Total Pageviews

Sunday 23 September 2018

शाळांना गरज समुपदेशकांची मटा ऑनलाइन |MUST READ-जगदीश इंदलकर


जागतिकीकरण, खासगीकरण, उदारीकरण हे आज परवलीचे शब्द झाले आहेत. जगण्यासाठी संघर्ष वाढत आहे. आयुष्यासमोर नवनवीन आव्हाने येत आहेत. स्पर्धा तीव्र झाल्या आहेत आणि या स्पर्धांना सामोरे जाण्यासाठी औपचारिक शिक्षण अत्यावश्यक बनलंय. शालेय विषयांमध्ये प्रावीण्य मिळवणं ही पूर्वीपासून महत्त्वाची बाब मानली गेलीय; पण त्याचबरोबर आता विद्यार्थ्यांचे समस्याशोधन कौशल्य, सृजनशीलता, पृथक्करणक्षमता, निर्णयक्षमता, समायोजनक्षमता इत्यादी जीवनकौशल्यांचा विकास होणे क्रमप्राप्त आहे. शैक्षणिक बुद्धिमत्तेपेक्षा भावनिक बुद्धिमत्तेचा विकास ही अत्यंत आवश्यक बाब बनली आहे.
आत्मभान म्हणजेच स्वत:च्या भावना ओळखणं, स्वत:चं मूल्यमापन, आत्मनियमन, भावनांवर नियंत्रण, नवोपक्रमशीलता, आत्मप्रेरणा, तदनुभूती हे आत्मव्यवस्थापनाचे काही महत्त्वाचे पैलू. कुटुंब व समुदाय, समाज इतर व्यक्ती यांच्या संबंधित तदनुभूती, सहानुभूती, संघर्ष व्यवस्थापन, प्रभावीपणा, बदलाला सामोरे जाणं, सहकार्य व गटकार्य हे पैलू शालेय स्तरावर जीवनकौशल्यामध्ये संक्रमित झाले पाहिजेत. निर्णय घेणं, नियोजन करणं, स्वनियंत्रण करणं, अंदाज करणं, शक्यता वर्तवणं, चांगलं किंवा वाईट ठरवणं हे आजच्या विद्यार्थ्यांना अवगत असलं पाहिजे. त्यासाठी शाळेमध्ये केवळ विषयाच्या अध्यापनावर भर देऊन चालणार नाही, तर शाळेतील मुले, त्यांची पार्श्वभूमी, त्यांच्या समस्या, त्यांचे प्रश्न हे सर्व समजून घेऊन भविष्यासाठी त्यांना तयार करणं गरजेचं आहे. शाळेमध्ये प्रत्येक मूल महत्त्वाचं आहे. त्याचा विकास ही शालेय व्यवस्थेतील प्रत्येकाची जबाबदारी आहे, हे सर्वांनी मानलं पाहिजे. त्यात अधिकारी वर्ग, व्यवस्थापन, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व समाज हे सर्वच समाविष्ट होतात. या सगळ्या पार्श्वभूमीवर समुपदेशनाची व समुपदेशकांची गरज तीव्रतेने भासू लागली आहे.
शाळेत समस्याग्रस्त, समुपदेशनाची गरज असलेले असंख्य विद्यार्थी आहेत. मुलांमध्ये छोट्या-मोठ्या स्वरूपाच्या, साध्या अथवा गंभीर अशा अनेक समस्या आढळून येतात. ती मुले समस्यांना तोंड देऊ शकत नाहीत, त्याचे परिणाम त्यांच्या वर्तनात दिसू लागतात. मुलांमध्ये आढळणाऱ्या समस्यांचे प्रामुख्याने तीन क्षेत्रांमध्ये वर्गीकरण करता येते -
- शालेय विषयाच्या अध्ययनाशी संबंधित
- भविष्यकालीन अभ्यासक्रम व्यवसायनिवडीशी संबंधित
- भावनिक व वर्तनविषयक
मुलांच्या अध्ययनविषयक समस्या सोडवण्यासाठी नैदानिक चाचण्या, उपचारात्मक अध्यापन यांचा वापर तर करावा लागतोच. व्यावसायिक मार्गदर्शनासाठी कलचाचणीसारख्या ऑनलाइन पोर्टलचा आता विद्यार्थ्यांना उपयोग करता येतो. त्यानुसार त्यांचा कल कोणत्या विषयाकडे आहे ते कळते.
