Total Pageviews

Thursday 20 April 2017

भक्कम रुपयाचा अन्वयार्थ By pudhari


| Publish Date: Apr 19 2017 11:13PM | Updated Date: Apr 19 2017 11:13PM देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सध्या सकारात्मकतेचे वारे वाहात आहेत. मागील काळात परदेशी गुंतवणुकीमध्ये झालेल्या वाढीमधून याचे प्रत्यंतर आले होते. आता प्रदीर्घ काळानंतर पहिल्यांदाच रुपयाची स्थिती भक्कम बनताना दिसत आहे. बर्‍याच वर्षांच्या कालखंडानंतर एखाद्या तिमाहीत रुपया 5 टक्क्यांनी मजबूत झालेला पाहायला मिळाला आहे. रुपयाच्या स्थितीतील हा बदल आशादायक मानावा लागेल. भविष्यातही रुपयाचे अवमूल्यन होण्याच्या शक्यता फारशा दिसत नाहीत. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात भ्रष्टाचार, महागाई या मुद्द्यांबरोबरच आणखी एका मुद्द्याची चर्चा सातत्याने होत असे, तो म्हणजे रुपयाची घसरण! वास्तविक, यूपीए सरकारमध्ये अनेक नामवंत अर्थतज्ज्ञ म्हणवल्या जाणार्‍या व्यक्ती सत्तास्थानी होत्या. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्याकडे तर अर्थशास्त्राचा गाढा अनुभव होता. भारतातील मुक्त अर्थव्यवस्थेच्या पर्वाची मुहूर्तमेढ त्यांच्याच साक्षीने रोवण्यात आली होती. पी. चिदम्बरम, डॉ. प्रणव मुखर्जी आदी आर्थिक क्षेत्रातील अभ्यासू नेत्यांची मांदियाळी या सरकारमध्ये होती; मात्र तरीही यूपीएच्या काळात देशाच्या अर्थव्यवस्थेला अपेक्षित प्रगतीकडे नेण्यामध्ये फारसे यश आले नाही. याच सरकारच्या काळात रुपयाची घसरण विक्रमी पातळीवर पोहोचली. 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सत्ता हाती घेतल्यानंतर या सरकारमध्ये आर्थिक जाणकारांची वानवा असल्याची, अर्थव्यवस्थेविषयीची पुरेशी माहितीच नसल्याची टीका यूपीए सरकारमधील नेतेगण आणि त्यांचे पाठिराखे विचारवंत करत होते. नोटाबंदीच्या निर्णयानंतर तर या टीकेची धार अधिक तीव्र झाली होती. मोदी सरकारच्या कार्यकाळातही रुपयाची घसरण सुरूच होती; मात्र मावळत्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत रुपया वधारण्यास सुरुवात झाली असून हा वाढीचा सिलसिला आता कायम राहिल्याचे दिसत आहे. जानेवारी 2017 ते 31 मार्च 2017 पर्यंत जवळपास पाच टक्क्यांनी रुपया मजबूत झालेला पाहायला मिळाला. अन्य चलनाच्या तुलनेत रुपयाची स्थिती भक्कम होत चालली आहे. दुसर्‍या बाजूला डॉलर जगातील अन्य चलनाच्या तुलनेत कमकुवत होत चालला आहे. तसे पाहिले तर रुपया जवळपास सर्वच चलनाच्या तुलनेत मजबूत झाला आहे. चीनच्या युआनच्या तुलनेत ही वृद्धी 3.68 टक्के, पौंडच्या तुलनेत 3.1 टक्के, युरोच्या तुलनेत 3.0 टक्के, सिंगापूर डॉलरच्या तुलनेत 1.1 टक्का आणि बांगलादेशच्या चलनाच्या तुलनेत 7 टक्के आहे. अलीकडील काही महिन्यांत बराच काळ रुपयाचा दर 68-69 रुपये प्रति डॉलर राहिला आहे. मात्र बर्‍याच वर्षांच्या कालखंडानंतर एखाद्या तिमाहीत रुपया 5 टक्क्यांनी मजबूत झालेला पाहायला मिळाला आहे. रुपयाच्या स्थितीतील हा बदल आशादायक मानावा लागेल. देशाच्या निकोप अर्थव्यवस्थेसाठी ही बाब पूरक ठरणारी आहे. सर्वसामान्यपणे परकी चलनाच्या मागणीत घट होते तेव्हाच एखाद्या देशाचे चलन मजबूत होते. गेल्या तिमाहीतील पहिल्या दोन महिन्यांत देशाची व्यापारी तूट वाढली होती. गतवर्षी असलेल्या 14.2 अब्ज डॉलरच्या तुलनेत तुटीचा आकडा 18.7 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला