Total Pageviews

Wednesday, 26 October 2016

स्वदेशी’ हेच राष्ट्रीय धोरण असावे!


स्वदेशी’ हेच राष्ट्रीय धोरण असावे! October 25, 2016056 भारताचे, पाकिस्तान आणि चीन या देशांशी कधीही चांगले संबंध नव्हते. ही राष्ट्रे शेजारी राष्ट्रे असल्यामुळे या देशांशी आपले सहकार्याचे संबंध असावे, एवढीच भारत सरकारची अपेक्षा होती. आपण आपल्या वैयक्तिक जीवनात शेजार्‍यांशी चांगले संबंध असावे, यासाठी बरेच प्रयत्न करतो. परंतु, शेजारी जर वाह्यात स्वभावाचा असेल तर त्याच्याशी दुरूनच संबंध ठेवण्याचा आपण प्रयत्न करतो. शेवटी आपल्याला, या वात्रट शेजार्‍याबरोबर, आपण राहतो त्या समाजाचा व इतर चांगल्या शेजार्‍यांचा विचार करावाच लागतो. मनात अशा शेजार्‍यांचा राग असतो, परंतु नेहमीकरिता हा राग प्रत्येक पातळीवर दाखविता येत नाही. कारण त्या संदर्भातील काही पथ्ये सामाजिक बांधिलकी म्हणून सांभाळावी लागतात. आज एका बाजूला आपण चीनच्या उत्पादनावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करतो आहे. त्यासाठी देशात विशिष्ट वातावरण निर्माण करतो आहे आणि दुसर्‍या बाजूला महाराष्ट्र सरकार, भारत सरकार चीनशी आर्थिक व तांत्रिक संदर्भातील करार करीत आहे. त्यावर बहिष्कार टाकीत नाही किंवा ते करार रद्दही करीत नाही. सर्वसामान्य जनतेला हे एक ‘विरोधाभासा’चे उदाहरण वाटते आहे. भारताने केलेल्या ‘सर्जिकल स्टाईक’पासून भारत आणि पाकिस्तानचे संबंध अगदी उघडपणे खराब झालेले आहेत. परंतु, हे संबंध शासकीय पातळीवर फक्त ‘संरक्षणाच्या’ संदर्भात विकोपास गेलेले आहेत. ‘गोळीचे उत्तर गोळीनेच देऊ’ हा त्यातील टोकाचा मार्ग स्वीकारणे भारत सरकारला भाग पडलेले आहे. त्यातूनच पाकिस्तानच्या विरोधात भारतीयांनी पावले उचललेली आहेत- ‘‘पाकिस्तानचे कलाकार, गायक यांनी भारतात आपले कार्यक्रम सादर करण्याचा प्रयत्न केल्यास, आम्ही त्या कार्यक्रमावर किंवा त्यांचा सहभाग असलेल्या चित्रपटावर बहिष्कार टाकू.’’ अशी उघड धमकी भारतीय जनतेने दिलेली आहे. अशा प्रकारचे धोरण भारत सरकारने निश्‍चित केलेले नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर विचार करता, असे टोकाचे धोरण भारत सरकार घेऊ शकत नाही. आपल्याला ज्या प्रमाणे समाजाचे भान ठेवून, शेजार्‍याशी विरोध करावा लागतो तसेच जागतिक वातावरणाचा विचार करतच सरकारला पाकिस्तानचा विरोध करावा लागतो. परंतु, भारतीय जनतेला असा विरोध उघडपणे करता येतो. कारण त्यांच्या मनात त्या वेळी केवळ ‘भारत’ असतो! त्याचप्रमाणे चीन हा देश पाकिस्तानच्या बाजूचा आहे. त्यामुळे भारत सरकारही या देशाचा विरोध करीत आहे. परंतु, हा विरोध टोकाला जाऊन करता येत नाही. आंतरराष्ट्रीय नियमांचा, कायद्यांचा आणि परिस्थितीचा विचार करूनच, मर्यादेच्या आत राहून हा विरोध भारताला करावा लागतो. परंतु, भारतीय लोक चीनच्या वस्तूंवर अगदी उघडपणे बहिष्कार टाकू शकतात. हा बहिष्कार टाकताना त्यांना चीन, अमेरिका, इतर देशांचा विचार करण्याची गरज नसते. ‘चीनच्या वस्तू खरेदी करू नका,’ असे भारत सरकार उघडपणे सांगू शकत नाही किंवा चीनशी केलेले व्यापारी करार ताबोडतोब रद्द करू शकत नाही. पाकिस्तान आणि चीनला विरोध करण्यासाठी अशा परिस्थितीत भारतीयांनीच समोर येणे, आंदोलन करणे गरजेचे असते. अशी आंदोलने सरकारलासुद्धा पसंत असतात. चिनी वस्तूंवर भारतीयांनीच बहिष्कार टाकला, तर भारताची चीनमधून होणारी आयात कमी होईल आणि त्याचा वाईट परिणाम त्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर होईल. चिनी उत्पादनावर बहिष्कार टाकणे तसे सोपे आहे. कारण चिनी वस्तू दिसावयास छान आणि स्वस्त वाटत असल्या तरी टिकाऊ नसतात. शीघ्रनाशी असतात. त्यापेक्षा थोड्या महाग टिकाऊ वस्तू भारतातच तयार होतात. त्या घेणे सयुक्तिक ठरते आणि त्यामुळे भारताचा व्यापार वाढू शकतो. लोकांना रोजगार मिळतो. चीनच्या ‘यूझ ऍण्ड थ्रो’ वस्तू काही कामाच्या नाहीत, नुसत्या फसव्या असतात. चीनशी आपले संबंध चांगले नाहीत म्हणूनच नव्हे, तर ‘स्वदेशी वस्तू खरेदी केल्या पाहिजेत,’ हे आपण भारतातील लोकांनी कायमचे धोरण ठरविले पाहिजे. हे धोरण सर्वात चांगले आणि ‘निकोप’ धोरण आहे. त्याचा आपण व्यावहारिक धोरण म्हणून स्वीकार केला पाहिजे, तरच त्याचे ‘राष्ट्रीय धोरणा’त रूपांतर होईल. भारताच्या विकासाकरिता अशा राष्ट्रीय धोरणाची नितान्त आवश्यकता आहे

No comments:

Post a comment