Total Pageviews

Sunday 1 April 2018

राष्ट्राच्या सीमेवर हसत हसत हौतात्म्य पत्करणारे वीर आजही आहेत. राष्ट्रपती भवनात शहीदांचा मेळावा भरला. शूरवीरांच्या पत्नी व मातांचे दुःख त्या मेळ्यात दिसले.SAMNA ROKHTOK



भगतसिंग, सुखदेव, राजगुरूचे हौतात्म्य आजही प्रेरणा देत असते. ते सर्व हसत हसत फासावर गेले, पण राष्ट्राच्या सीमेवर हसत हसत हौतात्म्य पत्करणारे वीर आजही आहेत. राष्ट्रपती भवनात शहीदांचा मेळावा भरला. शूरवीरांच्या पत्नी व मातांचे दुःख त्या मेळ्यात दिसले. देशानेही मानवंदना द्यावी, पण दुःखही करावे असा तो सर्व प्रसंग.
देश कोणामुळे टिकलाय? याचे उत्तर राजकारण्यांमुळेअसे नसून हिंदुस्थानच्या सीमेवर लढणाऱ्या आणि हौतात्म्य पत्करणाऱ्या असंख्य सैनिकांमुळे, हेच त्या प्रश्नाचे उत्तर आहे. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्यासारख्या हुतात्म्यांचे बलिदान आजही प्रेरणादायी ठरते, पण स्वातंत्र्यानंतर सीमेवरील चकमकीत अनेक भगतसिंग, राजगुरू बलिदान देत आहेत.
२७ मार्च रोजी राष्ट्रपती भवनात एक सोहळा पार पडला. देशाचे रक्षण करताना जे सैनिक अतुलनीय शौर्य दाखवीत शहीद झाले त्यांना शौर्यपदके प्रदान करण्याचा हा सोहळा खऱ्या अर्थाने रोमांचक, तितकाच मन हेलावणारा होता. Defence Investiture ceremony ‘रक्षा अलंकरण समारोहअसे या सोहळयास सरकारी भाषेत म्हणतात. राजकारणी व सत्ताधारी भाषणे करतात व इशारे देतात. प्रत्यक्ष युद्धभूमीवर रक्त सांडणारे व मरणारे दुसरेच असतात. हरसाल लगेंगे शहिदों के मेलेअसे भगतसिंग म्हणतो. हे शहीदांचे मेळेस्वातंत्र्यप्राप्तीनंतर सर्वात जास्त लागले.
हौतात्म्याचा सन्मान
rokhthok-1-april-1
राष्ट्रपती भवनाच्या भव्य अशोका हॉलमध्ये हुतात्म्यांच्या आप्तांना व शूर सैनिकांना गौरवण्याचा हा कार्यक्रम होतो. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधानांसह तिन्ही सैन्य दलाचे वरिष्ठ अधिकारी कडक गणवेशात उपस्थित राहतात. ज्यांना मरणोत्तर शौर्यपदके मिळाली अशांच्या विधवा, मातापिता यांना वेगळे बसवले जाते व त्यांच्याकडे पाहून मन हेलावते. दुसऱ्या बाजूला सर्व इतर सैनिक व अधिकारी असतात, ज्यांना ही विशिष्ट पदके प्रदान करायची असतात. पण शत्रूंशी लढताना ज्यांना वीरगती प्राप्त झाली व जे जखमी होऊनही प्राणांची पर्वा न करता लढत राहिले त्यांच्या शौर्यगाथांभोवतीच कार्यक्रम फिरत असतो. डेविड मनलूनचे माता-पिता आपल्या शहीद मुलाच्या वतीने कीर्तिचक्र स्वीकारायला समोर आले. त्यांनी त्यांचा तरुण मुलगा देशरक्षणासाठी नागालॅण्डच्या भूमीवर गमावला. जून २०१७ साली नागालॅण्डमधील एका चकमकीतमेजर डेव्हिड मनलूनच्या नेतृत्वाखालील सैन्य तुकडीवर नागा दहशतवाद्यांनी भयंकर ग्रेनेड हल्ला केला. त्यात मेजर डेव्हिड मनलूनसह तीन सैनिक गंभीर जखमी झाले. त्या अवस्थेत प्राणाची पर्वा न करता मेजर डेविड नागा बंडखोरांच्या दिशेने गोळीबार करीत पुढे सरकला. त्याने नागा दहशतवाद्यांना मागे रेटले व आपल्या सैन्य तुकडीचे रक्षण केले. तोपर्यंत मेजर डेव्हिडच्या शरीरात असंख्य गोळय़ा घुसल्या होत्या. त्याच अवस्थेत त्याने हौतात्म्य पत्करले. देशासाठी त्याने अतुलनीय शौर्य दाखवले व सर्वोच्च बलिदान दिले. तो अविवाहित तरुण अधिकारी होता. त्याच्या माता-पित्यांनी शहीद मुलाचे कीर्तिचक्र राष्ट्रपतींकडून स्वीकारले तेव्हा राष्ट्रपतींसह सगळेच हेलावले.
लढणाऱ्यांना सलाम
राष्ट्रीय रायफल्स १३ व्या बटालियनचा नायक चंद्रासिंह नोव्हेंबर २०१६ ला कश्मीरातील सोपोर येथे शहीद झाला. त्याला मरणोत्तर शौर्यचक्र प्रदान केले. त्यांची तरुण विधवा पत्नी शुभ्र साडीत तेथे आली व सोबत वृद्ध माता. या दोघींनी देशासाठी सर्वस्व गमावले. भविष्याच्या चिंता त्यांच्या चेहऱ्यावर साफ दिसत होत्या. देशातील राजकारणी, नोकरशहा व पोलीस अधिकारी सुरक्षा रक्षकांच्या पिंजऱ्यात फिरत असतात, पण नायक चंद्रासिंहसारखे अनेक जण दुश्मनांचे पिंजरे तोडून आत घुसतात. कश्मीरच्या सोपोर जिल्हय़ात पाक दहशतवाद्यांचा शोध सुरू होता. त्या ऑपरेशनमध्ये नायक चंद्रासिंह होता. ज्या घरात सशस्त्र दहशतवादी लपल्याचा संशय होता त्या घरास सैनिकांनी वेढा घातला. दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू करीत पळून जाण्याचा प्रयत्न केला. एका दहशतवाद्याने नायक चंद्रासिंहावर गोळीबार करून घेराबंदीतोडण्याचा प्रयत्न केला. चंद्रासिंह जखमी झाला, पण त्याने जागा सोडली नाही व अतिरेक्यांवर गोळीबार करीत राहिला. त्याने पळून जाणाऱ्या एका अतिरेक्यास मारले व नंतरच प्राण सोडला. तो देशासाठी शहीद झाला. जम्मू आणि कश्मीरच्याच बांदिपुरा जिल्हय़ात तीन पाक अतिरेक्यांचा खात्मा करून मेजर सतीश दहियाने वीरमरण पत्करले. त्याच्या तरुण पत्नीने शौर्यचक्रस्वीकारले. नीलेशकुमार नयन हा वायुसेनेचा तरुण सैनिक अतिरेक्यांशी लढताना शहीद झाला. त्याची तरुण पत्नी शौर्यचक्र स्वीकारीत होती तेव्हा अनेकांच्या पापण्या ओलावल्या.
महाराष्ट्राचा सुपुत्र
मिलिंद किशोर खैरनार हा भारतीय वायुसेना (गरुड)चा तरुण सार्जंट. त्यास जम्मू-कश्मीरच्या बांदिपोरात वीरमरण आले. त्याची आई व तरुण पत्नी शौर्यपदक स्वीकारायला समोर आली तेव्हा शिवरायांच्या महाराष्ट्राचा अभिमान वाटला. सार्जंट मिलिंद खैरनार हा सशस्त्र अतिरेक्यांशी लढला. त्याच्यावर ग्रेनेड फेकले व शत्रूंनी गोळीबार केला, पण तो शत्रूची वाट अडवून ठामपणे उभा राहिला. दोन अतिरेक्यांना त्याने यमसदनास पाठवले. देशासाठी सर्वोच्च शौर्य गाजवून तो धारातीर्थी पडला. वीरमाता व वीरपत्नीने त्याचे शौर्यपदक स्वीकारले. हिंदुस्थानच्या रक्षणासाठी मरणाऱ्यांना धर्म नसतो. अतिरेक्यांना धर्म नसतो, तसा हुतात्म्यांनाही धर्म नसतो. मेजर डेव्हिड शहीद होतो. मिलिंद खैरनार वीरमरण पत्करतो. जम्मू-कश्मीरमध्ये अतिरेक्यांशी लढताना मंजूर अहमद नायक हा राष्ट्रीय रायफलचा कॉन्स्टेबलही शहीद होतो. त्यास मरणोत्तर शौर्यचक्र प्रदान केले व मंजूर अहमदच्या विधवा पत्नीने ते स्वीकारले. हवालदार मुबारक अलीलाही शौर्यचक्राने सन्मानित करण्यात आले. प्राणांची बाजी लावून सैनिक देशाचे रक्षण करतात. काही जखमी होतात. काही शहीद होतात, त्यांचेही बलिदान भगतसिंग, राजगुरूंच्या तोडीचे आहे. स्वतंत्र हिंदुस्थानात
त्यांची बलिदाने का झाली?
आंध्र आणि ओडिशाच्या जंगलात माओवादी नक्षलवाद्यांशी पोलीस आणि सैनिकांना लढावे लागते. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात अनेकांनी प्राण गमावले. त्यांचे स्मरणही शौर्य पुरस्कारात केले जाते. परमवीर चक्र, अशोक चक्र, महावीर चक्र, कीर्तिचक्र, वीरचक्र, शौर्यचक्रांचे महत्त्व आहेच. जे शहीद झाले त्यांना व जे लढत राहिले त्यांना ही पदके बहाल होतात. शिवाय युद्धभूमीवर विशेष सेवा बजावणाऱ्या शूरांना युद्ध सेवामेडल प्रदान केली जातात. यातील प्रत्येकजण राष्ट्रासाठी समर्पित असतो. नीरव मोदीसारखे लोक देश लुटत असतात. खासदार संसदेत गोंधळ घालतात. राजकारणी निवडणुका व सत्तेच्या आटापिटय़ात रंगलेले असतात तेव्हा ६० हजार फुटांवरील बर्फाचे वादळ झेलत सैनिक उभा असतो. एखाद्या हिमवादळात आणि शत्रूच्या हल्ल्यात तो प्राण गमावतो. कॅप्टन अभिनव शुक्ला हा पॅराशूट रेजिमेंटचा योद्धा. जम्मू-कश्मीरच्या डीपीएसइमारतीत (श्रीनगर) दोन फिदायीन अतिरेकी घुसले. त्यांना बाहेर काढण्याची जबाबदारी कॅ. शुक्लावर सोपवली. कॅ. शुक्ला आत घुसला व त्याच्यावर ग्रेनेड हल्ला झाला. भयंकर जखमी होऊनही कॅप्टनने सैनिक तुकडीचे नेतृत्व सोडले नाही. गोळीबार करीत तो वर गेला व आतंकवाद्यांशी लढत राहिला. युद्ध समोरासमोर झाले. एक अतिरेकी त्याने ठार केला. कॅ. शुक्ला जखमी अवस्थेत हल्ला करीत होता. त्यास सुरक्षित जागी नेण्यासाठी इतर सैनिक पुढे सरकले तेव्हा त्याने नकार दिला. तो तुकडीचे नेतृत्व शेवटपर्यंत करीत राहिला व दुसऱ्या फिदायीन अतिरेक्यासही मारले. कॅप्टन अभिनव शुक्लाला शौर्यचक्रप्रदान केले. शौर्यचक्र पुरस्कारासाठी कॅप्टन शुक्ला आला तेव्हा जखमांचे व्रण-वेदना स्पष्ट दिसत होत्या.
सगळेच भगतसिंग
भगतसिंगांची फाशी वाचवता आली असती, पण गांधींनी त्यास फासावर जाऊ दिले. यावर आज चर्चा होते, पण जे जवान आज देशासाठी मरत आहेत त्यांचेही प्राण वाचवता आले असते, असे चर्चाकरणाऱ्यांना वाटत नाही. शिवाजीराजांचे शौर्य मोठे, पण ते दुसऱ्यांच्या घरात जन्माला यावेत असे ज्यांना वाटते त्यांनी दुसऱ्यांच्या घरात जन्मलेल्या या वाघांची शौर्यगाथा समजून घेतली पाहिजे. राष्ट्रपती भवनात हे सर्व शूरांचे शिरोमणी आले. राष्ट्रपती व पंतप्रधानांसह सगळेच जण मला त्यांच्यापुढे खुजे वाटले. राष्ट्रपती स्वतः खाली उतरून हुतात्म्यांच्या वीरमाता व वीरपत्नीस शौर्य पुरस्कार देतात तेथे राजशिष्टाचारही झुकतो व अहंकाराचे नकली अलंकार गळून पडतात. राष्ट्रपती व पंतप्रधान कडक पहाऱ्यात जगतात व वावरतात, पण राष्ट्रपतींनी ज्यांना शौर्यपदके बहाल केली त्यांना कोणतीही कवचकुंडले नव्हती. देशासाठी ते सहज मेले. त्यांच्या छातीचे मोजमाप कधीच कुणी केले नाही. त्यांचे काळीज वाघाचे व छाती सिंहाची.
शहीदांचा मेळा मी याचि देही याचि डोळा पाहिला व धन्य झालो


No comments:

Post a Comment