Total Pageviews

Wednesday 4 April 2018

काश्मीरमध्ये ‘ऑपरेशन ऑलआऊट

केंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर काश्मीरमधील दहशतवाद्यांबाबत अधिक कठोर धोरण अवलंबण्यास सुरुवात झाली होती. गेल्या चार वर्षांच्या काळात काश्मीरमध्ये ऑपरेशन ऑलआऊटया नावाने मोहीम आखून दहशतवाद्यांना वेचून वेचून ठार मारण्यात आले. गेल्या वर्षी तर, सुमारे अडीचशे दहशतवाद्यांना यमसदनी पाठवण्यात आले होते. या वर्षात आतापर्यंत पन्‍नासपेक्षाही अधिक दहशतवादी ठार करण्यात आले आहेत. एखाद्या संघटनेचा नवा म्होरका आला की, त्याला कंठस्नान घालण्याचा सपाटाच लष्कर आणि पोलिसांनी लावलेला आहे. दुसरीकडे पाकधार्जिण्या हुर्रियत कॉन्फरन्सच्या नेत्यांच्या मुसक्या एनआयएने आवळलेल्या असल्याने दहशतवाद्यांची रसदही कमी झालेली आहे. गेल्या रविवारी शोपियाँ आणि अनंतनाग जिल्ह्यांत तीन जागी झालेल्या चकमकीत तेरा दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. त्यामध्ये लेफ्टनंट उमर फयाज यांच्या मारेकर्‍यांचाही समावेश होता. हुर्रियतवाल्यांनी आणि पाकिस्तानने नेहमीच अशा दहशतवाद्यांना हीरो ठरवलेले आहे. बुरहान वानीचे उदाहरण तर ठळकच आहे. आताही या तेरा दहशतवाद्यांच्या खात्म्याने हादरलेल्या हुर्रियतवाल्यांनी काश्मीरमध्ये बंद पुकारला. सीमेपलीकडेही या दहशतवाद्यांच्या खात्म्याने मातम सुरू आहे. दहशतवादी ठार झाल्याचे समजताच पाकिस्तान सरकारने तातडीने मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आणि 6 एप्रिलला काश्मीर एकता दिनपाळण्याचे जाहीर केले. शिवाय, जगभर विशेष दूत पाठवून काश्मीरमधील स्थितीची माहिती देण्याचाही निर्णय घेण्यात आला. काश्मीरमध्ये कंठस्नान घातलेल्या दहशतवाद्यांना शहीदठरवण्यात आले. पाकचे पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी आणि परराष्ट्रमंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी यानिमित्ताने काश्मीरचा प्रश्‍न पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याची तयारी केली. खरे तर, पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरमधील लोक सातत्याने पाकच्या अत्याचारांविरुद्ध आणि हे नसते जोखड फेकून देण्यासाठी निदर्शने करीत असताना पाक सरकारने मानभावीपणाने जम्मू-काश्मीरमधील स्थितीची चिंता वाहणे हे चोराच्या उलट्या ुुुुुुअशा थाटाचेच आहे. अर्थात, मांजराने डोळे मिटून दूध पिण्याचा प्रयत्न केला, तरी जगाने डोळे झाकलेले नसतात. हाफिज सईदबाबत पाकिस्तानचा बुरखा आता चांगलाच फाटलेला आहे. हाफिजने निवडणुकीत उतरण्यासाठी मिल्ली मुस्लिग लीगची स्थापना केली होती; मात्र अमेरिकेने या पक्षालाही दहशतवादी संघटनांच्या यादीत टाकल्याने पाकिस्तानची किंवा हाफिजसारख्या उजळमाथ्याने वावरत असलेल्या दहशतवाद्यांची आता डाळ शिजणार नाही, हे उघड झाले आहे. त्यामुळे तेरा दहशतवाद्यांच्या खात्म्याबाबत पाकिस्तानने किंवा हुर्रियतवाल्यांनी कितीही आकांडतांडव केले, तरी जग याबाबत भारताला दोषी ठरवू शकणार नाही. सध्या सगळे जगच दहशतवादाच्या सावटाखाली असल्याने आपल्या देशाच्या व देशवासीयांच्या संरक्षणासाठी सगळेच तत्पर झालेले आहेत. अशा वेळी भारताने केलेली कारवाई चुकीचे आहे, असे म्हणण्याचे धाडस कुणीही करू शकणार नाही. पाकिस्तान मात्र आपल्या काळ्या कृत्यांवर पांघरून घालण्यासाठी काश्मीरचा राग आलापणार हे काही नवे नाही. अर्थात, असा राग आळवण्याचे दिवसही आता संपले आहेत!

No comments:

Post a Comment