Total Pageviews

Wednesday, 5 October 2016

आधी चीनच्या आर्थिक नाड्या आवळा..T BHARAT

आधी चीनच्या आर्थिक नाड्या आवळा.. . पाकिस्तानी दहशतवादी हल्ल्यानंतर आता पाकिस्तानवर राग व्यक्त करणार्‍या पोस्ट सोशल मीडियावर सातत्याने गेल्या तीन दिवसांत पडत आहेत. पण हे शब्दांचे बाण सोडून काही उपयोग नाही. आपणच आता त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. भारतीय सैनिकांची हत्या केल्यावर वृत्तवाहिन्यांवरून प्रचंड चर्चा झाल्या. काथ्याकूट झाला. देशप्रेम ओथंबून वाहात असल्याप्रमाणे आणि देशाची काळजी फक्त आपल्यालाच आहे अशा तर्‍हेने बोलणारे वक्तेही होते. त्याचप्रमाणे भडकवणारेही होते. त्याचवेळी सोशल मीडियावरून व्यक्त होणारा उद्रेक फार महत्त्वाचा होता. पाकिस्तानला जात असलेल्या ‘झेलम, सतलज आदी नद्यांचे पाणी बंद करा’पासून ‘पाकिस्तानी कलाकारांना हाकलून लावा’पर्यंत मते बाहेर येत आहेत. पण हे करायचे कोणी? आज पाकिस्तानचा उपद्रव देशाला आहे. पाकिस्तानला मदत करणारा शत्रू म्हणून चीन समोर येत आहे. अनेक वेळा पाकिस्तानला मदत करण्याची भूमिका चीनने बोलूनही दाखवली आहे. अशा परिस्थितीत चिनी अर्थव्यवस्था बळकट करण्याचे काम जे भारतातून होत आहे ते आपण थांबवले पाहिजे. केवळ शाब्दिक बाण सोडून आणि सोशल मीडियावर व्यक्त होऊन आपले काम संपणार नाही, हे नागरिकांनी लक्षात घेतले पाहिजे. आपल्या शहीद जवानांना मनापासून श्रद्धांजली देण्यासाठी भारताला हतबल करणार्‍या देशांच्या आणि महासत्तांच्या आर्थिक नाड्या आवळणे आपल्याला सहज शक्य आहे. चीनपासून तर सगळ्या पाकसमर्थक देशांना आपण नागरिक धडा शिकवू शकतो. नरेंद्र मोदी मेक इन इंडिया म्हणून परदेशी भारतीयांना आवाहन करत आहेत. आपण भारतीयांनी करून दाखवलं असं म्हणू शकतो. फक्त फार मोठ्या इच्छाशक्तीची गरज आहे. केवळ एका कसाबला फासावर चढवून पाकिस्तानचा बदला घेतला असे होते काय? एका अफझल गुरूला फासावर चढवून संसदेवरील हल्ल्याचे शल्य कसे काय संपते? त्यामागची सगळी ताकद नमवणे महत्त्वाचे आहे. आज आम्हाला खरा दहशतवाद कोणता आहे हे समजून घेतले पाहिजे. तो आहे आर्थिक आणि बाजारपेठेचा दहशतवाद. बहुराष्ट्रीय अमेरिकेचे वर्चस्व असलेल्या कंपन्यांच्या जाहिरातींचा पैसा मिळतो म्हणून माध्यमे यावर बोलत नाहीत. पण हा जाहिरातींचा पैसा आपल्या खिशातून जातो आहे. तो भारतीय उत्पादनांच्या जाहिरातींकडून मिळवण्यासाठी माध्यमांनी सज्ज झाले पाहिजे. चिनी मार्केट जे आमच्या खाद्य संस्कृतीपासून झोपेपर्यंत प्रत्येक गरजेत लुुडबूड करते आहे ती लुडबूड थांबवली पाहिजे. ती थांबवण्यासाठी आम्हाला सरकारच्या मदतीची गरज नाही. ते आपण करू शकतो. चिनी मालावर सरकारने बंदी घातली नाही तरी आपण ते नाकारून तिकडे जाणारा पैसा वाचवू या. चिनी बनावटीचे स्मार्ट फोन नको. दिवाळीत होणारा चिनी फटाक्यांचा फाटफाट नको. चिनी माळांचा आणि दिव्यांचा लखलखाट नको. चायनीज खाणे बंद करून अस्सल वेगवेगळ्या प्रांतांतल्या भारतीय पदार्थांवर ताव मारू. चिनी उत्पादने नकोत. असंख्य दर्जेदार अशा भारतीय कंपन्या आहेत. त्यांना आपण हात देऊ. मोठं करायचंच झालं तर आपल्या भारतीय उद्योजकांना मोठे करू. नागरिकांनी स्वयंखुषीने, स्वयंघोषित घातलेल्या आर्थिक निबर्ंंधानेच या परकीय आर्थिक दहशतवादावर विजय मिळवता येईल. चीनच्या अशा प्रकारे आर्थिक नाड्या आवळल्या तर त्यांना पाकिस्तानला मदत करण्याचे भरल्या पोटीचे निरुद्योग सुचणार नाहीत. ते सरकारच्या नाही आपल्या हातात आहे. तेव्हा अगोदर चीनच्या आर्थिक नाड्या आवळू. मग आपोआप सगळं सुतासारखं सरळ होईल. आपण आर्थिक नाड्या आवळल्यावर, चिनी उत्पादनांवर बंदी घालण्याचे धाडस केल्यावर सरकारला दखल घ्यावीच लागेल. मग त्यांना सतलज, झेलमचे प्रवाह वळवायचे तर वळवू देत. पण शत्रूच्या अगोदर त्याला मदत करणार्‍या देशांचा बंदोबस्त महत्त्वाचा आहे

No comments:

Post a comment