Total Pageviews

Friday 7 October 2016

भारतीय सेनेमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या रेजिमेंट आहेत-मराठा लाईट इन्फ्रंट्रीची युद्धगर्जना "छ.शिवाजी महाराज की जय


भारतीय सेनेमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या रेजिमेंट आहेत. पंजाब रेजिमेंट, राजपूत रेजिमेंट, बिहार रेजिमेंट, डोग्रा रेजिमेंट, मराठा लाइट इन्फेंट्री व महार रेजिमेंट ह्या त्यातल्या काही रेजिमेंट आहेत, सगळ्याच जन्मजात पराक्रमी. यांच्या सर्वांच्या युद्धगर्जना "Battle Cry" किंवा "War Cry" अतिशय सुंदर आणि आत्मिक शक्ती जागृत करणाऱ्या आहेत. पंजाब रेजिमेंटची युद्धगर्जना, "जो बोले सौ निहाल!" अशी आहे. नागा रेजिमेंटची युद्धगर्जना, "जय दुर्गा नागा!" अशी आहे. जाट रेजिमेंटची युद्धगर्जना, "जाट बलवान, जय भगवान!" आहे. डोग्रा रेजिमेंटची युद्धगर्जना, "ज्वाला माता कि जय!" अशी आहे. तर, बिहार रेजिमेंटची, "जय बजरंगबली!" अशी आहे. सगळ्या युद्धगर्जना त्यांच्या-त्यांच्या देवांच्या नावाने आहेत. तर मराठा लाइट इन्फेंट्रीची युद्धगर्जना, "बोला,श्री.छत्रपती शिवाजी महाराज की जय !" अशी जबरदस्त आहे. ही एकमेव युद्धगर्जना,जी देवाच्या नावाने नसून एका राजाच्या,एका महापुरूषाच्या नावाने आहे. मराठा लाईट इन्फ्रंट्रीची युद्धगर्जना "छ.शिवाजी महाराज की जय!" ही कधीपासुन दिली जाऊ लागली हे पाहणे सुध्दा रंजक ठरेल. इ.स.१९४१ साली दुसऱ्या महायुद्धात आफ्रिकेत आत्ताच्या इथियोपियाच्या म्हणजे त्याकाळच्या ॲबेसिनीयाच्या उत्तरेस एक छोटासा देश होता,त्याचं नाव इरेट्रिया. या इरेट्रियात एक केरेन नावाचा प्रांत आहे. या प्रांतात उंच उंच अशा डोंगर रांगा आहेत. या डोंगर रांगेवर एक किल्ला इटालियन सैनिकांच्या ताब्यात होता त्याचं नाव "डोलोगोरोडाँक". हा किल्ला जिंकून घेण्यासाठी ब्रिटिशांतर्फे मराठा रेजिमेंट लढत होती. बराच प्रयत्न करून सुद्धा हा किल्ला त्यांच्या ताब्यात येत नव्हता. परंतु या मराठा रेजिमेंटमध्ये 'श्रीरंग लावंड' नावाचे एक सुभेदार होते. त्यांनी ब्रिटिशांना सांगितलं की आम्हांला छ.शिवाजी महाराजांचं नाव घ्यायची परवानगी द्या,आम्ही हा किल्ला तुम्हाला जिंकून दाखवतो. पण ब्रिटिश ही परवानगी देण्यासाठी घाबरत होते,कारण महाराजांचं नाव घेऊन यांनी बंदुका आपल्यावरच रोखल्या तर ? पण त्यांना किल्ला घेण्याशी मतलब असल्यामुळं त्यांच्या स्वार्थापोटी नाईलाजाने त्यांनी ही परवानगी दिली. नंतर आपल्या लोकांनी,"बोला छत्रपती शिवाजी महाराज कि जय!" म्हणत एका रात्रीत किल्ला सर केला. आणि त्यानंतर मराठा लाइट इन्फ्रंट्रीने ही "Battle Cry" म्हणजे युद्धगर्जना अधिकृत केली. या युद्धगर्जनेमुळे केवळ सह्याद्रीतच नव्हे तर जगाच्या पाठीवर कोठेही प्रेरणा मिळाल्याशिवाय राहत नाही.

No comments:

Post a Comment