Total Pageviews

Tuesday, 24 March 2020

बेजबाबदारपणाचे वर्तन!-tarun bharat-24 MAR-काही उत्साही कार्यकर्ते तसेच त्यांच्या अतिउत्साही नेत्यांनी रस्त्यावर उतरून जो गोंधळ घातला


   कोरोनाचा वाढता उद्रेक ही फक्त भारताचीच नाही, तर संपूर्ण जगाची समस्या झाली आहे. साधी समस्या नाही, तर अतिशय चिंताजनक आणि प्राणघातक अशी समस्या झाली आहे. चीनमधून उगम पावलेल्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतले आहे. इटली आणि इराणमध्ये तर कोरोनामुळे अतिशय भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे.

भारतही त्यातून सुटणे शक्य नव्हते. भारतातही कोरोना या प्राणघातक विषाणूचा शिरकाव झाला आहे. भारतात चारशेवर लोकांना कोरोनाची लागण झाली असून, आतापर्यंत जवळपास दहा जणांचा यामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या संशयित अशा काही हजार लोकांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार आणि सर्व राज्य सरकारे युद्धपातळीवर कामाला लागली आहेत. अनेक उपाययोजना केल्या आहेत.

देशात आरोग्यविषयक आणिबाणी लावल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. राजधानी दिल्लीसह देशातील 75 मोठ्या शहरांत लॉकडाऊन करण्यात आले आहे. केंद्र सरकार आणि सर्व राज्य सरकारे आपल्या परीने या संकटाचा सामना करण्यासाठी झटत असताना, काही राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांची वागणूक परिस्थितीचे गांभीर्य घालवणारी आहे. काही उत्साही नागरिकांचाही याला अपवाद नाही.

कोरोनाचा प्रसार हा सामान्यपणे तीन टप्प्यांतून होत आहे. पहिला म्हणजे परदेशातून याची लागण होऊन आलेले पर्यटक, प्रवासी आणि अनिवासी भारतीय. दुसरे म्हणजे या लोकांच्या संपर्कात आलेले लोक. जोपर्यंत कोरोनाची लागण एवढ्या लोकांपर्यंत मर्यादित होती, तोपर्यंत परिस्थिती नियंत्रणात होती. मात्र, याचा तिसरा टप्पा आता सुरू झाला आणि परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली. कोरोनाचा तिसरा टप्पा आहे समाज संसर्गाचा. यातून कोरोनाचा संपर्क कित्येक पटीने वाढण्याची भीती आहे.


तिसर्‍या टप्प्यातून होणारा कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार 22 मार्चला जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. यामागचा उद्देश अतिशय स्तुत्य आणि देशवासीयांच्या हिताचा होता. सकाळी 7 ते रात्री 9 या वेळात लोकांनी घराबाहेर निघू नये, असे आवाहन मोदी यांनी केले. कारण, माणसे सार्वजनिक ठिकाणी जेवढी गर्दी करतील, एकदुसर्‍याच्या जितक्या जास्त संपर्कात येतील, तेवढा कोरोनाचा संसर्ग होण्याची सध्या भीती आहे. त्यामुळेच मोदी यांनी हा सारा प्रकार टाळण्यासाठी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते.


यासोबतच अशा आणिबाणीच्या परिस्थितीतही आपला जीव धोक्यात घालून लोकांची सेवा करणार्‍या डॉक्टर, परिचारिका, अन्य वैद्यकीय कर्मचारी, लष्कर, निमलष्करी दल आणि पोलिस, यासोबतच स्वच्छता कर्मचारी, पायलट आणि विमानतळावरील अन्य कर्मचारी, रेल्वे कर्मचारी, वीज आणि जल विभागाचे कर्मचारी आणि प्रसिद्धिमाध्यमांचे लोक यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच त्यांना धन्यवाद देण्यासाठी सायंकाळी 5 वाजता आपल्या घराच्या दारात, खिडकी तसेच बाल्कनी आणि घराच्या गच्चीवर एकत्र येत टाळ्‌या वाजवण्याचे, घंटी, ताटली-चमचा वाजवण्याचे आवाहन मोदी यांनी केले होते. मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत देशवासीयांनी दिवसभर जनता कर्फ्यूला अतिशय चांगला प्रतिसाद दिला. पण, सायंकाळी 5 वाजता जे घडले त्यामुळे दिवसभराच्या मेहनतीवर आणि गांभीर्यावर पाणी फेरले गेले.


अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना काही मर्यादांचे पालन करणे आवश्यक होते. पण, काही उत्साही कार्यकर्ते तसेच त्यांच्या अतिउत्साही नेत्यांनी रस्त्यावर उतरून जो गोंधळ घातला, तो अतिशय धक्कादायक होता. या अतिउत्साही लोकांनी रस्त्यावर लाऊडस्पीकर लावूून मिरवणुका काय काढल्या, घोषणा काय दिल्या, नाच काय केला, हे सर्वच चीड आणणारे होते. यात हातात भाजपाचे झेंडे घेतलेले नेते आणि कार्यकर्तेही होते. हे करताना रस्त्यावर गर्दी करू नये, एकदुसर्‍याच्या जवळ जाऊ नये, सुरक्षित अंतर ठेवावे, या मूलभूत सिद्धांतालाच हरताळ फासण्यात आला.