शाळेत समुपदेशनाची गरज सर्वात जास्त असते ती भावनिक व वर्तनविषयक समस्यांच्या बाबतीत. वाढ व विकासाच्या टप्प्यानुसार वर्तनविषयक समस्या या अनंत प्रकारच्या असतात. त्यांची कारणेही अनेक असतात. कौटुंबिक वातावरण, शारीरिक वाढ, वाढत्या वयातील गरजांची पूर्तता किंवा अपूर्णता यामध्ये ही कारणे दडलेली आहेत. शाळेचा परिसर, भोवताल, पालकांची जागरूकता, स्वीकारार्हता तसेच मुलाच्या बौद्धिक भरणपोषणातील आपली भागीदारी, यावर या समस्यांची तीव्रता अवलंबून असते. आजचा शिक्षक अभ्यासातील समस्या सोडवताना दिसतो आहे. करिअर गायडन्स संबंधित विविध व्याख्याने, कृतिसत्रे, कार्यशाळा आयोजित करून व्यवसायनिवडी संबंधित समस्या सोडवणं किंवा त्याबद्दल जागरूकता निर्माण करणं शक्‍य होत आहे. पहिल्या दोन क्षेत्रांमधील समस्या सोडवण्यासाठी आजचा शिक्षक नक्कीच सक्षम आहे. कारण त्याच्या व्यावसायिक कौशल्याशी, अध्यापनाशी, या समस्यांचा साक्षात संबंध असतो. मुलांच्या वर्तनसमस्या सोडवण्यास शिक्षक अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो का, याबाबतीत जरा शंका आहे. बालहक्क आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार नुकतंच 'रक्षा अभियान' जाहीर झालं, त्यामध्ये विद्यार्थ्यांचं समुपदेशन शिक्षकांनीच करावं, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
आजचा शिक्षक हा मुलांच्या वर्तनविषयक समस्या सोडवण्यासाठी समुपदेशकाची भूमिका किती प्रमाणात बजावू शकतो, हा प्रश्न संदर्भसापेक्ष आहे. अध्यापनपद्धतीमधील बदल, विविध चाचण्या व त्यांचा ऑनलाइन रिपोर्ट, शाळासिद्धीसारख्या शाळा नामांकनासाठी सतत प्रयत्नशील राहणं, यासाठीचे दस्तैवजीकरण, पुनर्परीक्षा, अध्ययन निष्पत्ती व त्यांचे अहवाल, विविध प्रकारच्या नोंदी, शाळेतील विविध उपक्रम, सातत्याने येणारी अभियाने (उदा. स्वच्छता पंधरवडा) यामध्ये शिक्षक गुरफटून गेला आहे. त्यामध्ये शिक्षकाला खरंच शाळेत उसंत मिळते का? आज कामाचे साडेपाच तास कमी पडत आहेत. असं असताना समुपदेशनाची पूर्ण जबाबदारी शिक्षक समर्थपणे पेलू शकतात का, हा यक्षप्रश्न आहे.
गेल्यावर्षी 'गुड टच-बॅड टच' हा व्हिडीओ सगळीकडे फिरत होता. फुलपाखराच्या रूपकाने लहान वयातील मुलींना स्पर्शभाषा शिकवण्यासाठीचा हा खूप चांगला प्रयोग होता. एका शाळेत हा व्हिडीओ आवर्जून दाखवला गेला. काही दिवसांनी एका मुलीने आपल्या वर्गमैत्रिणींना, तिच्या परिसरातील एका माणसाकडून होणारा त्रास सांगितला, या तीन-चार मुलींनी आपल्या वर्गशिक्षकाला एक पत्र लिहिले, वर्गशिक्षिकेच्या हातात पत्र आल्यावर तिनं ते समजून घेऊन प्राचार्यांना दाखवलं, पालकांना बोलून विश्वासात घेऊन पोलिस तक्रार केली गेली. ही तक्रार मागे घेण्यासाठी सामाजिक दबाव आणला गेला, तरीसुद्धा ना शाळा, प्राचार्य दबले ना पालक. त्यामुळे त्या गुन्हेगाराला शिक्षा झाली. त्यामध्ये विशेष कौतुक म्हणजे त्या मुलींच्या मैत्रिणींचे आणि त्या शिक्षिकेच्या सजगतेचे!
