Total Pageviews

Wednesday 16 May 2012

IPL MATCH FIXING

लोकशाहीचा खेळ;
क्रिकेटचा खेळखंडोबा!
हिंदुस्थानी क्रिकेटमध्ये सध्या काय चाललंय तेच कळत नाही. क्रिकेट म्हणजे जंटलमेन लोकांचा खेळ असे म्हटले जात होते. अर्थात जंटलमेन कोण? तर गोरे ब्रिटिश. ब्रिटिश सोडले तर इतर कुणालाही जंटलमेन म्हणवून घेण्याचा अधिकार नव्हता. ब्रिटिश आपल्या देशातून गेले पण आपण त्यांच्या काही चांगल्या गोष्टी न घेता क्रिकेट आणि लोकशाहीनामक थोतांड मात्र जरूर घेतले. पुन्हा या दोन्ही खेळात ‘घोडेबाजार’ (म्हणजे फिक्सिंग) आणून आपण एखाद्या चांगल्या गोष्टीची कशी वाट लावू शकतो हे जगाला सोदाहरण दाखवून दिले आहे. सध्या काय तर म्हणे आय.पी.एल. क्रिकेटमध्ये ‘फिक्सिंग’ झाल्याचा भंडाफोड एका टी.व्ही. चॅनलने केल्यापासून सर्वच क्रिकेटप्रेमी मंडळींना धक्का बसला आहे. सचिनचे लांबलेले महाशतक पार पडले. त्यानंतर त्यास राष्ट्रपती नियुक्त खासदारकीचा बहुमानही दिला व आता सचिनच्या भारतरत्नचे काय? असे सवाल क्रिकेटप्रेमी विचारीत असतानाच आय.पी.एल. नामक क्रिकेटच्या खाणीतून हे ‘फिक्सिंग’चे ‘रत्न’ बाहेर पडले आहे. हिंदुस्थानचा एकंदरीत सर्वच कारभार हा घोडेबाजारी जुगार्‍यांच्या हाती कसा गेला आहे व प्रत्येक क्षेत्रात फिक्सिंग किंवा आकडे लावून लोकांना कसे फसवले जात आहे ते रोज नव्या प्रकरणांवरून दिसत आहे. मुळात हा जो काही आय.पी.एल. क्रिकेटचा बाजार उघडला गेला आणि त्यात बडे बडे उद्योगपती, सिनेस्टार्स यांच्या मालकीचे क्रिकेट संघ करण्यात आले त्यात खेळाला महत्त्व किती आणि पैशाला किती हा एक प्रश्‍नच आहे. शेकडो कोटींची बोली त्यासाठी लावण्यात येते. देशात मंदीबाईंचा फेरा आणि महागाईचा फटका असला तरी उद्योगपती व सिनेमावाले
क्रिकेटपटूंसाठी कोटीकोटींच्या बोली लावत असतात. एका बाजूला विजय मल्ल्या यांची किंगफिशर एअरलाइन्स बुडत आहे. तिची हातगाडी झाली आहे. हजारो कर्मचार्‍यांचे महिनोन् महिने पगार होत नाहीत, पण किंगफिशरचा क्रिकेट संघ मात्र किंगफिशरचे विमान जसे अनेकदा इच्छित ठिकाणी पोहोचतच नाही त्याप्रमाणे मैदानावर पोहोचलाच नाही असे घडले नाही. एका खानाने तर आय.पी.एल.मध्ये पाकिस्तानी क्रिकेटपटूंना खेळविण्याची वकिली केलीच होती. अर्थात या सर्व लोकांना सामान्य लोकांशी, त्यांच्या वेदनांशी फारसे देणेघेणे आहे असे वाटत नाही. महाराष्ट्राचेच म्हणाल तर दुष्काळाच्या झळा त्या आयपीएल क्रिकेटच्या मैदानात व त्यांच्या मालकांना पोहोचण्याची सुतराम शक्यता नाही. विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्रात, खान्देश, मराठवाड्यात पाणीटंचाई, चाराटंचाईने लोक मेटाकुटीस आल्याची वार्ता या क्रिकेट उद्योजकांना व क्रिकेटमधील जुगार्‍यांना स्पर्शूनही गेली नसेल. पुन्हा राजकारणात ज्याप्रमाणे एकमेकांच्या तंगड्या खेचण्याचे कार्य चालत असते तोच प्रकार क्रिकेटमध्येही राजरोस सुरूच असतो; कारण क्रिकेट हा खेळ असला तरी त्या खेळाचा ‘अड्डा’ करून राजकारणी त्यात घुसले आहेत. पैसा दिसला की राजकारणी घुसणारच. शेवटी क्रिकेट काय आणि राजकारण काय, आपल्याकडे त्यात तसा काहीच फरक नाही. दोन्ही ठिकाणी टोलवाटोलवीच सुरू