रस्त्यावर उतरलेल्या या सर्वांचा उत्साह जणू भारताने विश्वचषक जिंकल्यासारखा होता. कोरोनाविरुद्धची लढाई जिंकल्याचा आवेग प्रत्येकाच्या वागण्यातून दिसत होता. मुळात पंतप्रधान मोदींनी कोणत्या उद्देशाने जनता कर्फ्यूचे आवाहन केले आणि झाले काय? मोदींनी भाजपाचे नेते आणि कार्यकर्त्यांकडून अशा वागणुकीची अपेक्षा केली नसावी. हे चित्र पाहून मोदी अतिशय संतप्त झाले होते. आपल्या कपाळाला हात लावत ‘हेचि फळ काय मम तपाला?’ असे म्हणण्याची वेळ मोदींवर, त्यांचे समर्थक म्हणवणार्‍यांनी आणली, हे दुर्दैवी आहे. एक दिवस जनता कर्फ्यू पाळून आम्ही कोरोनाविरोधातील लढाई जिंकू शकत नाही, तर आम्हाला एक आठवडा, दोन आठवडे, वेळ पडली तर महिनाभर जनता कर्फ्यू पाळावा लागणार आहे.


जनता कर्फ्यूच्या आवाहनातून, मुळात आजपासून आपल्याला कोरोनाविरुद्धची लढाई सुरू करायची आहे, असे मोदी यांना म्हणायचे होते; तर याला काही मूठभर देशवासी तसेच उत्साही नेते आणि कार्यकर्ते यांची वागणूक, कोरोनाविरोधातील निर्णायक लढाई आपण जिंकल्याचे प्रदर्शन करणारी होती. आपल्या अशा वागणुकीतून आपण आपल्या नेत्याची बदनामी करतो, प्रतिमा मलिन करतो, याचे भानही या उत्साही नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना ठेवता आले नाही, याचे वाईट वाटते. अत्यावश्यक सेवेतील ज्या कर्मचार्‍यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सारा प्रकार करण्यात आला, त्यांनाही हे सारे अपेक्षित नसावे. समाज आणि देशाप्रती आम्ही आपले कर्तव्य बजावतो, मात्र तुम्ही काहीच करू नका, असे या लोकांनी व्यथित अंत:करणाने म्हटले असेल. मुळात भारतीय लोक हे उत्सवप्रिय आहेत. पण, आपण कशाचा उत्सव साजरा करतो, याचे भान ठेवण्याची गरज आहे.


कोरोनामुळे इटली आणि इराणमधील परिस्थिती पाहून अतिशय वेदना होतात. तशीच परिस्थिती आपल्या देशातील लोकांवर येऊ नये, यासाठी पंतप्रधान मोदी आणि मंत्रिमंडळातील त्यांचे सहकारी रात्रंदिवस मेहनत करत आहेत. पण, काही लोक त्या सार्‍या मेहनतीवर पाणी फिरवतात, हे योग्य नाही. कोरोनाविरुद्धची लढाई लढताना संयमासोबत संकल्पाचे आवाहन मोदी यांनी केले आहे. ही लढाई आम्हाला दीर्घकाळ लढायची आहे. दृश्य शत्रूसोबतची लढाई लढणे सोपे असते, पण अदृश्य शत्रूसोबतची लढाई लढणे सोपे नसते, तर अतिशय कठीण असते. कोरोनाचा विषाणू हा मानवजातीचा असाच अदृश्य शत्रू आहे. या विषाणूवरील प्रतिबंधक लस आणि औषध अद्याप तयार झाले नाही. ही लस आणि औषध तयार व्हायला आणखी किती काळ लागेल, तेही कोणी सांगू शकत नाही.


त्यामुळे देशातीलच नाही, संपूर्ण जगातील मानवजातीचा प्राणघातक शत्रू असलेल्या कोरोनाविरुद्धची लढाई लढताना हिंमत, संयम आणि आत्मविश्वासाची गरज आहे. यासोबत सार्वजनिक शिस्तीचे आणि स्वच्छतेचे पालनही आम्हाला करावे लागणार आहे. कोरोना हा मानवतेचा सर्वात मोठा शत्रू आहे. या शत्रूविरुद्धची लढाई सोपी नसली तरी कठीण आणि अशक्यही नाही. गरज आहे, संयमाची, सहनशीलतेची आणि सामूहिक शक्तीची. यापुढे तरी अशा गंभीर प्रसंगी आम्ही बेजबाबदारपणाचे प्रदर्शन करणार नाही आणि आमच्या नेत्यावर मान खाली घालण्याची वेळ आणणार नाही, अशी अपेक्षा करायची काय


https://www.tarunbharat.net/Encyc/2020/3/24/Irresponsible-behavior.html

No comments:

Post a Comment