Total Pageviews

Sunday 18 February 2018

-छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत आदर्श राज्यव्यवस्था निर्माण केली. हे स्वराज्य निर्माण करताना शिवरायांसारख्या द्रष्ट्या राजाचे ‘गुप्तचर विभाग’ या राज्याच्या महत्त्वाच्या अंगाकडे दुर्लक्ष होणे शक्य नव्हते

शिवरायांचे हेरखाते एवढे पराकोटीचे प्रगल्भ होते की, त्यांची तुलना जगातल्या कुठल्याही हेरयंत्रणेशी होऊ शकत नाही.
एखाद्या मोहिमेचे पूर्वनियोजन तसेच प्रत्यक्ष मोहिमेची आखणी यात हेरांचे महत्त्वपूर्ण योगदान असे. ज्यायोगे शिवरायांचे पुढील बरेचसे काम सोपे सुलभ होई. पराक्रम, धाडस हेरांनी योग्य वेळी पुरवलेली माहिती या समन्वयावर शिवराय अत्यंत यशस्वीपणे मोहीम पूर्ण करीत असत! शिवरायांच्या संकल्पनेतील हेरखात्याला प्रत्यक्षात मूर्त स्वरूपात आणले ते बहिर्जी नाईक यांनी! अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्ता, समयसुचकता, धाडसीपणा, साहसाची अंगभूत जोड आदी गुणांवर बहिर्जी त्यांच्या साथीदारांनी इतिहासात अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावली आहे यास तोड नाही! बहिर्जी नाईक, सुंदरजी, कर्माजी, विश्‍वास मुसेखारेकर, विश्‍वास दिघे, विठोजी माणके, अप्पा रामोशी, महादेव अशी काही नावे जरी आपल्याला परिचित असली तरी शिवरायांच्या गुप्तहेर खात्याची पूर्ण माहिती इतिहासाला नाही. इतिहास इथे मुका होतो. कदाचित हेच शिवरायांच्या हेरगिरी खात्याचे यश म्हणावे लागेल!
शिवरायांचे हेरखाते हे आजच्या कुठल्याही देशाच्या इंटेलिजन्स ब्युरोपेक्षा कमी नव्हते. किंबहुना काकणभर सरसच ठरेल. शिवराय बहिर्जी यांच्या बुद्धिचातुर्यांच्या मार्गदर्शनाखाली मोहिमेच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून काही मार्गदर्शक तत्त्वांचा वापर केला जाई. वेशांतर करून हेरगिरी करणे हा शिवरायांच्या हेरखात्याचा, पर्यायाने बहिर्जी नाईक आणि इतर हेरांचा हातखंडा होता. बहिर्जी त्यांचे हेर परमुलखात, साधू, भिकारी, सोगांडे, गोंधळी, जादूगार, भविष्य सांगणारे, ज्योतिष इत्यादी वेषांतर करून इत्थंभूत माहिती घेत असत. ही वेषांतरे इतकी चपखल असत की प्रत्यक्ष शत्रूलासुद्धा यांचा थांगपत्ता लागत नसे. स्वराज्यापासून अनेक कोस दूर असलेल्या सुरतेची माहिती काढणे हे अत्यंत धोकादायक काम, परंतु बहिर्जीच्या नेतृत्वाखाली विठोजी माणके, अप्पा रामोशी हे बाबुल, मोमीन रामशरण या नावाने सुरतेत वावरत होते. यात मोमीन म्हणजे बहिर्जी भिकार्‍याच्या वेशात, तर विठोजी माणके म्हणजे बाबुल नावाने घोड्याला नाल लावण्याचे काम तर अप्पा रामोशी रामशरण या नावाने वावरताना सुरतेची खडान्खडा माहिती काढली पुढे शिवरायांनी आपले काम फत्ते केले!
