Total Pageviews

Tuesday 24 July 2018

पाकचे टांगलेले भवितव्य By shambhuraj.pachindre

आज पाकिस्तानात नव्या राष्ट्रीय संसदेसाठी मतदान होत असून, मागल्या खेपेस प्रचंड बहुमताने निवडून आलेले माजी पंतप्रधान नवाज शरीफ मात्र मूत्रपिंड विकार हाताबाहेर गेल्याने इस्पितळात भरती झालेले आहेत. ते आजारामुळे इस्पितळात गेलेले नसून, तुरुंगात असताना प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी तिकडे हलवण्यात आलेले आहे, तर पाकिस्तानी माध्यमांपासून वकील, न्यायाधीश, विचारवंत सगळेच जीव मुठीत धरून बसलेले आहेत. अशा स्थितीत मतदान किती व कसे होणार, हाच प्रश्‍न आहे. जे काही मतदान होईल त्याच्यावर जनतेचा विश्‍वास किती असेल, असाही प्रश्‍न आहे. कारण, लष्करी बंदुका व पोलादी टाचेखाली सर्व नियम व कायदे धाब्यावर बसवून निवडणुका उरकल्या जात आहेत. अशा प्रसंगात एखाददुसर्‍या राजकीय पक्षाने तक्रार केली, तर समजू शकते. त्याला अपप्रचारही म्हणायला हरकत नाही; पण सध्या पाकिस्तानात निवडणुकीच्या निमित्ताने जो उद्योग चालू आहे, त्यावर लोकशाही झुगारणार्‍यांखेरीज कोणाचा विश्‍वास उरलेला नाही. लष्कराने पुरस्कृत केलेल्या इम्रान खान यांचा पक्ष तहरिक-ए-इन्साफ आणि ‘तोयबा’प्रणीत सईदचे पाठीराखे वगळता, कोणालाही चाललेली प्रक्रिया विश्‍वासार्ह वाटलेली नाही.
माध्यमे थेट कुठल्या राजकीय प्रक्रियेत नसतात; पण पाकच्या बहुतांश पत्रकार व माध्यमांनी ही निवडणूक केवळ देखावा असल्याचा सरसकट आरोप केलेला आहे. कारण, त्यात पीपल्स पार्टी व मुस्लिम लीग या आजवरच्या दोन्ही प्रमुख राजकीय पक्षांची पुरती गळचेपी करण्यात आलेली आहे. त्यांच्या नेत्यांना जेरबंद करणे वा त्यांच्यावर खुनीहल्ले करण्यापासून जाहीर सभांमध्ये घातपातही घडवून आणले गेले आहेत. त्याच्यावर कडी म्हणजे, इस्लामाबाद हायकोर्टाचे न्यायाधीश शौकत अझीज सिद्दिकी यांनी पाक हेर खात्याने न्यायालयाच्या कामकाजात हस्तक्षेप चालविला असल्याचा आरोप जाहीरपणे केलेला आहे. आजवर असे आरोप माध्यमातून व राजकीय गोटातून झालेले होते. किंबहुना, लोकप्रिय नेता असलेल्या नवाजना आरोपात गोवून निवडणुकीतून बाद करण्यासाठी न्यायाधीशांवर लष्कराने दबाव आणल्याचा गवगवा झालेला होता. आता त्याला एका ज्येष्ठ न्यायाधीशाकडूनच दुजोरा मिळालेला आहे. त्या जाहीर आरोपामुळे मात्र लष्कराची पळापळ झाली असून, सेनेतर्फे सुप्रीम कोर्टाने त्यात हस्तक्षेप करण्याची मागणी झालेली आहे; पण सुप्रीम कोर्टच नवाज शरीफ यांना गुंतवण्यात सहभागी झालेले असेल, तर आपल्याच एका न्यायाधीशाच्या आरोपांवर ते काय करू शकणार आहे? ज्या दबावाचा उल्लेख शौकत अझीज करतात, तो सुप्रीम कोर्टावरही असेल, तर सेनेची हस्तक्षेपाची मागणी निव्वळ मानभावीपणाच नाही काय? मतदान व त्याचे निकाल पाकिस्तानला अराजकाच्या गर्तेत घेऊन जाणार, हे निश्‍चित.