शिक्षकांमध्ये अशी सजगता असतेच. सध्या प्रत्येकाने आपलं कौशल्य सातत्यानं वृद्धिंगत केलं पाहिजे. उत्तम शिक्षक हा उत्तम समुपदेशक होऊ शकतो. प्रत्येक शिक्षकानं समुपदेशकाचं कौशल्य अंगी बाणवणं आवश्यक आहे. यासाठी सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास म्हणून सातत्याने दीर्घकालीन अभ्यासक्रमासाठी शिक्षकांना पाठवलं गेलं पाहिजे. अभ्यास करून आल्यावर अशा प्रकारचं काम आणि कामाचे इन्सेन्टिव्ह त्याला दिले गेले पाहिजेत.
गेल्यावर्षी 'अविरत' नावाचा महाराष्ट्रातील पहिला ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम विद्या प्राधिकरणाद्वारे घेण्यात आला. मुख्याध्यापक व दोन शिक्षक यांच्यासाठी अत्यंत नाविन्यपूर्ण माहिती, पद्धती आणि व्यवसायाशी संबंधित अनेक गोष्टी,नववी आणि दहावीची मुलं, त्यांच्या वर्तन समस्या, करिअर गायडन्स, मेंदूची रचना इत्यादी अनेक उपविषय या प्रशिक्षणात होते. अशा प्रकारचं प्रशिक्षण, प्राथमिक ,उच्च प्राथमिक शिक्षकांसाठी, पालकांसाठी, संस्थाचालकांसाठी आवश्यक आहे. सध्या समुपदेशक नेमणाऱ्या संस्था-शाळा खूप कमी आहेत. त्यासाठी लागणारा खर्च, समुपदेशकाची स्वतंत्र बैठक व्यवस्था, शाळेच्या वेळापत्रकातील बदल अशा अनेक गोष्टींचा यात समावेश होतो. बऱ्याच आयसीएसई शाळांमध्ये समुपदेशक हा व्यक्तिमत्त्वविकास या विषयाचे तास घेत असतो, कारण त्या निमित्ताने प्रत्येक मुलाची विकासप्रक्रिया व त्यातील बदल त्याला अभ्यासता येतो. सध्याच्या नवीन अभ्यासक्रमात 'स्वविकास व कला रसास्वाद' हा विषय शिकवण्यासाठी भाषेचा आणि चित्रकलेचा शिक्षक नेमला जातो. मात्र ही विषयतासिका समुपदेशकाने घेतली पाहिजे आणि पहिली ते आठवीसाठीही कार्यानुभव तासिकेत हा विषय समाविष्ट करणं आवश्यक आहे.
समुपदेशकपद प्रत्येक शाळेत खरंतर अनिवार्य असलं पाहिजे, तरच मुलांच्या समस्या सुटू शकतात. 'युनिसेफ'ने २००२मध्ये समावेशित शिक्षणाचा आग्रह धरला. त्यानंतर भारतामध्ये सर्व शिक्षा अभियानांतर्गत विशेष गरजा असलेल्या बालकांसाठी फिरते विशेष शिक्षक आले. अशाच प्रकारे प्रत्येक शाळेत, विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात समुपदेशक शासनाद्वारे पुरवले गेले पाहिजेत किंवा विद्यमान शिक्षकांपैकी काही शिक्षकांना समुपदेशक कौशल्य आत्मसात होतील, अशा प्रकारचे अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी पाठवले गेले पाहिजे.
