Total Pageviews

Saturday 25 March 2017

इस्लामिक स्टेट (IS)शी सुरू असलेले युद्ध March 26,-प्रमोद वडनेरकर


2017026 इस्लामिक स्टेटच्या कब्जात असलेल्या इराकमधल्या ‘मोसूल’ या दुसर्‍या नंबरच्या शहरावर हळूहळू इराकी आर्मी आपली पकड घट्ट करत आहे. जून २०१४ ला अब्-बक्र-अल बगदादीने मोसूल शहर जिंकून ते आपल्या खलिफतमध्ये सामील झाल्याचे जाहीर केले होते. दोन वर्षांच्या लढाईनंतर आता कुठे या शहराभोवतीचे इसिस (खडखड)चे पाश सुटत आहेत. मोसूल शहराच्या मध्यभागातून तिग्रीस नदी वाहते. त्याचा पूर्व भाग डिसेंबर १६ मध्ये जिंकून घेण्यात इराकी आर्मीला यश आले. त्याच धुमश्‍चक्रीत पराभवाचा बदला घेण्याच्या उद्देशाने जाता जाता इसिसच्या जिहादींनी शहराचा पूर्व-पश्‍चिम भाग जोडणारे नदीवरचे पाचही पूल उद्ध्वस्त करून टाकले. इसिस आजही पश्‍चिम मोसूलच्या जुन्या भागात आपले अस्तित्व राखून आहे. तेथे शहराच्या छोट्या गल्ल्यागल्ल्यांत सुरुंग खोदून इराकी सेनेच्या हवाई हल्ल्यापासून आपल्या बचावाची सोय करून ठेवली आहे. इराकी सेनेला तेथे शिरकाव करणं कठीण जावे म्हणून घराघरातून व रस्त्यावर बॉम्ब पेरून ठेवले आहेत. पश्‍चिम मोसूलमध्ये आजही साडेसात लाख नागरिक राहतात. त्यामुळे तो भाग जिंकणे एवढे सोपे काम नाही. इराकी आर्मीचे ब्रिगेडियर क्वाईस याकूब यांनी उत्साहाच्या भरात दोन आठवड्यांच्या आत संपूर्ण मोसूल जिंकण्याची घोषणा केली होती. त्यालाही बरेच आठवडे उलटून गेले. जुन्या शहरात आजही ५०० च्या वर इसिसचे जहॉंबाज जिहादी दबा धरून बसले आहेत. त्यांना हुसकावयला कित्येक महिने लागतील. सध्या युद्धबंदीमुळे मोसूल पूर्वमध्ये जनजीवन पूर्ववत व्हायला सुरुवात झाली आहे. संपूर्ण परिसराचे निरीक्षण केले तर आताही शहरात कोसळलेल्या घरांचे ढिगारे तसेच पडून असलेले दिसतील. तसे युद्ध अजूनही संपलेले नसल्यामुळे लोक संभ्रमित आहेतच. तरी या जानेवारी १७ ला तेथे तीस शाळा सुरू करण्यात आल्या. लोकांनी मागणी केल्यामुळे ‘युनिसेफ’ने पुढाकार घेऊन त्या शाळा सुरू केल्या आहेत. शाळेचा पोषाख घालून मातीच्या ढिगार्‍यातून वाट काढत जाणारे विद्यार्थी दिसायला लागले आहेत. हळूहळू तेथे रेस्टॉरंट व दुकाने उघडत आहेत. दोन वर्षांपूर्वी शहर सोडून गेलेले लोक परतायला लागले आहेत. पण माणसांचा ओघ हा एकमार्गी नाही. युद्धाच्या भीतीने पळून जाणारेही अनेक आहेत. बॉम्बमुळे उद्ध्वस्त झालेल्या शहरात कुठे कुठे मोकळ्या जागेत मुले फुटबॉल खेळताना दिसतात. तेवढीच एक शहर जिवंत असल्याची खूण. इसिसच्या जिहादींनी पूर्व मोसूलचा ताबा सोडताना तेथील पाणीपुरवठा व वीज केंद्र उडवून दिले होते. त्यामुळे शहर आज मूलभूत सोयींपासून वंचित आहे. खाजगी जनरेटरकडून शहराच्या काही भागात विजेचा पुरवठा होतो. सरकारी पाणीपुरवठा योजना अजूनही बंदच आहे. शहराला मूलभूत सोयी पुरविणे हे इराकी सरकारचे कर्तव्य आहे. पण शिया व सुन्नी यांच्या वर्चस्वाच्या भानगडीत गुंतलेल्या इराकी सरकारचे तिकडे लक्ष नाही. शहरात सरकारी नोकर्‍यात असणार्‍यांना वर्षापासून पगार नाही. अनेक कुटुंबं कर्ज घेऊन कसेबसे घर चालवितात. लोकांजवळ पैसा नसल्यामुळे रेस्टॉरंट व दुकाने नाममात्र धंदा करतात. फक्त शहराला सुरक्षित ठेवण्यात