Total Pageviews

Thursday, 15 October 2026

स्वातंत्र्यवीर सावरकर : भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेचे दूरदर्शी शिल्पकार आणि काळाच्या पुढे असलेला सामरिक विचार-BY BRIG HEMANT MAHAJAN,YSM

 


 

हे पुस्तक स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, शिवाजी पार्क, मुंबई यांनी प्रकाशित केले असून ते तेथे उपलब्ध आहे. याशिवाय, माझ्याकडे या पुस्तकाच्या ५० मानार्थ (Complimentary) प्रती उपलब्ध आहेत. महाराष्ट्रातील अभ्यासक, विचारवंत, संशोधक आणि राष्ट्रहिताचा विचार करणाऱ्या वाचकांना या प्रती भेटस्वरूपात देण्याची माझी इच्छा आहे.

इच्छुकांनी माझ्याशी मोबाईलवर संपर्क साधून माझ्या निवासस्थानी येऊन पुस्तकाची प्रत स्वीकारावी. ३० ऑक्टोबर २०२६ पर्यंत "प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य" या तत्त्वावर या प्रती उपलब्ध करून दिल्या जातील.

ही संधी शक्य असल्यास अवश्य घ्यावी. कारण स्वातंत्र्यवीर सावरकरांचे राष्ट्रीय सुरक्षा, राष्ट्रनिर्माण आणि सामरिक विचार आजच्या अस्थिर जागतिक वातावरणातही तितकेच उपयुक्त व मार्गदर्शक आहेत. भारताला अधिक सुरक्षित, समर्थ आणि आत्मनिर्भर राष्ट्र बनविण्यासाठी प्रत्येक जागरूक नागरिकाची भूमिका महत्त्वाची आहे. त्या दृष्टीने हे पुस्तक वाचनासाठी अवश्य उपयुक्त ठरेल, असा मला विश्वास आहे.

 

ब्रिगेडियर हेमंत महाजन

सावरकरांची सुरक्षा दृष्टी : २१व्या शतकातील भारतासाठी मार्गदर्शन

"जे आज मी सांगतो ते लोकांना पन्नास वर्षांनी पटते. पन्नास वर्षे वाट पाहण्याची माझी सिद्धता आहे."
— स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

काही व्यक्तिमत्त्वे इतिहास घडवतात, काही इतिहासाचे विश्लेषण करतात; परंतु काही विलक्षण व्यक्तिमत्त्वे अशी असतात की जी इतिहासाच्या पुढे जाऊन भविष्याचा अचूक वेध घेतात. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे अशाच दुर्मिळ आणि दूरदर्शी व्यक्तिमत्त्वांपैकी एक होते. त्यांचे जीवनकार्य, राष्ट्रभक्ती, वैचारिक परखडपणा आणि असामान्य दूरदृष्टी यांचे समग्र मूल्यमापन आजही भारतीय समाजाने पूर्णपणे केलेले नाही, असे मला अनेकदा वाटते.

 

भारतीय इतिहासात काही नेते आणि विचारवंत असे आहेत की ज्यांचे मूल्यमापन त्यांच्या समकालीन कार्यावरूनच नव्हे, तर त्यांनी भविष्याबाबत केलेल्या अचूक भाकितांवरूनही करावे लागते. सावरकर हे त्यापैकीच एक होते.

 

त्यांच्या व्यक्तिमत्त्वात क्रांतिकारक, साहित्यिक, कवी, इतिहासकार, समाजसुधारक, संघटक, राजकीय विचारवंत आणि राष्ट्रभक्त यांचा अद्वितीय संगम दिसून येतो. तथापि, या सर्व पैलूंपेक्षाही अधिक महत्त्वाचा असा एक पैलू आहे, ज्याची पुरेशी चर्चा आजही होत नाही. तो म्हणजे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेविषयी विलक्षण दूरदृष्टी बाळगणारा, काळाच्या कित्येक दशकांपुढे विचार करणारा रणनीतिक विचारवंत म्हणून सावरकरांचा अभ्यास.

 

हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मला अनेक वर्षांच्या लष्करी सेवेतून, राष्ट्रीय सुरक्षेच्या सखोल अभ्यासातून आणि सावरकरांच्या साहित्य-विचारांच्या चिंतनातून प्राप्त झाली.

हे पुस्तक लिहिताना दोन प्रश्न सतत माझ्या मनात होते. पहिला प्रश्न असा की, सावरकरांनी त्यांच्या

 

काळात भारताच्या सुरक्षेविषयी नेमके कोणते विचार मांडले होते? आणि दुसरा प्रश्न असा की, आजच्या काळातील बहुआयामी सुरक्षा आव्हानांकडे पाहताना सावरकर जिवंत असते तर त्यांनी कोणती भूमिका मांडली असती?

