Total Pageviews

Saturday 21 October 2017

ड्रग्जविरोधी बुलंद आवाज हीच काळाची गरज October 18, 2017 iसुशांत द. तांडेल


याच बक्कळ धनाच्या उन्मादाने निर्माण होत असलेल्या देशी-विदेशी दुर्योधनांना वेळीच लगाम घालणे ही काळाची गरज आहे. या दुष्ट दुर्योधनांच्या मोहजाळ्यात अडकलेल्या सामान्यांना मात्र आवरण्या व सावरण्यासाठी पुरेशी संधी देणेही तेवढेच महत्त्वाचे आहे.
निसर्गाचा वरदहस्त लाभल्याने देशी-विदेशी पर्यटकांना अगदी मोहवून टाकणारे आपल्या चिमुकल्या गोव्याचे नयनरम्य समुद्रकिनारे व त्यामुळेच जगभर सुपरिचित झालेले येथील किनारी पर्यटनहे आज ड्रग्ज’(मादकपदार्थ) सारख्या अनेक गंभीर समस्यांच्या आगरात किंवा सागरात नव्हे तर चक्क महासागरात बुडत चालल्याची चर्चा समस्त गोमंतकियांना अगदी नित्याचीच झालेली आहे. परिणामस्वरुप – ‘किनारी पर्यटनः शाप की वरदान?’ हा एवढी वर्षे चर्चिला जाणारा विषय आज अगदीच नगण्य वाटून त्याऐवजी किनारी पर्यटनः शाप की महाशाप?’ हाच गहन चर्चेला परिस्थितीनुरुप योग्य विषय ठरल्यास नवल नाही.
ड्रग्जच्या विषयावर खुलेपणाने लिहिणे किंवा बोलणे हे आज आपल्या गोव्यात मुंगीला मेेरूपर्वत ओलांडणे किंवा माशीला सागर तरून जाणे जेवढे अवघड आहे तेवढेच अवघड बनले असल्याचा स्पष्ट संदेश सध्याची परिस्थिती व चहुबाजूचे वातावरण देते आहे. परिणामी, या अत्यंत गंभीर व दूरगामी परिणाम करू शकणार्‍या विषयावर सबळ पुराव्याविना स्पष्ट बोलणे तर सोडाच, पण साधा ब्रसुद्धा काढणे आजच्या परिस्थितीत कठीण झाले आहे. पण लाट कितीही लहान असली, तरी ती जशी सागराशिवाय एकटी येऊच शकत नाही किंवा धूर कितीही कमी असू दे, खाली आग असल्याशिवाय तो येऊच शकत नाही, तशीच परिस्थिती या ड्रग्ज संदर्भात बनली आहे.
वास्तविक पिढ्यानपिढ्या आपण सर्वजण ऐकत आलेला सुपरिचित वाक्‌प्रचार,‘वाळूचे कण रगडिता तेलही गळेहा आज अगदीच गचाळ वाटू लागल्यास नवल ते काय?.. कारण, चहुबाजूंनी आज चर्चिला जाणारा ड्रग्जचा विषय लक्षात घेता,‘‘वाळूचे कण चाळिता, ‘ड्रग्जही ड्रग्जमिळेहाच वाक्प्रचार येणार्‍या काळात सुपरिचित होण्याची भीती आज निर्माण झाली आहे.
बैल विकून गोठा बांधणार्‍याला किंवा पांघरुण जाळून त्या जाळाशी शेकत बसणार्‍याला सत्याची तोंडओळख करून देणार तरी कोण? व कशी? कारण आपण जे करीत आहोत ते चांगले की वाईट हे लक्षात येण्याएवढी देवाची बौद्धिक कृपाही त्याच्यावर नसावी तर मग आकाशच फाटल्यावर ठिगळ कुठे-कुठे लावणार?
सध्या तरी शासनाबरोबर संबंधित सामान्यजनांनाही बक्कळ धनप्राप्ती करून देणार्‍या या सरकारी अधिमान्यताप्राप्त किनारी पर्यटन क्षेत्राच्या ड्रग्जसारख्या दुष्परिणामांनाही सामोरे गेल्याशिवाय दोन्ही बाजूंना गत्यंतरच दिसत नाही. हे पर्यटन क्षेत्र जिवंत राहणे, किंबहुना भरभराटीला येणे हे दोघांच्याही हिताचेच नव्हे तर अत्यंत गरजेचेही आहे, यात तीळमात्र शंका नाही. पण याच बक्कळ धनाच्या उन्मादाने निर्माण होत असलेल्या देशी-विदेशी दुर्योधनांना वेळीच लगाम घालणे ही काळाची गरज आहे. असे करताना या दुष्ट दुर्योधनांच्या मोहजाळ्यात अडकलेल्या सामान्यांना मात्र आवरण्या व सावरण्यासाठी पुरेशी संधी देणेही तेवढेच महत्त्वाचे आहे.