सध्याच्या स्थितीमध्ये समुपदेशक ज्या शाळांमध्ये अस्तित्वात आहेत ते अत्यंत तंत्रशुद्ध शास्त्रीय पद्धतीने, समस्याप्रवण विद्यार्थ्यांचे समुपदेशन करताना आढळतात. ते स्वतः विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्याशी चर्चा करून, त्यांच्या मुलाखती घेऊन, त्या मुलाची समस्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे, याचा विचार करून शिक्षकांना, पालकांना, संस्थेला मार्गदर्शन करीत असतात. जर शिक्षक संपूर्णपणे समुपदेशकाचे शिवधनुष्य पेलणारा असेल, तर हे सर्व करत असताना शिक्षक स्वतःच्या अध्यापनाकडे किती लक्ष देईल, याबाबत शंका उपस्थित होते. प्रत्येक शाळेमध्ये समुपदेशक असणं हे अनिवार्य आहे, नव्हे ती काळाची गरज आहे. समुपदेशकाच्या मदतीशिवाय अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सजग होणार नाही. विद्यार्थ्याचं अनुभवविश्व, त्याच्या मेंदूची रचना, या सगळ्यांचा विचार करीत अध्यापनपद्धती ठरवता येते. बालकाला जर काही समस्या असेल, तर नक्की आपण काय करायचं, या विवंचनेत शिक्षक अडकलेला असतो. अशा वेळी शाळेत असलेला समुपदेशक त्याला मदत करतो.
आधुनिक काळ कृतिप्रवण आहे. या मुलाला डायरेक्ट उपदेश न करता विविध उपक्रम आणि कृतींच्या साह्याने विद्यार्थ्यांची समस्या दूर करण्याचा प्रयत्न करत असतात. दीड वर्ष सतत वर्गांमध्ये व घरातही रडणारी मुलगी जेव्हा समुपदेशकाच्या लिस्टमध्ये आली तेव्हा, त्या मुलीला वेगवेगळ्या अॅक्टिव्हिटी करायला दिल्यानंतर त्या मुलीचं वर्गात किंवा घरात रडण्याचं प्रमाण कमी होऊन अभ्यासामधली कामगिरी वाढलेली दिसली. याचा अर्थ, अशा मुलांना हाताळण्यासाठी केवळ शिक्षक पुरे पडेल, असे नाही. हाडाच्या शिक्षकाच्या नजरेत त्या मुलाचं काहीतरी वेगळं चाललंय, त्यांच्या वागण्यातलं काहीतरी खटकतं आणि तो समुपदेशकाकडे तो त्या मुलाला घेऊन जातो. मात्र हे प्रत्येक शिक्षकाला शक्य आहे का?
एसएनडीटी विद्यापीठ, टाटा सामाजिक संस्था, यशदा यासारख्या संस्थांमध्ये अल्पकालीन समुपदेशन अभ्यासक्रम अस्तित्वात आहेत. सरकारने अशा संस्थांचा नामनिर्देश करून शिक्षकांना हे अभ्यासक्रम करण्यासाठी प्रेरित करावे व त्याचे क्रेडिट पॉइंट्स त्यांच्या व्यावसायिक विकासाशी जोडावेत. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने 'स्वयम्' हे ऑनलाइन पोर्टल चालू केले आहे. तिथे विविध प्रकारचे अल्प मुदतीचे अभ्यासक्रम अस्तित्वात आहेत. या अभ्यासक्रमांमध्येसुद्धा समुपदेशन संबंधित अभ्यासक्रम चालू करता येईल.
शिक्षणशास्त्राचा संपूर्ण डोलारा हा आकलनशास्त्रावर उभा आहे. या शास्त्राकडे आपल्याकडे पूर्वीपासूनच दुर्लक्ष किंवा कमी महत्त्व दिलं गेलं आहे. विद्यार्थ्यांच्या गुणांच्या स्वरूपातल्या प्रगतीचा आलेख सगळीकडे पाहिला जातो. भावनिक बुद्धिमत्ता फार कमी प्रमाणात तपासली जाते. पूर्वीपासून आजतागायत माणसाच्या मनाची अवस्था अभ्यासली गेली. मात्र, त्याचा शिक्षणाशी, वर्गातील अध्ययन-अध्यापनाची संबंध व्यवहारात फार कमी प्रमाणात जोडला गेल्याचे दिसून येते. गोलमन यांनी भावनिक बुद्धिमत्तेची संकल्पना मांडली ती आजही कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना महत्त्वाची मानली जाते. माणूस भावनिकदृष्ट्या किती सक्षम आहे हे पाहिलं जातं. त्यासाठी भावनिक विकासासाठी जसा अभ्यासक्रम महत्त्वाचा आहे, तसाच समुपदेशक शाळेत असणं ही महत्त्वाची गरज आहे. तरच प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचं स्वप्न खऱ्या अर्थानं साकार होईल

No comments:

Post a Comment