या पुस्तकाचा प्रवास पूर्ण करताना माझ्या मनात एकच विचार दृढ होतो. राष्ट्रे केवळ आदर्श, घोषणा आणि स्वप्ने यांच्या बळावर महान होत नाहीत; ती सामर्थ्य, संघटन, शिस्त, त्याग आणि प्रबळ राष्ट्रीय इच्छाशक्ती यांच्या आधारावर महान बनतात. सावरकरांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात हाच संदेश दिला. "राष्ट्र प्रथम आणि राष्ट्रहित सर्वोच्च" हा त्यांचा विचार आजही तितकाच प्रासंगिक आणि मार्गदर्शक आहे.

 

जर या पुस्तकामुळे वाचकांना सावरकरांच्या राष्ट्रीय सुरक्षाविषयक विचारांचा नव्याने परिचय झाला, त्यांच्या दूरदृष्टीचे पुनर्मूल्यांकन करण्याची प्रेरणा मिळाली, भारताच्या सुरक्षेविषयी अधिक सखोल विचार करण्याची दिशा मिळाली आणि राष्ट्रहित सर्वोच्च मानण्याची भावना अधिक दृढ झाली, तर माझा हा प्रयत्न सार्थकी लागला असे मी मानेन.

स्वातंत्र्यवीर सावरकरांना विनम्र अभिवादन.

 

— ब्रिगेडियर हेमंत महाजन, युद्ध सेवा मेडल Mob-9096701253
पुणे,ऑक्टोबर २०२६

 

अनुक्रमणिका

प्रकरण १ : स्वातंत्र्यवीर सावरकर : साहित्यसम्राट पु. ल. देशपांडे आणि भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या शब्दांत

प्रकरण २ : स्वातंत्र्यवीर सावरकर : राष्ट्रीय सुरक्षेचे दूरदर्शी रणनीतिकार

प्रकरण ३ : भारतीय समाजाचे सैनिकीकरण : सावरकरांची राष्ट्रीय सुरक्षा संकल्पना

प्रकरण ४ : दुसरे महायुद्ध, जपान आणि सावरकर : सैनिकीकरणातून राष्ट्रसुरक्षेचा मार्ग

प्रकरण ५ : फाळणी, पाकिस्तान आणि काश्मीर : सावरकरांचे राष्ट्रीय सुरक्षा धोरण आणि विचार

प्रकरण ६ : तिबेट, चीन आणि भारत : सावरकरांचा सामरिक वास्तववाद आणि शक्तिसंतुलनाचा दृष्टिकोन

प्रकरण ७ : चीनविरुद्ध बहुआयामी संघर्ष : सावरकरांच्या विचारांवर आधारित राष्ट्रीय सुरक्षा आराखडा

प्रकरण ८ : स्वातंत्र्यवीर सावरकर आणि सागरी सुरक्षा : अंदमानातून दिसलेला भारताचा सामरिक भविष्यवेध

प्रकरण ९ : ग्रेट निकोबार : सावरकरांची सामरिक दूरदृष्टी आणि भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेचे नवे परिमाण

प्रकरण १० : स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बांगलादेशी घुसखोरी : राष्ट्रीय सुरक्षा, लोकसंख्यात्मक बदल आणि दूरदृष्टी

प्रकरण ११ : बांगलादेशी घुसखोरी : राष्ट्रीय सुरक्षा, लोकसंख्यात्मक बदल आणि सावरकरांची दूरदृष्टी

प्रकरण १२ : स्वातंत्र्यवीर सावरकर : राष्ट्रहित, सामर्थ्य, वास्तववाद आणि आधुनिक भारताचे परराष्ट्र धोरण

प्रकरण १३ : राष्ट्रनिर्मितीत लष्करी संस्कृती, वीरश्रीयुक्त संगीत, इतिहास, लष्करी प्रशिक्षण, देशभक्तीची प्रेरणा आणि लष्करी पर्यटन यांचे महत्त्व

प्रकरण १४ : इतिहासातून सामरिक धडे : सावरकरांच्या ‘सहा सोनेरी पाने’ या ग्रंथाचे विश्लेषण

प्रकरण १५ : नेताजी सुभाषचंद्र बोस आणि स्वातंत्र्यवीर सावरकर : एका ऐतिहासिक भेटीचे राष्ट्रीय परिणाम

प्रकरण १६ : एकसंघ व बलशाली राष्ट्रनिर्मितीसाठी जातिभेद निर्मूलन हेच अंतिम ध्येय : रत्नागिरीतील सावरकरांचे समाजसुधारणा कार्य

प्रकरण १७ : आधुनिक भारताची बहुआयामी सुरक्षा आव्हाने : सावरकरांच्या विचारांतून उपाययोजना

प्रकरण १८ : स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भारताविरुद्धचे हायब्रिड व नॅरेटिव्ह युद्ध : सत्तापालटाच्या प्रयत्नांविरुद्ध राष्ट्रीय प्रतिकार

No comments:

Post a Comment