Total Pageviews

Wednesday 1 August 2018

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे दोन्ही महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे महान सुपुत्र-विलास पंढरी<< -


लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे दोन्ही महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे महान सुपुत्र होतेलोकमान्य टिळक यांची आज पुण्यतिथी तर शिवशाहीर अण्णाभाऊ साठेंची जयंतीत्यानिमित्ताने या दोन्ही मराठी सुपुत्रांच्या अलौकिक जीवनाचा थोडक्यात घेतलेला आढावा.
लोकमान्य टिळक यांना हिंदुस्थानी असंतोषाचे जनक म्हटले जाते. आपल्या देशात गांधीजी आणि पंडित नेहरूंना जो मानसन्मान मिळाला तेवढा मानसन्मान सरदार वल्लभभाई पटेल व लोकमान्य टिळकांना मिळाला नाही. वास्तविक दोघांचेही कार्य तेवढेच महत्त्वाचे होते. दोघेही काँग्रेसचे उत्तुंग नेते होते. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच’ असे म्हणणारे टिळक स्वातंत्र्य मिळाले तेव्हा हयात नव्हते. महाराष्ट्र सरकारने टिळकांनी अखेरचा श्वास घेतला त्या सरदारगृहाचे राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्याचे आश्वासन तर दिले आहे.
आजच्या लोकमान्य टिळक पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांच्या वेगळय़ा पैलूंवर प्रकाश टाकणे उद्बोधक ठरेल. ‘कोणतेही काम करताना ते काम जगा म्हणजे तुमच्या हातून जे होईल ते फक्त सर्वोत्कृष्टच’ हा सध्याच्या मॅनेजमेंटमध्ये प्रचंड महत्त्व आलेला एक मूलभूत नियम आहे. मात्र तो लोकमान्यांनी एकोणिसाव्या शतकात जगून दाखवला. लोकमान्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाबद्दल सांगावे तेवढे थोडेच. ते एक गणितज्ञ होते, पत्रकार होते. त्यांचा ज्योतिषाचा अभ्यास होता. सर्वांगीण इतिहासाचा अभ्यास असणारे ते इतिहासतज्ञ होते,  मानवी उक्रांतीचे अभ्यासक होते. जहाल क्रांतिकारक होते. ‘कृष्णाचे कीर्तन’ करणाऱ्या क्रांतिकारक चापेकरांना कृष्णाचे जीवन जगायला प्रोत्साहन देणारे राजनीतीज्ञ होते. सावरकरांसारख्या क्रांतिकारकांना ब्रिटनमध्ये जाण्यासाठी सर्वतोपरी मदत करणारे ‘गुरू’ होते,  झनाना मिशन प्रकरणातील मवाळ नेत्यांना सांभाळून घेणारे त्यांचे वकील होते. त्याचबरोबर त्यासाठी शंकराचार्यांकडे माफी मागणारे नम्र, पण जहाल नेतेही होते, समुद्र पार केला म्हणून काशीला जाऊन प्रायश्चित्त घेणारे ‘कर्मठ’ होते, तर महर्षी कर्वे यांच्या स्त्राrशिक्षणाचे कौतुक करणारे उदारमतवादीही होते.  हिंदुस्थानच्या पहिल्या डॉक्टर आनंदीबाई जोशींना त्यांच्या शेवटच्या काळात मदत करणारे ‘स्त्री-पुरुष समानतेचे’ खंदे पुरस्कर्ते होते. राजद्रोहाच्या खटल्यात स्वतःची बाजू स्वतः मांडणारे कुशल वकील होते. ज्यांच्यासाठी खुद्द बॅ. मोहम्मद अली जीना यांच्यासारखा मुस्लिम नेता रस्त्यावर आणि न्यायालयात लढत असे असे हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक होते. शिवजयंती आणि गणेशोत्सव सुरू करून समाजाला एकत्र आणणारे समाजसेवक होते. रायगडावरील शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार करणारे ‘शिवसेवक’ होते, सहकारी बँक सुरू करणारे सहकारमहर्षी होते, तळेगाव येथे काच कारखाना सुरू करणारे स्वदेशी उद्योजक होते. शेगावच्या गजानन महाराजांचे आवडते भाविक होते. जीवनाच्या सर्वांगाने काम करताना त्यातून टिळक फक्त एकच साधत होते ते म्हणजे हिंदुस्थानचे स्वातंत्र्य! एक ऋषितुल्य जीवन टिळक जन्मभर जगले. म्हणूनच १ ऑगस्ट १९२० रोजी टिळकांचे देहावसान झाल्यावर टिळकांची अंत्ययात्रा पद्मासनात काढण्यात आली.