एका बाजूला असा राजकीय गोंधळ उडालेला आहे आणि एकूणच प्रशासकीय अराजक माजलेले असताना, आर्थिक दिवाळखोरीच्या कडेलोटावर पाकिस्तान येऊन उभा राहिलेला आहे. मागल्या काही वर्षांत जगातून मिळणारी मदत व अनुदान घटल्याने पाकिस्तानला कर्जाच्या गर्तेत जावे लागलेले आहे. अमेरिकेने हात आखडते घेतले आणि अरबी मुस्लिम तेलसंपन्‍न देशांनीही दुजाभाव दाखवलेला होता. त्याच्या परिणामी, पाकिस्तानला अधिकाधिक चीनच्या आहारी जावे लागले आणि पाकिस्तानची अर्थव्यवस्था आज कमी-अधिक चीनकडे गहाण पडलेली आहे. पाक-चीन महामार्गाची महत्त्वाकांक्षी योजना पाकला कर्जाच्या डोंगराखाली चिरडणारी ठरलेली आहे. त्यातही आता बुडत्याचा पाय खोलात म्हणतात, तशी स्थिती आलेली आहे. ताज्या बातमीनुसार पन्‍नास अब्ज डॉलर्स गुंतलेल्या या योजनेचे काम सर्वत्र अर्धवट पडलेले असून, जून महिन्यात पाच अब्ज डॉलर्सचे चेक देण्यात आले, ते खोटे पडले आहेत. इतक्या मोठ्या रकमचे येणे थकल्याने बहुतांश कंत्राटदारांनी जागोजागी काम थांबवलेले आहे.
पाच अब्ज डॉलर्स म्हणजे पाचशे कोटी डॉलर्स इतकी रक्‍कम असून, पाकिस्तानी रुपयांच्या हिशेबात ती पन्‍नास हजार कोटी रुपये इतकी होते. पश्‍चिम चीनला अरबी समुद्राशी ग्वादार बंदराने जोडणार्‍या या महत्त्वाकांक्षी योजनेवर चीन-पाकिस्तान मैत्री उभी आहे. तीच योजना या चेक हुकण्याने डगमगू लागली आहे. राजकीय नेतृत्वाची गळचेपी व मित्र चीनची दगाबाजी, अशा भोवर्‍यात पाकिस्तान सापडलेला आहे. त्यातच इम्रान खानसारख्या उथळ राजकीय अननुभवी नेत्याच्या हाती देशाची सूत्रे देण्याचा पाकसेनेचा डाव त्यांच्यावरच दिवसेंदिवस उलटत चालला आहे. अशा वेळी जनतेचा विश्‍वास नसलेल्या निवडणुका होऊन ज्याला कोणाचे नेतृत्व देशाच्या माथी मारायला लष्कर निघालेले आहे, ते विनाशाला आमंत्रणच आहे. कारण, त्यातून प्रथमच जिहादी निवडणूक रिंगणात आलेले असून, कुठलाही अनुभवी राजकीय नेता तोल सावरण्यासाठी उपलब्ध नाही. लोकसंख्येतील सुशिक्षित व बुद्धिमान वर्ग वैफल्यग्रस्त झालेला असून, प्रशासकीय यंत्रणा कोसळून पडलेली आहे. त्यामुळे उद्या निकाल लोकांचा अपेक्षाभंग करणारे लागले, तर जो लोकक्षोभाचा भडका उडेल, तो रणगाडे व बंदुकांनी आवरता येणारा नसेल. आधीच चीन त्यातून आर्थिक तोट्यात गेला असून पाकिस्तानातले अराजक आवरण्यासाठी तो कुठलीही मदत करण्याची शक्यता नाही. परिणामी, जिहादी व लष्करातील नाराजांनी उठावाला प्रोत्साहन दिल्यास पाकिस्तानचा सीरिया-इराक व्हायला वेळ लागणार नाही. कारण, अशा सगळ्या जागतिक जिहादची रोपवाटिकाच मुळात पाकिस्तानात होती आणि त्या विषवल्लीला पोषक हवामान खुद्द पाकिस्तानातच तयार झाले आहे. ती म्हणूनच क्षोभाची ठिणगी आज, बुधवारी होणार्‍या मतदानातून टाकली जाण्याचे भय जाणकारांना चिंतीत करणारे आहे.

No comments:

Post a Comment