असते. राजकारणी जनतेचे प्रश्‍न टोलवतात तर क्रिकेटपटू चेंडू टोलवतात एवढाच काय तो फरक. महाराष्ट्राच्या व देशाच्या तिजोरीत खडखडाट आहे, पण तुमच्या त्या क्रिकेट नियामक मंडळाच्या तिजोरीत म्हणे पैसाच पैसा, अगदी शेकडो कोटी पडून आहेेेेत. त्यामुळे या तिजोरीवर बसायला राजकीय भुजंग हवेतच. खेळ मागे पडला व त्याची जागा उद्योग आणि धंद्याने घेतली. आम्ही स्वत: एक क्रिकेटप्रेमी आहोत व खेळ म्हणून क्रिकेटचा नेहमीच आनंद घेत असतो. आमचे जानी दोस्त माधव मंत्री, बापू नाडकर्णी, पॉली उम्रीगर, रमाकांत देसाई वगैरेंशी तर आमचा अगदी चांगलाच घरोबा होता. पॉली व रमाकांत देसाई आज हयात नाहीत. मात्र इतर अनेक अधूनमधून जात-येत असतात. अजित वाडेकर, सुनील गावसकर यांच्या काळापर्यंत तरी हे ‘फिक्सिंग’चे भूत क्रिकेटच्या मानगुटीवर बसले नव्हते. इमानेइतबारे सगळे चालले होते, पण ते राजकारणी आधी घुसले व त्यांनी धनाढ्य उद्योगपतींसाठी पायघड्या घातल्या. एकदा तंबूत उंट शिरल्यावर दुसरे काय होणार?
फिक्सिंगचा रोग जगभरातच लागला आहे. पाकिस्तानचा एक क्रिकेटपटू तर ‘फिक्सिंग’ प्रकरणात लंडनच्या तुरुंगात सश्रम कारावासाची सजा भोगत आहे. पाकिस्तान, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडीज आणि हिंदुस्थानी क्रिकेटपटूंची नावे याआधी ‘फिक्सिंग’च्या प्रकरणात समोर आली, पण हिंदुस्थानातील अंडरवर्ल्ड डॉन तर म्हणे एखादी मॅच हमखास ‘फिक्स’ करतात व त्यावर हजारो कोटींचा सट्टा खेळला जातो. क्रिकेटवेडे रसिक मात्र ठार वेडे बनून टाळ्या पिटत असतात. हिंदुस्थानातील लोकशाहीचा, एकंदरीत कारभाराचा जो घोडेबाजार आमच्या राजकारण्यांनी केला आहे, ते घोडे क्रिकेटच्या मैदानात उधळलेले दिसतात. क्रिकेट हा खेळ राहिलेला नाही. घोड्यांच्या तबेल्यांची मालकी ज्याप्रमाणे उद्योगपतींकडे व काळाबाजारी ‘डॉन’ मंडळींकडे असते, त्याप्रमाणे क्रिकेटचे तबेले व त्यांचे मालक झाले आहेत. आपापला घोडा पुढे दामटवण्यासाठी कोण कोणाशी हातमिळवणी करील व पैशांचा पाऊस पाडेल ते कसे कळणार? सध्या सुरू असलेल्या ‘आयपीएल’बाबत आता एक स्टिंग ऑपरेशन झाले. त्यातील खरे काय, खोटे काय, ते येणारा काळच ठरवेल. सध्या तरी आरोपी क्रिकेटपटूंवर कठोर कारवाईची घोषणा क्रिकेट बोर्डाने केली आहे. ही घोषणा करणारे राजकारणीच आहेत. भ्रष्टाचार्‍यांवर कठोर कारवाईची घोषणा हीच मंडळी नेहमी करतात, पण म्हणून भ्रष्टाचार संपला काय? तर अजिबात नाही. क्रिकेटमधील भ्रष्टाचाराचे तसेच आहे. इंग्लंडने आम्हाला लोकशाही दिली, पण त्या लोकशाहीत घोडेबाजार आपण आणला. इंग्लंडच्या लोकशाहीत फक्त दोनच राजकीय पक्ष आहेत. हुजूर आणि मजूर पक्ष. आम्ही मात्र हम पाच हमारे पचीस या उक्तीस जागून लोकशाहीचे बाळंतपण करून असंख्य पक्षांना जन्म दिला. लोकशाहीस नेहमीच लेबर रूम म्हणजे बाळंतिणीच्याच खोलीत ठेवले. क्रिकेटचेही तेच केले. कसोटी सामने, वन डे, ट्वेंटी-२० आणि आता आयपीएल... लोकशाहीचा आम्ही खेळ केला आणि क्रिकेटचा खेळखंडोबा! ब्रिटिशांकडून ज्या बर्‍या गोष्टी घेतल्या त्याचे खोबरे करून एक नवाच पायंडा आपण पाडला. सर्वत्र राजकारणी घुसल्याचा हा परिणाम!


 

No comments:

Post a Comment