Total Pageviews

Wednesday 16 May 2012

IPL MATCH FIXING

फिक्सिंगचा शाप!
आयपीएलचे पाचवे पर्व आता निरोपाच्या वळणावर आले असताना स्पॉट फिक्सिंगचे गालबोट त्याला लागले. एका वृत्तवाहिनीने केलेल्या स्टिंग ऑपरेशननंतर बीसीसीआयने पाच क्रिकेटपटूंंना चौकशी होईपर्यंत सर्वच प्रकारचे क्रिकेट खेळण्यावर बंदी घातली आहे. टी. पी. सुधींद्र, मोहनिश मिश्रा, अभिनव बाली, शलभ श्रीवास्तव, अमित यादव हे सगळेच खेळाडू प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणारे आहेत. आता त्यावर जोरात चर्चा सुरू झाली आहे. गेला महिनाभर तरी प्रसारमाध्यमांची महत्त्वाची जागा व्यापून घेणारी ही स्पर्धा एका वादाच्या निमित्ताने परत एकदा सर्वच माध्यमांचा टीआरपी वाढविण्यास कारणीभूत ठरली आहे.
वास्तविक सामान्य रसिकांच्या चेतनेशी आणि अस्मितेशी कुठलेच नाते नसलेला हा प्रकार आहे. यातल्या कुठल्याच संघाच्या पाठीशी देश म्हणून अन् प्रदेश म्हणूनही अस्मिता उभी राहू शकत नाही. कोंबड्या झुंजवितात तसलाच हा प्रकार आहे. व्यावसायिक नव्हे, तर निव्वळ धंदेवाईक खेळ. पैसा, थोडेफार ग्लॅमर अन् धनाढ्यांचे चोचले, एवढेच काय ते समीकरण या प्रकारामागे आहे. सामान्य रसिकांच्या क्रीडा भावनेला हात घालत मनोरंजनाच्या नावाखाली या स्पर्धांमध्ये पैसा नाचविला जातो. अर्थात त्याची दुसरी अव्यक्त बाजू हीच आहे की, पैसा नाचविला जात असताना खेळ मात्र नासविला जात आहे. या देशात व्यवसायस्वातंत्र्यही असल्याने हा ‘इव्हेंट’ घेण्यास बीसीसीआयसारख्या दिग्गज अन् धनाढ्य, बलाढ्य संस्थेला कुणी रोखू शकत नाही. त्यामुळे देशाचे, समाजाचे, कुठल्या धर्माचे काय नुकसान होते, हे कुणी पुराव्यानिशी सांगू शकत नाही. होणारे अव्यक्त नुकसान किती भीषण आहे, याची सगळ्यांनाच पुरेपूर जाणीव आहे. मुळात खेळाडूंचा होणारा लिलाव, हा प्रकारच क्रीडा गुलामीकडे नेणारा आहे. खेळाडू असला तरी तो आधी माणूस आहे आणि एका स्पर्धेसाठी का होईना त्याची बोली लागत असेल, आणि खेळाडू स्वत: या बाजारात आपला लिलाव करण्यास उत्सुक असतील तर कोण काय करणार? काऊंटी क्रिकेटसाठी खेळाडूंशी करार होतो. त्यांना भरपूर पैसेही मिळतात, पण त्यात खेळाच्या दर्जात्मक अभिजातपणावर टाच येणार नाही, याची साहेब लोक सावधता बाळगतात. आता आयपीएलमध्येच ज्यांची बोली लागते, त्यांनीच आक्षेप घ्यायला हवा किंवा किमान बड्या नामवंत खेळाडूंनी याला विरोध करायला हवा. ज्याला भारतरत्न द्या, अशी मागणी अलीकडे जोर धरत आहे, तो सचिनच लिलावात सामील होत असेल, तर मग इतरांची काय कथा? या लिलावाचे नियम, निकष काय, हे देखील कुणी कर्त्या संस्थेला विचारू शकत नाही. टोपीधारी (कॅप्ड) खेळाडू आणि टोपीविहीन खेळाडू असे दोन भाग लिलाव करताना करण्यात येतात. ज्यांचा राष्ट्रीय संघात समावेश झाला आहे, ते टोपीधारी आणि लायकी असूनही काही कारणाने बाजूला राहिलेले टोपीविहीन. ही बोली लावली जात असताना कुठल्याही खेळाडूला किती भाव द्यायचा, हे संघ मालकच ठरवितात. ललित मोदींच्या डोक्यातून हा प्रकार निघाला. आता त्यांनाच बाजूला सारण्यात आले आहे. लिलावात कुठल्या खेळाडूला उभे करायचे, हे बीसीसीआय ठरविते. मात्र, आपल्या संघात कुठल्या खेळाडूचा किती किमतीत समावेश करता येईल, याचे ज्ञान प्रत्येकच संघाचे मेंटॉर्स देतात. आधारभूत किंमत ३० लाख एका स्पर्धेसाठी ठरलेली आहे. पण, या स्टिंग ऑपरेशननंतर जे भयानक वास्तव समोर आले आहे, त्यावरून ३० लाख म्हणजे दीड कोटी असतात आणि त्यापैकी एक कोटी काळा पैसा असतो, हे रहस्योद्घाटन कारवाई करणार्‍या खेळाडूंनीच केले आहे. सर्वांत खळबळजनक बाब म्हणजे या संपूर्ण व्यवहाराची बीसीसीआयला