Total Pageviews

Sunday, 22 March 2020

आजाराचा विकृत चिनी बाजार- 11-Mar-2020 TARUN BHARAT- विजय कुलकर्णी

सुप्रसिद्ध शोधपत्रकार सी. जे. वर्लमॅन यांनी दावा केला आहे की, कोरोनाग्रस्त पीडितांचा जीव वाचवण्यासाठी एखाद्या अवयवाची गरज पडल्यास तो अवयव चीनमध्ये अगदी सहजगत्या उपलब्ध करून देण्यात आला.


अगदी प्रारंभीपासून चीनच्या चार भिंतींआड नेमके काय चालते, ते जगासमोर येणे हे जवळपास कर्मकठीण. पण, हल्ली सोशल मीडिया आणि शोधपत्रकारितेच्या जमान्यात चिनी गोटातून अशाच काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. त्यातच 'कोरोना'मुळे चीनची गती मंदावली असून हळूहळू का होईना, तो पूर्वपदावर येण्याच्या तयारीत आहे. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनीही 'कोरोना'चे उगमस्थळ असलेल्या वुहान शहराला नुकतीच भेट देऊन जगालाही सर्व काही आलबेल असल्याचाच जणू संकेत दिला. वरकरणी चीन 'कोरोना' आटोक्यात आहे, हे जगाला दाखविण्याचा कितीही खटाटोप करत असला तरी सुरुवातीपासून चीनने 'कोरोना'मुळे झालेल्या मृतांचा खरा आकडा लपवल्याचाही संशय आहेच. इतकेच नाही तर हा महाभयंकर विषाणू देशात इतरत्र वेगाने पसरू नये म्हणून रहिवाशांना घरातच डांबण्यात आले. काही कोरोनाग्रस्त मृतदेहांना मोठ्या संख्येने शहराबाहेर आणून जाळण्यात आल्याचेही मध्यंतरी समोर आले होतेच. आता या सगळ्यात भर पडली आहे, ती अवयवांच्या काळ्या बाजाराची. त्यातही सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे, कोरोनाग्रस्त रुग्णांना चक्क बंदिवासातील उघूर मुसलमानांचे अवयव काढून त्यांचे प्रत्यारोपण केल्याची माहिती 'डेली स्टार' आणि 'बायलाईन टाइम्स' मध्ये प्रसिद्ध झाली आहे.


सुप्रसिद्ध शोधपत्रकार सी. जे. वर्लमॅन यांनी दावा केला आहे की, कोरोनाग्रस्त पीडितांचा जीव वाचवण्यासाठी एखाद्या अवयवाची गरज पडल्यास तो अवयव चीनमध्ये अगदी सहजगत्या उपलब्ध करून देण्यात आला. एरवी चीनमध्ये अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचा खर्च कमी असला तरी प्रत्यारोपणासाठी सहजासहजी अवयव मात्र उपलब्ध होत नाही. पण, कोरोनाच्या बाबतीत चिनी सरकारच्या हालचाली संशयास्पद असून उघूर मुसलमानांचे अवयव बळजबरीने काढून ते कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी वापरल्याचा धक्कादायक प्रकार वर्लमॅन यांनी उघडकीस आणला आहे. एवढेच नाही, तर काही दिवसांपूर्वीच एक ५९ वर्षीय कोरोनाग्रस्त चिनी नागरिक 'ऑर्गन फेलियर'च्या समस्येने पीडित होता. पण, कोरोनासारख्या घातक आजाराच्या काळात, ज्यावेळी साहजिकच अवयव प्रत्यारोपणासाठी मोठी मागणी असूनही या व्यक्तीला तब्बल दोन अवयव, तेही केवळ पाच दिवसांत उपलब्ध करून देण्यात आले. म्हणूनच या 'डबल ट्रान्सप्लान्ट'साठी इतक्या कमी कालावधीत चीन सरकारकडे अवयव आले तरी कुठून, हाच प्रश्न उपस्थित होतो.


वर्लमॅन यांनी केवळ या एका घटनेवरून चिनी सरकारवर गंभीर आरोप केलेले नाहीत, तर उघूर मुसलमानांच्या गोटातील 'व्हिसलब्लोव्हर' ठरलेल्या अब्दुवेली अयुप यांच्याकडून मिळालेल्या माहितीचीही त्याला पुष्टी जोडली आहे. तसेच, २९ फेब्रुवारी रोजी चीनमध्ये पडद्याआड सुरू असलेल्या या अवयवांच्या बाजारावर एक आंतरराष्ट्रीय अहवालही प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यातही चिनी सरकारच्या मनसुब्यांवर कडक ताशेरे ओढण्यात आले. अयुप यांच्या दाव्यानुसार, बंदिवासातील उघूर मुसलमानांवर विविध प्रयोग, शस्त्रक्रिया केल्या जातात. नवीन औषधं, वैद्यकीय चाचण्यांसाठी या उघूरांचा 'गिनीपिग' म्हणून वापर केला जातो. एवढेच नाही तर या उघूर मुसलमानांचे हृदय, किडनी, डोळे, फुप्फुस आणि त्वचादेखील काढून त्याचा काळाबाजार चालतो. त्यामुळे चिनी सरकार जरी हे उघूरांचे कॅम्प दहशतवाद, कट्टरतावादाला नियंत्रित करण्यासाठी असल्याचे कितीही दावे करत असली तरी आजतागायत विविध माध्यमांतून चीनचा उघूरांना संपविण्याचाच सुप्त हेतू वेळोवेळी समोर आला आहे. तरीही चीन मात्र जागतिक स्तरावर या आरोपांचे वेळोवेळी खंडनच करत आला आहे. त्यातच चीनमधील उघूर मुसलमानांच्या अन्याय, अत्याचाराच्या असंख्य हृदयद्रावक कहाण्या समोर आल्यानंतरही मुस्लीम जगताला मात्र अद्याप 'मुस्लीम ब्रदरहूड'चा पान्हा फुटलेला दिसत नाही. चीनचा जीवलग मित्र पाकिस्तान असो अथवा दिल्ली दंगलीवरून भारतात मुसलमानांचा नरसंहार होतोय म्हणून गळा काढणारे इराणचे खामेनी, या सगळ्यांनी मात्र याकडे सोयीस्करपणे डोळेझाकच केल्याचे दिसून येते. कारण, स्वाभाविकच चीनसारख्या व्यापारीदृष्ट्या इतक्या महत्त्वाच्या देशाशी धर्मासाठी पंगे घेणे कोणाला पडवडणार? निर्घृणपणे उघूरांचे अवयव काढून विकणे असो अथवा त्यांच्या अस्तित्वाच्या खुणाच मिटवण्याची प्रक्रिया, मुस्लीम 'बंधुभाव' मात्र चिनी मालाच्या 'भावाआड' येणार नाही, हेच खरे


No comments:

Post a Comment