Total Pageviews

Saturday, 21 March 2020

उद्याचे सामरिक तज्ज्ञ घडविण्यासाठी देशाला आज खरी गरज आहे, ती देशासमोरील आव्हानांचा देशहिताच्या दृष्टिकोनातून आणि सामरिक अंगाने विचार करणाऱ्या व्यक्तींची...-DR VIJAY KHAREPRASAD KULKARNI-


| Updated:Mar 22, 2020, 04:00AM IST

विद्यापीठामध्ये ‘मार्शल ऑफ द एअर फोर्स अर्जन सिंग चेअर ऑफ एक्सलेन्स’ स्थापन करण...
देशाला आज खरी गरज आहे, ती देशासमोरील आव्हानांचा देशहिताच्या दृष्टिकोनातून आणि सामरिक अंगाने विचार करणाऱ्या व्यक्तींची. अशा व्यक्तींची जडणघडण आपोआप होत नसते. त्यासाठी जनता आणि सरकारच्या पातळीवर प्रयत्न होण्याची गरज असते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये 'मार्शल ऑफ द एअर फोर्स अर्जन सिंग चेअर ऑफ एक्सलेन्स'ची झालेली स्थापना हा अशाच एका प्रयत्नाचा भाग आहे.
आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर मोठे बदल झाले. विन्स्टन चर्चिल यांनी उल्लेख केल्याप्रमाणे 'आयर्न कर्टन' अर्थात आभासी अशा लोखंडी पडद्याने जगाचे दोन भाग केले. एका बाजूला साम्यवाद आणि दुसऱ्या बाजूला भांडवलशाही. महायुद्धानंतर लगेचच दीर्घ अशा शीतयुद्धाच्या काळाला सुरुवात झाली. सामरिक शास्त्राच्या विकासाला बहर आला, तो याच काळात. वास्तविक पूर्वीदेखील अनेक सामरिक तज्ज्ञांनी रणनीती, सामरिक नीतीवर ग्रंथ लिहून ठेवले आहेत. भारताचा विचार केला, तर कौटिल्याचे अर्थशास्त्र, छत्रपती शिवाजी महाराजांची आज्ञापत्रे अशा ग्रंथांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. इतरांमध्ये सून त्झू, क्लॉजवित्झ, आल्फ्रेड महान या आणि इतर अनेक विचारवंताचा उल्लेख करावा लागेल. आधुनिक काळात केवळ युद्धकेंद्रित किंवा लष्कराशी निगडित दृष्टिकोन वगळून इतर निरनिराळ्या पैलूंचा विचार करण्यास आणि सामरिक शास्त्राचा सर्वांगाने विकास होण्यास दुसऱ्या महायुद्धानंतर सुरुवात झाली.
शीतयुद्धाच्या काळात जग दोन विचारप्रणालींमध्ये विभागल्यानंतर आणि प्रत्यक्ष युद्धातील संहाराची वास्तविकता लक्षात आल्यानंतरही सत्तावर्चस्वासाठी चढाओढ थांबली नाही. सत्तावर्चस्व राखण्यासाठी त्या अनुषंगाने धोरणे आखली जाऊ लागली. सुरक्षेचा संदर्भ अधिक व्यापक झाला. शीतयुद्धाच्या कालखंडामध्ये सोव्हिएत संघ आणि अमेरिका यांच्यातील डावपेचांना, सामरिक धोरणे आखण्याच्या कृतींना विद्यापीठाच्या स्तरावरून मोठी मदत मिळाली. वेगवेगळे 'थिंक टँक्स' तयार झाले. देशाची धोरणे कशी असावीत, देशाच्या धोरणांतील त्रुटी यांवर मंथने होऊ लागली. आंतरराष्ट्रीय संबंध, सामरिक अभ्यासावर विविध विद्यापीठांतून भर देण्यात आला. बळाचा वापर आणि बळाचे महत्त्व याच्याशी संबंधित साहित्य पाश्चिमात्य देशांत विकसित होत गेले. आण्विक युद्धनीतीच्या बाबतीतही अनेक संकल्पना या काळात तयार झाल्या.
