Total Pageviews

Saturday 14 March 2015

हिंदी महासागरातील भारताचे स्थान आणखी बळकट करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तीन देशांच्या दौऱ्याला सुरुवात

हिंदी महासागरातील भारताचे स्थान आणखी बळकट करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तीन देशांच्या दौऱ्याला सुरुवात झाली असून, सेशेल्सबरोबरील चार महत्त्वाच्या करारांवर बुधवारी सह्या करण्यात आल्या. संरक्षण सहकार्य वाढविण्याबरोबरच किनारपट्टीवर गस्तीसाठीच्या रडार बसविण्याच्या प्रकल्पाचाही (कोस्टल सर्व्हेलन्स रडार) या करारामध्ये समावेश आहे. मोदी यांचे भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी मध्यरात्री सेशेल्समध्ये आगमन झाले. सेशेल्सचा दौरा करणारे ३४ वर्षांमधील मोदी हे पहिलेच भारतीय पंतप्रधान आहेत. मोदी यांनी सेशेल्सचे अध्यक्ष जेम्स मायकेल यांच्याशी दीर्घ चर्चा केली आणि त्यानंतर चार करारांवर सह्या करण्यात आल्या. एका करारानुसार, भूजलसाठ्यांचे सर्वेक्षण करण्यासाठी सेशेल्सला भारत सहकार्य करणार आहे. तसेच, सेशेल्सला ड्रोनियर विमान देण्याच्या; सेशेल्सच्या नागरिकांसाठी तीन महिन्यांच्या कालावधीचा व्हिसा नि:शुल्क करण्याच्या कराराचाही यामध्ये समावेश आहे. यासाठी 'व्हिसा ऑन अरायव्हल'ची सुविधाही उपलब्ध होणार आहे. 'कोस्टल सर्व्हेलन्स रडार'चा पहिला प्रकल्प सेशेल्सची राजधानी असणाऱ्या माहे बेटांवर उभा राहणार आहे. 'इंडियन ओसिअन रिम असोसिएशन' आणखी बळकट होण्यासाठी भारताचा सक्रिय पाठिंबा असेल, असेही मोदी यांनी या वेळी स्पष्ट केले. चीनच्या प्रभाव क्षेत्रात हिंदी महासागरामध्ये मोक्याच्या स्थानी असणाऱ्या श्रीलंका, सेशेल्स आणि मॉरिशस या तीन देशांवर चीनने प्रभाव वाढविला आहे. या तिन्ही देशांमध्ये चीनने मोठ्या प्रमाणामध्ये पायाभूत सुविधांचे प्रकल्प उभारले आहेत. मोदी या दौऱ्यामध्ये या तिन्ही देशांना भेटी देणार आहेत. मॉरिशसच्या स्वातंत्र्यदिनाला हजेरी सेशेल्सच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मॉरिशसमध्ये दाखल झाले आहेत. ते १२ मार्च रोजी साजरा होणाऱ्या मॉरिशसच्या स्वातंत्र्यदिनाचे प्रमुख पाहुणे असतील. मॉरिशसचे अध्यक्ष राजकेश्वर प्युरयाग आणि पंतप्रधान अनेरुद जुग्नौथ यांनी त्यांचे स्वागत केले. मॉरिशस हा 'छोटा भारत' म्हणून ओळखला जातो आणि यातून जुने संबंध आणखी बळकट होतील, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला आहे. कांतिलाल शहांचे स्मरण सेशेल्स बेटांवर पर्यावरणाचे जतन करण्यासाठी भारतीय वंशाच्या कांतिलाल शहा यांनी सेशेल्समध्ये मोठे कार्य केले आहे. सेशेल्स दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहा यांच्या या कार्याचे कौतुक केले. शहा यांचे २०१०मध्ये निधन झाले. कांतीलाल व त्यांचे कुटुंबीय १९२७मध्ये सेशेल्समध्ये स्थायिक झाले. त्यांनी बेटांवरील वन व वन्यजीव यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले. सेशेल्स बेटांवर... भारताच्या दक्षिणेला आणि आफ्रिका खंडाच्या पूर्वेला सेशेल्स हा ४५९ चौरस किमी. क्षेत्रफळाचा देश आहे. हिंदी महासागरामध्ये आफ्रिका खंडाच्या भूमीपासून १५०० किलोमीटर अंतरावर ११५ बेटांचा समूह म्हणजे हा देश. सेशेल्स बेटांच्या समुहाला २९ जून १९७६ रोजी ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले. सेशेल्स हे जगातील एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. हिंदी