Total Pageviews

Friday 25 May 2018

भगवद्‍गीता भाग – 1-सुरेश कुळकर्णी -महा एमटीबी


1.
कृष्णाने अर्जुनाचा रथ सैन्याच्या पुढे आणला. त्याच्या ध्वजावर हनुमान विराजित होते. धृतराष्ट्रपुत्र आणि पितामह भीष्मांनी रचलेला सेनाव्यूह त्याला दिसला. अर्जुनाने गांडीव धनुष्य हाती घेत, श्रीकृष्णाला रथ मध्यावर नेण्यास विनविले. तो म्हणाला, ’’कृष्णा, मला आमच्याविरुद्ध लढायला आलेल्या सर्व वीरांना पाहायचे आहे. मी कोणाशी लढणार ते मला कळले पाहिजे.’’ कृष्णाने रथ मधोमध नेला आणि म्हणाला, ’’अर्जुना पाहा! भीष्म, द्रोण यांचे नेतृत्त्व लाभलेले हे कौरवांचे सैन्य पाहा! तुझ्या हातून मरण मिळावे म्हणून हे सारे इथे जमले आहेत.’’ अर्जुनाने पाहिले. त्यात त्याला प्रिय असलेले अनेक वीर दिसले. त्यात त्याचे पितामह, गुरु, चुलते, भाऊ व अनेक मित्र होते. एकदम त्याच्या हृदयात कणव दाटून आली. कातर आणि थरथरत्या आवाजात तो कृष्णाला म्हणाला, ’’भयंकर दुबळेपणा माझ्यात आला आहे असे मला का वाटते आहे. माझ्या मुखाला कोरड पडली आहे, शरीर थरथरत आहे, शिर गरगरत आहे, मला मूर्च्छा येईल असे वाटत आहे. पायाखालील जमीन सरकत आहे, ज्वराने माझे शरीर तप्त झाले आहे. माझ्या हातातले गांडीव धनुष्य गळून पडते आहे. मला माझेच सर्व आप्त समोर दिसत आहेत, तर त्यांच्याशी मी कसा लढू? कृष्णा, मी माझ्याच माणसांना ठार करु शकत नाही. त्यातून काही चांगले उत्पन्न होईल असे वाटत नाही. मला हे युद्ध जिंकायची इच्छा नाही. मला कोणतेही राज्य नको किंवा इहलोकीचे कुठलेही सुख नको! ते पापी, लोभी आहेत हे मला जरी माहिती असले, तरी ते माझे नातेवाईक आहेत. आपल्याच नात्यातील लोकांना मारणे महापाप आहे! त्यापेक्षा मी युद्धाकडे पाठ फिरवेन. दुर्योधनाने मला ठार केले तरी चालेल. मला हे युद्धच करायचे नाही,’’ असे म्हणून अर्जुन रथातच कोसळला! त्याने धनुष्य आणि बाण फेकून दिले. त्याचे डोळे अश्रूंनी भरून आले. हृदय करुणेने भरले होते. कृष्ण त्याच्याकडे पाहतच राहिला. तो म्हणाला, ’’अर्जुना, तू असा अस्वस्थ का? अरे अशा गंभीर प्रसंगी असा का हातपाय गाळतो आहेस? तू आपल्या भावना आवर, असे भावुक होऊन चालणार नाही. अशाने तू स्वर्गापासून वंचित होशील. तुला या भावनेत असे वाहून जाणे चांगले दिसत नाही, लोक तुला नावे ठेवतील, तुझ्या नावाला कलंक लागेल. तू पुरुष आहेस हे विसरू नकोस! युद्धाला तयार हो.’’

