Total Pageviews

Friday 16 February 2018

पाणीबाणी’च्या दिशेने -प्रा. रंगनाथ कोकणे


जगातील प्रत्येक माणसाची गरज पूर्ण करण्याची क्षमता आपल्या पृथ्वीकडे आहे; परंतु प्रत्येकाची हाव पूर्ण करणे पृथ्वीच्या आवाक्याबाहेर आहे, असे महात्मा गांधींनी म्हटले होते. जेव्हा माणसाकडे एखाद्या पशू इतकेच ज्ञान होते, तेव्हाही तो आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी निसर्गावरच अवलंबून होता. आज विज्ञानाच्या प्रगतीने कळस गाठला आहे. मात्र, तरीही आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आजही आपण निसर्गावरच अवलंबून आहोत. निसर्गाचा मानवी जीवनाशी इतका घनिष्ट संबंध असूनही आपण केवळ स्वार्थापोटी निसर्गाचा समतोल बिघडवीत आहोत. त्याचे दुष्परिणाम आपल्याला मोठ्या प्रमाणावर भोगावे लागणार असून, त्याची सुरुवातही झाली आहे. देशातील प्रमुख 91 जलाशयांमधील पाणीपातळी एकाच आठवड्यात दोन टक्क्यांनी घटल्याची बातमी येऊन थडकली आहे. या जलाशयांची एकंदर पाणीपातळी 64 टक्के होती. ती एकाच आठवड्यात 62 टक्क्यांवर घसरली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत या जलाशयांची पाणीपातळी तब्बल 96 टक्के होती. वाढती लोकसंख्या, सिंचनाबरोबरच बेसुमार वाढणार्‍या औद्योगिकीकरणामुळे वाढलेली पाण्याची गरज आणि त्यासाठी भूगर्भातील पाण्याचे बेसुमार दोहन सुरू असून, त्याचा परिणाम म्हणूनच देशातील जलाशयांची पाणीपातळी घटल्याचे पाहायला मिळत आहे. भूगर्भ शास्त्रज्ञांच्या मते, पडणार्‍या पावसाचे 31 टक्के पाणी जमिनीत मुरायला हवे. तरच भूगर्भजल पुनर्भरण योग्य प्रमाणात होऊ शकते. असे झाले तरच हिमनद्या वगळता इतर नद्यांमध्ये आणि जलाशयांमध्ये पुरेसे पाणी नेहमी राहू शकेल; परंतु प्राप्त माहितीनुसार, सद्यःस्थितीत पावसाच्या 13 टक्के पाणीच भूगर्भात जमा होत आहे. अशा परिस्थितीत, जलसंरक्षण आणि त्यायोगे भूगर्भातील जलसाठ्याचे पुनर्भरण केले गेले नाही, तर देशाच्या एकंदर लोकसंख्येचा एकतृतीयांश हिस्सा तहानलेला राहण्याचा दिवस फार दूर नाही. 
देशातील 16 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधील पाणीस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे, हे आताच लक्षात घेतले पाहिजे. गरजेपेक्षा अधिक पाण्याचे दोहन केल्यामुळे अनेक राज्यांमधील जलसंकट अधिकाधिक तीव्र बनत चालले आहे. राजधानी दिल्लीतही भूगर्भाखालील पाण्याचा उपसा बेसुमार वाढला आहे. देशाच्या अनेक भागांतील भूगर्भ जलपातळी दरवर्षी एक मीटर एवढ्या प्रचंड वेगाने खालावत चालली आहे, असे सांगितले जाते. चिंतेची आणखी एक बाब म्हणजे, उपलब्ध पाण्याची गुणवत्ताही वेगाने खालावत चालली आहे. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार, सिंचनासाठी सर्वाधिक म्हणजे 91 टक्के पाण्याचा उपसा भूगर्भातून केला जातो. पाण्याचा सर्वाधिक उपसा पंजाब, हरियाणा आणि राजस्थानात केला जातो. पंजाबात तर भूगर्भात जमा होणार्‍या पाण्यापैकी 98 टक्के पाण्याचा वापर केला जातो. हरियाणात हे प्रमाण 94.5 टक्के, तर राजस्थानात 88.4 टक्के इतके आहे. भूगर्भ शास्त्रज्ञांच्या मते, बेंगळुरूसारख्या शहरात ज्या वेगाने भूगर्भातील पाण्याचे दोहन केले जात आहे, त्याच वेगाने उपसा सुरू राहिल्यास सुमारे दहा वर्षांनंतर संपूर्ण शहरच दुसरीकडे वसविण्याची वेळ येऊन ठेपेल.  
जलसंरक्षणाचा विषय संपूर्ण जगाच्या दृष्टीने प्राधान्यक्रमाचा ठरला आहे. जलसंरक्षण आपल्याला घरात, घराच्या बाहेर, बागबगीचांमध्ये, शेतात अशा विविध ठिकाणी करता येणे शक्य आहे. गावांत पूर्वी कच्ची घरे असत. घराच्या समोर मोठी मोकळी जागा असे. घराच्या आवारातच भाज्यांची लागवड केली जात असे. घराच्या परिसरात झाडेझुडपेही मोठ्या प्रमाणावर असत. त्याचा फायदा असा होई, की पावसाचे पाणी थेट भूगर्भापर्यंत पोहोचत असे. परिणामी, भूगर्भातील पाण्याची पातळी आपोआप वाढत असे. आता गावे आणि शहरांमध्ये घरासमोरच्या जागेचेही काँक्रीटीकरण केले जाते. मोकळी जागाच कमी होत चालली आहे. झाडाझुडपांचे प्रमाण बरेच कमी झाले आहे. परिणामी, जमिनीचे पोट भरतच नाही. 
पाण्याची सध्या देशात आणीबाणी आहे, असे म्हटले तर अतिशयोक्ती वाटेल. परंतु, ती अतिशयोक्ती नाही. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार, 10 राज्यांतील 256 जिल्हे दुष्काळग्रस्त आहेत. सुमारे 33 कोटी नागरिक दुष्काळाचा सामना करीत आहेत. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, येत्या काही वर्षांत परिस्थिती आणखी बिघडणार आहे. त्यामुळे पाण्याचे संरक्षण गांभीर्याने करण्याची गरज आहे. त्यासाठी योग्य आराखडे आणि त्याची प्रामाणिकपणे अंमलबजावणी गरजेची आहे. नैसर्गिक जलस्रोतांचे संरक्षण, पारंपरिक जलसंरक्षणाचे उपाय नव्याने अंमलात आणणे, पाण्याचा अपव्यय टाळणे, असे अनेक उपाय योजावे लागतील. तरच पाण्याच्या कमतरतेच्या संकटाशी आपण मुकाबला करू शकू

No comments:

Post a Comment