Total Pageviews

Saturday, 15 October 2016

संवेदनशील गोष्टीत अपप्रचार-शत्रूला नेमके हेच हवे असते. त्यावरून वादाचा धुरळा उठावा आणि जनतेत संभ्रम निर्माण व्हावा. अर्थात जनताही अशांच्या बातांना मनावर घेत नाही. पण मतदानासारखी सुवर्ण संधी मिळताच सर्व हिशोब चुकते करते

संवेदनशील गोष्टीत अपप्रचार Thursday, October 13th, 2016 जयेश राणे ‘सर्जिकल स्ट्राईकची कारवाईच बनावट होती, कारवाईचे पुरावे जगासमोर मांडा म्हणजे पाकिस्तानचा अपप्रचार बंद होईल,’ अशी मतांतरे व्यक्त झाली. या विधानांचा रोख हा सर्जिकल स्ट्राईकच्या पुराव्यांकडे अंगुलीनिर्देश करतो. सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडीओ हिंदुस्थानी सैन्याने सरकारला सादर केला आहे. असे असले तरी कोणीही कितीही आदळआपट केली तरी सैन्याचे हित पाहता तो व्हिडीओ सर्वांसाठी खुला न करण्याचे दायित्व सरकार पार पाडेल, अशी जनतेची अपेक्षा आहे. राजकीय वैर असल्याने नेत्यांचे आपसांत पटणार नाही. त्यामुळे नेत्यांनी जे माजी लष्करी अधिकारी आहेत त्यांना विचारण्याची तसदी घ्यावी की पुराव्यांवरून रणकंदन करणे कितपत योग्य आहे? आपल्या प्राणाची बाजी लावून त्यांनी देशसेवा केलेली आहे, त्यांचेच उत्तराधिकारी आज सीमेवर कार्यरत आहेत. सोनाराने कान टोचलेले बरे असे म्हणतात. पण ते टोचून घेण्याची इच्छाच नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. पाकिस्तानने हिंदुस्थानवर अनेकदा दहशतवादी हल्ले केले आहेत. त्यांविषयी पाकला हिंदुस्थानने वेळोवेळी पुरावे सादर केले आहेत. तरी त्यांना मूठमाती देण्याचे काम पाकने त्यांच्या स्वभावानुसार केले आहे. हिंदुस्थानच्या पुराव्यांनी त्यांचे कधीच समाधान झालेले नाही आणि ते करून घ्यायचेच नाही, असे ठरवले असल्याच्या आवेशात त्यांचे कायम वागणे, बोलणे असते. पुरावे पाकला दिले काय आणि त्यांच्या नीचपणाचे पुरावे जगासमोर ठेवले काय, त्याचा पाकवर जराही फरक पडणार नाही. सर्व जगाला ज्ञात आहे की, पाकिस्तान दहशतवादी देश आहे. त्यामुळे पुरावे गोळा करून त्यांना देण्यात वेळ, श्रम वाया घालवू नये. देशातील काही नेत्यांकडून सर्जिकल स्ट्राईकच्या पुराव्यांची मागणी होणे आणि त्यावर कडी म्हणजे त्या कारवाईस बनावट म्हणणे यावरून त्यांचे किती वैचारिक अध:पतन झाले आहे हे समजते. त्या बेतालांना विचारून सैन्याने आपल्या मोहिमा आखायच्या का? ज्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री विविध प्रकरणांत दोषी आढळले आहेत. परिणामी त्यांची हकालपट्टी करावी लागली आहे, अशांच्या प्रमुखाने प्रथम आपल्या मंत्रिमंडळावर सर्जिकल स्ट्राईक करावा. कारवाईच बनावट होती असे म्हणणार्‍या वाचाळांबद्दल काय बोलायचे? बाह्य शत्रूंसोबत देशांतर्गत घरभेदीही देशासाठी धोकादायक असल्याची चर्चा जनतेत आहे. शाब्दिक बुडबुडे सोडणे फार सोपे असते. दुधात मिठाचा खडा टाकण्याचे काम बिनडोकच करू शकतात. हिंदुस्थानात अनावश्यक मंडळीच तोंडाचा पट्टा अयोग्य वेळी अयोग्यपणे चालवण्यात आघाडीवर असतात. कारण गलिच्छ राजकारणापुढे त्यांना सर्व गौणच वाटत असते. सर्जिकल स्ट्राईकबद्दल पाकची जेवढी घुसमट होत आहे त्याही पेक्षा ते ऑपरेशन ज्या शासनाच्या काळात झाले त्याचा हा जळफळाट असल्याचे वाटल्यास वावगे ठरू नये. देशहितासाठी केलेली कोणतीही गोष्ट कोणाच्या काळात झाली हे अजिबात महत्त्वाचे नसून त्याने देशाला काय फायदा झाला हे महत्त्वाचे नाही का? महत्त्वाचे म्हणजे हिंदुस्थानच्या लष्करी कारवाईच्या महासंचालकांनी सर्जिकल स्ट्राईक केल्याची माहिती पाकच्या लष्करी कारवाईच्या अधिकार्‍यास दिली होती. दोन देशाच्या जबाबदार अधिकार्‍यांत हॉटलाईनवरून बोलणी झाली यापेक्षा महत्त्वाचे काय असू शकते? लष्कराला त्यांच्या पद्धतीने राष्ट्रसेवा करू द्यावी. लष्कर कधीही राजकारणात हस्तक्षेप करत नाही, पण बिनडोक नेते मात्र त्यांनी केलेल्या राष्ट्रसेवेबद्दल खुसपट काढून का हस्तक्षेप करत आहेत? देशातील नेते पूर्वग्रहदूषितपणा ठेवून संवेदनशील बाबींचेही राजकारण करण्यात मग्न राहिले तर दोघांचे भांडण आणि तिसर्‍याचा लाभ असे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शत्रूला नेमके हेच हवे असते. त्यावरून वादाचा धुरळा उठावा आणि जनतेत संभ्रम निर्माण व्हावा. अर्थात जनताही अशांच्या बातांना मनावर घेत नाही. पण मतदानासारखी सुवर्ण संधी मिळताच सर्व हिशोब चुकते करते

No comments:

Post a comment