Total Pageviews

Thursday 19 April 2018

मुंबई, चेन्नईत स्फोट घडवून आणणारे, संसदेवर हल्ला करणारे, काश्मिरात धिंगाणा घालणारे लोक मुस्लिम नसतात, ते फक्त दहशतवादी असतात. कारण दहशतवादला धर्माचा रंग नसतो. पण कठुआत बलात्कार झाला की मात्र पीडिता ‘मुस्लिम’अन्‌ बलात्कारी ‘हिंदू’ होऊन जातात अचानक! स्वयंघोषित शहाण्यांची जमात मग ‘भगवा दहशतवाद’, ‘गुन्हेगार हिंदूं’ना झोडपून काढण्यासाठी कधीनव्हे इतक्या उत्साहाने सरसावते.

सत्ता हातून गेल्यानंतरच्या काळात एकूण सारेच फासे उलटे पडताहेत अन्‌ कॉंग्रेसचे कारनामे एकामागून एक या प्रमाणे उघडे पडताहेत. सीबीआयपासून तर राष्ट्रीय तपास यंत्रणेपर्यंतच्या झाडून सार्‍या यंत्रणा गोठ्यातल्या खुंट्याला बांधून त्यांचा कसा गैरवापर करण्यात आला होता, त्या तपास यंत्रणांचा स्वत:च्या राजकारणासाठी त्यांनी वेळोवेळी कसा दुरुपयोग केला होता, याचे मजेदार किस्सेच आता बाहेर येताहेत. येनकेनप्रकारेन्‌ सत्ता मिळवण्यासाठी धडपडायचं. त्यासाठी लोकांचे मुडदे पाडण्यापासून तर दंगली पेटवण्यापर्यंत जे जे म्हणून काही करता येईल, ते सगळं करायचं. या धडपडीतून एकदा का सत्ता हातात आली की मग ती टिकवण्यासाठी जीवाचा आटापीटा करायचा. त्यासाठी वाट्टेल तितकी खालची पातळी गाठायची. बरं अलीकडच्या काळात तर त्या नीचतेलाही मर्यादा उरली नव्हती. मग मालेगावचे प्रकरण व्यवस्थितपणे, नियोजनबद्ध पद्धतीने गाजविण्याची बाब असो, गुजरातच्या बदनामीचे षडयंत्र असो, तिस्टा सेटलवाड ला पुढे करून कुणीतरी खेळलेली खेळी असो की मग मक्का मशीद स्फोट प्रकरण असो, लोक मेले काय अन्‌ जगले काय, त्याची चिंता वाहण्याची गरज राजकारणापुढे नेहमीच थिटी पडत गेली.
मुंबई बॉम्बस्फोटाशी संबंधित आरोपाचा धनी असलेला कुणी कलावंत यांच्या राजकीय पक्षाशी निगडीत आढळला तर कायद्याची वासलात लावून त्याच्या बचावाची शक्कल ते लढवत गेले. पण जरा कुठे हिंदू साधू संतांची नावे गोवण्याची संधी मिळाली की मात्र त्यांचा आवेश उफाळून येत असे. मग सबळ पुराव्यांच्या अभावाचीही त्यांनी कधी तमा बाळगली नाही. सीबीआय, राष्ट्रीय तपास यंत्रणा, एटीएस सारख्या संस्था तर काय दावणीलाच बांधलेल्या. त्यांचा गैरवापर करत सत्तेचे राजकारण करीत राहिले या पक्षाचे नेते. मग कधी कुण्या साध्वीचे नाव त्यात गुंतवण्याचा प्रयत्न झाला तर कधी स्वामी असीमानंदांना कारागृहात धाडण्याचा निलाजरा प्रयत्न झाला. शेवटी काय, घाणेरडे असले तरी त्यांच्या लेखी राजकारण महत्त्वाचे होते. मुस्लिम मतांचा जोगवा त्याहून महत्त्वाचा होता. मग हिंदू नेत्यांच्या, त्यांच्या श्रद्धास्थानांच्या, त्यांना पूज्य असलेल्या साधूसंतांच्या इभ्रतीची लक्तरे वेशीवर टांगली गेली तरी त्याचे दु:ख इथे होते कुणाला? उलट त्याचा असुरी आनंद उमटलेला दिसायचा चेहर्‍यावर त्यांच्या.
पंडित नेहरू काय, इंदिरा गांधी काय नि कुणाच्यातरी हातातले बाहुले बनून कारभार चालविणारे डॉ. मनमोहनिंसह काय, विरोधी पक्षाला, आपल्याला मतदान न करणार्‍यांना कायम अस्वस्थ ठेवण्याच्या त्यांच्या नीतीचे परिणाम लोक वर्षानुवर्षे भोगत राहिले. आणिबाणी हा तर त्यांच्या दडपशाहीचा कहर होता. बरं, या देशात तसेही हिंदूंच्या भाव-भावना पायदळी तुडवून राज्य करण्याचाच प्रघात रुढ झालेला. त्यामुळे इतके बॉम्बस्फोट झाले, हजारो लोक मेले, रक्तपात झाला... तो घडविणार्‍या मुस्लिम दहशतवाद्यांचा सहभाग स्पष्ट असतानाही दहशतवादला धर्म नसतो असे तुणतुणे वाजवीत राहिलेल्या लोकांना जराकुठे साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल पुरोहितांची नावे समोर आलेली दिसली की मग मात्र हाती पुरावे नसले तरी दहशतवाद भगवा होतो, त्यांच्या लेखी. मुंबई, चेन्नईत स्फोट घडवून आणणारे, संसदेवर हल्ला करणारे, काश्मिरात धिंगाणा घालणारे लोक मुस्लिम नसतात, ते फक्त दहशतवादी असतात. कारण दहशतवादला धर्माचा रंग नसतो. पण कठुआत बलात्कार झाला की मात्र पीडिता ‘मुस्लिम’अन्‌ बलात्कारी ‘हिंदू’ होऊन जातात अचानक! स्वयंघोषित शहाण्यांची जमात मग ‘भगवा दहशतवाद’‘गुन्हेगार हिंदूं’ना झोडपून काढण्यासाठी कधीनव्हे इतक्या उत्साहाने सरसावते.
