Total Pageviews

Friday, 20 March 2020

पाकवर चिनी मैत्रीचा ‘कोरोना इफेक्ट’- 18-Mar-2020 संतोष कुमार वर्मा-अनुवाद : विजय कुलकर्णी-TARUN BHARAT

चीनचा घनिष्ट मित्र पाकिस्तानही कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हैराण आहे. त्यातच अपुरे वैद्यकीय मनुष्यबळ, सोयीसुविधांचा अभाव आणि त्यातच डबघाईला आलेल्या अर्थव्यवस्थेमुळे पाकिस्तान या संकटाचा सामना करण्यासाठी समर्थ नाही. इमरान खान यांनीही विकसित देशांकडे मदत मागितली आहे. तेव्हा, पाकिस्तानातील कोरोनाच्या समस्येची कारणमीमांसा करणारा हा लेख...जगभरात ‘कोरोना’ विषाणूचा धोका दिवसागणिक वाढताना दिसतो. विशेष म्हणजे, कोरोनाची ही महामारी येत्या काही दिवसांत पाकिस्तानात अधिक भीषण स्वरुप धारण करण्याचीच चिन्हे आहेत. कारण, १६ मार्च या एकाच दिवशी, पाकिस्तानमध्ये कोरोना संक्रमित तब्बल १८४ रुग्ण आढळल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. त्यातच इराणमधून पाकिस्तानमध्ये प्रवेश केलेल्या १३४ कोरोना संक्रमित रुग्णांना सीमेवरील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.दि. २६ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानात कोरोनाग्रस्त रुग्णाची पहिली घटना समोर आल्यानंतर दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसते. पाकिस्तानातील कोरोना विषाणूच्या संक्रमणाचा प्रादेशिक विचार करता, एकट्या सिंध प्रांतांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक कोरोनाग्रस्त आढळले आहेत. ताफ्तान सीमेवर होणार्‍या या प्रसारामुळे सिंध आता पाकिस्तानातील ‘डेंजर झोन’ म्हणून समोर आला आहे. पाकिस्तान तसेच सिंध सरकारचे म्हणणे आहे की, लगतच्या ताफ्तान सीमेतूनच पाकिस्तानमध्ये प्रवेश करणार्‍या नागरिकांमुळे कोरोना विषाणूचा सिंधमध्ये सर्वाधिक प्रादुर्भाव झाला. खरंतर ताफ्तान सीमेवरून पाकिस्तानात दाखल होणार्‍या प्रत्येक नागरिकाची कोरोना चाचणीही करण्यात आली होती. काही काळ त्यांना सीमेवरील विलगीकरण शिबिरात थांबवून नंतर त्यांच्या त्यांच्या प्रांतात सोडण्यातही आले, तर काही जणांना पाकिस्तानातच कोरोनाच्या निदान आणि उपचारासाठी स्थानांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु, याच विलगीकरण कक्षात असलेल्या काही जणांनी पाकिस्तानी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, या कक्षात संशयितांची योग्यप्रकारे कोरोना चाचणीही करण्यात आली नाही आणि त्यावर उपचारांचाही अभाव दिसून आला. तसेच, या कोरोना संशयितांनी विलगीकरण कक्षातील आरोग्य सुविधा आणि राहण्याच्या व्यवस्थेबद्दलही तक्रारी नोंदवल्या असून पाकिस्तान सरकारचे अक्षरश: वाभाडे काढले आहेत.वर्तमान प्रक्रियेंतर्गत पाकिस्तानच्या सीमेवरील विलगीकरण कक्षातून सोडलेल्या नागरिकांना पुढे त्यांच्या प्रांतांत १४ दिवसांसाठी तेथील विलगीकरण कक्षात ठेवले जात असून ते वैद्यकीय निगराणीखाली आहेत. परंतु, सध्या पाकिस्तानची वर्तमान स्थिती इतकी बिकट आहे की, या रुग्णांसाठी विलगीकरणाच्या, कोरोना चाचणीच्या पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करण्याचे सरकारसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. सोशल मीडियावर पाकिस्तानातील विलगीकरण कक्षातील काही व्हिडिओही व्हायरल झाले व त्यातून अतिशय धक्कादायक वास्तवही समोर आले. या रुग्णांना चक्क तंबूत ठेवले जात असून तिथे स्वच्छतागृह, शौचालयाच्या मूलभूत सुविधेचाही अभाव आहे. एवढेच नाही, तर काही संशयितांना चक्क सरकारी इमारतींच्या फरशीवर झोपण्याची वेळ ओढवल्याचे वास्तवही व्हिडिओमधून समोर आले.