Total Pageviews

Sunday 9 September 2018

माओवाद्यांचे शहरी कारस्थान- प्रवीण दीक्षित (निवृत्त पोलिस महासंचालक)-Sep 09 2018 2:15AM



2004 मध्ये विविध माओवादी, लेनिनवादी कम्युनिस्ट घटकांचे विलीनीकरण झाल्यावर कम्युनिस्ट पक्ष (माओवादी) स्थापण्यात आला. 2007 मध्ये या पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक झाली त्यात त्यांनी चीनच्या धर्तीवर भारतात क्रांती करून राज्यसत्ता बळकावण्याचा सविस्तर विचार Strategy and Tacticts of the Indian Revolution, CPI (Maoist) 2007 या नावाने प्रसिद्ध केला. त्यानुसार जर भारतात क्रांती करून राज्यसत्ता काबीज करायची असेल, तर त्यासाठी भारतातील सैन्यदल, पोलिस व शासकीय अधिकारी यांची कत्तल करण्यात यावी, हे प्रमुख उद्दिष्ट ठरविण्यात आले. प्रथम ग्रामीण भागात क्रांती करावी, असे ठरविण्यात आले. कारण, तेथे भारतीय सैन्य व पोलिस यांचा सहज पाडाव करणे शक्य होईल व नंतर हळूहळू शहरांनाही घेरून ज्या ज्या ठिकाणी शासकीय किल्ले मजबूत आहेत, ते ते हळूहळू उद्ध्वस्त करावेत, असे ठरविण्यात आले. अशाप्रकारे ग्रामीण भागामध्ये गोरिला गट व मुक्‍त भागाची निर्मिती करण्यात यावी व यासाठी आवश्यक पाठबळ निर्माण करण्यासाठी सामान्य माणसाची मदत इतक्या मोठ्या प्रमाणावर निर्माण करावी की, ज्यामध्ये शासनाचे सर्व सैन्य व पोलिस बुडून जातील, असेही ठरविले गेले.
या प्रस्तावात शहरी भागांना क्रांतीच्या द‍ृष्टीने विशेष महत्त्व देण्यात आले आहे. कारण, औद्योगिक कामगार हे शहरात मोठ्या संख्येने उपलब्ध आहेत व ते क्रांतीला अनुकूल घटक आहेत आणि सत्ताधार्‍यांची प्रशासकीय यंत्रणाही शहरी भागात एकत्रित आहे. शहरातील चळवळ ही प्रामुख्याने नवीन उमेदवार व नेतृत्व देण्याचा उगम आहे. त्यातूनच विविध गोष्टींची रसद पुरविणे, तंत्रज्ञान मिळविणे, माहिती मिळविणे या सर्व जबाबदार्‍या शहरातील माओवादीच पार पाडू शकतात. शहरातील सशक्‍त माओवाद अजून सबळ केला नाही, तर माओवादी चळवळीवर मर्यादा पडतील व चळवळीची प्रगती खंडित होईल हे ते चांगल्याप्रकारे जाणून होते.
शहरातील माओवादाची उद्दिष्टे खालीलप्रकारे ठरवण्यात आली आहेत.
1) सामान्य लोकांना क्रांतीसाठी प्रोत्साहित करणे व एकत्र करणे.
2)
त्यांची एकत्र संघटना तयार करणे.
3)
त्यांना सशस्त्र कामासाठी तयार करणे.
1) सामान्य लोकांना क्रांतीसाठी प्रोत्साहित करणे व एकत्र करणे : कामकरी, अर्धकुशल कामगार, विद्यार्थी, मध्यमवर्गातील चाकरमानी व बुद्धिजीवी यांच्या माध्यमातून ही जबाबदारी पार पाडणे महत्त्वाचे आहे. तसेच विशेष सामाजिक घटक जसे महिला, अनुसूचित जाती सदस्य, धार्मिक अल्पसंख्याक यांना क्रांतीसाठी तयार करणे आवश्यक आहे.
2) त्यांची एकत्र संघटना तयार करणे : कामगारांना एकत्र करणे, नंतर कामगार व शेतकरी यांच्यात एकी घडविणे, कामगारांच्या शोषणाविरुद्ध व अन्यायाविरुद्ध त्यांना एकत्र करणे, जागतिकीकरणाला विरोध करणे, हिंदू प्राबल्यास विरोध करणे हे यातील महत्त्वाचे घटक आहेत. शहरातील माओवाद्यांना ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडायची आहे.
3) त्यांना सशस्त्र कामासाठी तयार करणे : ग्रामीण भागामधे सशस्त्र उठाव होत असताना शहरातील चळवळीतून त्याला पूरक काम करणे महत्त्वाचे आहे. यासाठी शहरातील माओवाद्यांनी सैन्य, पोलिस, प्रशासन, न्यायव्यवस्था या विविध घटकांमध्ये खोलवर प्रवेश करणे, महत्त्वाच्या औद्योगिक चळवळीत लोकांना प्रोत्साहित करणे, ग्रामीण सशस्त्र चळवळीच्या नेत्यांबरोबर समन्वय राखून घातपात करणे, आवश्यक ती रसद पुरविणे ही कामे करावयाची आहेत. यासाठी वर उल्लेखलेल्या समाजातील लोकांना प्रोत्साहित करणे ही त्यांची प्राथमिक जबाबदारी आहे.