ऐंशीच्या शतकात परिस्थिती पुन्हा बदलली. ऐंशीच्या दशकाच्या अखेरीस आणि नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला शीतयुद्ध संपून पूर्ण जगात उलथापालथ झाली. अमेरिका एकध्रुवीय महासत्ता बनली. आंतरराष्ट्रीय पातळीवरील या घडामोडींबरोबरच संरक्षण व सामरिकशास्त्र या विषयाच्या अभ्यासातही फरक पडला. संरक्षणशास्त्र म्हणजे केवळ बळाचा वापर; या अर्थापुरते ते मर्यादित न राहता या विषयाचा आंतरविद्याशाखीय अभ्यास सुरू झाला. संरक्षणशास्त्रामध्ये कला, विज्ञान, वाणिज्य अशा तिन्ही पातळ्यांवरील विषयांचा अभ्यास केला जातो. युद्धकला, संरक्षण अर्थनीती, राष्ट्रीय सुरक्षा, विज्ञान-तंत्रज्ञान, पीस अँड कॉन्फ्लिट स्टडीज, दहशतवाद, नॉन स्टेट अक्टर्स अशा विविध विषयांचा सर्वंकष अभ्यास केला जाऊ लागला. या विषयाच्या अभ्यासातील हा महत्त्वपूर्ण बदल होता. अमेरिकेवरील 'वर्ल्ड टॉवर सेंटर'च्या हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरील परिस्थिती पुन्हा बदलली. कितीही अण्वस्त्रे असली, तरी एखाद्या देशाला शत्रू लक्ष्य करू शकतो, हे अधोरेखित झाले आणि संरक्षणशास्त्र हा विषय त्या अनुषंगाने आणखी विकसित झाला. वर्तमानस्थितीमध्ये संरक्षण व सामरिकशास्त्र हा आंतरविद्याशाखीय आणि विद्यार्थ्यांना इतक्या मोठ्या प्रमाणावर ज्ञानाची कवाडे खुली करून देणारा कदाचित एकमेव अभ्यासक्रम असावा!
भारतामध्ये या अभ्यासाकडे १९६२च्या चीनबरोबरील युद्धानंतर गांभीर्याने पाहू जाऊ लागले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात १९६३मध्ये हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. लष्करी अभ्यासक्रमामध्ये पदवी देण्यात येऊ लागली. १९७४मध्ये पदव्युत्तर पदवीचे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले. आंतरराष्ट्रीय पातळीवर सामरिकशास्त्राचा विकास होत गेला, तसे त्याचे परिणाम विद्यापीठ पातळीवरही दिसले. 'मिलिटरी स्टडीज' या अभ्यासक्रमाचे नाव नंतर 'डिफेन्स स्टडीज' आणि आता 'डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज' असे झाले आहे. नागरी पातळीवर देशामध्ये चेन्नई, अलाहाबाद, पंजाबमधील चंडीगड विद्यापीठ, गोरखपूर आदी विद्यापीठांत सामरिकशास्त्रात विद्यार्थ्यांना पारंगत केले जात आहे. राज्यात नाशिक येथील भोसला मिलिटरी कॉलेज, पुण्यातील मॉडर्न कॉलेज, धुळे, जळगाव, बारामती, नगर, मराठवाड्यातील विद्यापीठांमध्ये आणि संलग्न महाविद्यालयात हा अभ्यासक्रम शिकवला जात आहे. या विषयाची व्याप्ती वाढण्याची आवश्यकता असून, प्रत्येक महाविद्यालयामध्ये हा अभ्यासक्रम शिकवला जाणे गरजेचे आहे.
