Total Pageviews

Saturday, 28 March 2020

आपणच बना आपले रक्षक! -ARVIND SURVE -TARUN BHARAT

कोरोना व्हायरसने सध्या धुमाकूळ घातला आहे. ही वैश्विक महामारी झाली आहे आणि जगभरात त्यात हजारो बळी गेले आहेत. केंद्र शासन आणि राज्य शासन आपापल्या परीने लोकांना घराबाहेर न पडण्याची विनंती करत आहे. पोलिसांच्या गाड्या रस्तोरस्ती आवाहन करत फिरत आहेत. मात्र, लोकांना त्याचे गांभीर्य कळले असल्याचे अद्याप दिसत नाही. अजूनही लोक ‘अगा जे घडलेचि नाही’ अशा पद्धतीने निर्धास्तपणे रस्त्यावर फिरत आहेत. १०-१५ मिनिटांत ३-३ वेळा इमारतीतून खाली येऊन काही कामानिमित्त रस्त्यावर येत आहेत. काही जण एखाद्या वसाहतीच्या गेटवर गप्पा छाटत बसलेले दृष्टीस पडते.


याहूनही गमतीची गोष्ट म्हणजे, काही महिला कोरोनाचे संकट ही संधी समजून संचारबंदीच्या काळातही एक-दोघीच्या गटात नाचगाणी करत टिकटॉकसाठी व्हिडिओ बनवत असल्याचे दृष्टीस पडत आहे. मुलांना रस्त्यावर खेळण्यासाठी सोडले जात आहे. अशा प्रवृत्तींना रोखण्यासाठी पोलिसांना ‘१००’ नंबरवर कोणी फोन केल्यास तो नंबरही लागत नाही. पोलिसांवर असलेला ताण लक्षात घेता आणि त्यांच्याकडे येणारा कॉल लक्षात घेता प्रत्येकाच्या कॉलला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा बाळगणेही गैर आहे.


या आजारात कोरोना गरीब-श्रीमंत, उच्च-नीच असा कोणताही भेद करीत नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपली काळजी आपणच घ्यायची आहे. आपले रक्षक आपणच बनायचे आहे. शासनाचे प्रथम गर्दी न करण्याचे आवाहन केले, जमावबंदी केली, संचारबंदी केली. उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या रेल्वे बंद करून शेवटी ‘लॉकडाऊन’ केले. पण, लोकांना त्याचा काहीही फरक पडलेला नाही.


पोलिसांच्या गाड्या खबरदारीच्या सूचना देण्यासाठी दररोज रस्तोरस्ती फिरत आहेत. तरीही लोक रस्त्यावर येत आहेत. सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक स्व. दादा कोंडके यांनी त्यांच्या एका चित्रपटातील गीतात ‘माणसापरिस मेंढरं बरी’ असे म्हटले आहे. मेंढपाळाने मेंढरांना एका जागेवर बसवले तर ते त्याच परिघात फिरत बसतात. मेंढपाळाच्या बरहुकूम रस्त्याने जातात. मग आपण तर सर्व प्राण्यांत सुबुद्ध आहोत. शासनाचे हुकूम आपण नको का मानायला?


संवाद असू द्यावा!

कोरोना ही वैश्विक महामारी आहे. तो रोखण्यासाठी एकमेकांपासून लांब राहणे हाच एक पर्याय आहे. त्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ मार्च रोजी ‘जनता कर्फ्यू’ जाहीर केला. ही एक प्रकारची रंगीत तालीम होती. लोकांनी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत स्वतःला बंदिस्त करून घेतले असले तरी कोरोनाचे वाढते संकट लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (२४ मार्च) मध्यरात्रीपासून देशभर ‘लॉकडाऊन’ जाहीर केला. १४ एप्रिलपर्यंत हा ‘लॉकडाऊन’ राहणार आहे. या काळात कोणीही घराबाहेर पडायचे नाही, असे पंतप्रधानांनी स्पष्टपणे बजावले आहे. या वैश्विक महामारीपासून स्वतःला वाचविण्यासाठी, कुटुंबाला वाचविण्यासाठी आणि देशवासीयांना वाचविण्यासाठी घराबाहेर पडणार नाही यासाठी प्रत्येकाने दरवाजाबाहेर लक्ष्मणरेषा आखून घ्यायची आहे, स्वतःच संकल्प करायचा आहे. जे देश आपल्यापेक्षा बलाढ्य आहेत, ज्यांच्याकडे आपल्यापेक्षाही अधिक आधुनिक अशा आरोग्यसुविधा आहेत, अशा बलाढ्य देशांनाही या भयंकर आजाराच्या संकटाने सोडलेले नाही. एकमेकांच्या संपर्कात न येणे हाच यावर एक पर्याय आहे. जेथे या आजाराची गंभीर समस्या आहे, त्या प्रत्येक राज्याने ‘लॉकडाऊन’ केले आहेच. त्यामुळे देशवासीयांच्या हितासाठी पंतप्रधानांनी देशभर ‘लॉकडाऊन’ जाहीर केला. कोरोनाची लागण होताच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी राष्ट्रीय आणीबाणीच जाहीर केली. तरीही तेथे बळींची संख्या १,२८८ झाली आहे. आपल्या देशाची लोकसंख्या १३४ कोटींच्या आसपास आहे. त्यामानाने आपल्या राज्याच्या लोकसंख्येपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या देशात हजारो बळी गेले आहेत. आजच्या घडीला जगभरात पाच लाख, २६ हजार कोरोनाबाधित आहेत. २३ हजार, ९५४ मृत्यू आहेत, तर एक लाख, २१ हजार, ९७८ रिकव्हर झाले आहेत. त्यापैकी भारतात ६९४ कोरोनाबाधित आहेत. १६ जण मृत पावले आहेत आणि ४५ जण रिकव्हर झाले आहेत. यापुढची पायरी आपण ओलांडायची नसेल तर केंद्र आणि राज्य सरकारने सुसंवाद साधणे आवश्यक आहे. पंतप्रधानांनी सांगायचे, “लक्ष्मणरेषा आखा”, मुख्यमंत्र्यांनी म्हणायचे,“घाबरू नका”, त्यामुळे आजाराच्या गांभीर्याविषयी लोकांत संभ्रम निर्माण होतो आणि मंत्र्यांनाच लष्कर बोलावण्याचा इशारा द्यावा लागतो.No comments:

Post a Comment