पाकिस्तान सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार, गेल्या महिन्याभरात एकूण ४,६०० पेक्षा अधिक नागरिकांना विलगीकरण शिबिरात थांबविण्यात आले होते, त्यापैकी १,८२२ नागरिकांना त्यांच्या जिल्ह्यात स्थापित विलगीकरण कक्षात पाठवण्यात आले. परंतु, या विलगीकरण कक्षांमध्ये एकूणच वैद्यकीय सेवांची वानवा असल्याचेच समजते. एखाद्या संशयितामध्ये कोरोनाचे लक्षण किंवा संक्रमण असल्यास तातडीने उपचार करण्यासाठी या कक्षात कोणताही प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी वर्ग नाही की अन्य सुविधाही उपलब्ध नाहीत. विशेष म्हणजे, सोमवार, दि. १६ मार्च रोजीच पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या अध्यक्षतेखाली कोरोनाच्या बाबतीत राष्ट्रीय समन्वय समितीची महत्त्वाची बैठक पार पडली. परंतु, या बैठकीनंतर कोणतीही मोठी घोषणा सरकारतर्फे करण्यात आली नाही. मागील आठवड्यात उच्च स्तरीय राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीत मात्र ३ एप्रिलपर्यंत पाकिस्तानातील सर्व शैक्षणिक संस्था बंद करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्याचबरोबर इराण आणि अफगाणिस्तानला लागून असलेल्या पाकिस्तानच्या सर्व आंतरराष्ट्रीय सीमाही बंद करण्याचे आदेश देण्यात आले. पाकिस्तानातही आता सार्वजनिक समारंभांवरही प्रतिबंध सरकारने जाहीर केले आहेत.खरंतर पाकिस्तानमध्ये कोरोनाचा विषाणू इतक्या जलदगतीने संक्रमित होण्याचे प्रमुख कारण म्हणजे, या देशाच्या पश्चिमेकडील खुल्या सीमा. पाकिस्तान सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार फेब्रुवारीनंतर पाकिस्तानात ९ लाख, ७५ हजार, ६३४ हून अधिक नागरिकांनी देशात प्रवेश केला. असंरक्षित पश्चिमी सीमा, मरणासन्न अवस्थेत असलेली रुग्णालये आणि मोठ्या प्रमाणात असलेल्या अशिक्षित लोकसंख्येने कोरोनाच्या महामारीत अधिकच भर घातली आहे. त्याशिवाय पाकिस्तानचे इतर दोन शेजारी देश इराण आणि अफगाणिस्तानलाही कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. आधी म्हटल्याप्रमाणे, पाकिस्ताननेही आपल्या आंतरराष्ट्रीय सीमा बंद केल्या असल्या तरी चीनच्या देशांतर्गत हालचाली हा चिंतेचा विषय आहेच. कारण, पाकिस्तानचे चीनशी मोठ्या प्रमाणावर व्यापारी संबंध आहेतच, पण यानिमित्ताने खूप मोठी चिनी लोकसंख्याही पाकिस्तानात स्थायिक झालेली दिसून येते. त्यापैकी काही जणांचे पाकिस्तानातच वास्तव्य असून त्यांच्या चीनमधील प्रवासामुळेही कोरोनाचा धोका आणखीन वाढू शकतो. त्यामुळे चीननंतर कोरोनाने सर्वाधिक त्रस्त देशांमध्ये पाकिस्तानचा दुसरा क्रमांक लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाकिस्तानात या कोरोनाग्रस्तांचे जीव वाचवण्याचे निष्फळ प्रयत्न बघता, विशेषज्ञांनीही हजारो पाकिस्तानींचा कोरोनामुळे बळी जाण्याची भीती व्यक्त केली आहे. मोठ्या प्रमाणात शरणार्थींची ये-जा, हिंसाचाराच्या घटना, शिया तीर्थयात्रींचा इराणमधील प्रवास, वाढती तस्करी आणि कामाच्या शोधार्थ पाकिस्तानात इतर देशांमधून दाखल होणारे नागरिक यांसारख्या कारणांमुळे कोरोनाचा प्रकोप पाकिस्तानमध्ये कैकपटीने वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.कोरोनाची ही वैश्विक आपदा जगभरात आर्थिक संकटाला सर्वस्वी आमंत्रण देणारी ठरली आहे. अमेरिकेमध्ये तर बेरोजगारीचा दर २० टक्क्यांहून अधिकने वाढण्याचे भाकीत वर्तविण्यात आले आहे. त्यामुळे आधीच कंबरडे मोडलेली पाकिस्तानची अर्थव्यवस्था या महामारीनंतर सावरणे दुरापास्त ठरू शकते. आधीच गगनाला भिडलेली महागाई आणि त्यात कोरोनाच्या भीतीमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या वाढलेल्या किंमतींमुळे पाकिस्तानी जनतेसमोर जगण्याचे संकटच उभे ठाकले आहे. त्यामुळे कोरोनाच्या या भीषण महामारीनंतर चीनमध्येही उद्भवणार्‍या मंदीच्या लाटेचा तडाखा पाकिस्तानलाही बसण्याची पूर्ण शक्यता आहे. त्यामुळे ढासळणारी अर्थव्यवस्था सावरण्याबरोबरच पाकिस्तान सरकार त्यांच्या नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करण्यासाठी समर्थ ठरेल का, हे आगामी काळात स्पष्ट होईलच.


No comments:

Post a Comment