Total Pageviews

Friday 4 May 2018

होता जिवा, म्हणून वाचला शिवा-आज जिवाजी यांची ३०६ वी पुण्यतिथी जिवाजी महाला यांच्या पराक्रमास मानाचा मुजरा

वाचताना अंगावर काटा येतो

" जिवा महाला "*

उमरठ हे गाव तसं ३५० वर्षांपूर्वी जेमतेम एक हजार वस्तीचे गाव.
सुभेदार तानाजी मालुसरे यांचे हे गाव.
गावात चारचौकी वाडा होता तानाजीरावांचा.

आज गावची यात्रा भरली होती. गावात सायंकाळी कुस्तीची दंगल भरवण्यात आली होती.

राजांची आणि तानाजीरावांची मैत्री लहानपणापासूनची. मिसरूड फुटायचं व्हतं त्यावेळचे सवंगडी.

आज कुस्ती होती लखू बेरड या नावाजलेल्या पैलवानाची, त्याचे वस्ताद होते खुद्द बाजी पासलकर.

आणि त्याच्याबरोबर लढणारा होता तो भिकाजी ढेरे. हा हिरडस मावळातला.वस्ताद होते खुद्द फुलाजी बांदल.

वास्तविक सर्व जण शिवाजी राजांना पाहायला जमणार होते आणि का नाही जमणार ??
लेकीसुना, संत सज्जन ,गाई वासरे सारे सारे सुखावले होते राजांच्या मुळे. स्वराज्य आणले होते ..!

मैदान खचाखच भरले होते. लहान मोठ्या कुस्त्यांना प्रारंभ झाला.

आणि पूर्वेकडून दस्तुरखुद्द शिवाजीराजे भोसले यांचे अश्वदल दाखल झाले.
राजीयांनी पांढरा अंगरखा घातला होता.

कृष्णा घोडीवर स्वार होते आणि कमरेला  तलवार बांधली होती. जणू सह्याद्रीचे दैवत भासत होते.

राजे खाली उतरले ..

तानाजीराव आपल्या फौजेसह राजांना भेटायला वाटेतच थांबले होते. राजांनी तानाजीरावांना मिठी मारली.

तितक्यात खबर आली की, बाजी पासलकर यांच्या गावी रात्री नरभक्षक वाघाने हल्ला चढवला होता. त्यात लखू बेरड स्वत: वाघाशी चार हात करायला गेला .

वाघाने त्याच्या पायाला जबर दुखापत केली.
मात्र वाघाला नुसत्या हाताने ठार केले लखुने.

हे ऐकून मैदान शांत झाले. खूप आशेने लोक कुस्त्या पाहायला मैलोन् मैल आले होते.

आता भिकाजीला १० शेर वजनाचे कडे आयते बक्षीस मिळणार होते तेही राजांच्या हस्ते

'' मंडळी, लखू बेरडाने काल नुसत्या हाताने वाघाला ठार केले ,पण त्याच्या पायाला जबर दुखापत झाली आहे. म्हणून तो आज लढू शकत नाही.

या गावात असा कोण आहे का जो या भिकाजीशी दोन हात करू शकेल ?असेल तर समोर या.''

ही घोषणा ऐकून मैदानाच्या पश्चिमेकडे कुजबूज सुरु झाली.

एक भाल्यासारखा उंचापुरा रांगडा गडी कपडे काढून लांघ चढवून मैदानात येत होता. सर्व लोक जोरात ओरडत होते त्याला पाहून.
राजे सर्व पाहत होते.

तितक्यात कोणीतरी किंचाळला... 

''आरं आला रं जिवा आला ''
राजांनी चौकशी केली तानाजीरावांपाशी ..
तानाजी म्हणाले, ''राजं , ह्यो जिवाजी ,आपल्या हिकडचाच हाय, कुस्तीत लय भारी पवित्रा हाय याचा. दांडपट्टा तर लय चोख..फक्त परिस्थती नाय ..याचं वडील आपल्या थोरल्या महाराजान्सागट होतं..

निजामशाहीचा दंगा झाला तवा ह्येच्या बाचा उजवा पाय निकामी झाला..तेनच याला तयार केलाय."
राजांच्या चेहर्‍यावर एक तेज आले होते.

कुस्तीची सलामी झडली .

भिकाजी ने ठोक्यावर ठोके टाकून जिवाला नमवण्याचा प्रयत्न केला ,पण जिवाजी पण तितक्याच ताकतीने तो चुकवत होता. डाव-प्रतिडाव करत एक अर्धा तास गेला.

भिकाजीने उसन्या अवसानाने पळत येवून पटात शिरायचा प्रयत्न केला ,पण सावध जिवाने फिरवून बाहेरची टांग लावली...भिकाजी अक्षरक्ष ५-६ फुट उडून पाठीवर पालथा झाला.

सगळे प्रेक्षक वेड्यासारखे आत घुसले. जिवाला अक्षरशः डोक्यावर घेवून नाचू लागले. 
तितक्यात शिंगे-करणे गरजू लागली. खुद्द राजे येत होते.

पटापटा सर्व बाजूला झाले.
राजीयांनी हासत हासत जिवाला मिठीच मारली. मनात काय राजकारण होते माहीत नव्हते; मात्र राजे जाम खुश झाले होते.
राजांनी १० शेराचे सोन्याचे कडे जिवाला बक्षीस दिले..आणि विचारले..

"जिवा काय करतोस ??"
जिवा उद्गारला ,'' काय नाय, वरातीत पट्टा फिरवतो, दंगलीत कुस्त्या खेळतो.''

राजे हसले आणि म्हणाले ..''येशील आमच्या सोबत ?....
पट्टा फिरवायचा आणि कुस्तीही खेळायची.....फक्त गानिमांच्यासोबत..!!
आहे कबूल ..??"

जिवा हसला...होकारार्थी मान हलवून त्याने मुजरा केला.

आणि 

हाच तो जिवा महा*ला ज्याने अफजलखानाचा अंगरक्षक सय्यद बंडाचा हात वरच्यावर उडवून राजांचा प्राण वाचवला

आज जिवाजी  यांची  ३०६ वी  पुण्यतिथी

जिवाजी महाला यांच्या पराक्रमास मानाचा मुजरा   

म्हणूनच तर म्हणतात 

होता जिवा, म्हणून वाचला शिवा

No comments:

Post a Comment