Total Pageviews

Thursday 6 April 2017

सीरियातील विषारी संहार Maharashtra Times

यादवीने ग्रस्त असलेल्या सीरियाला रासायनिक हल्लेही नवीन नसले, तरी खान शेखून या शहरामध्ये मंगळवारी झालेल्या हल्ल्याने धोक्याची सीमा ओलांडली आहे. लहान मुले आणि महिलांसह सुमारे ७५ जणांचा बळी घेणाऱ्या आणि अनेकांना अपंगत्व आणणाऱ्या या हल्ल्याने जग हादरले असून, अमेरिका आणि रशिया यांच्यातील सीरियावरून असलेली दरी आणखी रुंदावण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. बंडखोरांचा बीमोड करण्यासाठी सीरियाचे अध्यक्ष बशर अल असद यांनीच हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आदी अनेक देशांनी केला असून, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत असद यांच्या विरोधात ठराव आणण्याचे संकेतही दिले जात आहेत. सुन्नी बंडखोर, कुर्दिश बंडखोर आणि इस्लामिक स्टेट असे विविध बंडखोर गट आणि सीरिया सरकार यांच्यातील गेल्या सहा वर्षांच्या यादवीत आतापर्यंत पाच लाख लोकांचा बळी गेला असून, तेथील सुमारे एक कोटी जनतेने स्थलांतर केले आहे. क्रौर्याच्या सर्व सीमा ओलांडणाऱ्या या यादवीत असद राजवटीने केलेली दडपशाही काही कमी नाही. २०१३ मध्ये दमास्कस येथे रासायनिक हल्ला झाला होता आणि त्यामध्ये सुमारे दीड हजार जणांचा बळी गेला होता. हा हल्लाही असद यांनी घडवून आणल्याचा आरोप होता. त्यावेळी अमेरिकेने सीरियावर कारवाई करू नये म्हणून असद राजवटीने रशियाच्या मदतीने रासायनिक अस्त्रांबाबतच्या करारावर सही केली. मात्र, त्यानंतरही त्यांचा वापर सुरूच असल्याचे खान शेखून हल्ल्यातून स्पष्ट झाले आहे. २०१३ प्रमाणेच रशिया असद यांच्यामागे ठामपणे उभी आहे. बंडखोरांकडून टाकण्यात येणाऱ्या शस्त्रांतील रसायनांची गळती झाली असल्याची शक्यता मॉस्कोने व्यक्त केली आहे. सीरियाला असलेला आपला पाठिंबा कायम राहणार असल्याचे रशियाने निःसंदिग्ध शब्दांत सांगितले आहे. खान शेखून हल्ल्यात सरिन नर्व्ह गॅसचा वापर झाल्याचा अंदाज अमेरिकी गुप्तचर संस्थांनी व्यक्त केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे रशियाबरोबरील संबंध मधुर करतील, असे बोलले जात असले, तरी सीरियावरून या दोन देशांमधील मतभेद वाढण्याची चिन्हे आहेत. ट्रम्प यांनी सुरुवातीला असद यांच्याबाबत सौम्य भूमिका घेतली होती. सीरियामधील अमेरिकेच्या भूमिकेबाबत मत मांडताना, असद यांना हटविण्यावर भर देणार नसल्याचे मत ट्रम्प प्रशासनाने गेल्याच आठवड्यात मांडले होते. मात्र, मंगळवारच्या हल्ल्यानंतर असद यांच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्याचबरोबर अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्यावरही ट्रम्प बरसले आहेत. ओबामा यांनी रासायनिक अस्त्रांबाबत ‘रेड लाइन’ आखणार असल्याचे म्हटले होते. मात्र, ओबामांनी प्रत्यक्षात काहीही केले नसल्याचा आरोप करीत ट्रम्प यांनी, मंगळवारच्या हल्ल्यांनी ‘लाल रेषा’च नव्हे, तर अन्य अनेक रेषा ओलांडल्याचे म्हटले आहे. अशा प्रकारे सीरियावरून अमेरिका आणि रशिया समोरासमोर उभे ठाकले आहेत. सीरियातील यादवीत बड्या देशांचे हितसंबंध असल्याने त्याला आंतरराष्ट्रीय परिमाण लाभले आहे. त्यामुळे तेथील प्रश्नाची गुंतागुंत वाढतच चालली आहे. सीरियातील रासायनिक हल्ल्यानंतर वाहिले जाणारे अश्रू हे नक्राश्रू असल्याची शंका म्हणून दृढ होते.

No comments:

Post a Comment