Total Pageviews

Friday 3 August 2018

जलजागरूकता कधी येणार?-PUDHARI- प्रा. रंगनाथ कोकणे

सध्या देशातील एकतृतीयांश भागात पाऊस कमी झाल्याने दुष्काळाचे सावट असल्याचे चित्र दिसत आहे. दुसरीकडे, यमुनेसारख्या नद्यांना आलेल्या महापुराने हाहाकार माजला आहे. विशेषत:, पाणी टंचाईचा सामना करणार्‍या महानगरांत किंवा मोठ्या शहरांत पाऊस चांगला पडत आहेत. निसर्ग माणसाला भरभरून पाणी देत असताना काही दिवसांनंतरच पाणी टंचाईचे चटके जाणवू लागतात. पाणी टंचाईचे प्रमुख कारण हे कमी पावसात नसून, आपल्या सवयीचा तो एक परिणाम होय. पुरेसा संचय न करणे आणि वाया घालवणे हे प्रमुख कारण मानले जाते. त्यामुळे चांगला पाऊस पडूनही डिसेंबर-जानेवारीपासून पाण्यासाठी ओरड सुरू होते. विशेष म्हणजे, चांगला पाऊस पडत असताना त्याचा साठा कसा करता येईल, यावर कोणत्याच पातळीवरून लक्ष दिले जात नाही. परिणामी, नागरिकांना, ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. दुष्काळ आणि पूर या निसर्गाच्या दोन बाजू आहेत, जसे की ऊन आणि सावली. पावसाळा संपल्यानंतर काही दिवसांतच पाणी टंचाईच्या बातम्या येऊ लागतात. कोठे पिण्यासाठी पाणी नाही, तर कोठे पिकाला द्यायला पाणी नाही. समाधानकारक आणि शंभर टक्के पाऊस पडूनही अशी स्थिती निर्माण का होते, हे आपण जाणून घेण्याचा कधी प्रयत्न केला आहे का? तर त्याचे उत्तर नाहीच असेच असेल. पावसाचे पाणी शेवटी जाते कोठे, याचा शोध घेतला आहे का? अशी अनेक प्रश्‍न अजूनही अनुत्तरित आहेत.  
जगात 1.4 अब्ज नागरिक हे शुद्ध पाण्यापासून वंचित आहेत. उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा हे ऋतुचक्र असून, ते अविरत सुरू राहणे हे निसर्गासाठी आणि माणसासाठी आवश्यक आहे. या निसर्गचक्राच्या आधारेच आपल्याला पाणी मिळते. यात काही बिघाड झाला, तर पाण्यापासून आपण वंचित राहू शकतो. याशिवाय, निसर्गापासून जेवढे पाणी आपल्याला मिळते, ते पाणी परत देणे हे माणसाचे कर्तव्य आहे; मात्र आपण ही कर्तव्ये पाळण्याबाबत फारसे उत्सुक नसतो. पाण्याबाबतचे वास्तव आपण गांभीर्याने पाहिले, तर आपल्या लक्षात येईल, की आपण किती पाणी वाया घालवतो. उदाहरणच घ्यायचे तर, मुंबईत दररोज धुतल्या जाणार्‍या गाड्या. या गाड्यांसाठी दररोज 50 लाख लिटर पाणी खर्च होते.  दिल्ली, मुंबई आणि चेन्नईसारख्या महानगरांत पाईपलाइनच्या सदोष व्हॉल्व्हमुळे 17 ते 44 टक्के पाणी वाया जाते. ब्रह्मपुत्रा नदीचे दररोज 2.16 घनमीटर पाणी बंगालच्या उपसागरात जाते. 

आपल्या समाजात पाणी वाया घालवण्याची प्रवृत्ती अधिक बळावलेली आहे. त्यावर अंकुश बसवण्यासाठी फार मोठे प्रयत्न केले गेले नाहीत. वास्तविकपणे, आपल्या देशाला जेव्हा स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा या दिशेने गांभीर्याने काम केले गेले नाही. जगात दर दहा व्यक्तींपैकी दोन व्यक्तींना शुद्ध पाणी मिळत नाही. अशा स्थितीत दरवर्षी सहा अब्ज लिटर पाणी हे सिलबंद बाटलीतून पिण्यासाठी आपण प्रवृत्त होतो. पाण्याचा मुख्य स्रोत मानल्या जाणार्‍या नदीचे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी तज्ज्ञ हे उपाय शोधत आहेत; मात्र जोपर्यंत कायदा कडक होत नाही, तोपर्यंत अधिकाधिक नागरिकांना दूषित पाणी पिण्याशिवाय पर्याय राहणार नाही. पृथ्वीचा विस्तार हा 51 कोटी वर्ग किलोमीटर इतका आहे. त्यापैकी 36 कोटी वर्ग किलोमीटर जागा ही पाण्याने व्यापलेली आहे. दुर्दैवाने यात पिण्यायोग्य पाण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. 97 टक्के भागात समुद्र व्यापलेला आहे. उर्वरित तीन टक्क्यांतील उपलब्ध पाण्यापैकी दोन टक्के पाणी हे डोंगर, धु्रवांवर बर्फरूपातून जमलेले आहे. या पाण्याचा काहीच उपयोग होत नाही. जर यापैकी सुमारे सहा कोटी घन किलोमीटर बर्फ वितळला, तर महासागरातील पाण्याची पातळी 80 मीटरने वाढेल; परंतु ही बाब शक्य नाही. पृथ्वी सोडून आपण चंद्राची गोष्ट केली, तर तेथील धुव्रीय प्रदेशात 30 कोटी टन पाण्याचा अंदाज आहे. 
1991 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेने उदारीकरणाचे धोरण स्वीकारल्यानंतर खासगीकरणाला वेग आला. एकानंतर एक क्षेत्राचे खासगीकरण होऊ लागले. सर्वात मोठा झटका हा पाण्याच्या खासगीकरणाचा. भारतात वीज निर्मिती क्षेत्राचे खासगीकरण करण्याची गोष्ट निर्माण झाली, तेव्हा त्यावर चर्चा झाली नाही. मोठ्या प्रमाणात होणारी वीज टंचाई लक्षात घेता, विजेचे खासगीकरण करण्याच्या प्रक्रियेला चालना देण्यात आली; पण त्याचे परिणाम आपण आज पाहत आहोत. पाण्याच्या संदर्भात विकासाच्या नावावर देशाला बरीच किंमत मोजावी लागत असल्याचे सरकारने मान्य केले आहे. आता पाणी क्षेत्राच्या खासगीकरणाचा विचार पुढे आला आहे. नदीची देखभाल खासगी कंपन्यांकडे देण्याचा विचार होत आहे. आज विकासाच्या नावावर तलाव आणि नद्या ओसाड ठेवण्यास कोणतीही कसर ठेवली जात नाही. जर आपण पावसाच्या पाण्याचा एक थेंब जरी वाचवला नाही, तर भविष्यात केवळ आपल्याच डोळ्यात पाणी राहील. एके काळी आपल्या देशात हजारो नद्या मुक्तपणे खळखळून वाहत होत्या. आज हजारो नद्यांची संख्या शेकड्यांवर आली आहे. या नद्या कोठे गायब झाल्या हे कोणीही सांगावयास तयार नाही.

No comments:

Post a Comment