इतक्या जुन्या काळात आजच्यासारखे मोबाईल, विविध गॅझेट्स, वेबकॅम, सेटॅलाईट नसताना, तंत्रज्ञानाची जोड नसताना बहिर्जी नाईक त्यांच्या हेरांनी मिळालेल्या माहितीचे संकलन, विश्‍लेषण इतक्या अचूकपणे कसे केले असेल! परमुलखातील भौगोलिक ज्ञान मिळवून प्रतिस्पर्धांच्या सणावारांची, बलस्थाने, कमकुवत स्थाने यांची माहिती योग्य वेळेत घेऊन ती महाराजांना योग्य वेळेत कशी दिली असेल हे आजही उलगडणारे कोडे आहे. इतिहास हा काही बाबतीत मुका मुका आहे, अंधारात आहे. परंतु बहिर्जी आणि त्यांची त्यांच्या काळातील सर्वोत्तम हेरयंत्रणा निर्विवाद सर्वश्रेष्ठ होती यात कोणाचेही दुमत होणे नाही. स्वराज्यावर सर्वांत पहिले भीषण संकट घोंघावत आले ते क्रूर सरदार अफजलखानाचे. याप्रसंगी सर्वांचीच कसोटी पणाला लागली होती. मात्र अशाप्रसंगी बहिर्जी त्यांच्या हेरांमार्फत शिवरायांना खानाची, खानाच्या गोटाची त्यांच्या मनसुब्यांची माहिती अचूक मिळाली. इतकेच नव्हे तर भेटीची कलमे ठरवायला गेलेल्या गोपीनाथ पतांच्या माध्यमातून अफझलखानाच्या डेर्‍यामध्ये कशाची चर्चा चालू आहे, इतकेच नव्हे तर खानाचे अंगरक्षक कोणे होते, सय्यद बंडाची माहिती, खानाचे मनसुबे काय आहेत ही माहिती हेरखात्याने अचूकपणे काढली. या जोरावर सय्यद बंडाला पर्याय म्हणून जीवा महालाला उभे केले गेले; तर खान अंगचटीला आला तर त्याच्याच ताकदीचा विसाजी मुरंबकदेखील अंगरक्षकांत सामील केला होता. हे निर्णय किती अचुकपणे घेतले गेले याची साक्ष आपल्याला पटते! पुढे पन्हाळगड प्रसंगात शिवरायांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी बहिर्जी नाईक त्यांच्या हेरांमार्फत पन्हाळगड, सिद्धी गौहरच्या वेढ्यांची अचूक तंतोतंत माहिती शिवरायांच्या हेरखात्याने काढली...कुठल्या वाटेवर पहारा नाही, कुठल्या वाटेने गेल्यास लवकर जाऊ शकू, किल्ल्याबाहेर कुठे जौहरचे पहारे, कुठे टेहळणी पथके आहेत याची खडान्खडा माहिती शिवरायांच्या हेरखात्याने काढली त्यानंतरच शिवराय पन्हाळ्यावरून निसटू शकले! स्वराज्यनिर्मितीच्या महत्त्वाच्या काळात शिवरायांच्या हेरखात्याचा वाटा फारच मोठा होता. आपल्या इतिहासातील एक दुर्दैवी बाब म्हणजे शिवरायांच्या हेरखात्याचा किंवा तिथे काम करणार्‍या लोकांचा इतिहासात फारच कमी उल्लेख आढळतो. त्यामुळे आजही शिवरायांच्या हेरखात्याचे कार्य कसे चालत असेल, याबाबत विश्‍वसनीय माहिती सांगणारी साधने उपलब्ध नाहीत.
शिवरायांचे कार्य हे निश्‍चितपणे स्वयंभू आहे! त्यांच्या युद्धनीती, राजनीती, समाजनीतीमध्ये अनेकदा कौटिल्याच्या नीतीचे प्रभाव दिसतात. सुरत लूट, बसनुरची स्वारी, आग्रा-भेट सुटका, दक्षिण दिग्विजय अशा अनेक घटनांमध्ये मोहिमांमध्ये सुरक्षित मार्ग शोधण्यापासून शत्रूच्या हालचालीची बित्तमबातमी घेऊन ते सुरक्षितपणे पोहोचवणे या गोष्टी मुरब्बी हेर हेरखाते असल्याशिवाय संभवनीय नाही!
गुप्तहेरांच्या संदर्भात कौटिल्याने केलेली मांडणी आजच्या काळापेक्षाही आधुनिक म्हणता येईल अशी आहे. शिवाजी महाराजांच्या कार्यपद्धतीचे कौटिल्याच्या विचारांशी असलेले साम्य पाहिले की, दूरदृष्टी असलेली माणसे कोणत्याही काळात जन्माला आली तरी कालातीतच असतात आणि म्हणूनच शिवरायांचा आठव केवळ घोषणा किंवा जयजयकारांच्या गदारोळात अडकता शिवरायांच्या कर्तृत्वगुणांची आपण थोडी आठवण जरी ठेवली तरी पुरेसे आहे


No comments:

Post a Comment