महाराष्ट्राचा आणखी एक सुपुत्र म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. १ ऑगस्ट ही लोकमान्यांची पुण्यतिथी तर अण्णाभाऊ साठे यांची जयंती. १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिह्यातील वाटेगाव इथे अण्णाभाऊंचा जन्म झाला. अण्णाभाऊ साठे यांनी मराठी भाषेत ३५ कादंबऱ्या लिहिल्या. त्यामध्ये ‘फकिरा’ समाविष्ट आहे. जिच्या वीसेक आवृत्त्या निघाल्या आहेत. तिला १९६१ मध्ये राज्य सरकारचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला आहे. अण्णाभाऊ साठेंच्या लघुकथांचे १५ संग्रह आहेत. त्यांच्या साहित्याचे मोठय़ा संख्येने बऱ्याच हिंदुस्थानी भाषांमध्ये आणि बिगर हिंदुस्थानी भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. कादंबरी आणि लघुकथा यांच्याव्यतिरिक्त अण्णाभाऊंनी तीन नाटके, रशियातील ‘भ्रमंती’ हे प्रवासवर्णन, १२ पटकथा आणि मराठी पोवाडा शैलीतील १५ गीते लिहिली आहेत. त्यांच्या पोवाडा आणि लावणी यांसारख्या लोककथात्मक कथाशैलीने लोकांमध्ये ते लोकप्रिय बनले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेल्या ‘फकिरा’मध्ये अणाभाऊंनी आपल्या समुदायाला वाचवण्यासाठी ग्रामीण रूढीवादी प्रणाली आणि ब्रिटिश शासनाच्या विरुद्ध विद्रोह करणारा नायक ‘फकिरा’ला चित्रित केले.
अण्णाभाऊ पहिल्यांदा कम्युनिस्ट विचारसरणीने प्रभावित होते. एन. गवंकर आणि अमर शेख या लेखकांसोबत ते लाल बावटा कला पथक या तमाशा नाटय़प्रसाराचे सदस्य होते, ज्यामार्फत ब्रिटिशांच्या निर्णयांना आव्हान दिले जाई. हिंदुस्थानी स्वातंत्र्यानंतर जातीव्यवस्थेच्या विरोधात त्यांनी १६ ऑगस्ट १९४७ रोजी मुंबई येथे मोर्चा काढला आणि त्या मोर्चातील घोषणा होती ‘ये आझादी झुठी है, देश की जनता भुखी है!’ इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशनमध्येही ते एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्व होते. जी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची एक सांस्कृतिक शाखा होती. अण्णाभाऊंनी दलित व कामगारांच्या जीवनातील अनुभवांना प्रकट करण्यासाठी कथांचा वापर केला.  १९५८ मध्ये पहिल्या दलित साहित्य संमेलनात आपल्या उद्घाटनपर भाषणात त्यांनी म्हटले होते की, ‘पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित व कामगार लोकांच्या तळहातावर तरलेली आहे.’ यातून त्यांनी दलित आणि कामगार वर्गाचे महत्त्व स्पष्ट केले. १ ऑगस्ट २००१ रोजी अण्णाभाऊंचे विशेष टपाल तिकीट काढले गेले. लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे दोन्ही महाराष्ट्राचेच नव्हे, तर देशाचे महान सुपुत्र होते

No comments:

Post a Comment