Total Pageviews

Wednesday 19 October 2016

काश्मीरचे करायचे काय? -भारत जसजसा अधिकाधिक आधुनिक, सशक्त तसेच औद्योगिक, वैज्ञानिक व लष्करीदृष्टय़ा प्रगत होत जाईल तसे हे युद्ध, बळाचा वापर न करताही जिंकणार आहे. आवश्यकता मुत्सद्देगिरीची, संयमाची, चिकाटीची, आत्मविश्वासाची आणि लोकशाहीवरील प्रामाणिक निष्ठेची आहे. गीतेचेच शब्द वापरायचे झाले तर पाकिस्तान नष्ट होणारच आहे; आपण फक्त निमित्तमात्र व्हायचे आहे


काश्मीरचे करायचे काय? अतिरेकी बुऱ्हान वानी चकमकीत मारला गेल्यानंतर पेटलेले काश्मीर शंभर दिवसांनी तसे शांत झाले. हरिहर कुंभोजकर | October 20, 2016 खतरनाक अतिरेकी बुऱ्हान वानी चकमकीत मारला गेल्यानंतर पेटलेले काश्मीर शंभर दिवसांनी तसे शांत झाले. मधल्या काळात भारतीय लष्कराने लक्ष्यभेदी कारवाई केली तरी अतिरेक्यांच्या कारवाया सुरूच आहेत. या पाश्र्वभूमीवर काश्मीरचे करायचे काय, या प्रश्नाच्या संभाव्य उत्तरांची शहानिशा करणारा लेख.. पहिल्या महायुद्धाच्या काळातला एक विनोद सांगतात : जर्मन पाणबुडय़ांनी ब्रिटिश नौदलाला सळो की पळो केले होते. या जर्मन अस्त्राला कसे काबूत आणायचे यावर विचार करण्यासाठी ब्रिटिश तज्ज्ञांची समिती नेमली. समितीने बऱ्याच विचारांती उपाय सुचवला की समुद्राच्या तळाला आग लावावी. पाणी उकळू लागले की पाणबुडय़ा आपोआप पृष्ठभागावर येतील. मग ब्रिटिश नौदलाने त्याचा फडशा पाडावा. या तज्ज्ञांना विचारले, ‘‘समुद्राच्या तळाला आग कशी लावायची?’’ ‘‘ते तुमचे तुम्ही पाहा. उपाय सुचवणे आमचे काम; अंमलबजावणीचे काम नौदलाचे!’’ तज्ज्ञांनी सांगितले. काश्मीर समस्येवर सुचविलेले बहुतेक सल्ले या विनोदाची आठवण करून देतात. काश्मीरवर बोलताना एक उपाय अगदी गंभीरपणे सुचवला जातो; हा उपाय सुचवणारे बहुधा मानवतावादी असतात. यांचा उपाय असतो : ‘‘काश्मीरचा प्रश्न सोडवायचा असेल तर काश्मिरी जनतेची मने जिंकली पाहिजेत.’’ मने जिंकली की शांतता प्रस्थापित होईल हे म्हणणे पाणी उकळू लागले की पाणबुडय़ा पृष्ठभागावर येतील असे म्हणण्याइतके तर्काला धरून आहे. प्रश्न आहे पाणी कसे उकळायचे, मने कशी जिंकायची हा. गेल्या २०१४ च्या निवडणुकीत काश्मिरात ६५% मतदान झाले आहे. हे भारताच्या अन्य काही राज्यांहूनही अधिक आहे. या निवडणुका ‘फ्री अॅकण्ड फेअर’ होत्या हे विरोधकही मान्य करतात. आज तेथे बहुमताचे सरकार आहे. त्यामुळे भारताच्या अन्य राज्यांत ज्याप्रमाणे तेथील जनतेची मने जिंकण्याचा प्रश्न निर्माण होत नाही, त्याप्रमाणे तो काश्मिरातही होऊ नये. मग काश्मिरात हा प्रश्न का निर्माण होतो? काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे : आज जे तेथे अशांतता निर्माण करीत आहेत ते पाच टक्के जनतेचेही प्रतिनिधित्व करीत नाहीत. त्यांच्यात निवडणुकांना सामोरे जाण्याचे धाडस नाही आणि ज्यांनी ते धाडस केले त्यांची डिपॉझिटेही जप्त झाली आहेत. लोकशाही मार्गाने आलेल्या सरकारला काम करू द्यायचे नाही हा त्यांचा निर्धार आहे. म्हणजे मने जिंकायचीच असतील तर या पाच टक्क्यांची! या पाच टक्क्यांचे प्रमुख नेते सय्यद अली शाह गिलानी यांनी आपली काश्मीरसंबंधी भूमिका स्पष्ट करणारी एक प्रदीर्घ मुलाखत २०१० साली दिली होती. त्या मुलाखतीत ते म्हणतात : ‘‘.. एखादा सच्चा मुसलमान कुठल्याही लढय़ात भाग घेतो तेव्हा इस्लामसाठीच असतो. (काश्मीरचा प्रश्न) काश्मिरी मुसलमानांसाठी निश्चितपणे धार्मिक प्रश्न आहे.’’ ते पुढे म्हणतात, ‘‘हिंदू आणि मुसलमान ही पूर्णपणे वेगळी राष्ट्रे आहेत. हिंदू बहुमताच्या भारतात मुस्लीम राष्ट्र राहू शकत नाही.’’ त्याच वर्षांतील २ ऑक्टोबरच्या ‘इकॉनॉमिक अॅेण्ड पोलिटिकल वीकली’च्या अंकात ते पुन्हा म्हणतात : ‘‘धर्म, संस्कृती, रूढी, आचार-विचार यांच्या बाबतीत मुस्लीम हे पूर्णत: वेगळे राष्ट्र आहे. त्यांची राष्ट्रीयता आणि त्यांच्यातील एकता यांचा पाया देश, वंश, भाषा, रंग किंवा आर्थिक प्रणाली अशा गोष्टींच्या आधारे ठरू शकत नाही. त्यांच्या एकतेचा पाया फक्त इस्लाम हाच आहे.’’ आता अशा लोकांची मने कशी जिंकणार? हे समुद्राच्या तळाला आग लावण्याहून कठीण आहे. मग यावर हे शांततावादी दुसरा उपाय सांगतात, ‘‘देऊन टाका काश्मीर पाकिस्तानला आणि मिटवा एकदाचा हा प्रश्न!’’ पण हा उपायही पहिल्या इतकाच अव्यवहार्य आहे. जम्मू-काश्मीरच्या जनतेचा बळी देऊनही तुम्हाला शांतता विकत घेता येणार नाही. गिलानींची काश्मीरविषयक भूमिका ही जिना यांच्या पाकिस्तानविषयक भूमिकेचा पुनरुच्चार आहे. ‘मुसलमान हे स्वतंत्र राष्ट्र आहे’ ही घोषणा करीतच जिनांनी पाकिस्तान मिळविले. जिना हे स्वत: धर्मवेडे नव्हते. परंतु ते धर्मवेडय़ा लोकांचे प्रतिनिधित्व करीत होते. पाकिस्तान धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनावे, असे त्यांनी म्हटले होते. पण वाघावर स्वार झालेले खाली उतरू शकत नसतात. इंग्लंडमध्ये कायदा शिकलेल्या बॅरिस्टरपेक्षा अमेरिकेमध्ये कवायत शिकलेल्या जनरलला हे अधिक चांगले ठाऊक असावे. पाकिस्तानचे माजी लष्करशहा झिया-उल-हक यांना त्याबाबत छेडले असता ते एकदा म्हणाले होते, Turkey and Egypt, if they stop being aggressively Muslim they will remain exactly what they are-Turkey and Egypt. But if Pakistan does not become and remain aggressively Muslim it will become India again. Amity with India will mean getting swamped by this enveloping embrace of India. झियांच्या म्हणण्याचा मथितार्थ इतकाच : भारतद्वेष पाकिस्तानच्या अस्तित्वासाठी आवश्यक आहे. ज्या दिवशी पाकिस्तानचे भारत-वैर संपेल त्या दिवशी पाकिस्तानच संपेल. कारण भाषा, साहित्य, संगीत, संस्कृती, खाणे-पिणे, विचार-पद्धती, सर्व बाबतींत आम्ही बरेच जवळ आहोत. मग भारत-पाकमधील प्रश्न सुटण्याचा उपाय काय? वस्तुत: तो उपाय झियांनीच आपल्याला, आडवळणाने सुचवला आहे. तो म्हणजे पाकिस्तानच नष्ट होणे. हा उपायही पूर्वीच्या उपायांप्रमाणे, निश्चितच तर्काला धरून आहे. पण हाही पूर्वीच्या उपायांइतकाच अव्यवहार्य नाही काय? आहेही आणि नाहीही! अव्यवहार्य यासाठी आहे की, २० कोटी लोकांचा देश युद्ध करून नष्ट करणे इतके सोपे नाही. पाकिस्तानशी र्सवकष युद्ध झाले तर दोघांचेही अतोनात नुकसान होणार आहे. शिवाय अणुयुद्धाची शक्यता वेगळीच. पण पाकिस्तान नष्ट होणे शक्य आहे; लगेच उद्या नसेल पण येत्या काही वर्षांत ते निश्चितपणे होईल आणि त्यासाठी आपल्याला फार काही करावे लागणार नाही. फक्त आपल्याला आपली मानसिकता बदलावी लागेल. बाकी गोष्टींची काळजी पाकिस्तानचे सध्याचे राज्यकर्तेच घेतील. एक. पाकिस्तानची निर्मिती लोकांच्या चळवळीतून झाली नाही; ती, जिना यांच्याच भाषेत, एक टायपिस्ट आणि एक सेक्रेटरी यांच्या मदतीने झाली आहे. पाकिस्तानचे आजचे ‘हुक्मरान’ हे जनतेचे नेते नाहीत. ते वृत्तीने सरंजामशहा आणि पेशाने लष्करशहा आहेत. जिनांनी बलुचिस्तानचा