Total Pageviews

Monday 9 March 2015

त्या’ सैनिकांना विसरू नका...

जम्मू-काश्मीरमध्ये नवीन सरकार स्थापन झाले आणि त्यानिमित्त आयोजित विविधरंगी समारंभ, मेळावे आणि झगमगाटाबरोबरच आव्हानांचे नवीन युग सुरू झाले आहे. हा एक नवीन अध्याय आहे, याचे स्वागत केले पाहिजे आणि सावध राहून देशभक्तीबरोबरच विकासाच्या मार्गावर पुढे चालले पाहिजे. सारे विश्‍व ही अभूतपूर्व घटना पाहत आहे आणि भारताचे शत्रू आश्‍चर्यचकित झाले आहेत. या सार्‍या गदारोळातही जर विचलित न झालेला, कुठलाही परिणाम होऊ न दिलेला आणि कुठल्याही परिस्थितीत कर्तव्यपथावर पाय रोवून उभा असलेला जर कुणी असेल, तर तो आहे भारताचा शूर सैनिक! त्याने त्याच्या डोळ्यांनी पाहिला होता १९५३ चा तो काळ... जेव्हा लखनपूरच्या सीमेवरून जम्मू-काश्मीरच्या सीमेत बिना परमिट प्रवेश केल्याने एक भारतीय डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींना अटक करून जीपने श्रीनगर येथे नेण्यात आले होते, जेथून २३ जून रोजी त्यांचा मृतदेह कोलकाता येथे पाठविण्यात आला, तेव्हा देशात हलकीशी खळबळ माजली होती. आज ते जे श्यामाप्रसाद मुखर्जींच्या तत्त्व व विचारांवर विश्‍वास ठेवून राजकारणात आले, जम्मू-काश्मीरचे शासक या नात्याने शपथ घेतानाही दिसले. काळ हा असा बदलत असतो. मात्र, सैनिकाला याविषयी फारसे देणेघेणे नसते. त्याला हे पक्के माहीत आहे की, या प्रदेशात ते देशभक्त असोत वा देशद्रोही, ते भारत समर्थक असोत अथवा पाकचे गोडवे गाणारे, जोपर्यंत ते भारतीय सीमेच्या आत आहेत तोपर्यंत त्यांना भारताचे रक्षण करायचेच आहे. गिलानी दिल्लीत येऊन लष्कराविरुद्ध कितीही बरळो किंवा सैनिकांवरील हल्ल्यांचे कितीही खटले यासीन मलिकविरुद्ध चालू देत, त्यांचे संरक्षण भारतीय सैनिकांना यासाठी करायचे आहे की, तसा राज्यघटनेचा आदेश आहे. मी श्रीनगरहून किशनगंगेची सीमा आणि हाजी पीरच्या समोरची गस्ती चौकी तसेच लडाखच्या देमछोकपर्यंत लष्करी जवानांचे दैनंदिन जीवन जवळून न्याहाळले आहे, त्यांच्या आयुष्यातील विविध प्रसंग पाहिले आहेत. खबर मिळताच ते दहशतवाद्यांच्या तळावर कसे छापे मारतात, हे बघितले आहे. कधीकधी आपसातील वैमनस्यापायी किंवा कुणाचा हिशेब चुकता करण्यासाठी जाणुनबुजूनच सैनिकांना चुकीची माहिती देण्यात येते. कुठल्याही निर्दोष, निष्पाप व्यक्तीवर गोळीबार होऊ नये यासाठी सैनिक जिवापाड प्रयत्न करतात. पहाटे ५ वा. उठून ६ वा. पुरी-भाजीचा नाश्ता आणि पहाटे अडीच वाजल्यापासून सैनिक स्वयंपाकघरात बनलेले जेवण पॅक करून व मागे बांधून ते ‘रोड क्लीयरन्स’च्या कामावर निघून जातात, जेणेकरून रस्त्यावर किंवा कुणा दहशतवाद्यांनी खड्ड्यात आयईडी किंवा भूसुरुंग पेरले असतील, तर आपल्याजवळील यंत्रांनी त्याचा माग काढून ते निष्प्रभ करून सर्वसामान्य काश्मिरी नागरिकांसाठी असलेला मार्ग निर्धोक व सुरक्षित व्हावा. दिवसभराच्या ड्युटीत ते केवळ आपल्याजवळ असलेल्या बाटलीतील पाणीच पितात. कोण कसे पाणी देईल, याचा काहीही भरवसा नाही. तीस किलोंचे शस्त्र आणि बुलेटप्रूफ जॅकेट, वजनदार बूट, वजनदार गणवेश आणि सतत १२ तास अतिशय सावधपणे उभे राहून कर्तव्य बजावणे... त्याच्या ‘वन रँक वन पेन्शन’ प्रकरणाचा भलेही त्याच्या बाजूने निर्णय लागलाही नसेल, पण तरीही त्याला आपले कर्तव्य कुठलीही चूक होऊ न देता निभवायचेच आहे. त्याला पक्के माहीत आहे की, या (काश्मीरच्या) भूमीत जर त्याचा मृत्यू झाला, तरीही त्याच्या