महासागरातील या बेटांचे स्थान मोक्याचे असून, सागरी व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी या बेटांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळेच चीनने या बेटांवर लष्करी तळ उभारला आहे. या बेटावर २०१२च्या जनगणनेनुसार ९२ हजार नागरिक राहतात. सायबर सिटीच्या विकासासाठी मदतीची घोषणा मॉरिशस या छोट्याशा देशाने हिंदी भाषेची खूप सेवा केली आहे, असे गौरवोद्‌गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथे काढले. मॉरिशसचे स्वत:चे हिंदी साहित्य आहे आणि या हिंदीमधून कामगारांची भक्ती दिसून येते, असे पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी येथे आयोजित एका कार्यक्रमाला संबोधित करताना सांगितले. मातृभाषेचा महिमा सांगताना पंतप्रधान म्हणाले की, कोणतीही मातृभाषा ही थेट हृदयातून बाहेर पडते. जेव्हा कुणी आपल्या भाषेतून बोलतो तेव्हा ती गोष्ट त्याच्या हृदयापासून निघत असते. याउलट एखादी दुसरी भाषा आधी मनात येते आणि नंतर प्रकट होते, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. मॉरिशसमध्ये असलेला लघुभारत बघून आपलेपणाची जाणीव होते, असे सांगतानाच पंतप्रधान मोदी यांनी मॉरिशसच्या जनतेचे आभार मानले. आणखी एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी यांनी सायबर सिटी विकसित करण्यासाठी मॉरिशसला मदत करण्यास भारत तयार असल्याचे सांगितले. एवढेच नव्हे तर दुहेरी कररचनेसंदर्भात असलेल्या कराराचा दुरुपयोग थांबविण्यावरही पंतप्रधानांनी भर दिला. गेल्या काही काळात मॉरिशसने वेगाने विकास केला आहे, असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले. वाजपेयी सरकारने याठिकाणी सायबर सिटी विकसित करण्यासाठी मदत केली होती. भारत पुन्हा एकदा यासाठी मॉरिशसला सहकार्य करण्यास तयार आहे. भारत आणि मॉरिशस यांच्यात अनेक गोष्टींबाबत साम्य आहे. या दोन्ही देशांमध्ये होळी, दिवाळी, महाशिवरात्र अशाप्रकारचे सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. याशिवाय दोन्ही देशांमध्ये पूर्ण बहुमताचे सरकार आहे आणि दोन्ही देशांमध्ये संसदेच्या सभागृहाच्या सभापती महिलाच आहेत, याकडेही मोदी यांनी लक्ष वेधले. गंगा तलावाची केली पूजा तत्पूर्वी, सध्या मॉरिशसच्या दौर्याूवर असलेले पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी सकाळी गंगा तलावाची पुजाअर्चना केली आणि लोकांचे लक्ष नद्यांच्या संरक्षणाकडे आकर्षित केले. पोर्ट लुईस येथील गंगा तलावात आधी गंगाजल टाकण्यात आले. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी संपूर्ण धार्मिक रितीरीवाजासह गंगा तलावाची पूजा केली. पंतप्रधानांनी मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनानिमित्त स्थानिक जनतेला शुभेच्छाही दिल्या. या विशेष प्रसंगी मॉरिशसच्या जनतेत उपस्थित असल्याचा विशेष आनंद आहे, असे मोदी यांनी स्थानिक जनतेला शुभेच्छा देताना म्हटले. ५० कोटी डॉलर्सची मदत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पायाभूत सुविधांच्या महत्त्वाच्या प्रकल्पांकरिता मॉरिशसला ५० कोटी डॉलर्सची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली. मॉरिशसचे पंतप्रधान अनिरुद्ध जगन्नाथ यांच्याशी पंतप्रधान मोदी यांनी सविस्तर चर्चा केली आणि यावेळी पाच द्विपक्षीय करारांवर स्वाक्षरी करण्यात आली.

No comments:

Post a Comment