विद्यापीठातील संरक्षण विभागाचा भारतीय संरक्षण दलांशी खूप जुना संबंध आहे. भारतीय लष्कराने 'पॉलिसी स्टडीज'साठी छत्रपती शिवाजी अध्यासनाची स्थापना केली आहे. लष्करातील विविध हुद्द्यांचे अधिकारी 'रेसिडेंट स्कॉलर' म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. प्रत्यक्ष रणांगणावरील, धोरणनिर्मितीच्या अनुभवांचा विद्यार्थ्यांना फायदा होतो. भारतीय लष्कराबरोबर संयुक्त विद्यमाने दर वर्षी जनरल बी. सी. जोशी व्याख्यानाचे आयोजन केले जाते. तिन्ही दलांचे प्रमुख आलटूनपालटून दर वर्षी व्याख्यानासाठी या ठिकाणी येतात आणि त्यांचे अनुभव सांगतात. याखेरीज हवाई दलाचे आणि संपूर्ण भारताचे एक आदर्श असणारे आणि विविध युद्धांत मोलाची कामगिरी बजावलेले 'मार्शल ऑफ द एअर फोर्स अर्जनसिंग' यांच्याही नावाने विद्यापीठामध्ये नुकतेच अध्यासन सुरू झाले आहे. हवाई दलाकडून एक कोटी रुपयांचा निधी त्यासाठी विद्यापीठाला मिळाला आहे. लष्कराबरोबरच हवाई दलाचे अधिकारीदेखील 'रेसिडेंट स्कॉलर' म्हणून विद्यापीठात आता येणार आहेत. याखेरीज गेल्या दोन ते तीन वर्षांत विद्यापीठ अनुदान आयोगाकडून दोन कोटी रुपये आणि 'डॉ. आंबेडकर स्टडीज'साठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेकडून (बीएआरटीआय) २.८० कोटी रुपयांचा निधी विभागाला प्राप्त झाला आहे. कुलगुरूंच्या मार्फत नौदलाशीही समन्वय सुरू असून, त्यांचेही एक अध्यासन स्थापन व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सामरिकशास्त्राच्या विकासास त्यामुळे मोठा हातभार लागणार आहे.
विद्यापीठातील विभागामध्ये संरक्षण विश्लेषक, दहशतवादविरोधी अभ्यास, संकटव्यवस्थापन यांचे डिप्लोमा सुरू केले आहेत. तसेच, येत्या शैक्षणिक वर्षापासून बारावीनंतर पाच वर्षांचे बीए/एमए, बीएस्सी/एमएस्सी हे अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत. जागतिक शांतता आणि सुरक्षेचा अभ्यासही सुरू केला जाणार आहे. विभागामध्ये सध्या भूराजनीती, लष्करी इतिहास, लष्करी भूगोल, सामरिकशास्त्र, आंतरराष्ट्रीय संघटना आदी विषयांवर शिक्षण आणि संशोधन सुरू आहे.
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरक्षेच्या संदर्भाचे मापदंड बदलत असताना या विषयाचे महत्त्व आगामी काळात वाढणार, हे निर्विवाद आहे. सुरक्षा आणि सामरिक दृष्टिकोनातून अनेक नवी आव्हाने देश म्हणून आपल्यासमोर उभी ठाकली आहेत. देशामध्ये सिव्हिल-मिलिटरी रिलेशन्स (नागरी-लष्करी संबंध) सुधारण्याची आवश्यकता आहे. अशा वेळी देशामध्ये नागरी पातळीवर अनेक रणनीतीकार, युद्धशास्त्र अभ्यासक, सामरिक तज्ज्ञ तयार होण्याची नितांत गरज आहे. या विषयाला जागतिक पातळीवर आणायचे असेल, तर त्या अनुषंगाने जागतिक स्तरावर आवश्यक असे संशोधन होणे गरजेचे आहे. देशामध्ये संशोधकांची अशी मोठी फळी आजच्या घडीला तयार होण्याची गरज आहे. खासगी स्तरावर वेगवेगळे थिंक-टँक तयार होण्याचीदेखील आवश्यकता आहे. हा विषय प्रामुख्याने विद्यापीठ स्तरापुरताच मर्यादित राहिल्याने त्याची चर्चा आतापर्यंत फारशी झाली नाही. सामरिक तज्ज्ञ मोठ्या संख्येने तयार होण्यासाठी प्रत्येक कॉलेजांमधून हा विषय शिकविला जाणे अत्यंत आवश्यक आहे.

No comments:

Post a Comment