Total Pageviews

Tuesday 21 August 2018

टोबॅको इज अ सायलेंट किलर,’-वाढते धूम्रपान घातकच! महा एमटीबी 22-Aug-2018

‘टोबॅको इज अ सायलेंट किलर,’ असं म्हटलं जातं, ते अगदी खरंच आहे. तंबाखू खाणं आरोग्यास हानिकारक आहे, अशी सूचना तंबाखूच्या पुडीवर, विडीच्या बंडलावर, सिगारेटच्या पाकिटावर ठळकपणे लिहिलेली असतानाही लोक तंबाखूचं सेवन करतात. तंबाखू खाल्ल्याने किंवा धूम्रपान केल्याने कॅन्सर होतो, असं सांगितल्यानंतरही तंबाखूचं सेवन थांबत नाही. याउलट, तंबाखू न खाणार्यांना किंवा सिगारेट न ओढणार्यांना काय कॅन्सर होत नाही काय, असा प्रतिप्रश्न केला जातो. दरवर्षी भारतात तंबाखूमुळे होणार्या कॅन्सरने नऊ लाख लोकांचा मृत्यू होत असतानाही तंबाखूसेवनाचे प्रमाण कमी झालेले नाही. धूम्रपानाचे प्रमाणही वाढतच चालले आहे. सिनेमात सिगारेट ओढतानाचे दृश्य दाखवायचे असेल, तर ‘धूम्रपान आरोग्यास घातक आहे,’ अशी ओळ दाखवावीच लागते. लोकांनी तंबाखूचे सेवन करू नये यासाठी अनेक उपाययोजना असतानाही तंबाखू खाणार्यांचे, विडी-सिगारेट ओढणार्यांचे प्रमाण वाढतच चालले आहे, ही चिंताजनक बाब आहे. भारतात जवळपास 12 कोटी लोक सिगारेट ओढतात. जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल विचारात घेतला, तर जगात जेवढे लोक सिगारेट ओढतात, त्याच्या 12 टक्के लोक हे भारतात आहेत. यावरून आपल्याला या समस्येचे गांभीर्य लक्षात येईल.
 
भारतात वेगवेगळे कायदे आहेत, चळवळी चालवल्या जातात, व्यसनमुक्तीसाठी कार्यक्रम राबविले जातात, धूम्रपान करणे आरोग्यास हानिकारक असल्याचे निक्षून सांगितले जाते, तरीही लोक धूम्रपान करतात. विशेष म्हणजे स्त्रियांमधील वाढते धूम्रपान हा अधिक चिंतेचा विषय झाला आहे. ग्रामीण भागात तर स्त्रिया सुरुवातीपासूनच तंबाखूचे सेवन करतात, कुठेकुठे विड्या ओढतात. पण, आता शहरी भागातील महिलांमध्ये सिगारेट ओढण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. भारतात गेल्या काही वर्षांत पुरुषांचे धूम्रपानाचे प्रमाण कमी होत चालले असताना, स्त्रियांमधील धूम्रपान वाढत चालले आहे. वाढत्या धूम्रपानामुळे स्त्रियांना वांझपणाचा धोका वाढला आहे. शिवाय, कॅन्सरचा धोका आहेच. टीव्हीवर येणार्या जाहिराती, दाखविले जाणारे कार्यक्रम यामुळे स्त्रियांवर नको तो प्रभाव पडत आहे. टीव्हीने केलेल्या आक्रमणामुळे भारतातील स्त्रियांची जीवनशैलीही बदलत चालली आहे.
 
बदलत्या जीवनशैलीत धूम्रपानाची सवय केव्हा लागली, हे सिगारेट ओढणार्या स्त्रियांनाही कळत नाही! बदलत्या लाईफ स्टाईलमुळे महिलांना धूम्रपान करण्याची सवय जडत आहे, असे एका सर्वेक्षणाअंती लक्षात आले आहे. धूम्रपानामुळे महिलांमध्ये वांझपणा येण्याची शक्यता तर बळावतेच, कॅन्सरचा धोकाही उत्पन्न होतो. याशिवाय, धूम्रपान केल्याने फुफ्फुस कमजोर होण्यास प्रारंभ होतो. जे धूम्रपान करतात, त्यांना सुरुवातीची चार-पाच वर्षे याबाबत काही जाणीव होत नाही. त्यांचे फुफ्फुस नियमितणे काम करीत असते. प्रत्यक्ष परिणाम दिसत नसला, तरी नुकसान सुरू झालेले असते. तंबाखू जरी पुरुष आणि महिला असा भेदभाव करीत नसला, तरी धूम्रपानामुळे महिलांवर लवकर विपरीत परिणाम होतो, असे तज्ज्ञ सांगतात. वांझपणासोबतच सर्व प्रकारच्या कर्करोगाचा धोका वाढीस लागत असल्याने चिंता वाढीस लागली आहे. भारत आणि चीन या दोन देशांमधील लोकसंख्या प्रचंड आहे. चीन नंबर एकवर आणि भारत नंबर दोनवर आहे. या दोन्ही देशांकडे पाश्चात्त्य जग बाजारपेठ म्हणूनच पाहते. त्यामुळेच अन्य उत्पादनांसोबतच तंबाखूयुक्त पदार्थांसाठीही भारत आणि चीनच्या बाजारपेठेवर पाश्चात्त्यांचा डोळा आहे. या दोन्ही देशांमधील महिला जाहिरातींना लवकर बळी पडतात, दोन्ही देशांमधील महिलांवर जाहिरातींचा प्रभाव लवकर पडतो, असा एका सर्वेक्षणातील निष्कर्ष आहे, जो चिंताजनक आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये असलेले कडक कायदे सिगारेट कंपन्यांना मानवणारे नाहीत. त्यामुळे ते भारत आणि चीनमध्ये आपल्या उत्पादनांचा प्रचार-प्रसार करतात.
 
