Total Pageviews

Sunday 22 October 2017

चीनमध्ये सध्या राजकीय गोंधळ माजलेला आहे.फुकाच्या डरकाळ्या-By dhanaji.surve

चीनमध्ये सध्या राजकीय गोंधळ माजलेला आहे. तिथे विविध गट एकमेकांवर कुरघोडी करण्यात गर्क आहेत आणि चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या पंचवार्षिक अधिवेशनात अध्यक्ष जिनपिंग यांनी बाजी मारली असली, तरी पूर्णपणे या गटबाजीला वेसण घालणे त्यांना शक्य झालेले नाही. तसे नसते तर त्याच अधिवेशनात एक उपमंत्री चांग युचियांग यांनी मुक्‍ताफळे उधळली नसती. या गृहस्थांनी बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांची भेट घेण्यालाच गुन्हा म्हणण्यापर्यंत मजल मारलेली आहे. असली भाषा उठवळ नेते प्रसिद्धीसाठी वापरत असतात आणि काही प्रसिद्धीला हावरे लोकही तशी सनसनाटी माजवत असतात; पण चांग हे चिनी सरकारचे एक जबाबदार प्रतिनिधी असून, त्यांनी अशी भाषा करण्याला परराष्ट्र संबंधात बाधा आणणारी कृती म्हणावे लागेल. दलाई लामा हे चिनी राज्यकर्त्यांना आपले शत्रू वाटत असतील तर काही बिघडत नाही. कारण, त्यांना हुसकावून चिनी सत्तेने तिबेट हा देश प्रदेश गिळंकृत केला आहे. साहजिकच, सहा दशके होत आली तरी जगभर पसरलेले परागंदा तिबेटी लोक पुन्हा आपली भूमी स्वतंत्र करण्यासाठी संघर्ष करीत आहेत. त्यांची शक्‍ती दुर्बळ असून त्यापैकी कोणी हिंसाचाराचा मार्ग पत्करलेला नाही. म्हणूनच चिनी सरकारला दलाई लामा यांची भीती वाटण्याचे काही कारण नाही. खुद्द दलाई लामा यांनीही कधी सशस्त्र उठाव करून तिबेट स्वतंत्र करण्याची भाषा वापरलेली नाही. मग असली धमकीवजा भाषा चिनी उपमंत्र्याने कशाला करावी? दलाई लामा 1960 च्या सुमारास जीवाला धोका असल्याने मोजक्या सहकार्‍यांनिशी भारतात आले होते. कारण, तिबेट बळकावण्याच्या चिनी कम्युनिस्ट सरकारने ज्या हालचाली सुरू केल्या होत्या, त्यात दलाई लामांचा बळीही जाऊ शकला असता. आपल्या या पापकर्माच्या अपराधगंडातून चीन अजून बाहेर पडू शकलेला नाही, इतकाच याचा अर्थ आहे. कारण, अजूनही त्यांना तिबेटची भूमी लष्करी तळाच्या व बळाच्या जोरावरच राखणे भाग झालेले आहे. मध्यंतरीच्या काळात अन्य चिनी प्रांतातही चलबिचल सुरू झालेली आहे. चांग कशाला, खुद्द जिनपिंग यांनीही आपल्या प्रदीर्घ भाषणात चीनचे तुकडे पडू देणार नाही व तशा प्रवृत्ती चिरडून काढल्या जातील, अशी भाषा वापरलेली आहे. त्याचे तरी काय कारण होते? जगात सहसा कुठल्याही माध्यमात चीनमध्ये बेबनाव असल्याच्या बातम्या आलेल्या नाहीत किंवा फाटाफुटीच्या चळवळीचा सुगावा कुणाला लागलेला नाही. मग जिनपिंग वा त्यांच्या अन्य सहकार्‍याने असली भाषा कशाला वापरावी? वरवर चीनमध्ये जी शांतता व सुव्यवस्था दिसते, तितके सर्वकाही चीनमध्ये आलबेल राहिलेले नाही. राजकीय, प्रादेशिक व वांशिक मतभेद उफाळून वर येत असल्याची ही चाहूल आहे आणि त्याकडे दुर्लक्ष करण्याचे साहस चिनी राज्यकर्त्यांत राहिलेले नाही, असा याचा अर्थ आहे.