लष्कराला यश आले आहे. पूर्व मोसूल जिंकताना शहरात जातीय कत्तली होऊ नयेत म्हणून अगोदरच युद्धात आघाडीवर असणार्‍या शिया व कुर्द लढाऊ जवानांना शहरापासून दूर ठेवले आहे. एक वेगळी पोलिस यंत्रणा उभारून त्यामार्फत शहरात कायदे राबविले जातात. पुढच्या काळात मोसूल शहराला बर्‍याच अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. या शहराच्या अधिकारांच्या पदावर आपला जास्तीत जास्त हक्क असावा म्हणून सुन्नी प्रयत्नशील आहेत. खरे तर ते शहर जिंकायला शिया लष्कराच्या युनिटची जास्त मदत झाली. कुर्ददेखील लढाईत आघाडीवर असल्यामुळे त्याचा फायदा मिळावा म्हणून मागणी करतील. खरे तर हे शहरच संपूर्णपणे नव्याने बांधून काढावे लागणार आहे. त्यामुळे त्यावर नियंत्रण असणारी यंत्रणा या जातिवंशाच्या बंधनापासून का मुक्त असू नये? आता एकट्या पडलेल्या इसिसची त्याच्या खलिफतवरची पकड हळूहळू कमी होताना दिसते. सीरियाच्या सीमेलगतचे ‘राक्का’ हे एकमेव मोठे शहर त्यांच्या खलिफतमध्ये उरले आहे. ते शहर जिंकण्यासाठी इराकी सेना अनेक महिन्यांपासून डावपेच रचते आहे. युद्ध सुरू झाल्यावर तेथे इतर शहरांप्रमाणे बॉम्ब वर्षावात वस्त्या उद्ध्वस्त होऊ नयेत याची काळजी घ्यावी लागेलच. राक्कामध्ये केव्हाही युद्धाला तोंड फुटू शकते. त्यामुळे अनेक सरकारी अधिकारी तेथून पळ काढण्याच्या तयारीत आहेत. राक्का जिंकण्यासाठी आघाडीला कुर्दीश जिहादींची फळी ठेवण्याची योजना आहे. कारण तेच केवळ अटीतटीने इसिसला जिंकण्यासाठी लढू शकतात. तरी युद्धाचे डावपेच म्हणून इसिसच्या बाजूने लढणारी जिहादींची पुढची फळी कमकुवत केल्याशिवाय आत शिरकाव नाही, हे इराकी लष्करी अधिकारी जाणतात. त्या जिहादींना स्मगलर्सद्वारा पैसा पुरवून युद्धापासून परावृत्त करण्याचा प्रकार अनोखा म्हणावा लागेल. तिकडे खनिज तेलाचे भाव घसरल्यामुळे त्यापासून इसिसला येणारा महसूल कमी झाला आहे. त्यामुळे इसिस फार काळ युद्धात टिकाव धरू शकेल असे वाटत नाही. ‘राक्का’चा पाडाव तर निश्‍चित आहे. इसिसने ज्या खलिफत साम्राज्याची कल्पना केली होती, ते अशा तर्‍हेने संपुष्टात आल्यामुळे त्याची धुरा वाहणार्‍या जिहादींवर खोलवर परिणाम होईल. इस्लामी कट्टरता जोपासणार्‍या संघटना यानंतर अधिक त्वेषाने त्याचा बदला घेण्याचा प्रयत्न करतील. अगोदरच त्यांनी इतरत्र आपले अस्तित्व दाखवायला सुरुवात केली आहे. त्यांचे बंडखोर जिहादी कोणत्याही देशात केव्हाही उत्पात घडवून आणू शकतात. कारमध्ये बॉम्ब ठेवून हजारो निरपराध्यांचा बळी घेणे हे त्यांना कठीण नाही; हे नुकतेच बगदादमधल्या धमाक्यांनी दाखवून दिले आहे. पाकिस्तानातही आता इस्लामिक स्टेट (खडखड) सक्रिय झाले आहे. सेहवान दर्ग्यावर झालेल्या हल्ल्यात इस्लामिक स्टेटचा हात होता. २४ ऑक्टोबरला क्वेट्टाच्या पोलिस प्रशिक्षण केंद्रावर हल्ला चढविण्यात आला. त्यात ६२ ठार झाले. हा हल्लादेखील इसिसच्या खुरासन शाखेने घडविला होता. या पार्श्‍वभूमीवर भारताला येणार्‍या काळात अत्यंत जागरूक राहण्याची गरज आहे. कारण आपली खलिफत संपताच सैरभैर झालेले इस्लामिक स्टेटचे जिहादी आपले सामर्थ्य दाखवायला कुठल्याही स्तरावर जाऊ शकतात. प्रमोद वडनेरकर/९४०४३४३५०

No comments:

Post a Comment