Total Pageviews

Saturday 1 December 2018

सीमेवर आपले सैनिक रक्त सांडत असताना आपण पाकिस्तानी सोहळ्यात जाणे अयोग्यच

सीमेवर आपले सैनिक रक्त सांडत असताना आपण पाकिस्तानी सोहळ्यात जाणे अयोग्यच अशी भूमिका खुद्द पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनीच घेतलेली असताना सिद्धूसारखा माणूस तिथे जातो... तुकाराम महाराजांच्या अभंगाचा सडेतोड अनुभव कुणीतरी यांना देणार यात शंका नाही.

‘बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना’ नावाची एक म्हण हिंदीमध्ये प्रचलित आहे. खरं तर ही म्हण जम्मू- काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांना लागू होते. कारण, हे महाशय आपल्या अचरट विधानं आणि कृत्यांसाठी प्रसिद्ध आहेत. मात्र, फारूख अब्दुल्लांशीही अचरटपणाच्या बाबतीत स्पर्धा करू शकेल, असे एक व्यक्तिमत्त्व हिंदुस्थानच्या राजकारणात आहे. माजी क्रिकेटपटू आणि खा. नवज्योतसिंग सिद्धू हे त्याचे नाव. कॉमेडी शोमध्ये आपल्या रंजक फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या नवज्योतसिंग सिद्धूने राजकारणात प्रवेश केला तो आपल्या याच करिष्म्यासह. आता मुद्दा असा की, जे टीव्हीवर चालते ते सगळीकडेच चालते का? याचे उत्तर शोधायला अन्य कुठे जावे लागत नाही, त्यासाठी तुम्हाला खुद्द सिद्धूच्या चाळ्यांकडे पाहिले तरी, त्याचे उत्तर मिळून जाते. सध्या सिद्धू कुठल्या पक्षात आहेत, ते जरा तपासून पाहावे लागेल. खरे तर या महाशयांची महत्त्वाकांक्षा पंजाबचे मुख्यमंत्री होण्याची होती. भाजपमध्ये ती काही पूर्ण होणार नाही, हे त्याच्या लक्षात आले आणि मग त्याने निरनिराळी कारणे काढून भाजपमधून काढता पाय घेतला.
 
२०१४च्या पार्श्वभूमीवर काँग्रेसलाही भाजपला खिजवायला पंजाबमध्ये काही तरी हवे होते, ते सिद्धूच्या नावाखाली त्यांना सापडले. आता हा मोती नाकापेक्षा जड होऊन बसला आहे. इतका जड की, त्यामुळे कॅप्टन अमरिंदर सिंग यांनाच कदाचित खाली वाकावे लागेल. सिद्धूने त्याच्या सवयीनुसार, इथेही समासातील जागासुद्धा खायला सुरुवात केली आहे. त्यामुळे कॅप्टन अमरिंदर सिंगही अस्वस्थ आहेत. खरं तर सिद्धूचे पार्सल नवी दिल्लीने पंजाबात पाठविले होते. त्यांनी ते अत्यंत नाखुशीने स्वीकारले होते. करतारपूर कॉरिडोरच्या निमित्ताने या दोघांतील मतभेद आता समोर येऊ लागले आहे. काही नटनट्या वास्तव जीवनातही अभिनयच करतात, तसे नवज्योत सिद्धू सगळीकडे टेलिव्हिजन शोवर असल्यासारखेच वागतात. मागे पाकिस्तानात इमरान खानच्या शपथविधीलाही ते असेच पोहोचले होते. काय ती पाकिस्तानची अवस्था आणि काय त्यांचा तो पंतप्रधान... पहिल्याच आठवड्यात दिवाळखोरी जाहीर करून आपल्या गाड्या विकायला काढलेल्या या इसमाच्या तख्तपोशीला सिद्धू असाच जाऊन थडकला होता. ज्या मूल्यांची पोपटपंची करीत सिद्धू फिरत असतो, ती मूल्यं राजकीय क्षितिजांवर अस्ताला पावत आहेत. पण, सिद्धूसारख्या मनोरंजनात माहीर असलेल्या माणसाला त्याच्याशी काही देणे घेणे नसावे. काहीही बरळावे आणि चर्चेत राहावे, यासाठी त्यांनी सेनेच्या संजय राऊतांशी स्पर्धा लावली आहे.
 