फक्त दहशतवादी कृत्यांमध्ये मुस्लिमांचा सहभाग आढळला की मात्र तोंडं शिवली जातात त्यांची. मतांची भीक मागण्यासाठी काहीही करून मुस्लिमांना खुश ठेवायचे. त्यासाठी गरज पडल्यास हिंदूंना अपमानास्पद वागणूक द्यायची. सहभाग नसलेल्या प्रकरणातही त्यांना गोवण्याचा प्रयत्न निर्लज्जपणे करायचा...आता त्याच एकेका प्रकरणाचे पितळ उघडे पडत आहे. मक्का बॉम्बस्फोट प्रकरणातही स्वामी असीमानंदांना गोवण्यासाठी कॉंग्रेसने सत्तेचा आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर केल्याचा त्या संस्थेचे एक माजी अधिकारी मणी यांनी केलेला आरोप प्रत्येक भारतीयाने गांभीर्याने घ्यावा. या प्रकरणात तपासकार्य हाती घेतलेल्या सीबीआयला पुराव्यांच्या संकलनात बर्‍यापैकी यश हाती येऊ लागले असतानाच तपास सीबीआयकडून काढून एनआयएकडे सोपविण्याचा डाव नेमका कोणी आणि कशासाठी खेळला होता, यावर खलबतं होतीलच कधीतरी. पण इथे मुद्दा आहे तो, विरोधकांना परास्त करण्यासाठी सत्ताधार्‍यांनी सत्तेचा बेमुर्वतखोरीने गैरवापर करण्याचा आणि त्यावेळी गुमान त्या सत्तेपुढे माना तुकविणार्‍यांनी सेवानिवृत्तीनंतर तो प्रकार उघड करून तीर मारल्याच्या थाटात स्वत:ची पाठ थोपटून घेण्याचा. दोन्ही बाबी असमर्थनीयच. हा प्रकार करणारे तर दोषी आहेतच.
कॉंग्रेस तर त्यासाठी तशीही बदनाम आहे. बहुधा म्हणूनच लोकांनीही पार नाचक्की करून टाकलीय्‌ त्या पक्षाची गेल्या निवडणुकीत. अजूनही त्यांच्या इभ्रतीची लक्तरे दरदिवशी कुठल्या ना कुठल्या प्रकरणात वेशीवर टांगली जाताहेत. पण प्रशासनातील अधिकार्‍यांचे काय? स्वत:च्या नोकर्‍या सांभाळण्यासाठी म्हणून, डोळ्यांदेखत घडत असलेला हा खोटानाटा प्रकार मुकाट्याने सहन करायचा अन्‌ सेवानिवृत्तीनंतर मात्र मर्दुमकीचे प्रदर्शन मांडत लोकांसमोर सत्य उघड करायचे...मक्का मशीद स्फोट प्रकरणात स्वामी असीमानंदांना जाणीवपूर्वक गोवण्याचा प्रयत्न करणार्‍या कॉंग्रेस सरकारमधील तत्कालीन नेत्यांनी तर शेण खाल्लेच होते. स्वामींना निर्दोषत्व बहाल करण्याच्या न्यायालयाच्या निर्णयामुळे त्यांची थोबाडं तशीच काळी ठिक्कर पहली आहेत आता. मणींच्या विधानामुळे कॉंग्रेसचे षडयंत्रही जगजाहीर झाले आहे. धर्मनिरपेक्षतेचे त्यांच्या चेहर्‍यांवरचे बुरखेही त्यामुळे टराटरा फाटले आहेत. पण म्हणून त्यावेळी मौन साधणार्‍या मणींसारख्या कित्येक अधिकार्‍यांचा दोष कमी होत नाही. खरंतर गेली सात दशकं कॉंग्रेसच्या नेतृत्त्वात हाच तमाशा चालत राहिला आहे. कधी त्याला आयाम आणिबाणीचा मिळाला तर कधी मालेगाव प्रकरणात दहशतवादाचा रंग भगवा दाखवण्याच्या नादात तपास यंत्रणांचे स्वातंत्र्य मातीत गाडून सत्तेचा झेंडा उंच फडकाविण्याच्या प्रयत्नांतून त्याचे दर्शन घडत राहिले. बाकी, सीबीआय पासून तर एनआयएपर्यंत झाडून सार्‍या यंत्रणांच्या नाड्या आवळून धरण्यात, त्यांच्या स्वातंत्र्याचा गळा घोटण्यात कॉंग्रेसने कसूर कुठलाच कधी बाकी ठेवला नव्हता, हे मात्र पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. त्या पक्षाचे दुर्दैवही बघा केवढे, त्यांची काळी कृत्ये उघडकीस आणायला कित्येक ‘मणी’ दररोज मैदानात उतरत आहेत...

No comments:

Post a Comment