Total Pageviews

Friday 2 August 2024

कमांडर इन चीफ अंताजी मानकेश्वर गंधे-अनसंग हिरो ऑफ मराठा वॉरियर्स लेखक : कौस्तुभ कस्तुरे, अनुवाद : सुनंदा भावे

 

दुर्लक्षित वीराची अज्ञात कथा

27 Jul 2024,

या करारान्वये मराठा फौजा बादशहाचे सर्व संकटांपासून रक्षण करतील आणि त्यासाठी आपला एक सेनापती व सैन्य नेहमीच दिल्लीत ठेवतील, अशी तरतूद होती.




लाख बांगडी फुटली, दोन मोती गळाले, २७ मोहोरा हरवल्या आणि चिल्लर खुर्दा किती गेला याची गणना नाही’, १७६१च्या पानिपतच्या मराठे विरुद्ध अब्दाली युद्धात, पानिपतावर विश्वासराव पेशवे, सदाशिवरावभाऊ आणि मराठ्यांचे अनेक मातब्बर सरदार तसेच हजारो सैनिक धारातीर्थी पडले, त्याचे हे सांकेतिक वर्णन. अब्दालीशी लढायला नानासाहेब पेशव्यांनी महाराष्ट्रातून सदाशिवरावभाऊ यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड सैन्य दिल्लीला का पाठवले, असा प्रश्न पडू शकतो; त्याचे उत्तर आहे, १७५२च्या अहमदिया करारात. दिल्लीचा मोगल बादशहा अहमदशाह आणि पेशवे नानासाहेब यांच्यामध्ये हा करार २३ एप्रिल, १७५२ रोजी झाला. पेशव्यांच्या वतीने त्यांचे सरदार जयाप्पा शिंदे आणि मल्हारराव होळकर तर बादशहाच्या वतीने सफदरजंगाने या करारावर सह्या केल्या. या करारान्वये मराठा फौजा बादशहाचे सर्व संकटांपासून रक्षण करतील आणि त्यासाठी आपला एक सेनापती व सैन्य नेहमीच दिल्लीत ठेवतील, अशी तरतूद होती. या संरक्षणासाठी बादशहाने चौथाईच्या सनदा तसेच मुलूखही तोडून दिला होता.

  


पेशव्यांच्या वतीने आणि शिंदे तसेच होळकरांच्या संमतीने मराठ्यांचा एक सेनापती सरदार दिल्लीत ठेवण्यात आला त्यांचे नाव अंताजी माणकेश्वर गंधे. १७५३पासून अंताजी जवळ जवळ ७ ते ८ वर्षे दिल्लीत होते. या अंताजींचा कऱ्हे पठार, (कामरगाव) ते दिल्ली हा प्रवास लेखकाने उलगडला आहे. त्याच मराठी चरित्राचा हा इंग्रजी अनुवाद ‘कमांडर इन चीफ अंताजी माणकेश्वर गंधे-अनसंग हिरो ऑफ मराठा वॉरियर्स’ नावाने आला आहे.


या अंताजींच्या प्रवासाचा शेवट पानिपतच्या लढाईने झाला. लढाईत जखमी होऊन दुपारनंतर निसटून दिल्लीच्या वाटेवर असताना अफगाण सैनिकांकडून अंताजी मारले गेले. अंताजींचा नानासाहेब पेशव्यांबरोबरचा विपुल पत्रव्यवहार पुस्तकात आहे. यातील बरीच पत्रे, म्हणजे दिल्लीतले मोगल बादशहाच्या दरबारातले पेशव्यांचे वकील, बापूजी हिंगणे यांच्या तक्रारी आहेत. पेशव्यांचे उत्तरेतले सरदार, प्रतिनिधी गोविंदपंत बुंदेले खेर, नारोशंकर, विठ्ठल शिवदेव विंचुरकर इत्यादींचे एकमेकांमधील हेवेदावे, वैयक्तिक स्वार्थासाठी वा प्रतिस्पर्ध्यांवर कुरघोडी करण्यासाठी दौलतीचे हित बाजूला सारून केलेल्या तडजोडी इत्यादी गोष्टी पत्रव्यवहारातून स्पष्ट होतात.


अर्थातच, अंताजी यांनी पेशव्यांना पाठवलेली पत्रे फक्त तक्रारीची नसत. अब्दालीचा बंदोबस्त कायमचा करायचा असेल तर मोठी मराठी फौज उत्तरेत असायला हवी, हे त्यांनी तसेच हिंगण्यांनी पेशव्यांना कळवले होते. अंताजी तसे दुसऱ्या फळीच्या सरदारांनी फौज कमी असूनही १७५७च्या अब्दालीच्या दिल्लीवरच्या स्वारीत त्याच्या फौजांना अनेक ठिकाणी पराभूत केले होते. अंताजींचा एक गुणविशेष या आपल्याला समजतो. भारतातील सतीची प्रथा बंद करण्याचे श्रेय समाजसुधारक राजा राममोहन रॉय यांना दिले जाते. मात्र, त्या आधी ७५ वर्षे सती प्रथा बंद करण्याचा प्रयत्न अंताजी यांनी केला होता. ते उत्तरेत असताना त्यांची सून पती निधनानंतर सती गेली. हे सती प्रथेतील क्रौर्य अंताजी यांना व्यथित करत होते. त्यामुळे, कामरगावी परतल्यावर जुलै १७५४मध्ये त्यांनी अहमदनगर आणि त्यांच्या जहागिरीतली गावे या सर्व प्रदेशात सतीप्रथा बंद करण्याचा हुकूम काढला होता.


नानासाहेब पेशव्यांचा काळ म्हणजे मराठी सत्तेचा उत्कर्षाचा काळ. मराठ्यांच्या अंमल भारतातील बऱ्याच भागावर होता. या प्रदेशातून चौथाई वसूल होऊन पुण्यात येत असे; तरी पेशव्यांची सरदारांना पैसे पाठवण्यासाठी तगाद्याची पत्रे जात. पेशवे नेहेमी कर्जाच्या ओझ्याखाली असत. व्हायचे असे की पेशव्यांचे उत्तर हिंदुस्थानातले दिल्लीतील सरदार, वकील सगळा वसूल सरकारात भरत नसत. शिंदे-होळकरही याला अपवाद नव्हते. पेशव्यांची खरमरीत पत्रे नारोशंकर, विठ्ठल शिवदेव हिंगणे, गोविंदपंत बुंदेले यांना जात. त्यापैकी काहींना चौकशीसाठी पुण्याला बोलावले जाई. अंताजी माणकेश्वरांना याच कारणासाठी पुण्याला बोलावले होते. अंताजी तलवार आणि लेखणी दोन्ही चांगली चालवत; मात्र, थोडे अहंमन्य होते. पुण्यात त्यांची भाऊसाहेबांनी चौकशी केली आणि त्यांना दोषमुक्त केले आणि पानिपत मोहिमेवर सोबत नेले.


रियासतकार सरदेसाई आणि इतिहास संशोधक जदुनाथ सरकार यांनीही त्यांची तारीफ केली आहे. या शूर पण दुर्लक्षित वीराचे चरित्र लेखकाने अनेक संदर्भग्रंथ तसेच पत्रव्यवहारांचा अभ्यास करून सिद्ध केले आहे. पुस्तकाला निवृत्त अतिरिक्त पोलिस महासंचालक पंकज गुप्ता यांची प्रस्तावना आहे.


प्रकाशक : हेड्विंग मीडिया हाऊस
पाने : २१२, किंमत : ३०० रुपये

No comments:

Post a Comment