अर्जुन काही निराशेतून बाहेर पडेना. तो म्हणाला, ’’या माझ्या पितामहंना, माझ्या गुरूंना माझ्या बाणांनी मी कसा मारू? अरे ज्यांची मी पूजा करावी त्यांनाच मी ठार मारू? हे ठीक नाही. मग मला मिळणार्‍या प्रत्येक सुखावर त्यांच्या रक्ताचे डाग असतील! मी भ्याड नाही आहे हे तुलादेखील ठाऊक आहे. हा दुबळेपणा नाही. ही शत्रूविषयी वाटणारी करुणा आहे. मला काहीच कळत नाही आहे. मी काय करू? तूच मला सांग. मी तुझ्या हाती सर्व सोपवितो...’’ आणि युद्ध करायला नकार देऊन अर्जुन शांत बसून राहिला. कृष्ण हसून म्हणाला, ’’अर्जुना, ज्यांच्यासाठी दु:ख करू नये, त्यांच्यासाठी तू उगीच दु:ख करत आहेस! आपण कोणीतरी महान प्रज्ञावंत आहोत असे तू बोलतो आहेस. अरे आत्मा हा अविनाशी असतो. हे शरीर अशाश्वत असते. प्रत्येक जण जीवनात बालपण, तारुण्य आणि वार्धक्य या अवस्थांतून जातोच ना? जशा या तीन अवस्था नैसर्गिक तसेच मरणही नैसर्गिक आहे. ती चौथी अवस्था आहे! ज्याप्रमाणे वस्त्र जुने आणि जीर्ण झाल्यावर आपण ते टाकून देतो, तसेच हे शरीर जुने आणि जीर्ण झाले की आत्मा ते टाकून देतो. सुख आणि दु:ख हे तर तात्पुरते ढग आहेत. ते येतील आणि जातील. ते कायमचे टिकत नसतात. अरे तुला वाटते की, तू एखाद्याला ठार मारत आहेस आणि त्यालाही वाटते की तो ठार मारला जात आहे, पण इथे तुम्ही दोघेही चुकता. अरे जो जन्माला आला आहे तो मरू शकत नाही. शरीर मेले तरी आत्मा मरू शकत नाही. शस्त्रे आत्म्याला मारू शकत नाहीत, अग्नी त्याला जाळू शकत नाही, पाणी त्याला बुडवू शकत नाही, वायू त्याला कोरडा करू शकत नाही! एकदा तुला आत्मा अविनाशी असतोया सत्याचा साक्षात्कार झाला की, मग तुला दु:ख होणे शक्य नाही. अरे ज्या क्षणी माणूस जन्मतो, त्याच क्षणी त्याचा मृत्यू समय ठरलेला असतो. जो जन्म घेतो, त्याचा मृत्यूदेखील निश्चित असतो आणि ज्याचा मृत्यू होतो, त्याचा पुनर्जन्म पण ठरलेलाच असतो. त्यामुळे तू अजिबात दु:ख करू नकोस. हे सर्व बाजूला ठेवले, तरी तू तर जन्माने क्षत्रिय आहेस आणि म्हणून तुला लढले तर पाहिजेच! ते तुझे आद्य कर्तव्य आहे. अरे हा सुयोग तुझ्याकडे योगायोगाने चालून आला आहे आणि स्वर्गाची द्वारे तुझ्यासाठी उघडली आहेत. तू आता जर कच खाल्लीस, तर ते महापाप ठरेल. सर्व जग तुला नावं ठेवेल आणि ते मरणाहून दु:खद असेल. तुला कोणीच समजून घेणार नाहीत. तू भ्याड आहेस असेच ते म्हणतील. तुला तुच्छ समजून, तुझी अवहेलना करतील. तुझे शत्रू तुला हसतील, तुझी निंदा करतील! तुला युद्धात मरण आले, तर तुझी जागा स्वर्गात निश्चित आहे आणि जिंकलास तर तू या पृथ्वीवर राज्य करशील. तेव्हा तुझे मन तयार कर आणि या युद्धास उभा राहा. तू लढलेच पाहिजेस. अरे तू सुख-दु:ख, लाभ-हानी, जय-पराजय या सर्वांकडे समदृष्टीने पाहा, अस्वस्थ होऊ नकोस. युद्धाला तयार हो. तुला कोणतेही पाप लागणार नाही.’’ (क्रमश:)

No comments:

Post a Comment