वस्तुस्थिती पाहता या पर्यटनावर उदरनिर्वाह करणार्‍या गोमंतकीयांची संख्याही काही कमी नाही आहे. कष्ट कुठे नाहीत? या क्षेत्रातही ते लागतातच. पण, पारंपरिक धंदा-व्यवसाय किंवा साधारण नोकरीच्या तुलनेत इथल्या कष्टाचा मोबदला मात्र जास्त आकर्षक असणे स्वाभाविकच आहे. म्हणूनच या व्यवसायाविषयीे पराकोटीचे आकर्षण असणे क्रमप्राप्तच आहे. या चकाकत्या आकर्षणाला बळी पडणार्‍या सामान्य गोमंतकीयांमधील तुटपुंजे शिक्षण घेतलेल्या, शिक्षणात संस्कारक्षम मूल्यांपेक्षा दिले जाणारे निरर्थक आदर्शही कारणीभूत नाहीत ना?
किनारी पर्यटनाशी निगडित व्यावसायिकांच्या जीवनमानात गेल्या आठ-दहा वर्षांच्या अल्प कार्यकालात झपाट्याने होत आलेले आमूलाग्र बदल सर्वत्र चर्चेचा विषय होणे स्वाभाविकच आहे. पण त्याचबरोबर विदेशींचा हैदोस, रात्री अपरात्री चालणारा, वाजणारा, कर्णकर्कष, कानठळ्या बसविणारा आवाज, ‘अतिथी देवो भवःम्हणत विविध सेवेत घालविलेल्या सलग व सतत पाच-सहा महिन्यांच्या रात्रीच्या जागरणांमुळे शारीरिक व्याधींचा ससेमिरा, व जणू एकावर एक फ्रीम्हणून प्राप्त झालेला मानसिक क्लेश, ज्यात दिवसाढवळ्या, घरा-दारासमोर मुलांबाळांसमोर घडत असतानाही अगदी उघड्या डोळ्यांनी पाहूनही दुर्लक्ष केल्याशिवाय गत्यंतर नसलेली विदेशी विकृतीपरिणामस्वरुप युवा पिढी हाताबाहेरच नव्हे तर अगदी अवाक्याबाहेर गेली आहे, या अशा विनाशकारी, क्लेशदायक घटनांचाही सविस्तर अभ्यास होणे व त्यावर सर्वंकष चर्चा होणे आवश्यक आहे.
या किनारी पर्यटनांतून मिळणार्‍या बक्कळ लक्ष्मीकडे महसूल किंवा उत्पन्न म्हणून पाहणार्‍यांना या पर्यटनाची ही दुसरी अघोरी बाजूही नक्कीच माहीत असणार, पण तरीही अगदी जाणूनबुजून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. पण तसे करणे हे विस्तवाशीच नव्हे तर चक्क अग्नितांडवाशी खेळ करण्यासारखे आहे.
वाहत्या पाण्याला वाटेत खाचखळगे लागले तर ते सर्व भरून काढल्याशिवाय ते पाणी पाऊलही पुढे घालत नाही तशीच परिस्थिती आज किनारपट्टीवरून हातपाय पसरत असलेल्या पर्यटनाच्या दुष्परिणामांची तर होणार नाही ना? याचा विचारही आजच गांभीर्याने होणे गरजेचे नव्हे तर अत्यंत निकडीचे आहे. पण दुर्दैवाने लक्ष्मीपुढे पाप पुण्याचा विचारही अविचार ठरावा याच्यासारखी शोकांतिका नाही.
धनरुपी मोहात आकंठ बुडालेल्या व ड्रग्ज सारख्या विनाशकारी परिणामाकडे डोळेझाक करणार्‍यांना जागे करण्याची वेळ आलेली आहे. ड्रग्जही केवळ सरकारपुढील समस्या नसून इथल्या प्रत्येकाचीच समस्या आहे आणि तिचे उच्चाटन करण्यासाठी प्रत्येक सर्वसमान्यानेही पेटून उठले पाहिजे. संबंधित सरकारी यंत्रणेला केवळ सहकार्यच नव्हे तर स्वतः बोलावून कामाला लावले पाहिजे.
खालच्या मजव्यावर आग लागली म्हणून तिथल्या लोकांना दोष देत वरच्या मजल्यावर निवांत झोपणार्‍यांनाही त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्याची वेळ आली आहे. काळ सोकावत आहे. आज काही जण जात्यात आहेत आणि काही जण सुपात. त्यामुळे सुपात असलेल्यांना जात्यात भरडल्या गेलेल्यांविषयी कणव दिसत नाही, परंतु त्यांचीही गत जात्यातल्याप्रमाणे होण्यास वेळ लागणार नाही.
त्यामुळे वेळ न दवडता प्रत्येक सुज्ञ गोमंतकीयाने ड्रग्जविरोधी जनजागृतीचा विडा उचललाच पाहिजे. इथल्या प्रत्येक स्वयंसेवी संघटनेने या जनजागृतीत सर्वशक्तीनिशी उतरून ती जनचळवळ केल्यास मायबाप सरकारलाही ड्रग्जमुक्त गोवा करणे अशक्य अजिबात होणार नाही. गरज आहे ती केवळ आणि केवळ बुलंद आवाजाची


No comments:

Post a Comment