 
भारत आणि चीन या दोन देशांमधील पुरुषांसोबतच मोठ्या प्रमाणात महिला सिगारेट ओढायला लागल्या, की पाश्चात्त्य जगातील बाजारपेठांची आपल्याला गरजच पडणार नाही, असा या कंपन्यांचा होरा आहे. त्यातूनच ते मोठ्या प्रमाणात जाहिराती करताना दिसतात. यावर अंकुश लावण्याची गरज आहे. दिवसेंदिवस धूम्रपान करणार्या स्त्रियांची संख्या वाढत चालली आहे. पूर्वी मुंबईसारख्या महानगरांमध्ये दिसणारे दृश्य आता अनेक छोट्यामोठ्या शहरांमध्येही दिसू लागले आहे. ही बाब समाजाची चिंता वाढविणारी आहे. विकसित देशांमध्ये धूम्रपान करणार्यांची जी संख्या आहे, त्यात 30 टक्के पुरुष आणि 17 टक्के महिला आहेत. विकसनशील देशात धूम्रपान करणार्यांत 32 टक्के पुरुष आणि केवळ चार टक्के महिला आहेत. याचा अर्थ असा की, महिलांचे धूम्रपान करण्याचे प्रमाण हे विकसित देशात जास्त आहे. अमेरिकेसारख्या प्रगत आणि बलाढ्य देशात दरवर्षी पाच लाख लोकांचा धूम्रपान केल्याने होणार्या कॅन्सरने मृत्यू होतो.
 
 
 
धूम्रपानामुळे होणार्या आजारांवर दरवर्षी 300 कोटी डॉलर्स एवढा प्रचंड खर्च होतो. अमेरिकेत पुरुषांचे सिगारेट ओढण्याचे प्रमाण 22 टक्के आणि स्त्रियांचे 17 टक्के आहे. एकूण लोकसंख्येच्या पाच कोटी लोक धूम्रपान करतात. फ्रान्समध्ये धूम्रपानामुळे होणार्या आजारांवर 200 कोटी डॉलर्स, इंग्लंडमध्ये 100 कोटी डॉलर्स, चीनमध्ये 70 कोटी डॉलर्स एवढा खर्च केला जातो. भारतात अशा आजारांवर एक लाख 10 हजार कोटी रुपयांचा खर्च केला जातो. केंद्र आणि राज्यांची सरकारं मिळून आरोग्य सुविधांसाठी जेवढा खर्च करतात, त्याच्या 12 पट जास्त खर्च आपल्या देशात धूम्रपान केल्यामुळे होणार्या आजारांवर उपचार करण्यावर खर्च केला जातो. यावरून आपल्याला समस्येचे गांभीर्य लक्षात यावे. भारतात एक हजार लोकांमध्ये 87 लोक धूम्रपान करतात. एक व्यक्ती सरासरी दररोज आठ सिगारेट ओढते. पाकिस्तानातील ही सरासरी 16 सिगारेट एवढी आहे. पाकमध्ये हजारात 100 लोक धूम्रपान करतात. रशियात हजारात 269 लोक धूम्रपान करतात आणि एक व्यक्ती सरासरी दररोज 24 सिगारेट ओढते. चीनमध्ये 209 लोक सिगारेट ओढतात आणि सरासरी 22 सिगारेट ओढल्या जातात. नेपाळमध्ये 109 लोक धूम्रपान करतात आणि सरासरी सहा सिगारेट ओढतात.
 
 
युएईमध्ये हजारात 154 लोक धूम्रपान करतात आणि सरासरी 18 सिगारेट ओढतात. भूतानमध्ये 84 लोक धूम्रपान करतात आणि सरासरी 23 सिगारेट ओढतात. बांगलादेशात हजारात 157 लोक धूम्रपान करतात आणि सरासरी तीन सिगारेट ओढतात. अमेरिकेत 200 लोक सिगारेट ओढतात आणि सरासरी 23 सिगारेट ओढतात. न्यूझीलंडमध्ये 132 लोक धूम्रपान करतात आणि सरासरी 20 सिगारेट ओढतात. ऑस्ट्रेलियात 135 लोक धूम्रपान करतात आणि सरासरी 20 सिगारेट ओढतात. जपानमध्ये हे प्रमाण हजारात 183 एवढे असून, सरासरी 24 सिगारेट ओढल्या जातात. ग्रीस या देशात एक हजार लोकांमध्ये 312, मॅसिडोनियामध्ये 307, सर्बियामध्ये 298 लोक धूम्रपान करतात. सुरिनाम या देशात एक माणूस दररोज सरासरी 109 सिगारेट ओढतो! त्याला ‘चेनस्मोकर’पेक्षाही काही वेगळे नाव देता येईल. धूम्रपानाचे हे प्रमाण अतिशय घातक आहे. त्यामुळे धूम्रपानविरोधी मोहीम भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगात वेगाने चालू करण्याची गरज आहे. धूम्रपानामुळे होणारे नुकसान अधोरेखित करतानाच जनतेने आपापल्या देशातील सरकारांवर दबाव आणून तंबाखूवर बंदी घालण्याची मागणी रेटून धरली पाहिजे. तर आणि तरच पुढला अनर्थ टळणार आहे

No comments:

Post a Comment