होता. मात्र अनिवासी भारतीयांकडून पाठवण्यात आलेला निधी, सॉफ्टवेअर साहित्यांची निर्यात आणि परकी गुंतवणुकीचा ओघ यामुळे जानेवारी 2017 मध्ये असणारी 360 अब्ज डॉलरचीही परकी गंगाजळी 26 मार्च रोजी 370 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली. वस्तुतः परकी गंगाजळीत वाढ झाल्याने रुपया मजबूत झाल्याचा इतिहास नाही. डॉलर्सची मागणी घटते आणि आगामी काळातही ती घटतच राहील अशा शक्यता दिसू लागतात तेव्हा रुपया मजबूत होतो. गेल्या काही महिन्यांपासून कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने होणार्‍या घसरणीमुळे भारताची व्यापारी तूट कमी झाली आहे. दुसरीकडे देशात होणारी परकी गुंतवणूक विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. तसेच अनिवासी भारतीयांच्या बचतीमुळे आणि सॉफ्टवेअर क्षेत्राकडून मिळणारे उत्पन्न कायम राहिल्याने देशाच्या परकी गंगाजळीत सतत भर पडत होती. असे असूनही जगभरातील सट्टेबाज रुपयाला कमकुवतच समजत होते. 2012-13 या काळात व्यापारी तूट 195.6 अब्ज डॉलर्स होती. ती कमी होत 2015-16 मध्ये 130 अब्ज डॉलरपर्यंत कमी झाली. यादरम्यान चार वर्षांत 178.5 अब्ज डॉलर्सची परकी गुंतवणूकदेखील भारतात झाली. अनिवासी भारतीयांकडून 260 अब्ज डॉलर देशाच्या अर्थव्यवस्थेत आले. तरीही रुपया 68 ते 69 रुपये प्रति डॉलर या दरम्यान फिरत राहिला. मग प्रश्‍न असा पडतो की अचानकपणाने असा काय चमत्कार घडला आणि तेलाच्या किमतीत वाढ होत असताना अचानक तीन महिन्यांत रुपया पाच टक्क्यांनी मजबूत का झाला? गेल्या तीन महिन्यांत तेलाच्या किमतीत 17.8 टक्क्यांनी वाढ झाली तसेच व्यापारी तूटही तुलनेने वाढली आहे. असे असूनही रुपया कसा वधारला? मुळातच रुपया भक्कम स्थितीत येण्यासाठी अनुकूल वातावरण असतानाही तो कमजोर होत राहिला हा एक विरोधाभास होता आणि जो बराच काळ दिसत राहिला. मात्र सट्टेबाजांचा हा खेळ आता संपला आहे. त्यामुळे रुपयाचे पुनर्मूल्यांकन होणे स्वाभाविक होते. नोटाबंदीचा निर्णय हे रुपया मजबूत होण्याचे एक कारण असू शकते. परदेशात रोख त्यातही काळा पैशातून व्यवहार मोठे केले जात होते. अशा स्थितीत रोकडधारक नागरिक डॉलर्समध्ये त्याचे रुपांतर करून घेत होते. डॉलर्सच्या वाढलेल्या भावाचा फायदा घेत होते. बेकायदेशीररित्या कमी बिलाची आकारणी करून चीनसारख्या अन्य देशातून वस्तूंची आयात केली जात असे. या लोकांकडून बेकायदेशीररित्या डॉलरची मागणी करून त्याची किंमत वाढवण्यात येत होती. त्यामुळे रुपयाची स्थिती नाजूक झाली होती. नोटाबंदीच्या निर्णयाने अशा प्रकारच्या वृत्तीला काही प्रमाणात आळा बसला आहे. नागरिकांकडून चीनच्या मालावर बहिष्कारअस्त्र टाकले गेल्याने डॉलर्सच्या मागणीत घट झाली आहे. 2015-16 च्या तुलनेत 2016-17 मध्ये चीनचा भारतातील व्यापार हा दोन अब्ज डॉलर्सनी कमी झाला आहे. डिसेंबर 2016 मध्ये चीनमधून 5.8 अब्ज डॉलर्स किमतीच्या उत्पादनांची आयात झाली होती. फेब्रुवारी 2017 मध्ये ती घसरून 4.69 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली आहे. आगामी काळातही चीनमधून आयात कमी होण्याची शक्यता अधिक आहे. सरकारकडून ‘मेक इन इंडिया’, ‘स्टार्ट अप इंडिया’, स्वदेशी मालाला प्राधान्य दिले असल्याने आगामी काळातही परदेशातील आयातीत घट होऊ शकते. उद्योगविश्‍वात आलेली शिथिलता आता कोठे कमी होऊ लागली आहे. या आशेवरच रुपया मजबूत होताना दिसून येत आहे

No comments:

Post a Comment