कुटुंबीयांना एक इंच जमीनही खरेदी करण्याची परवानगी मिळणार नाही. कर्नल एम. एन. राय यांना काही दिवसांपूर्वी काश्मिरात हौतात्म्य आले. ते गाजीपूरचे होते. त्यांच्या पार्थिवाला दिल्लीत मुखाग्नी देण्यात आला. अंत्यसंस्काराला साधारण दीडशे लोक होते, अशी बातमी वर्तमानपत्रात आली. ज्याने कर्नल राय यांच्यावर गोळ्या झाडल्या, त्याला पाकिस्तान सरकारने शहिदाचा दर्जा देऊन जेव्हा त्याची अंत्ययात्रा काढण्यात आली, त्या वेळी हजारो नागरिक त्यात सहभागी झाले होते. सैनिकाला हे सर्व पाहावे आणि सहनही करावे लागते. डेहराडूनचे लेफ्टनंट कर्नल राज गुलाटी यांनाही काश्मिरात वीरगती प्राप्त झाली, तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यात सर्व नेते व्यस्त होते. आपल्या खाजगी सचिवांना अंतिम संस्कारासाठी त्यांनी पाठविले होते. आमच्या शहरातील एखादा नवतरुण देशासाठी शहीद झाला असल्यास त्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी त्या शहरातील शाळा बंद झाली आहे काय, किंवा मुलांना कधी असे सांगितले आहे काय की, जर त्याची इच्छा असती तर तो सैनिकही आयएएस, आयपीएस बनू शकला असता आणि त्याला जर नैसर्गिक मृत्यू आला असता, तर सर्व नेते, मंत्री, मुख्यमंत्री व शहरातील प्रतिष्ठित व्यक्तींनी त्याला श्रद्धांजली अर्पण केली असती. शहरातील शासकीय अधिकारी सैनिकांच्या कुटुंबीयांचे लवकर काम करीत आहेत किंवा त्यांना थोडी सन्मानाची वागणूक देत आहेत, कारण त्यांच्या कुटुंबातील ती व्यक्ती आमच्या संरक्षणासाठी सीमेवर तैनात आहे, असे सहसा दिसत नाही. अमेरिका, युरोप अथवा चीनबाबत आम्ही मंडळी मोठ्या अहंकाराने चर्चा करतो की, ते भांडवलशाही व बाजारवादी अर्थव्यवस्थेचे समर्थक आणि मनुष्याच्या शोषणावर टिकणार्‍या व्यवस्थेचे मूल्यहीन समाज घटक आहेत. आम्ही तर खूप महान आहोत. आमच्याजवळ आमची हजारो वर्षे जुनी संस्कृती आहे. मात्र, देशभक्ती आणि सैनिकांच्या सन्मानाबाबत जर कुणाकडून काही शिकण्यासारखे असेल तर ते अमेरिका, चीन आणि जपानसारखे देश आहेत. सैनिकांचे हौतात्म्य संपूर्ण समाजाला आंदोलित आणि प्रेरित करीत असते. वर उल्लेखित देशांमधील सैनिक जर इकॉनॉमी क्लासमधून जरी प्रवास करीत असला, तरीही विमानतळावर प्रवासी आणि विमान कंपनीचे कर्मचारी बिझनेस क्लासवाल्या प्रवाशांपूर्वी सैनिकांना आत येण्यासाठी आमंत्रित करतात. (अर्थात त्यांना प्रथम प्राधान्य देतात) मात्र, याची कुणीही तक्रार करीत नाही. केवळ प्रवासच नाही, तर त्यांच्या देशातील सार्वजनिक वातावरणही सर्वसाधारण असेच असते की, लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सारेच जण सैनिकांना खूप सन्मान देतात. त्यांच्या कामात कुणीही अडथळा आणत नाही. तेथे हे सर्व स्वयंस्फूर्त आणि नैसर्गिक रीत्या होते. आमच्या येथे सैनिकांची उपेक्षा आणि तिरस्काराने भरलेले मानवाधिकारवाद्यांचे भाषण दैनंदिन जीवनाचा भाग आहे. शाळा, महाविद्यालयात सैनिकांविषयी, त्यांना आदर देण्याविषयी काहीही चर्चा होत नाही. अशा बोटावर मोजण्याइतक्याच शाळा असतील की, जेथे या गोष्टीचा गौरवपूर्वक उल्लेख करण्यात आला असेल की, त्या शाळेच्या माजी विद्यार्थ्याने सैनिक होऊन देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी बलिदान देणार्‍यांची कीर्तीच केवळ चिरंतन राहते. आम्ही हे जर विसरणार नसू, तर आमचे उर्वरित कामकाजही योग्य दिशेने सुरू राहील

No comments:

Post a Comment