करतारपूर सोहळ्याला हजर राहण्याचे पाकिस्तानी निमंत्रण कॅप्टन अमरिंदर सिंगांनी नाकारले. पंजाबमध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे अमरिंदर सिंग यांनी हा निर्णय घेतला. दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अशा कुठल्याही कार्यक्रमाला हजर राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले. अमरिंदर सिंगांना राजकारण आणि लष्करातीलही उत्तम जाण आहे. पाकिस्तानात कार्यरत काही दहशतवादी गटांना आता जम्मू-काश्मीरमध्ये आपले तळ निर्माण करणे अवघड झाले आहे. त्यांना आता पंजाबमध्ये तसे करणे सोईचे वाटते. स्वत: अमरिंदर सिंगांनीही याबाबत स्पष्टपणे भूमिका घेतली आहे. पाकिस्तानने पंजाबला कुरवाळण्याचे एक विचित्र राजकारण अवलंबिले आहे. केंद्रातील सत्तेच्या विरोधातील पक्षाचे सरकार पंजाबमध्ये आहे. त्यामुळे ते बधेल, असे पाकिस्तानातील अर्धवटांना वाटते. पंजाबमधील राजकारण्यांना पाकिस्तानातील कार्यक्रमांचे निमंत्रण दिले जाते. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी अशी निमंत्रणे यापूर्वीही धुडकावली आहेत. सीमेवर आपले जवान रक्त सांडत असताना अशा कार्यक्रमांना जाणे चुकीचे आहे, असे त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितले. मात्र, शहाणे ज्या रस्त्याला चुकूनही जात नाहीत तिथे जाऊन रपेट मारून येण्याचे उद्योग मूर्ख माणसे करतात, अशा आशयाची एक म्हण आहे. सिद्धूने नेमके तेच अवलंबिले. मूर्खपणाचा कळस म्हणजे खुद्द त्यांच्याच पक्षाचे मुख्यमंत्री इतकी जबाबदारपणे भूमिका घेत असताना हा मूर्खासारखा बरळतो. पाकिस्तानी लष्करप्रमुखाला याने पुन्हा जाऊन मिठी मारली. पत्रकारांनी यावर छेडले असता, त्यावर हा माणूस शिरजोरपणे म्हणतो की, “अशी मिठी मारणे म्हणजे राफेल करार नव्हे.” मनोरंजन करणाऱ्यांचा उपमर्द न करता याठिकाणी एकच सांगावेसे वाटते, ते म्हणजे, अशी माणसांना केवळ सवंग लोकप्रियतेसाठी आपल्या पक्षात घेणे चुकीचे आहे.
 
एका आकड्यावरून पडलेले सरकार हा आपला इतिहास असला तरी अशांना घेऊन आपण पाकिस्तानसारख्या आपलाच द्वेष करणाऱ्या देशाला का संधी देतो, याचा विचार केला पाहिजे. भारत-पाक मैत्रीचे भरपूर प्रयत्न यापूर्वीही झाले आहेत. त्यावर आपण कुठल्याही प्रकारे कधीच काहीही भाष्य केलेले नाही. भारताची भूमिका सदैव सकारात्मकच राहिली आहे. जे वाजपेयींसारख्या उदार मनाच्या नेत्याला मानले नाहीत, ते अशा विदूषकांमुळे मैत्रीची गाणी गायला लागतील असे मानणे चुकीचे आहे. अमरिंदर सिंग आणि सिद्धूमधील मतभेद आता नवीन नाहीत. पंजाबमध्ये अमली पदार्थांचा सुकाळ ही चिंतेची बाब. ‘उडता पंजाब’सारख्या चित्रपटाने हे वास्तव उघडकीला आणले. निवडणुकीतही हा मुद्दा मोठ्या गाजावाजाने चालला होता. कॅप्टन अमरिंदर सिंग हे रॅकेट मोडून काढण्यासाठी विशेष खातेच उभे करतात आणि दुसऱ्या बाजूला सिद्धू अचरटपणे गांजाची शेती आणि तस्करी कायदेशीर करण्याच्या मागणीला पाठिंबा देताना दिसतो. हे खुळे का पाळले आहे, असा प्रश्न पडावा असे हे सिद्धूचे मागणे. पण, सिद्धूसारखी माणसे सभ्यतेने आखलेल्या मर्यादा ओलांडण्याचे पाप करतात, ते केवळ आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठीच. अन्य लोक यांना जोड्याने मारत नाहीत. कारण, ते सभ्यतेचे काही निकष पाळत असतात. मात्र, या वागण्याचे काही ना काही विपरित परिणाम दिसणार, यात काही शंका नाही. कुणीतरी माथेफिरू उठणार आणि पादत्राणे काढून तुकाराम महाराजांच्या ओवीचा अनुभव देणार यात शंका नाही.
 

No comments:

Post a Comment