Total Pageviews

Tuesday 4 December 2018

गगनयान : लक्ष्य 2022

श्रीनिवास औंधकर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केल्यानंतर सांगितले होते, की 2022 पर्यंत भारताचा एखादा सुपुत्र किंवा सुकन्या स्वदेशी गगनयानातून अंतरिक्षात पोहोचेल. भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्थेच्या (इस्रो) मानवविरहित अंतरिक्ष मोहिमेचे नाव ‘गगनयान’ असे आहे. ‘इस्रो’ने आपल्या बाहुबली रॉकेटच्या म्हणजे जीएसएलव्ही मार्क-3 डी-2 च्या साह्याने जीसॅट-29 उपग्रहाचे प्रक्षेपण 14 नोव्हेंबर 2018 रोजी केले. भारताच्या भूमीवरून प्रक्षेपित करण्यात आलेला आजवरचा हा सर्वात वजनदार उपग्रह आहे. 2019 मध्ये प्रक्षेपित होणार्‍या चांद्रयान-2 मोहिमेवेळी याच रॉकेटचा वापर केला जाणार आहे. ‘इस्रो’ने अंतरिक्षात मानवयुक्‍त मोहिमेसाठी 2021, तर तत्पूर्वी मानवविरहित ‘गगनयान’ मोहिमेसाठी डिसेंबर 2020 हे लक्ष्य ठेवले आहे. गगनयान ही केवळ ‘इस्रो’चीच मोहीम नसेल, तर देशातील विविध संस्था आणि दिव्यांगांचेही योगदान असलेली ती एक मोठी मोहीम आहे. ‘इस्रो’च्या नियोजनानुसार, 2022 पर्यंत रशिया, अमेरिका आणि चीनपाठोपाठ भारत हा जगातील असा चौथा देश ठरेल, ज्याच्याकडे मानवाला अंतरिक्षात पाठविण्याची क्षमता आहे. 
गगनयान जीएसएलव्ही मार्क-3 रॉकेटच्या साह्याने अंतरिक्षात प्रक्षेपित केले जाईल. हे भारताचे सर्वांत मोठे आणि सक्षम रॉकेट आहे. त्याला ‘बाहुबली’ असे नाव देण्यात आले आहे. याच रॉकेटच्या साह्याने मानवयुक्‍त यान पाठविले जाणार आहे. ‘इस्रो’ने त्यासाठी क्रू-मोड्युलची चाचणीही 2014 मध्येच पूर्ण केली आहे. क्रू-मोड्युल म्हणजे, ज्या भागात अंतराळवीर बसतात, त्या जागेचा आराखडा. यान सुरक्षित पृथ्वीवर परतणे गरजेचे असते. त्यामुळे तसे मॉडेल तयार करून ते प्रक्षेपित करण्याची आणि पुन्हा सुरक्षित पृथ्वीवर आणण्याची चाचणी घेतली जाते. अंतराळात वापरण्याचे ‘स्पेस सूट’ तर भारताने यापूर्वीच तयार केले आहेत. 