पाकिस्तानात समावेश करण्यासाठी बलप्रयोग आणि छलकपट दोन्हींचा उपयोग केला आहे. स्पॅनिश चाच्यांनी माया लोकांना जिंकले तसे. बलुचिस्तान हे पाकिस्तानची वसाहत आहे. फाळणीची चर्चा सुरू झाली तेव्हा आजच्या वायव्य सरहद्द प्रांतावर काँग्रेसची सत्ता होती. खान अब्दुल गफार खान हे तेथील लोकनेते होते. जनआंदोलनाने दिलेले ते पाकिस्तानातील बहुधा एकमेव पुढारी. त्यांना वायव्य सरहद्द प्रांत भारतातच सामील करण्याची इच्छा होती. पण त्या वेळच्या काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यास मान्यता दिली नाही. ‘पख्तुनिस्तान’मध्ये पाकिस्तानचे शासन आजही नावालाच आहे. पूर्व-पाकिस्तानचा दर्जा पाकिस्तानच्या त्या वेळच्या लष्करी ‘हुक्मरानां’च्या दृष्टिकोनातून वसाहतीपेक्षा वेगळा नव्हता. पाकिस्तान काश्मीरकडेही वसाहतवादी दृष्टिकोनातूनच पाहते. मग बोलण्याची भाषा काहीही असो. काश्मीरचा काही हिस्सा त्याने परस्पर चीनला देऊन त्याला लुटीत सामील करून घेतले. पाकिस्तानची ही कृती पोर्तुगीज राजाने इंग्लंडच्या राणीला साष्टीचे बेट आंदण देण्याइतकीच वसाहतवादी आहे. उलटपक्षी, भारत जनतेच्या सहभागातून, लोकांच्या चळवळीतून स्वतंत्र झाला. जेव्हा राजकारण म्हणजे तुरुंगवास, त्याग आणि बलिदान हेच होते त्या वेळी आमचे नेते राजकारणात उतरले होते. त्यांच्यापुढे काही ध्येये होती; काही निष्ठा होत्या. लोकशाहीवरील निष्ठा ही त्यापैकी एक. काश्मीरच्या सामीलनाम्यावर महाराजा हरिसिंगांची सही पुरेशी होती. पण नेहरूंच्या लोकशाहीवरील निष्ठेमुळे लोकप्रतिनिधी म्हणून शेख अब्दुलांची सही घेतली. काश्मीरमध्ये लोकशाही नांदावी ही सर्वच भारतीयांची प्रामाणिक इच्छा होती आणि आहे. आशिया आणि आफ्रिकेतील देशांना वसाहतवादापासून मुक्त करण्यासाठी भारताने सुरुवातीपासून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष साहाय्य केले आहे. म्हणून, बलुचिस्तान, सिंध, पख्तुनिस्तान इत्यादी प्रांतांतील स्वातंत्र्यवादी शक्तींना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. आम्ही असे करणे आणि पाकिस्तानने काश्मीरमधील फुटीरतावाद्यांना मदत करणे यात तात्त्विकदृष्टय़ा मूलभूत फरक आहे. कुठल्याही प्रदेशात वसाहती स्थापन करण्याचा आमचा उद्देश नाही. तेथील लोकांच्या हातात सत्ता जावी यासाठी आम्ही मदत करतो. शेजारी देशात लोकनियुक्त सरकारे प्रस्थापित होणे, तेथे लोकशाही सुदृढ होण्यासाठी प्रयत्नशील राहणे याला कृतिशील लोकशाहीवाद असे म्हणता येईल. बांगलादेशाबाबत आमची कृती हे त्याचे उदाहरण आहे. हे भारताचे दीर्घकालीन धोरणही होऊ शकते. पाकिस्तानला नेस्तनाबूत करण्यासाठी युद्ध केलेच पाहिजे असे नाही. तेथील सरंजामीवृत्तीच्या लष्करशहांशी असहकार, त्यांची प्रत्येक क्षेत्रात कोंडी आणि प्रागतिक लोकशाही शक्तींना सक्रिय साहाय्य यामार्गे पाकिस्तानला नामोहरम करणे शक्य आहे. अण्वस्त्रसज्ज सोविएत युनियनबरोबरचे युद्ध ‘शांतते’च्या मार्गाने अमेरिकेने जिंकले. लोकशाही भारत जसजसा अधिकाधिक आधुनिक, सशक्त तसेच औद्योगिक, वैज्ञानिक व लष्करीदृष्टय़ा प्रगत होत जाईल तसे हे युद्ध, बळाचा वापर न करताही जिंकणार आहे. आवश्यकता मुत्सद्देगिरीची, संयमाची, चिकाटीची, आत्मविश्वासाची आणि लोकशाहीवरील प्रामाणिक निष्ठेची आहे. गीतेचेच शब्द वापरायचे झाले तर पाकिस्तान नष्ट होणारच आहे; आपण फक्त निमित्तमात्र व्हायचे आहे

No comments:

Post a Comment