Total Pageviews

Thursday 19 October 2017

उद्योजकांना चीनमध्ये बोलावून लुबाडणे हा त्यांचा खरा धंदा.-SAKAL

ज लक्ष्मीपूजन. पण मागल्या दारातून अलक्ष्मी येऊन आपल्याला संकटात टाकणार नाही, याची काळजी घेण्याचाही दिवस. एका उद्योजकाला चीनमध्ये अलक्ष्मीचा तडाखा बसणार होता, त्याची ही गोष्ट. 
इलेक्‍ट्रॉनिक्‍समधे लागणाऱ्या सुट्या भागांचे उत्पादन करताना, चीनमधून आयात होणाऱ्या स्वस्त मालाशी नेहमीच तीव्र स्पर्धा असते. अशा स्थितीत चीनमधील एका कंपनीमधून आम्हाला मोठया ऑर्डरसाठी विचारणा झाली, तेव्हा आम्हाला आश्‍चर्याचा धक्का बसला. रीतसर दरपत्रक पाठवले, पैसे बुडू नयेत म्हणून पन्नास टक्के रक्कम आगाऊ व उरलेले माल निर्यात करण्यापूर्वी, अशा सहसा मान्य न होणाऱ्या अटी घातल्या. त्यांनी ताबडतोब आमचे दर व अटी मान्य असल्याचे कळवले.
फक्त ऑर्डर देण्यापूर्वी चीनमधे येऊन भेटावे असे कळवले. ऑर्डर मोठी असल्याने आम्हाला यात काहीच वावगे वाटले नाही. पण चीनमध्ये हेच उत्पादन स्वस्त मिळत असताना ही कंपनी आम्हाला ऑर्डर का देत आहे हे कळेना. कोणतीही फसवणूक होऊ नये म्हणून आमच्या आर्थिक सल्लागारांच्या मदतीने मालाचे काही नमुने व करारनामा पूर्वमान्यतेसाठी पाठवून दिला. या कंपनीची बाजारातली पत तपासण्याचा प्रयत्न केला, पण जुजबी माहिती हाती लागली. 
थोड्याच दिवसात कंपनीने कळवले की, सर्व नमुन्यांचा दर्जा उत्तम असून करारनाम्यातल्या अटीही त्यांना मान्य आहेत. मात्र चीनमध्ये येऊन एकदा भेटावे म्हणजे आगाऊ पैसे पाठवता येतील. 
मी व माझे एक सहकारी संचालक चीनला एक औद्योगिक प्रदर्शन बघायला जाणारच होतो. त्याचवेळेस या कंपनीमध्ये जाऊन भेटावे असे ठरले. चीनमधे भाषेची मोठी अडचण असल्याने आमच्याशी व्यावसायिक संबंध असलेल्या व इंग्रजी येणाऱ्या एका स्थानिक मित्राला बरोबर घेतले. आदल्या दिवशी कंपनीने कळवले की, ते विमानतळावर आमच्यासाठी गाडी पाठवायला तयार आहेत. पण आमच्या चिनी मित्राने आग्रह धरला की, आपण विमानतळावरून टॅक्‍सीनेच जाऊ. आम्ही कंपनीच्या ऑफिसमध्ये थेट पोचलो, तेव्हा तेथे चार-पाच माणसेच होती. सरव्यवस्थापकाच्या कक्षात आमची बैठक चालू झाली. समोरच्या व्यक्तीला इंग्रजी अजिबात येत नव्हते. एका दुभाषा महिलेमार्फत आमचे संभाषण सुरु झाले. आमचा चिनी मित्र बाहेरच्या दालनात बसला होता, पण त्याचे सर्व लक्ष आमच्यकडे होते. आमचे नमुने त्यांना पसंत आहेत व करारनाम्यावर सह्या झाल्यावर ते आगाऊ रक्कम पाठवतील, असे त्यांनी आम्हाला सांगितले. का कोणास ठाऊक, मला समोरची व्यक्ती विश्वासार्ह वाटेना. सहज माझे लक्ष टेबलामागे ठेवलेल्या छोट्या टीपॉयकडे गेली. आम्ही पाठवलेले नमुने तेथे पॅकिंगमध्ये तसेच पडले होते. करारनाम्याची प्रतही बंद पाकिटात जशीच्या तशी होती. मनात अनेक शंका यायला लागल्या. आमचा चिनी मित्र बाहेर ढिम्मपणे बसून होता, पण त्याचे सर्व लक्ष आत होते. 
सह्या झाल्या. त्यांनी आमच्यासाठी हॉटेलमध्ये खोली बुक केली होती. आम्ही त्यांचा पाहुणचार घ्यावा, तसेच, आगाऊ रक्कम पाठवण्यासाठी बॅंक व सरकारची परवानगी मिळवण्यासाठी रात्री भोजनाच्या वेळी संबंधित अधिकाऱ्यांना काही रक्कम देण्याची व्यवस्था आम्ही करावी, असे आम्हाला सुचवण्यात आले. 
त्यावर आम्ही स्पष्टपणे सांगितले की, तुमच्या देशातील कोणत्याही अधिकाऱ्याला आम्ही लाच देणार नाही. ते आग्रह करत राहिले, पण आमचा सतत नकार ऐकल्यावर ते वैतागले. त्यांचे चिनी भाषेत आवाज वाढू लागले. त्या क्षणी आमचा मित्र आत आला आणि म्हणाला , ताबडतोब इथून बाहेर पडा, क्षणभरही थांबू नका. आम्ही त्वरेने लिफ्टमधून खाली आलो. तेव्हा माझ्या लक्षात आले की, माझा एक पाऊच गडबडीत वरच विसरला आहे. आमच्या चिनी मित्रासह आम्ही पुन्हा वर गेलो तर, माझा पाऊच सरव्यवस्थापकाच्या हातात होता. त्याची व आमच्या मित्राची चिनी भाषेत जोरदार वादावादी झाली. मित्राने पाऊच जवळजवळ हिसकावून घेतला. खाली येऊन आम्ही टॅक्‍सी पकडली व विमातळावर परत आलो. नक्की काय झाले, हे आम्हाला कळेना.
सुरक्षित अंतरावर आल्यावर मित्राने सारे सांगितले. हे माफिया होते. उद्योजकांना चीनमध्ये बोलावून लुबाडणे हा त्यांचा खरा धंदा. विमानतळावर त्यांच्या गाडीत बसलो असतो, तर त्यावेळीच त्यांनी आम्हाला लुबाडले असते. अशा प्रकारांची कल्पना असल्यानेच मित्राने टॅक्‍सीचा आग्रह धरला होता. रात्री भोजनाच्यावेळी त्यांच्यातील एक बॅंक व दुसरा सरकारी अधिकारी बनला असता. लाच दिली म्हणून अडकवण्यासाठी तिसरा पोलीस अधिकारी बनला असता. पासपोर्ट ताब्यात घेऊन लुबाडले असते. वेळप्रसंगी भारतातून पैसे मागवून सुटका करून घ्यावी लागली असती. हे सर्व ऐकून आम्ही सुन्न झालो. मी हळूच विचारले की, "माझा पाऊच परत देताना कसली वादावादी झाली.' मित्र म्हणाला, ""त्यात ड्रगचे पाकीट आहे व पोलिसांना बोलावतो असे ते म्हणत होते.'' हे ऐकून मला घामच फुटला

No comments:

Post a Comment