तसे पाहायला गेल्यास ‘इस्रो’च्या प्लॅनिंग कमिटीकडून मानवी अंतरिक्ष मोहिमेला 2004 मध्येच मान्यता देण्यात आली आहे. तेव्हापासूनच अशा मिशनची तयारी सुरू झाली होती. अर्थात, प्रारंभी ही मोहीम 2015 मध्ये पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते; परंतु मिशन लाँच करण्याबाबत स्पष्टता नव्हती. 6 जून 2018 रोजी मोदी सरकारने 4338.2 कोटी रुपयांचा अंदाजित खर्च असलेल्या जीएसएलव्ही मार्क-3 च्या पुढील दहा उड्डाणांसाठी आर्थिक मंजुरी दिली. त्यामुळे वजनदार पेलोड अंतरिक्षात पाठविण्यासाठी क्रायोजेनिक तंत्रज्ञान विकसित करण्यास ‘इस्रो’ला मदत मिळेल. ‘इस्रो’ने मानवी क्रू-मोड्युल, पर्यावरण नियंत्रण आणि जीवनरक्षक प्रणाली आदी तंत्रज्ञान विकसित केले आहे; परंतु 2022 मध्ये प्रत्यक्ष मानवाला अंतराळात पाठविण्यापूर्वी दोन मानवविरहित मोहिमा आणि एक अंतरिक्ष यान जीएसएलव्ही मार्क -3 चा वापर करून प्रक्षेपित केल्या जातील. ‘इस्रो’चे माजी अध्यक्ष के. राधाकृष्णन यांच्या नेतृत्वाखाली मंगलयान मिशन 2013 मध्ये प्रक्षेपित करण्यात आले होते. ‘गगनयान’ हा ‘इस्रो’च्या दृष्टीने ‘टर्निंग पॉईंट’ असेल, असे के. राधाकृष्णन यांनी म्हटले होते. याच दरम्यान ‘इस्रो’ने चांद्रयान-2 मोहिमेच्या लाँचिंगच्या तारखेची घोषणा केली आहे.  
‘इस्रो’चे अध्यक्ष के. सिवन यांच्या म्हणण्यानुसार, हे यान 3 जानेवारीला प्रक्षेपित केले जाईल. 16 फेब्रुवारीला हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या जवळ निश्‍चित स्थानावर उतरेल. याखेरीज भारत 2022 मध्ये ‘गगनयान’ हे मानव मिशन ‘इस्रो’ने आखले आहे. चांद्रयान-2 चे वजन 600 किलोग्रॅम वाढविण्यात आले आहे. ‘गगनयान’वर सुमारे 10 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. कोणत्याही अन्य देशांच्या मानव मिशनच्या तुलनेत हा खर्च खूपच कमी आहे. आतापर्यंत अमेरिका, रशिया आणि चीनने मानवाला अंतरिक्षात पाठविले आहे. हे देश चंद्रावरही पोहोचले असून, भारताला एकमेव स्पर्धा इस्राएलची आहे. या मिशनअंतर्गत भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था प्रथमच चंद्रावर यान उतरविण्याचा प्रयत्न करणार आहे. भारताच्या चांद्रयान-1 मिशनने चंद्रावर पाण्याचा शोध घेण्यात यश मिळविले होते. चांद्रयान-2 हे याच मिशनचे विस्तारित रूप आहे. 
प्रोजेक्ट चांद्रयान-2 मिशन 800 कोटी रुपये खर्चाचे आहे. या मिशनच्या माध्यमातून चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग करून सहा चाकांचे रोव्हर चंद्रावर उतरवेल. या मिशनसाठीही आपल्या सर्वात मोठ्या बाहुबली रॉकेटचा वापर भारताकडून केला जाईल. चांद्रयान-2 चंद्राच्या कक्षेत पोहोचल्याबरोबर लँडर आणि ऑर्बिटर वेगवेगळे होतील आणि लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरेल. रोव्हरचे डिझाइन अशा प्रकारे करण्यात आले आहे, जेणेकरून ते चंद्राच्या पृष्ठभागावर 14 दिवस राहू शकेल आणि दीडशे ते दोनशे किलोमीटर चालू शकेल. रोव्हर दर 15 मिनिटाला एक या प्रमाणे चंद्राच्या पृष्ठभागाची छायाचित्रे आणि आकडेवारी पृथ्वीवर पाठवणार आहे. 14 दिवसांनी रोव्हर ‘स्लीप मोड’वर जाईल.
भारताच्या मानव मिशनसाठी अंतराळवीरांची निवड हा महत्त्वाचा मुद्दा असतो. 1984 च्या मोहिमेत ज्या संस्थेने अंतराळवीरांची निवड केली होती, तीच संस्था भारतीय अंतराळवीरांची निवड करणार आहे. त्यावेळी राकेश शर्मा या भारतीय अंतराळवीराची निवड झाली होती. इन्स्टिट्यूट ऑफ एअरोस्पेस मेडिसिन (आयएएम) ही भारतीय वायुदलाच्या अखत्यारीत काम करणारी संस्था ही निवड करते. अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, गगनयान मोहिमेसाठी 30 उमेदवारांचा संच तयार केला जाईल आणि त्यातील 15 जणांची निवड करून त्यांना प्राथमिक प्रशिक्षण दिले जाईल. याव्यतिरिक्‍त अंतराळवीरांना जीवशास्त्र, भौतिकशास्त्र आणि औषधांच्या बाबतीत प्रशिक्षित केले जाईल. ‘आयएएम’ या उमेदवारांना औषधांबाबत प्रशिक्षण देईल, तर अन्य प्रशिक्षक इतर बाबींचे प्रशिक्षण देतील. अंतरिक्ष फ्लाइटचे एक प्रारूप तयार करण्यात येते. त्याला फ्लाइट सर्जन सपोर्ट असे म्हणतात. तेही ‘आयएएम’तर्फे तयार करण्यात येईल. प्राथमिक प्रशिक्षणानंतर विशेष प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या अंतराळवीरांना देशाबाहेर पाठविले जाईल. थोडक्यात, सर्व बाजूंनी तयारी सुरू असून, ‘इस्रो’कडून चांद्रयान आणि गगनयान या दोन महत्त्वाच्या मोहिमा आगामी काळात भारताचा या क्षेत्रातील दबदबा वाढविणार्‍या ठरणार आहेत. 

No comments:

Post a Comment