व राजनीतिशास्त्राचे शिक्षण दिले. शिवबाच्या मनात स्वराज्याचे स्फुल्लिंग चेतविले. छत्रपती शिवाजीराजे जेव्हा पुण्याचा कारभार पाहू लागले, तेव्हा त्यांनी स्वत:ची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली. ही राजमुद्रा संस्कृत भाषेत होती. प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजतेयाचा अर्थ, ज्याप्रमाणे प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो आणि सा-या विश्वात वंदनीय होतो, तशीच शहाजींचा पुत्र शिवाजींची ही मुद्रा व तिचा लौकिक वाढत जाईल. अक्षरश: हे खरे ठरले आहे.
महाराजांचा नावलौकिक वाढलाच आहे, पण त्यांनी म्हटल्याप्रमाणे केवळ राजमुद्राच नाही तर छत्रपती शिवाजी महाराज हे विश्ववंद्य झाले आहेत. म्हणून महाराष्ट्राचे आराध्य दैवत असा भाषणातील होणारा त्यांचा उल्लेख आपण टाळून विश्ववंद्य महाराज म्हटले पाहिजे. याचे कारण छत्रपती शिवरायांच्या कारभाराचे, त्यांच्या कर्तबगारीचा गौरव करणारे अनेक लेखक हे परकीय आहेत. काफीखान आणि इतर इतिहासकारांनी शिवाजीच्या स्त्रीदाक्षिण्याबद्दल भरभरून लिहिले आहे. इंग्रजी फॅक्टरी रेकॉर्ड्समध्ये म्हटले आहे की, शिवाजी राजे स्त्रियांना अभय देतात हे सर्वश्रुत असल्याने युद्धामध्ये पराभव झाल्यानंतर शत्रुपक्षातील मातब्बर माणसे स्त्रीवेष घालून पळून जात. शिवाजी महाराजांच्या समकालीन इंग्रज, डच, फ्रेंच, पोर्तुगीज आणि इटालियन प्रवाशांनी शिवाजी महाराजांची तुलना जगाच्या इतिहासात अजरामर झालेल्या अलेक्झांडर, हॅनिबल, ज्युलियस सीझर, सरटोरियस यांच्याशी केली आहे. त्यावरून निघालेल्या निष्कर्षावरून ते सांगतात की, या बाकीच्या थोर व्यक्तींमध्ये शौर्याव्यतिरिक्त दोषही होते. मात्र, शिवाजी महाराज हे सर्वगुणसंपन्न होते. शिवरायांचे शौर्य, कल्पकता, संघटनाकौशल्य, राजधर्मपालन, स्त्रीदाक्षिण्य इत्यादी गुणांनी पाच शतके पारतंत्र्यात पडलेल्या देशास स्वातंत्र्य मिळवून दिले.


No comments:

Post a Comment