शहरातील माओवाद्यांनी मदत करताना आवश्यक ते साहित्य, मनुष्यबळ याचा अव्याहत पुरवठा होईल याची खात्री करणे आवश्यक आहे. सैन्य, अर्धसैन्य, पोलिस, वरिष्ठ प्रशासन या सर्व ठिकाणी माओवादी घुसविणे आवश्यक आहे. सैन्य व पोलिस दले यांच्यामध्ये समविचारी लोकांना प्रोत्साहित करणे, त्यांच्या मदतीने क्रांती करणे, सैन्याची माहिती माओवादी लोकांना पुरविणे व अशाप्रकारे सैन्य व पोलिस दल आतून पोखरून खिळखिळे करणे ही महत्त्वाची कामे आहेत. शस्त्रे व दारूगोळा, संचारमाध्यमे, औषधांचा पुरवठा, दुरुस्तीसाठी आवश्यक मदत, प्रचार, प्रसिद्धी, आजारी व्यक्‍तींना मदत या सर्व गोष्टींसाठी शहरी चळवळीतील कार्यकर्त्यांवरच क्रांती अवलंबून आहे. छोट्या शहरांमध्ये क्रांतिकार्‍यांना मदत करण्यासाठी भूमिगत कार्यकर्त्यांनी समर्थक तयार करणे आवश्यक आहे.
शहरातील माओवादी यांच्यामध्ये सतत नेतृत्व निर्माण करणे, उघड व गुप्‍त कामांमध्ये समन्वय राखणे, वरिष्ठ आणि कनिष्ठ यांच्यामध्ये एकसूत्रता ठेवणे, शहरी व ग्रामीण नेतृत्वामध्ये सौहार्द ठेवणे ही यांची कामे आहेत.
माओवाद्यांच्या विविध संघटनांचे क्रांती हे एकमेव राजकीय उद्दिष्ट असले, तरी त्यांच्या विविध संघटना जणू काही आपला एकमेकांशी काहीच संबंध नाही, असा वरकरणी आव आणत असतात; पण आतून मात्र त्या एकमेकांशी घट्ट जोडलेल्या असतात. यालाच संघटनात्मक विघटीकरण म्हणतात. कनिष्ठ पाताळीवरील सर्व कार्यकर्त्यांचा माओवादी विचारसरणीवर पक्‍का विश्‍वास असावा लागतो. त्यामुळेच ते संघटनेच्या राजकीय उद्दिष्टांना पार पाडण्याचे काम अडचणीतही पूर्ण करू शकतात. हे करतांना वरिष्ठ नेतृत्वाने कनिष्ठ कार्यकर्त्यांशी प्रत्यक्ष संबंध ठेवू नये. जर कोणी कार्यकर्ते शासनाला माहिती झाले, तर त्यांना त्वरित भूमिगत ठेवण्यात यावे, अशी त्यांची पद्धत आहे. सरुवातीपासून ते क्रांतीचे उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत क्रांतीसाठी आवश्यक नवीन व्यक्‍ती मिळविण्यासाठी शहरी भाग हा अत्यंत महत्त्वाचे उगमस्थान आहे. विविध स्तरांवर क्रांती घडवून आणण्यासाठी व राजकीय प्रशिक्षण, तसेच चळवळीवरील विश्‍वास घट्ट करण्यासाठी शहरातून नवनवीन कॉम्रेडस्चा पुरवठा होणे गरजेचे आहे. (पान नं. 29 ते 125) Strategy and Tacticts of the Indian Revolution, CPI ( Maoist) 2007
2007 डिसेंबर 2012 मध्ये संयुक्‍त राजकीय आघाडी (UPA­) ने जाहीर केले की, 2007 नंतर वरीलप्रमाणे माओवाद्यांचे हस्तक म्हणून काम करणार्‍या 128 संघटना आहेत व सर्व राज्य सरकारांनी या संघटनांविरुद्ध कारवाई करावी. वारावारा राव, सुधा भारद्वाज, सुरेंद्र गडलिंग, रोना विल्सन, अरुण फरेरा, व्हेरनॉन गोन्साल्वीस व महेश राऊत हे या अशा संघटनांमध्ये काम करत होते. यातील फरेरा व गोन्साल्वीस हे 2007 साली त्यांच्या आक्षेपार्ह कारवायांमुळे पकडले गेले होते व कित्येक वर्षे तुरुंगात होते. वारावारा राव याला आंध्र प्रदेश व तेलंगणा पोलिसांनी अनेकवेळा पकडले होते. ज्या संघटनांमध्ये या व्यक्‍ती काम करत होत्या त्या प्रतिबंधित अशा कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) यांना मदत करत होते व त्यांच्या भूमिगत कार्यकर्त्यांना मदत करून लोकांनी लोकशाही मार्गाने निवडून दिलेल्या शासनास उलथवून टाकण्याचा प्रयत्न करत होते. कामगारांचे व शोषितांचे राज्य स्थापन करण्यासाठी जनक्रांती करणे व त्यासाठी शहरी व ग्रामीण भागातील चळवळींमध्ये समन्वय निर्माण करणे हे माओवाद्यांचे प्रमुख धोरण आहे. शहरातील कार्यकर्त्यांमधून माओवाद्यांना रसद व कार्यकर्ते याचा अखंड पुरवठा करणे, आवश्यक सामग्री पुरविणे, तंत्रज्ञान उपलब्ध करणे, कुशल कामगार देणे, माहिती पुरविणे, औषधे पुरविणे ही जबाबदारी शहरातील उघडरीत्या काम करणार्‍या कार्यकर्त्यांची ते पार पाडत होते.
