Total Pageviews

Thursday 8 February 2018

सोशल मीडियाबाबत धोक्याची घंटा-महा एमटीबी-‘डिजिटल दहशतवाद’


   06-Feb-2018

 
 
इस्लामी दहशतवाद्यांकडून केला जाणारा सोशल मीडियाचा वापर हा मोठ्या संकटाची चाहूल आहे. नवे तरुण भरती करण्यापासून ते संदेशवहनासाठी त्याचा वापर केला जात आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आता इंटरनेटच्या ताब्यात गेलेले आर्थिक व्यवहारही दहशतवाद्यांच्या यादीत असतील.
संयुक्त राष्ट्रांनी भारताला एक सल्ला दिला आहे. संयुक्त राष्ट्र असे अनेक सल्ले भारताला देतच असते. ते किती मानायचे आणि किती टाळायचे हे स्थल, काल, परिस्थिती पाहून आपण ठरवितो. मात्र, यावेळचा सल्ला गांभीर्याने घ्यावा असाच आहे. प्रारंभी ‘ऑर्कूट’ नंतर फेसबुक आणि आता ट्विटर अशा मुक्तमाध्यमांनी सध्या संवाद विश्वाचे अवकाश पूर्णपणे व्यापून टाकले. मोबाईल वापरणार्‍यांमध्ये हीच जागा व्हॉट्‌स अॅपने व्यापली आहे. भविष्यात ही माध्यमे कशी आकार घेतील व त्यांचा उपयोग कशा कशासाठी केला जाईल, हे सध्यातरी गुलदस्त्यातच आहे. गुलदस्त्यात अशासाठी की तो पुढे कसा वापरला जाईल हे सांगता येणार नाही. भारतातले सर्वच आघाडीचे मंत्री या मुक्तमाध्यमांचा अत्यंत प्रभावी वापर करून घेत लोकांच्या समस्या सोडवित आहेत, तर दुसर्‍या बाजूला समाजविघातक घटकही तितक्याच प्रभावीपणे या माध्यमांचा वापर करीत असल्याचे समोर येत आहे. इस्लामी दहशतवादी या माध्यमांचा वापर करून जगभरातील मुस्लीमतरुणांची माथी भडकविण्यात पुढे आहेत.
 
भारतातूनदेखील इंटरनेटच्या माध्यमातून जागतिक दहशतवादी कारवायांत सहभागी होण्यासाठी जाणार्‍या तरुणांची संख्या मोठी आहे. अशा प्रकारे तिथे जाण्यासाठी तयार झालेल्या तरुणांचे समुपदेशन करून नंतर त्यांना परत घरी पाठविण्याचे उद्योग पोलिसांना करावे लागल्याच्या बातम्या नुकत्याच प्रकाशित झाल्या आहेत. जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांना आता कुठे आळा बसू लागला आहे. तिथली परिस्थिती चिघळण्यासाठी मुक्तमाध्यमांच्या माध्यमातून पसरविण्यात आलेल्या चित्रफितीच मोठ्या प्रमाणावर कारणीभूत होत्या. सध्याच्या सरकारने संवादक म्हणून नेमलेले दिनेश्वर शर्मा यांच्या पुढाकारानेच अशा माथेफिरू मजकुरातून त्यांना बाहेर पडण्यास मदत करण्यास आली. सोशल मीडियावर पसरविल्या जाणार्‍या या मजकुराचा परिणामहा इतका भयंकर आहे. लोकांकडून वापरल्या जाणार्‍या व्हॉट्‌सअॅप वगैरेंसारख्या संदेशमाध्यमांच्या पलीकडे ‘एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन’ असलेल्या मेसेजिंग अॅपचा वापरही मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. ही ऍप अशी आहेत की त्यांचा वापर करणार्‍यांव्यतिरिक्त अन्य कुणालाही त्याचा वापर करता येत नाही. म्हणजेच, सुरक्षा यंत्रणांनाही वापरल्या गेलेल्या अॅपमधील मजकूर तपासता येत नाही. दहशतवादी गटांकडून वापरला जाणारा मजकूर हा याच माध्यमातून वितरित केला जात आहे. खोटे व्हिडिओे पसरविणे, प्रोपागंडासाठी त्याचा उत्तमवापर करून घेणे असे त्याचे उपयोग आहेत. खरे व्हिडिओे आपल्याला हवे तसे संपादित करूनही वापरले जात आहेतच.
 
