Total Pageviews

Friday 13 July 2018

दर्जाहीन गुणवत्ता... महा एमटीबी 13-Jul-2018




 
संघ लोकसेवा आयोग अर्थात युपीएससी परीक्षा आणि ती उत्तीर्ण होण्यासाठी करावयाची तयारी याबाबत आजमितीस गल्लीबोळात चर्चा ऐकावयास मिळते. भारताच्या प्रत्येक घरात किमान एक जिल्हाधिकारी असावा, अशी सगळ्याच पालकांची इच्छा! मग काय, इच्छा तेथे मार्ग यानुसार लावला जातो तो क्लास.. पण क्लास लावून आपण आपला ‘बौद्धिक क्लास’ जपतो का, हाच खरा प्रश्न.. आज हे सगळे मांडण्यामागचे कारण म्हणजे नुकताच २०१६ च्या बॅचचा सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीचा प्रशिक्षणांती परीक्षेचा निकाल लागला आणि त्यात ‘न भूतो’ घडलेली किमया घडली, ती म्हणजे १२२ पैकी ११९ आयपीएस अधिकारी एक वा अनेक विषयांत नापास झाले. एका विशिष्ट बॅचमधील काही अधिकाऱ्यांचा एखाद्दुसरा विषय न सुटणे हे नवे नाही. मात्र, ९० टक्के प्रशिक्षणार्थी पूर्ण उत्तीर्ण न होणे, असे अकादमीच्या इतिहासात प्रथमच घडले आहे. विशेष म्हणजे, पोलिसांच्या दैनंदिन कार्याशी संबंधित अशा कायदा-सुव्यवस्था आणि अंतर्गत सुरक्षा यांसारख्या विषयांत नापास व्हावे यावरून देशाचे भावी आयपीएस अधिकारी कोणत्या दर्जाचे असणार हे सरळ दिसते. युपीएससी परीक्षा पास होणारा उमेदवार हा चौकस आणि विचारी असावा, यासाठी आयोगाने परीक्षेत अनेक बदल केले. मात्र, केवळ परीक्षार्थी बनून पेपर देणारे ज्ञानार्थी कसे बनणार? त्यासाठी साक्षात ब्रह्मदेव जरी भूतलावर अवतरले तरी काही फरक पडेल का? हाच सवाल. मुळात देशाचे धोरण कार्यान्वित ठेवणे आणि ते आखण्याकामी महत्त्वाची भूमिका बजावणे, हे अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचे मुख्य कार्य असते. त्यासाठी बुद्धिमत्तेबरोबरच संवेदनशीलता हा उमेदवाराच्या ठायी असणार मोठा गुण मुलाखती दरम्यान आयोग तपासते. मात्र, केवळ परीक्षा पास होण्यासाठी घोकंपट्टी करणारे उमेदवार संवेदनाहीन होऊन जातात का, हा मोठा प्रश्न त्यांनी प्रत्यक्ष कामकाजास सुरुवात केल्यावर सामान्य नागरिकांना पडतो. त्यामुळे प्रशिक्षण कालावधीत उमेदवारांनी खरा व्यक्तिमत्व विकास करणे आवश्यक आहे. पण, वंचितांना मुख्य प्रवाहात आणताना संचितांची (?) निवड ही अनाठायी कागदी गुणांची अपेक्षा ठेवून डावलली जाते आणि परिणामी प्रशिक्षणपश्चात परीक्षेत वास्तव समोर येते. अशा महत्त्वाच्या परीक्षेत गुणवत्ता हाच निकष ठेवला आणि सर्वांना समान लेखले, तर दर्जा आणि गुणवत्ता यांचा संगम साधता येईल.
 
मैदानी गुणवत्तेस प्रोत्साहन कधी?
 
उत्तमाची आराधना आणि त्यासाठी प्रचंड ध्येयासक्ती म्हणजे यश, अशी क्रीडा मानसशास्त्रात मांडणी करण्यात आली आहे. याची प्रचिती देणारा चमत्कार म्हणजे सातत्याने तब्बल १८ वर्ष अपार मेहनत घेत बेल्जियमने स्वत:ची गोल्डन पिढी घडविली आहे. यंदाच्या फिफा विश्वचषकात हा संघ उपांत्य फेरीत धडकला आहे. ३२ वर्षांनंतर हा संघ पाचवेळा विश्वविजेता ठरलेल्या ब्राझीलला हरवून अंतिम- ४ मध्ये पोहोचला आहे. भलेही तो अंतिम फेरीत पोहोचला नसेल, मात्र त्या संघावर त्यांनी दिलेल्या लढतीबद्दल देशवासीयांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या संघाला बेल्जियममध्ये ‘गोल्डन जनरेशन’ म्हणून संबोधले जाते. आता प्रश्न असा आहे की, या संघाने हे यश प्राप्त केले कसे? तर त्याचे उत्तर हे त्यांच्या मेहनतीबरोबरच तेथील सरकारचा, जनतेचा खेळाकडे बघण्याच्या दृष्टिकोनात दडले आहे. फुटबॉलसंबंधी भेडसावणाऱ्या समस्यांचा २००० प्रकल्पांमार्फत १५०० हून अधिक समस्यांचा विचार करून लोऊवुन विद्यापीठाने दिलेल्या निकषांवर आधारित त्यांनी स्वतःचा खेळ घडविला. तसेच विविध अकादमींना त्यांचे जितके जास्त गोल तितका अधिक निधी हे धोरण त्यांनी स्वीकारले. ज्यांना अभ्यासात जास्त गुण त्यांना खेळापासून लांब ठेवले. अशा पद्धतीने बेल्जियमवासीयांनी स्वत:ला घडविले आणि विश्वचषकाच्या उंबरठ्यावर स्वत:ला सिद्ध केले. मात्र, याच्या अगदी उलट स्थिती आपली आहे, नाही का? ‘खेलोगे, कुदोगे तो बनोगे खराब,’ अशी आपली विचारधारणा. त्यामुळे ऑलिम्पिक असो वा राष्ट्रकुल आपल्याकडे सर्वोत्तम असूनही आपण किमान उत्तमही देऊ शकत नाही, हीच मोठी शोकांतिका. आपली माध्यमे ही क्रीडावृत्ताला मागील पान किंवा तळाचे ठिकाण दाखविण्यात धन्यता मानतात. खिलाडू वृत्ती, व्यवस्थापन, निर्णयक्षमता, आत्मविश्वास अशा अनेकविध गुणांची जोपासना होते ती मुळात खेळातून. मात्र, गुणवत्तेपेक्षा गुणांकडे लक्ष देणारे आपण हे कधी जाणणार, हा यक्षप्रश्न आहे. बेल्जियमसारखा छोट्या देशाला हे अभूतपूर्व कार्य साधणे शक्य होते, तर भारतासारख्या खंडप्राय देशात हे सहज शक्य आहे. त्यामुळे जागतिक क्रीडा क्षेत्रात तिरंगा अभिमानाने डौलावा यासाठी आपण सर्वांनीच आपली ज्ञानात्मक भूक भागविण्याबरोबर मैदानी गुणवत्तेसही प्रोत्साहन देण्याची गरज आहे

No comments:

Post a Comment