Total Pageviews

Saturday 11 March 2017

शिनजियांगचा प्रश्न चीनला सतावणार,


सोनाली जोशीचीन हा देशच मुळी जगासाठी अगम्य आणि गूढ आहे. याच देशातला शिनजियांग प्रांत तर त्याहून गूढ. कारण त्या प्रांतात जाण्यास 'बाहेरच्या' माणसांना बंदीच आहे. त्यातूनही कुणी गेलंच, तर या प्रांताची राजधानी उरुम्कीशिवाय त्याला फार कुठं फिरू दिलं जात नाही. त्यामुळं या प्रांतात नेमकं काय सुरू आहे, याची सर्वसामान्य चिन्यांनाच माहिती नसते, तर बाहेरच्या जगाला ती कशी असणार? पण आता हे चित्र काहीसं बदलू लागलं आहे. या प्रांतातील खदखद आता बाह्य जगालाही जाणवू लागली आहे. या प्रांतातील तुर्कमेनी वंशाचे उघ्युर मुस्लिमांनी स्वातंत्र्यांचा नारा बुलंद केला असून त्यासाठी त्यांचं सनदशीर मार्गानं आंदोलनंही सुरू आहेत. त्यातच आता मध्य व पश्चिीम आशियातून परागंदा होणारे मूलतत्त्ववादी या प्रांतात घुसत असून त्यांच्यामुळं चीनला दहशतवादी कारवायांचा धोका असल्याची भीती वाटते आहे. त्यामुळं चिनी लाल सेनेनं या प्रांतात दडपशाहीचा अवलंब सुरू केला असून त्यातून वातावरण चिघळत आहे. शिनजियांग आणि तिबेट या दोन्ही प्रांतात दीर्घकाळ स्वातंत्र्यासाठी आंदोलन सुरू आहे. चीनसाठी हे प्रांत प्रतिष्ठा व अस्मितेचे बनले असून त्यामागं भू राजकीय व व्यूहतंत्रात्मक कारणं आहेत. तिबेटइतकाच हा प्रांतही आपल्याला जवळ असून आपल्या संरक्षणाच्या दृष्टीनं तो महत्त्वाचा आहे. काश्मीर खोर्याूतील गिलगिट, बाल्टीस्तान आणि अक्साई चीनला लागून शिनजियांगची दक्षिण व पश्चितम सीमा आहे. याच गिलगिट परिसरातून पुढं मध्य आशियाचे रस्ते फुटतात. काराकोरम पर्वतराजी व तिथून पुढं ताजिकिस्तान, अफगाणिस्तान, उझबेकिस्तानला जाता येतं. गिलगिटमधून काश्मीर खोरे ओलांडून पंजाब, सिंध व बलुचिस्तान प्रांतातून अरबी समुद्र व इराण व इराणच्या आखातात जाता येतं. चीनच्या मुख्य भूमीपासून मध्य आशिया, युरोपात जाण्याच्या मार्गावरचा शिनजियांग हा म्हणूनच सर्वात महत्त्वाचा प्रांत आहे. याच प्रांतातील हुंजा खोरे (काश्मीरच्या उत्तरेकडील खोर्यााला लागूनच हुंजा खोरे परिसर आहे) या नितांत सुंदर परिसरात चांदी, तांबे, निकेल, अशा मौल्यवान धातूंचे प्रचंड साठे असलेल्या मोठय़ा खाणी आहेत. तसेच, कापूस, तेलबिया, गहू आणि उत्तम प्रकारची फळफळावळ पिकवणारा हा प्रांत कृषीच्या दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा आहे. चीनचा पारंपरिक रेशीम मार्ग (सिल्क रूट) याच प्रांतातून जात असल्यानं रस्त्यांचं पूर्वापार जाळंही या प्रांतात आहे. चीनमध्ये १९४९ मध्ये साम्यवादी क्रांती झाली. त्याच्या दहा वर्षे आधीच या प्रांतानं स्वातंत्र्यांची घोषणा केली होती. पूर्व तुर्कमेनी प्रजासत्ताक, असं त्याचं नामकरण करण्यात आलं होतं. माओनं चीनची सूत्रं हाती घेतल्यावर लगेचच शिनजियांगमध्ये लाल सेना घुसवून हा प्रांत ताब्यात घेतला होता. पुढं माओनंतर सत्तेवर आलेले दंग ज्याव फंग यांनी हानवंशाच्या चिन्यांचं शिनजियांगमध्ये मोठय़ा प्रमाणावर स्थलांतर घडवून आणलं. त्यामुळं या प्रांतातील लोकसंख्येचा समतोलच बदलून गेला. या प्रांतात तुर्कमेनी वंशाचे उघ्यूर मुस्लिम बहुसंख्य होते. त्यांची पद्धतशीर गळचेपी केली गेली. चिनी भाषा व लिपीची सक्ती तर झालीच, शिवाय कोणत्याही स्वरूपाच्या नोकर्याे किंवा व्यवसायात चिनी येणार्यांबनाच प्राधान्य देण्याचं धोरण राबवण्यास प्रारंभ झाल्यानं उघ्युरींची भाषा, संस्कृती, धर्म या सर्वांवरच घाला घातला जाऊ लागला. त्यातूनच उघ्युरींनी बंडाचं निशाण फडकवत