Total Pageviews

Saturday, 8 October 2016

पाप आणि पुण्याचे सर्जिकल ऑपरेशन!-संजय राऊत


पाप आणि पुण्याचे सर्जिकल ऑपरेशन! Sunday, October 09th, 2016 संजय राऊत सर्जिकल ऑपरेशन’नंतर पाकिस्तान बेहोश झाले, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर म्हणतात. त्यांच्या तोंडात गोयचा ‘चणक’ मासा पडो, पण दोन देशांतील तणाव युद्धाला आमंत्रण देणारा आहे. कश्मीर हेच त्या युद्धाचे कारण. आपल्याला वाटतोय तसा पाकिस्तान एकाकी नाही, हे आधी मान्य करायला हवे. हिंदुस्थानच्या सैन्याने पाकव्याप्त कश्मीरात घुसून ‘सर्जिकल ऑपरेशन’ नामक हल्ला केला व त्याबद्दल आपले सैनिक अभिनंदनास पात्र आहेत. अशा हल्ल्यांमुळे पाकिस्तान हादरले आहे काय? या प्रश्नादचे उत्तर अधांतरी आहे. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले, ‘‘पाकिस्तान बेहोश झाले आहे.’’ संरक्षणमंत्र्यांचे म्हणणे खरे असेलही, पण बेहोशीचे शब्द हवेत विरण्याआधीच बारामुल्ला लष्करी तळावर अतिरेक्यांनी हल्ला केला. पठाणकोट हवाई तळावरील हल्ला, त्यानंतर ‘उरी’तील लष्करी तळावरील हल्ला व आता बारामुल्ला लष्करी तळावरील हल्ला, हे सर्व पाहिले तर एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. पाकिस्तानची ‘बेहोशी’ या भूलथापा आहेत. त्यांनी पोसलेला दहशतवाद हेच त्यांचे बळ आहे. हे बळ खतम होत नाही तोपर्यंत पाकिस्तान कायमचे कोमात जाणार नाही. ‘उरी’ हल्ल्याचा बदला ‘सर्जिकल ऑपरेशन’ करून घेतला, पण या ऑपरेशनवरच आपल्याकडील राजकीय नेत्यांनी शंका घ्याव्यात हे बरोबर नाही. राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत तरी हे प्रकार घडू नयेत. तणावाचे कारण कश्मीरचा तिढा हे दोन देशांतील तणावाचे मुख्य कारण आहे. दोन युद्धांनंतरही हा प्रश्ने संपला नाही व याप्रश्नीर ‘धर्मयुद्ध’ म्हणून पाकिस्तानातील दहशतवादी या लढ्याकडे पाहात आहेत व त्यांनी कश्मिरी जनतेला वेठीस धरले आहे. बॅ. नाथ पै आज नाहीत. ते इतर खासदारांसह बारामुल्लाला त्यावेळी गेले. तिथल्या कश्मिरींनी त्यांना विचारले, ‘‘साहेब, देशात एवढे वाद कश्मीरवरून का?’’ बांदिपुरा खेड्यातल्या माणसांनी नाथ पैना विचारले, ‘‘साहब, पाकिस्तानी तो चार ही करोड है और हम चालीस करोड. फिर हमारे दिल और दिमाग मे फतह के बारे मे शंकोशुभह क्यों?’’ यावर नाथ पै म्हणतात, तो कश्मिरी पूर्व पाकिस्तानी लोकांना पाकिस्तानी गणायला तयार नाही आणि हिंदुस्थानच्या चाळीस कोटींच्या एकोप्याबद्दल मात्र त्याला विश्वालस वाटतो. यातलं मर्म आपण हिंदुस्थानी मंडळींनी ओळखलं पाहिजे. १९६५ च्या युद्धकाळातील ही घटना आहे. तेव्हा पाकिस्तानी चार कोटी होते. ते आज सतरा कोटी झाले व आपण चाळीस कोटींचे सव्वाशे कोटी झालो. उद्या युद्ध भडकलेच तर १७ कोटी नामशेष होऊन पाकिस्तान जगाच्या नकाशावरून कायमचा नष्ट होईल व त्याच तुलनेत आपले २० कोटी नष्ट झालेच तरी ११० कोटींचा देश पुन्हा नव्या दमाने उभा राहील. फक्त सक्षम नेतृत्व व राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे! धर्मयुद्धाचे काय झाले? पाकिस्तानने आपल्या हद्दीत घुसखोरी करून आपले शेकडो सैनिक आतापर्यंत मारले. ही घुसखोरी रोखली व आपल्या भूमीवरचे हल्ले थांबवले तरी ‘सर्जिकल ऑपरेशन’ची गरज पडणार नाही. १९७१ च्या युद्धात भुत्तो यांनी गर्जना केली होती, ‘हिंदुस्थानविरुद्ध आमचे धर्मयुद्ध आहे!’ आठशे वर्षे आम्ही हिंदुस्थानवर राज्य केले आणि हिंदुस्थानला संस्कृती दिली, असे तेव्हा भुत्तो म्हणाले होते. पण याच भुत्तोला पुढे इंदिरा गांधींनी पराभूत केले व पाकिस्तानच्या लष्करशहांनी भुत्तोला फासावर लटकवून मारले. पाकिस्तान हे इस्लामच्या प्रसारासाठी लढत आहे आणि इस्लामी लोकांच्या अमलाखाली राहणे म्हणजे सुसंस्कृत बनणे असा तेव्हा भुत्तो यांचा आवाज होता, पण इस्लामचा सुसंस्कृतपणा काय ते शेवटी भुत्तोनीच अनुभवले. भुत्तोला तुरुंगात सडवले व आजारी पडलेल्या भुत्तोला हात-पाय बांधून स्ट्रेचरवरून फाशीस्तंभाकडे नेले व त्याच अवस्थेत फासावर लटकवले! चीनचा पाठिंबा आज हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये चोरटे युद्ध सुरू आहे व ते ६० वर्षांपासून चालले आहे. एक गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे. आपल्याला वाटतो तसा पाकिस्तान एकाकी पडलेला नाही. आंतरराष्ट्रीय नाती ही शेवटी हितसंबंधांवर टिकून असतात. पाकिस्तानला प्रदीर्घकाळ ताकद देणारे शेवटी अमेरिका व ब्रिटनसारखे देश होते. इराक व इराण, अफगाणविरोधात लढण्यासाठी अमेरिकेने कोट्यवधी डॉलर्सची खंडणी देऊन पाकिस्तानात लष्करी तळ उभे केलेच होते व हिंदुस्थानने केलेल्या विरोधाला तेव्हा अमेरिकेने जुमानले नाही. आजही चीनसारखी मोठी महासत्ता पाकिस्तानच्या बाजूने ठामपणे उभी आहे व हिंदुस्थानवर सोडलेला प्रत्येक बॉम्ब आणि बंदुकीच्या गोळीवर चीनचाच शिक्का आहे. चीनला कश्मीरचे जे महत्त्व वाटत आहे, त्याला कारण कश्मीरच्या जवळून किंबहुना त्या टापूच्या काही भागातून चीनच्या सिकियांग प्रांताला तिबेटशी जोडणारा अक्साई चीनचा रस्ता जातो. ज्याच्या ताब्यात कश्मीर तो सिकियांग व तिबेट यांच्यामधील दळणवळण तोडू शकेल. सिकियांग प्रांतात चीनची अणु संशोधन केंद्रे जर असतील तर सिकियांग भागाला चीनचे मर्मस्थान समजावयास हरकत नाही. चीनमधून हिंदुस्थानात येण्याचा व हिंदुकुश पर्वत ओलांडण्याचा एक मोठा मार्ग कश्मीरच्या ईशान्य टोकाला आहे. हिंदुस्थान हा कम्युनिझमचा जरी शत्रू नसला तरी चीनचा शत्रू आहे, अशी चिनी लोकांची खात्री आहे. त्यामुळे कश्मीरचा टापू हिंदुस्थानच्या ताब्यात असण्यापेक्षा पाकिस्तानसारख्या दुर्बल राष्ट्राच्या ताब्यात असणे चीनच्या दृष्टीने सोयीचे. दुर्बलाच्या हाती असलेल्या वस्तू बलवान लोक केव्हाही काढून घेऊ शकतात. तेव्हा कश्मीर पाकिस्तानच्या हाती असले म्हणजे आपल्याच हाती असल्यासारखे चीनला वाटत असेल व त्यासाठी चीन पाकला संपूर्ण लष्करी सहाय्य करणार असेल तर त्यात मोठेसे नवल नाही. पाप आणि पुण्य! हिंदुस्थान आणि पाकिस्तानात युद्ध भडकेल काय? हा महत्त्वाचा सवाल आहे. दुसरे असे की, राजकारण करण्याचे जे अनेक मार्ग आहेत त्यापैकी युद्ध हा एक मार्ग आहे. युद्ध या उपायाचा अवलंब केव्हा ना केव्हा तरी करावाच लागतो. त्याशिवाय राजकीय हेतू साध्य होत नाहीत हा जगाचा अनुभव आहे. युद्ध म्हणजे फार मोठे पाप आहे आणि शांतता म्हणजे फार मोठे पुण्य आहे हा दृष्टिकोन ज्यावेळी आपल्या देशातील बहुसंख्य लोक सोडतील, त्यावेळी आपल्या राजकारणाला जास्त वास्तववादी वळण लागेल. पाकिस्तानवरील हल्ला हा राजकारणाचा डावपेच ठरू नये. उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल काहीही लागोत. पाकिस्तानचे ‘सर्जिकल ऑपरेशन’ सुरूच ठेवायला हवे. पाकिस्तानला एकाकी पाडल्याचा डांगोरा पिटणे सर्वप्रथम थांबवायला हवे. इस्लामाबादच्या ‘सार्क’ परिषदेवर भुतान, नेपाळ, मालदिव, बांगलादेश, श्रीलंकासारख्या राष्ट्रांनी बहिष्कार टाकला हा आनंद ठीक आहे. या राष्ट्रांची सैन्य ताकद तोळामांसाचीही नाही व चीनसारखे बलाढ्य राष्ट्र पाकिस्तानला मांडीवर घेऊन बसले आहे. त्यामुळे ‘सर्जिकल ऑपरेशन’नंतर पाकिस्तान बेहोशीत गेले, या भ्रमातून बाहेर पडण्यातच राष्ट्रीय हित आहे. पूर्ण तयारीनिशी युद्धात उतरायला हवे. युद्धाचा हेतू शुद्ध हवा व आपण एकाकी लढतोय हे मनात रुजवायला हवे. आमची तशी तयार्रीं असेल तर उशीर कशाला?

No comments:

Post a comment