सुद्धा पूर्ण कल्पना आहे, असेही या खेळाडूंनी सांगितले आहे. म्हणजे, काळा पैसा पांढरा करण्याचे साधन म्हणून अशा आयपीएल नावाच्या स्पर्धा भरविल्या जातात, हे उघड झाले आहे. या माहितीवरून आता कुठे आयकर आणि अंमलबजावणी संचालनालयाने कान टवकारले गेले आहेत. आणखी एक बाब समोर आली आहे. हा काळा पैसा स्वीस बँकेत जमा केला जात आहे. असे असेल तर बीसीसीआयचा कुणीतरी पदाधिकारी किंवा राजकीय नेत्याचे स्वीस बँकेत खाते असले पाहिजे. हा पदाधिकारी किंवा नेता कोण हे जनतेपुढे यायला हवे.
कास्टिंग काऊच चित्रपट क्षेत्रात असतात, तसेच इकडे ‘कॉस्टिंग काऊच’ असतात. ते कुठल्याही संघात तुमची वर्णी लावण्यापासून तुमचा रेट ठरविण्यापर्यंत त्यांची दलाली ठरलेली असते... ही स्पर्धाच मुळी निव्वळ धंदा करण्यासाठी घेण्यात येते. बड्या आसामी त्यात कोट्यवधी रुपये लावतात, ते उगाच नाही. त्यातही महाराष्ट्रासारख्या राज्यात त्यावरचा मनोरंजनाचा कर माफ करण्यात येतो. (म्हणजे आत काय व्यवहार होत असतील हे सुज्ञांनी लक्षात घ्यावे) ज्याची सुरुवातच भ्रष्टाचारापासून होते, त्या स्पर्धेत खेळाडूंनी फिक्सिंग केले तर त्यावर इतका गजहब करण्याचे कारण काय? यंदाची आयपीएल कुणाचा संघ जिंकेल, हे देखील आयोजकांच्या पातळीवर आधीच ‘फिक्स’ नाही, असे कुणी छातीठोकपणे सांगू शकते का? पैशासाठी वाट्टेल ते, एवढाच ज्यांचा जीवनमंत्र आहे, त्यांचे फिक्सर्सशीही साटेलोटे नसेल कशावरून? नाहीतर आयपीएलमधल्या बहुतांश सामन्यांचा निकाल अखेरच्या चेंडूवरच कसा लागतो? ज्या खेळाडूंवर संशय घेत त्यांना बाहेर करण्यात आलेय् त्यात पुणे वॉरीयर्स, डेक्कन चार्जर्स, किंग्ज एलेव्हन पंजाब हे संघ स्पर्धेबाहेर झालेले आहेत. चांगले खेळूनही बोली चांगली लागत नसेल, तर मग वाइट खेळून तेवढाच पैसा कमविण्याचा मोह खेळाडूंना होणारच. वरवर पाहता या स्पर्धेमुळे पुढे न येऊ शकलेल्या प्रतिभावान खेळाडूंना संधी मिळते, पैसा मिळतो आणि पुढे जाऊन त्यांना राष्ट्रीय संघातही स्थान मिळू शकते, असे वाटू शकते. मात्र, तसे काहीच होत नाही. काही बडे खेळाडू, उद्योगपती, बडे नेते आणि बीसीसीआय यांच्यातली ही कोट्यवधीची उलाढाल होणारी स्पर्धा आहे. काळा पैसा पांढरा करण्यासाठी हा खेळ चालविला जातो, हा लोकसभेत करण्यात आलेला आरोपही तथ्यहीन नाही. क्रीडा संस्थांवर राजकारणी नेत्यांचे वर्चस्व हा देखील त्या क्षेत्रासाठीच नव्हे, तर देशासाठी चिंतेचा विषय आहे. राष्ट्रकुलचा घोटाळा करून कलमाडींनी ते दाखवून दिले आहे. क्रिकेटवर तर राजकारण्यांचेच वर्चस्व आहे. राजकारण्यांचे उद्योगपतींशी असलेले ‘मधुर’ संबंध आणि क्रिकेटमध्ये दिसणारा पैसा यातून आयपीएलचा तमाशा उभा झालेला आहे. तिथे खेळ नाहीच, हे सामान्यांनी लक्षात घ्यायला हवे. कारण, सामान्य रसिकांच्या बळावरच उद्योगपती आणि नेते मालज्यादा करतात. त्यांनी पैसे कमवावे, अमाप कमवावेत, पण खेळाला नागवे करून नव्हे. यात आजी-माजी खेळाडू, क्रीडातंत्रज्ञ, क्रिकेट पंडित आणि इतरांचे भले होत असले, तरी राजकारण्यांच्या सहभागाने सार्वजनिक मालमत्तेचा गैरवापर होतो. करात सूट पासून अनेक शासकीय सोयींचा वापर होतो. खेळाचा कार्पोरेट धिंगाणा होतो. ते थांबविले गेले पाहिजे. बीसीसीआयचा कारभार देखील पारदर्शक करायला हवा. बीसीसीआय माहितीच्या अधिकाराच्या कक्षेत आणावे, आणि राजकीय नेत्यांनी त्यापासून अलिप्त रहावे, अशी मागणी स्वत: क्रीडामंत्री अजय माकन यांनीच केली आहे. माकन यांनी केवळ सूचना करू नये, तर तसा कठोर कायदाच करावा. तेव्हाच आयपीएलचा हा तमाशा किती घाणेरडा आहे आणि यात कोणकोण गुंतले आहेत, हे उजेडात येईल

No comments:

Post a Comment