स्वातंत्र्यासाठी आंदोलन सुरू केलं. शिनजियांगची राजधानी उरुम्कीत हानवंशीय चिन्यांचं प्राबल्य आहे. तेथील अवजड उद्योग, ऊर्जानिर्मिती प्रकल्प, अवकाश संशोधन संस्था आदी सर्व ठिकाणी हानवंशीयांनाच स्थान दिलं जातं. साहजिकच आपल्याच राजधानीच्या शहरात उघ्युर उपरे ठरताहेत. त्या तुलनेत या प्रांताच्या अति पश्चिनमेला असलेल्या व मध्य आशिया व गिलगिट प्रांताला लागून असलेल्या काशगर शहरात मात्र विकासाच्या फारशा संधीच चिनी राज्यकर्त्यांनी विकसित केलेल्या नाहीत. किंबहुना चिनी लष्कराच्या ताब्यातच या परिसरातील बहुसंख्य भाग असल्यानं काशमग परिसरातील (सीमावर्ती भागातील) उघ्युरींना सातत्यानं लाल सेनेच्या करड्या नजरेखालीच जीवन कंठावं लागतं आहे. या प्रांतात पाकिस्तानातील दहशतवादी घुसू नयेत, याची चीन कसोशीनं काळजी घेतो आहे, मात्र २00८ व २0१४ मध्ये चीनमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमुळं चिनी राज्यकर्त्यांना धक्का बसलाच. त्यात पाकिस्तान व अफगाणिस्तानच्या सरहद्दीवर कार्यरत असणार्याल दहशतवाद्यांचा हात असल्याचं आढळून आल्यानं शिनजियांग प्रांताविषयी चीन अधिकच कठोर भूमिका घेत आहे. आता सीरिया व इराकमधील अल कायदाचे परांगदा दहशतवादी या प्रांताच्या जवळपास लपून बसल्याची शक्यता वर्तवण्यात येते. त्यामुळं चीननं काशगरपासून सर्व ठिकाणी अभूतपूर्व बंदोबस्त ठेवला आहे. शिनजियांगमध्ये उघ्युरींच्या आंदोलनाला त्यामुळं धोका निर्माण झाला आहे. उरुम्कीसह या प्रांतात आता ठिकठिकाणी कधीही लष्कराच्या तुकड्या रस्त्यावर येऊन ब्लॉकेड्स करत आहेत. त्यामुळं जनजीवन ठप्प होत असून हानवंशीय चिन्यांनाही त्याचा फटका बसू लागला आहे; परंतु चिनी कम्युनिस्ट पार्टीच्या शिनजियांग प्रांताच्या प्रमुखांना त्याची पर्वा असल्याचं दिसत नाही. चीनमध्ये (पर्यायाने शिनजियांगमध्ये) दहशतवादी घुसता कामा नयेत आणि या प्रांतातील दुर्गम भागात जिथे त्यांचे अड्डे असतील, ते उद्ध्वस्त करण्याचे आदेश त्यांनी लष्कर व पोलिसांना दिले आहेत. पडत्या फळाची आज्ञा समजून लाल सेना आणि पोलीस या प्रांतातील उघ्युरींनाही छळछावणीचा अनुभव देऊ लागले आहेत. पूर्वी त्या प्रांतातील खदखद बाहेर येणं अवघड होतं; पण आता 'सोशल मीडिया'चा वापर तेथील उघ्युरीही करू लागले आहेत. त्या माध्यमातून ते बाह्य जगाशी संपर्क साधू लागले आहेत. काशगर किंवा हुंजा खोर्या तूनही अनेक उघ्युरी मध्य आशियात स्थलांतर करते झाले असून त्यांनी तेथील छळाची वार्ता जगापर्यंत पोहचवणं सुरू केलं आहे. मुख्य म्हणजे शिनजियांग प्रांतात राहणार्या् हानवंशीयांनीच मुख्य भूमीतील हान बांधवांना या प्रांतातील सध्याच्या स्थितीची माहिती दिली आहे. त्यावर चीनमध्ये वापरल्या जाणार्याल वेईबोवर (व्हॉट्सअँपचा चिनी अवतार) उमटणार्याा प्रतिक्रियाही बोलक्या आहेत. चिनी सरकारच्या शिनजियांगबाबतच्या धोरणावर चिन्यांमध्ये नाराजी आहे. या नाराजीमुळंही चीन सरकार अस्वस्थ झाले आहे. शिनजियांगबाबत चीननं आततायी धोरण स्वीकारल्यास त्याचे परिणाम चीनला पाकिस्तान व मध्य आशियात भोगावे लागतील आणि अन्य मुस्लिम देशांची नाराजीही सहन करावी लागेल. शिनजियांगचं लोण तिबेटमध्येही पसरण्याची भीती आहेच. त्यामुळं चीननं या प्रांतावरील पोलादी पकड अजूनच मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. ही खदखद अधिक वाढणं चीनला परवडणारं नसल्यानंच चीन तिथं बळाचा वापर करून शांतता प्रस्थापित करू पाहतो आहे; परंतु एकंदरीत शिनजियांगचा प्रश्न चीनला सतावणार, हे निश्चि त!

No comments:

Post a Comment