आखाती देशांतील वेगाने बदलणाऱ्या भूराजकीय घडामोडी, तसेच अमेरिका-इस्रायल-इराण यांच्यातील वाढता संघर्ष आणि या सर्व पार्श्वभूमीवर भारताची नेमकी भूमिका काय या विषयावर प्रकाश टाकण्यासाठी पुण्यात मंगळवारी (दिनांक ७) विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रबोधन मंच आणि विश्व संवाद केंद्र, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होणार आहे.
एरंडवणे येथील ‘सेवाभवन’ येथे मंगळवारी ७ एप्रिलला सायंकाळी सहा वाजता हे व्याख्यान होईल. ‘भारत आणि मध्यपूर्व: अमेरिका-इस्रायल-इराण संघर्षातील आपली भूमिका’ असा या व्याख्यानाचा मुख्य विषय आहे. या वेळी भारतीय सैन्य दलातील अनुभवी अधिकारी, राष्ट्रीय सुरक्षा तज्ज्ञ व लेखक निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन आणि तेल व वायू क्षेत्रातील जागतिक प्रकल्पांचा प्रदीर्घ अनुभव असलेले इंजिनिअर कल्याण कुलकर्णी हे सखोल मार्गदर्शन करणार आहेत. मध्यपूर्वेतील सद्यस्थितीचा जागतिक अर्थव्यवस्थेवर आणि विशेषतः भारतावर काय परिणाम होऊ शकतो, याचे तांत्रिक व सामरिक विश्लेषण या माध्यमातून मांडले जाईल. कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रबोधन मंचचे अध्यक्ष विद्याधर कुलकर्णी आणि विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष अभय कुलकर्णी यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment