March 2, 2017014
अग्रलेख
केरळमधील डाव्या विचारसरणीचे लोक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांवर अत्याचार करतात, ही बाब काही नवीन नाही. संघाला जातीयवादी म्हणून हिणवणारे मार्क्सवादी विचारसरणीचे डावे लोक स्वत:च जातीयवादी आहेत आणि त्यांचा शांततेवर, अहिंसेवर नव्हे, तर हिंसाचारावर विश्वास आहे, हे त्यांनीच प्रत्यक्ष कृतीने सिद्ध केले आहे. सहिष्णुतेच्या बाता मारणारे मार्क्सवादी किती असहिष्णू आहेत आणि त्यांचे तत्त्वज्ञानही किती पोकळ आहे, हे संपूर्ण जगाने अनुभवले आहे. विरोधी विचारसरणीच्या लोकांची मुस्कटदाबी करायची अन त्याच वेळी भाजपा-संघावर असहिष्णुतेचा आरोप करायचा, असा दुटप्पीपणा करणार्या कम्युनिस्टांना आता कायमचा धडा शिकविण्याची वेळ आली आहे. धर्मनिरपेक्षतेचा टेंभा मिरवायचा, स्वत:ला सेक्युलर असल्याचे भासवायचे अन् इतरांना कमी लेखत दादागिरी करायची, हा कम्युनिस्टांचा उद्योग आता बंद करण्याची वेळ आली आहे. संघ, भाजपा यांच्यावर सांप्रदायिक असल्याचा आरोप करणारे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे लोक मुस्लिमांचे लांगूलचालन करण्यात आघाडीवर आहेत. मागील काही महिन्यांपासून केरळमधील डाव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांकडून हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांवर हल्ले होत आहेत. स्वयंसेवकांच्या निर्घृण हत्या केल्या जात आहेत. काही कारण नसताना निवडून निवडून संघ स्वयंसेवकांना मारले जात आहे. विशेषत: केरळात डाव्यांची सत्ता आल्यापासून आणि विजयन मुख्यमंत्री झाल्यापासून केरळात डाव्यांची गुंडागर्दी वाढली आहे. डाव्यांनी एवढा उत्पात माजवला आहे की, हिंदू संघटनांचे कार्यकर्ते प्रचंड दहशतीत राहात आहेत. केरळात जो हिंसाचार होतो आहे, त्याला कम्युनिस्ट राजवटीचा आशीर्वाद आहे आणि असेच चालू राहिले तर ज्याप्रमाणे काश्मिरी पंडितांना खोर्याबाहेर पलायन करावे लागले, तसे हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांना केरळबाहेर जावे लागेल. एरवी असहिष्णुतेविरुद्ध बेंबीच्या देठापासून बोंबलणारे तथाकथित पुरोगामी केरळात निष्पाप संघ स्वयंसेवकांवर हल्ले होत असताना वाळूत चोच खुपसून बसलेत की काय, असे वाटावे एवढे ते शांत दिसत आहेत. उत्तरप्रदेशात कोण्या एका अखलाखची हत्या झाली म्हणून किंचाळणार्या पुरोगाम्यांना केरळातील संघ स्वयंसेवकांच्या हत्या दिसत नाहीत? यांची सहिष्णुता काय फक्त हिंदू विरोधकांना काही झाले कीच उफाळून येते? एकीकडे स्वत:ला पुरोगामी, सहिष्णू म्हणायचे, धर्मनिरपेक्ष म्हणायचे अन् दुसरीकडे संघ-भाजपावर जातीयवादाचा आरोप करायचा, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संघाचे स्वयंसेवक असल्याने ते पंतप्रधान होऊनही त्यांना मान्यता न देण्याचा करंटेपणा करायचा, ही कम्युनिस्टांची वृत्ती प्रत्यक्षात काय दर्शविते? कम्युनिस्ट हे ढोंगी आहेत. त्यांना मानवतेशी, पुरोगामित्वाशी काहीही घेणेदेणे नाही. त्यांना परदेशातून मिळणार्या देणग्या हव्या आहेत. त्या बळावर ते देशातीलच लोकांवर अत्याचार करणार, त्यांचे विचार संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करणार आणि वरून आपणच सहिष्णू असल्याचा टेंभा मिरविणार. हा सगळा प्रकार निषेधार्ह आहे, निंदनीय आहे. केरळात कम्युनिस्ट राजवटीच्या आशीर्वादाने जो हिंसाचार बोकाळला आहे, त्याला वेसण घालणे आता क्रमप्राप्त झाले आहे. डाव्यांचा हिंसाचार चव्हाट्यावर आणण्यासाठी जनजागृती व्हावी म्हणून लोकाधिकार मंचातर्फे काल १ मार्च रोजी देशभर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता डाव्यांना वठणीवर आणणे कठीण नाही. केरळातील कन्नूर येथे संघ स्वयंसेवकांवर सर्वाधिक हल्ले झाले आहेत. त्याच कन्नूरचे मूळ निवासी आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी राष्ट्रीय महामंत्री व्ही. मुरलीधरन यांनी काल नागपूरच्या धरणे आंदोलनात जे विचार मांडलेत, ते चिंतन करायला लावणारे आहेत. केरळमधील डाव्यांचा खरा चेहरा त्यांनी उघडकीस आणला आहे. आपल्या चिंतनशील विचारांतून त्यांनी डाव्यांचा बुरखा टराटरा फाडला. कन्नूर हे केरळच्या मुख्यमंत्र्यांचेही गाव आहे. या कन्नूरमध्ये हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांवर होणारे अत्याचार मुख्यमंत्र्यांना दिसत नाहीत की, दिसत असूनही ते आंधळेपणाचे सोंग घेऊन बसले आहेत? कन्नूरमधील हत्यासत्राचा साधा निषेधही पुरोगाम्यांनी केला नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पार्टी, अन्य हिंदू संघटना यांच्या कोणत्याही कार्यकर्त्याची हत्या झाली, त्याच्यावर आणि त्याच्या कुटुंबावर हल्ला झाला तरी या पुरोगाम्यांना त्याचे सोयरसुतक नसते. पण, मुस्लिम आणि ख्रिश्चन वा अन्य कोणत्या समुदायाच्या व्यक्तीवर हल्ला झाला आणि त्या हल्ल्यात हिंदू संघटनांच्या कुठल्याही कार्यकर्त्याचा हात नसला तरी ही मंडळी किंचाळून उठतात अन् एका स्वरात निषेधाच्या बोंबा ठोकतात, हा यांचा निधर्मीवाद आहे, हा यांचा मानवतावाद आहे. तो किती पोकळ आणि ढोंगी आहे, हेही आता जगापुढे आले आहे. आता गरज आहे ती यांचे डाव उधळून लावण्याची. अखलाखची हत्या झाल्यानंतर पुरस्कारवापसीचे सत्र चालविणारे कथित पुरोगामी आता केरळातील संघ स्वयंसेवकांच्या हत्येनंतर कुठे लपून बसले आहेत? अखलाखची हत्या झाली म्हणून मातम करणार्यांना हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या हत्येचे काहीच दु:ख नाही? नाहीच. कारण, त्यांना अखलाखच्या मृत्यूशीही काही देणेघेणे नसते अन् मानवतावादाशीही देणेघेणे नसते. त्यांना माहिती असतो तो त्यांचा वैयक्तिक स्वार्थ. समाजमन जागृत करून या ढोंग्यांचे पितळ उघडे पाडत त्यांना सुतासारखे सरळ करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. समाजात विनाकारण फूट पाडण्याचे कामच ही ढोंगी मंडळी सातत्याने करीत आली आहे. किती दिवस यांचे ढोंग सहन करत देशाचे आणि समाजाचे नुकसान करत राहायचे, किती दिवस निष्पाप हिंदूंच्या हत्या होऊ द्यायच्या, याचा विचार आता गांभीर्याने करावाच लागणार आहे. मानवाधिकाराच्या बाता मारणार्या देशातील मल्टीकम्युनलांना डाव्यांचा हिंसाचार दिसत कसा नाही, याचेही आता आश्चर्य वाटेनासे झाले आहे. कारण, त्यांचासुद्धा डाव्यांना छुपा पाठिंबा आहे. हिंदू संघटनांविरुद्ध गरळ ओकण्यात ज्यांनी आजवर धन्यता मानली, त्यांच्याकडून या संदर्भात काही अपेक्षा करणेही चुकीचेच आहे. एरवी कुठेही काही खुट्ट वाजले की कर्णकर्कश किंकाळ्या ठोकणार्यांना केरळात हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांची हत्या झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांचा आक्रोश ऐकायलाच येत नाही काय? की ऐकूनही हे बहिरेपणा आल्यासारखे वागताहेत ही मंडळी? कम्युनिस्टांमध्ये बहुतांश मंडळी ही हिंदूच आहेत. असे असतानाही हे लोक हिंदू संघटनांच्या लोकांनाच का लक्ष्य करतात? असा प्रश्न अनेकदा अनेकांना पडतो. त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्नही केला जातो. पण, समाधानकारक उत्तर मिळत नाही. कारण, कम्युनिझमची झूल पांघरलेले आंधळे झाले आहेत. आपली विचारसरणी मान्य न करणार्यांचा समूळ नायनाट करण्यावरच त्यांचा विश्वास असल्याचे त्यांनी कृतीतून दाखवून दिले आहे. त्यामुळे त्यांना त्यांची जागा दाखवत समाजात सौहार्द प्रस्थापित करण्याची जबाबदारी प्रत्येक राष्ट्रभक्त नागरिकाला स्वीकारावी लागणार आहे.
No comments:
Post a Comment