थोडक्यात सांगायचे तर ‘डिजिटल दहशतवाद’ नावाची नवी संज्ञाच जन्माला येऊ घातली आहे. दहशतवादी संघटना पूर्वी पारंपरिक माध्यमांचा वापर करीत होत्या, मात्र त्यावर अंकुश येतो. पाकिस्तानसारख्या देशात स्थानिक सरकारांनी काही केले नाही तरी जागतिक संघटनांच्या दबावाखाली का होईना त्यांना ही माध्यमे बंद किंवा नियंत्रित करावी लागतात. ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर अल जवाहिरी अल कायदाचा म्होरक्या म्हणून पुढे आला होता. भारत व बांगलादेशातून तरुण भरती करण्यासाठी त्याने त्याच्या ध्वनिचित्रफिती तयार केल्या. ‘ऑर्कूट’सारखी माध्यमे त्यावेळी खुल्या स्वरूपाची असल्याने त्यांचा वापर केला गेला नाही. मात्र, ईमेलच्या माध्यमातून त्यांचा वापर पुरेपूर केला गेला. बांगलादेशात तरुणांनी केलेला दहशतवादी हल्ला व डॉ. झाकीर नाईकसारख्या दहशतवादी निर्माण करणार्‍यांचे जागतिक नेटवर्क समोर आले. या माध्यमातूनच त्याने आशियायी देशात स्वत:चे नेटवर्क उभे केले व अप्रत्यक्षपणे आशियायी मुस्लीमतरुणांची माथी भडकविण्याचे कामकेले. आजघडीला निरनिराळे दहशतवादी गट सक्रिय असले आणि त्यांचे म्होरके निरनिराळे असले तरी सोशल मीडिया हा त्यांच्यासाठी समान व्यासपीठासारखा झाला आहे. दक्षिण आशियात ‘इस्लामी स्टेट’ निर्माण करण्याचा त्यांचा मनसुबा सोशल मीडियाच्याच माध्यमातून पुरा होऊ शकतो, असा पक्का विश्वास त्यांना आहे. नव्या तरुणांची भरती आणि सातत्याने साधता येणारा संवाद या दोन्ही कारणांसाठी मुक्त माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. ‘इस्लामिक स्टेट’ किंवा ‘इसिस’सारख्या संघटना आज स्वत:ची म्हणून स्वतंत्र अॅप्स निर्माण करीत आहेत. खुल्या संदेशवहनातून निर्माण होणारे धोके त्यांना ठाऊक असल्यानेच ही कृती आहे. जागतिक स्तरावर एक इतकी मोठी रचना उभी करायची तर अजस्त्र संवाद यंत्रणा हवीच. मात्र, इस्लामी दहशतवाद्यांकडून अत्यंत धूर्तपणे सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. सगळ्याच ठिकाणी ही माध्यमे निरनिराळी आहेत. मात्र, या सगळ्याचा उद्देश इस्लामी राजवट निर्माण करण्याचा असल्याने नियोजनबद्ध पद्धतीने त्याचा वापर केला जात आहे. नजीकच्या काळातला एक मोठा धोका म्हणजे आर्थिक घडामोडींमध्ये अनागोंदी माजविण्याचा. जागतिक स्तरावर आता ई-कॉमर्स हा परवलीचा शब्द झाला आहे. खरेदी-विक्री, लहान-मोठ्या वित्तीय संस्थांचे व्यवहारही आता ऑनलाईन होत असतात. एकदा का या प्रणालींनाच धक्का दिला की, आर्थिक व्यवहार ठप्प होऊन अर्थव्यवस्थाच वेठीस धरता येऊ शकते. यात एक मेख अशी की, मुक्तमाध्यमांचा जन्ममूळचा अमेरिकेतला. त्यामुळे ही माध्यमे जगभर रुजविली जात असताना त्यांच्याकडे सांस्कृतिक आक्रमण म्हणून पाहिले गेले. ज्या अनेक प्रकारचे प्रभाव अमेरिका वाढवत असते त्यात याचाही समावेश होता. मात्र, इस्लामी दहशतवाद्यांनी अमेरिकेविरुद्धच या माध्यमांचा वापर सुरू केल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे एफबीआयच्या सायबर प्रयोगशाळांमध्ये नित्यनेमाने या माध्यमांना उतारा किंवा तोड म्हणून नवनवे प्रयोग केले जात असतात. ‘एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन’ ही तर मोठीच डोकेदुखी बनली आहे. या सार्‍याचा अंत कसा होईल, हे आज तरी कुणीही सांगू शकत नाही. संवादवहनाची माध्यमे मुबलक उत्पन्न होत असली म्हणजे ती वापरण्याच्या विवेकाचाही विकास होईल, असे मानणे भाबडेपणाचे आहे. त्यामुळे भविष्यकाळ प्रश्नांकितच आहे

No comments:

Post a Comment