Total Pageviews

Friday 18 May 2018

खुलेगा झोजिला जुडेगा देश : एक ऐतिहासिक प्रकल्प-NIHARIKA POL -TARUN BHARAT


श्रीनगर ते लेह हा मार्ग खरं तर अतिशय खडतर. त्यातील झोजिलामार्ग वर्षाचे ६ महीने बर्फाखाली. असे असताना तेथील नागरिकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, भारतीय लष्करासाठी एक महत्वाची बातमी म्हणजे आता केंद्र सरकार आणि रस्ता वाहतूक मंत्रालयातर्फे झोजिला मार्गाला वर्षभर काश्मीर आणि संपूर्ण देशाशी जोडण्यासाठी "झोजिला" हा बोगदा तयार करण्यात येत आहे. १४.२ किलोमीटर पर्यंत असलेल्या या बोगद्यामुळे आता पूर्ण वर्षभर हा भाग केवळ राज्यासोबतच नाही संपूर्ण भारतासोबत जोडला जाऊ शकेल. उद्या म्हणजेच १९ मे २०१८ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमीपूजन करण्यात येणार आहे. काश्मीरच्या जनतेसाठी आणि एकूणच देशासाठी सगळ्यात महत्वाची असलेली बाब म्हणजे संपूर्ण आशिया खंडातील हा सगळ्यात मोठा द्वि-दिशात्मक बोगदा असणार आहे. हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी ७ वर्षे लागणार आहेत, मात्र ४ वर्षातच हा प्रकल्प पूर्ण करावा असा सरकारचा मानस आहे.

 हा बोगदा नसल्याने येथील नागरिकांपुढे असलेल्या समस्या : 

काश्मीरला लेह सोबत जोडण्यासाठी झोजिला मार्ग खूप महत्वाचा आहे. या मार्गाचे येथील नगरिकांसाठी खूप महत्व आहे त्याचे कारण : 

१. हा बोगदा नसल्याने एकूण ३.३० तास प्रवास करावा लागतो. 

२. बर्फाळ प्रदेश असल्याकारणाने हा मार्ग ६ महीने बंद असतो. 

३. या कारणाने येथील नागरिकांना, विद्यार्थ्यांना, व्यापाऱ्यांना आणि लष्करातील जवानांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो. 

४. येथील नागरिकांचा संपूर्ण जगासोबत संपर्क ६ महिन्यांसाठी तुटतो. त्यामुळे त्यांना दरवर्षी ६ महिन्यांसाठी तरतूद करुन ठेवणे भाग असते 

५. हा मार्ग अत्यंत खडतर आहे. 

६. लष्कराच्या जवानांचे देखील या ६ महीन्यात खूप हाल होतात, त्यामुळे या बोगद्याचा निर्माण झाल्यानंतर लष्कराच्या जवानांना देखील मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. 

बोगद्याचे महत्व :

१. हा बोगदा झाल्यानंतर श्रीनगर आणि लेह यांच्यात असलेल्या प्रवासाचा अवधि कमी होईल. म्हणजेच आता ३.३० तासाऐवजी केवळ १५ मिनिटेच प्रवास करावा लागेल, त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल.

२. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे हा बोगदा झाल्यानंतर झोजिला मार्ग संपूर्ण १२ महीने सुरु राहील. यामुळे नागरिकांचे जीवन सुरळीत सुरु राहील आणि त्यांना कुठल्याही प्रकारची तरतूद करणे भाग पडणार नाही.

३. लष्करातील जवानांसाठी याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल कारण लष्कराला १२ महीने रसद मिळू शकेल आणि बर्फाच्छादित प्रदेशात त्यांचे हाल होणार नाहीत.



केवळ २५ गावांसाठी इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च का

या प्रकल्पासाठी केंद्र सरकारतर्फे एकूण ६८०९ कोटी रुपयांचा निधी सरकारने मंजूर केला आहे. या प्रकल्पाशिवाय आता पर्यंत केंद्र सरकारने काश्मीरसाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केला आहे, त्यामुळे केवळ २५ गावांच्या विकासासाठी इतका मोठा निधी का? असा प्रश्न उपस्थित झाला असता, केंद्र सरकारचे हे मतपेटीचे राजकारण नसून काश्मीरचा विकास करून संपूर्ण देशाचा विकास करण्याचे उद्दिष्ट्य असल्याचे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे प्रश्न केवळ काही गावांचा, मतदार संघाचा किंवा सरकारचा नाही तर नागरिकांच्या विकासाचा आहे, असे दिसून येत आहे.


नवीन रोजगारांची निर्मिती : 

या बोगद्यामुळे लेह आणि लडाख तसेच काश्मीरच्या जनतेला व या मार्गाच्या आजू बाजूला असलेल्या २५ हून अधिक गावांना याचा मोठा फायदा होणार आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणेज यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करण्यात येईल असे आश्वासन सरकारतर्फे देण्यात आले आहे. एकूणच दळण - वळणाचा विकास झाला की संपूर्ण क्षेत्राचा विकास नक्कीच होतो. त्याप्रमाणेच या बोगद्यामुळे पर्यटनाचा विकास होईल आणि त्यामुळे येथील युवा नागरिकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी देखील मिळतील. 




पूर्वाचंल आणि जम्मू- काश्मीरकडे केंद्र सरकारचे विशेष लक्ष :

एकूणच गेल्या २-३ वर्षात केंद्र सरकार भारताच्या पूर्वांचल भागाच्या आणि जम्मू काश्मीरच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात कार्य करत आहे, असे दिसून येत आहे. याचे मोठे कारण म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून देशासाठी अत्यंत महत्वाचे असलेले हे दोन भाग आता पर्यंत दुर्लक्षित होते, त्यामुळे या भागांचा विकास झाल्यावरच देशाचा खऱ्या अर्थाने विकास होईल हे लक्षात घेत केंद्र सरकार आता या भागांकडे विशेष लक्ष देत आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

ऐतिहासिक दृष्ट्या महत्व :

झोजिला या भागाचे ऐतिहासिक दृष्ट्या देखील खूप महत्व आहे. १९४७ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या युद्धादरम्यान या भागावर पाकिस्तानी सैन्याने कब्जा केला होता. हा भाग कारगिलच्या खूप जवळ आहे. त्यावेळी भारतीय सेनेने 'ऑपरेशन बायसन' राबवत या भागावर पुन्हा एकदा नियंत्रण मिळवले. त्यामुळे ऐतिहासिक दृष्ट्या देखील या भागाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

एकूण सर्व महत्वाच्या गोष्टी बघता ऐतिहासिक दृष्टीकोनातून, सामाजिक दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या, दहशतवाद आणि इतर समस्या तसेच रोजगार निर्मिती आणि पर्यटन असे सगळेच विषय लक्षात घेता हा प्रकल्प खूप महत्वाचा आहे. हा प्रकल्प वेळेत पूर्ण झाल्यास निश्चितच नागरिकांना आणि जागतिक पातळीवर भारताला याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल.


No comments:

Post a Comment