माओवाद्यांनी 2001 पासून 6,956 निरपराधी नागरिकांना व 2,517 पोलिसांना निर्घृणपणे ठार मारले आहे. याशिवाय विकासासाठी आवश्यक असे रस्ते, पूल, इमारती यांचा विध्वंस केला आहे. विकास पूर्णपणे बंद पाडला आहे. आदिवासींनी माओवाद्यांना झिडकारल्यामुळे आता ते शहरी भागात विशेष लक्ष देत आहेत.
6 जून 2018 रोजी व नंतर महाराष्ट्र पोलिसांनी पकडलेल्या व्यक्‍ती व त्यांच्याशी निगडित असलेल्या संस्था पुढीलप्रमाणे- 
सुरेंद्र गडलिंग ( Gen. secretary Indian ­Association of People’s Lawyers),, रोना विल्सन ( Public Relation Secretary Committee for the Release of Political Prisoners), सुधीर ढवळे (Republican Panthers), शोमा सेन ( Executive Member, Committee for Protection for Democratic Rights ), महेश राऊत, ( State Convener, Maharashtra Visthapan Virodhi Jan Vikas ­Andolan), वारावारा राव (President, Revolutionary Democratic Front), सुधा भारद्वाज (Vice President, Indian A­ssociation of People’s Lawyers),  गौतम नवलाखा (Leader, People’s Union for Democratic Rights), व्हेरनॉन गोन्साल्वीस (ex Secretary, Maharashtra State Committee of CPI/Maoist)  आणि अरुण फरेरा (ex-Member, Maharashtra State Committee of CPI-Maoist).
लोकांनी निवडून दिलेल्या अत्युच्च लोकप्रतिनिधींना ठार मारण्याचा कट रचल्याचा व त्यासाठी आवश्यक दारूगोळा, शस्त्रे मिळविण्याचा प्रयत्न करणे हा आरोप यांच्यावर आहे. त्यासाठी नेपाळ व मणिपूर येथील कॉम्रेडस्ची मदत घेणे प्रस्तावित होते. 
शोषित व पीडित व्यक्‍तींना सामाजिक न्याय मिळवून देणे हे जर या लोकांचे उद्दिष्ट असेल, तर शासनाच्या या घटकांसाठीच्या विविध कल्याणकारी योजना परिणामकारकरीत्या राबविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले असते व शासनाला मदत केली असती. जी लोकशाही सतत वाढावी म्हणून सर्व स्तरांवर गेली सात दशके प्रयत्न झाले आहेत तीच लोकशाही नष्ट करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. लोकशाहीने उपलब्ध करून दिलेले भाषणाचे स्वातंत्र्य शासनाविरुद्ध वापरून मार्कसिस्ट लेनिनिस्ट माओअस्टी प्रणाली जी चीन व रशियातूनही हद्दपार झाली आहे ती त्यांची प्रेरणास्थळे आहेत. 
इतके  दिवस दुर्गम अशा भागातील आदिवासींना क्रूररीत्या छळल्यानंतर त्यांनी शहरातील गरीब, झोपडपट्टीत राहणार्‍या व्यक्‍ती व सहज बळी पडणार्‍या महाविद्यालय, विद्यापीठ येथील तरुण-तरुणी यांना सावज करायचे ठरविले आहे. त्यातूनच जवाहरलाल नेहरू विद्यापीठासारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये, TISS मध्ये त्यांनी चळवळी उभारल्या आहेत. प्राध्यापक साईबाबा हा अशाच लोकांचा म्होरक्या होता. परंतु, न्यायालयाने त्याच्या देशविघातक कारवायांसाठी त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. त्यामुळे महाविद्यालयातील तरुण, शहरातील बुद्धिजीवी, अनुसूचित जातींतील व्यक्‍ती यांनी माओवाद्यांच्या स्वार्थी, भूलथापांना बळी न पडता त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करत असलेल्या योजनांमध्ये सहभागी होणे आवश्यक आहे. तसेच अन्य विरोधी पक्षांनीही हे समजून घेणे गरजेचे आहे की, या चळवळीचे लक्ष भाजप नसून, सर्व देशात अराजक माजवणे हे आहे.


No comments:

Post a Comment