 


चीनमध्ये लालक्रांती झाल्यानंतर मागल्या सात दशकांत कुठल्या धर्माचे वा वंशाचे तिथे वर्चस्व नसल्याचे दावे केले जात असतील; पण व्यवहारात तिथे हान या वंशांच्याच लोकांचा वरचष्मा कायम राहिलेला आहे. सेना, सत्ता व राजकारणात त्याच वंशाच्या लोकांचे प्राबल्य असून, चीनच्या पश्‍चिमेला असलेल्या विविध प्रादेशिक व वांशिक अस्मिता पायदळी तुडवूनच चिनी कम्युनिस्ट पक्षाने वाटचाल केलेली आहे. आताही चीनची जी भरभराट दिसते, तेव्हा त्याची सर्वाधिक फळे हानवंशी जनतेच्या वाट्यालाच आलेली आहेत. साहजिकच, त्यात मागे पडलेल्यांची नाराजी दीर्घकाळ लपून राहत नाही. तिथे एकपक्षीय कम्युनिस्ट हुकूमशाही असल्याने धर्माला सार्वजनिक जीवनात कुठलेही स्थान नव्हते; पण अलीकडल्या काळात धर्माचे व्यक्‍तिगत जीवनात पालन करण्याची मुभा मिळाल्यानंतरची विभागणी अधिक बोलकी ठरत चालली आहे. कोटीहून अधिक लोकांनी स्वत:ला बौद्धधर्मीय म्हणून घेतले आहे आणि अन्य धर्मांना तिथे दुय्यम लेखले जात आहे. अशा मोठ्या लोकसंख्येवर धर्माचा प्रभाव असला, तरी त्यांना कोणी अधिकृत धर्मगुरू नाही. पूर्वांपार दलाई लामा हेच चिनी लोकांचे श्रद्धास्थान राहिलेले आहेत. आजही तिबेट भागात चिनी सेनेला झुगारून चिनी नागरिक दलाई लामांचे नेतृत्व मानतात. आजच्या चिनी राज्यकर्त्यांना त्याचीच भीती सतावत असावी. कारण, मध्यंतरीच्या काळात  म्यानमार, थायलंड वा दक्षिणपूर्व आशियात मुस्लिम विरुद्ध बौद्ध असा संघर्ष बळावत चालला आहे. चीनच्या मोठ्या बौद्ध संख्येला त्याचे आकर्षण वाटल्यास कम्युनिस्ट सत्तेला ते आव्हान ठरू शकेल. कारण, चीनच्या पश्‍चिमेला झिंजझँग प्रांत मुस्लिम अनुयायांचा आहे. त्याच्यावर निर्बंध घालून चिनी राज्यकर्त्यांना आपले बलस्थान असलेल्या हानवंशी लोकसंख्येला सांभाळावे लागते आहे. त्याच लोकसंख्येला दलाई लामांचे आकर्षण वाटू लागले, तर राज्यसत्तेला ते आव्हान वाटणे स्वाभाविक आहे; पण त्यासाठी अन्य देशांच्या सत्तांना व राज्यकर्त्यांना धमकावणे हा शुद्ध मूर्खपणा झाला. चांग यांना त्याचेच भान राहिलेले नाही. चीनशी संबंध असलेल्या कुणा अन्य देशाने चिनी प्रादेशिक सार्वभौमत्व मानलेले आहे. साहजिकच, तिबेट हा चीनचाच प्रदेश असण्याला मान्यता दिलेली आहे. अशा तिबेटचे परागंदा सरकार म्हणून दलाई लामा कार्यरत असल्याने त्यांना कोणी धर्मगुरू म्हणून भेटला, तरी त्यालाही राजनैतिक भेट मानले जाईल, असा चांग यांचा इशारा आहे. अशा देशात भारताचाही समावेश असून, इथेच भारतात दलाई लामांना आश्रय दिलेला आहे. त्यांचे परागंदा सरकार भारतातच कार्यरत आहे. मग चिनी सरकार भारताशी असलेले संबंध तोडून टाकणार आहे काय? नसेल तर असल्या फुकाच्या डरकाळ्या कशाला फोडल्या जात आहेत?

No comments:

Post a Comment